सुभाष शिंदेंची कला आणि अवकळा

पारीचा स्वयंसेवक संकेत जैन याला भारतभरातल्या ३०० गावांना जायचंय आणि इतर गोष्टी तर लिहायच्या आहेतच पण मुख्यम्हणजे ही मालिका तयार करायचीयेः गावातल्या एखादं दृश्य आणि त्या छायाचित्राचं हुबेहूब रेखाचित्र. त्याच्या या मालिकेतलं हे पहिलंपान. छायाचित्र किंवा रेखाचित्र पूर्ण पाहण्यासाठी त्यावरील पट्टी हवी तिथे सरकवा

“मी नकली सिंघम हाय, पण मी माझ्या पोरावाला असली सिंघम बनविणार हाये,” उस्मानाबाद जिल्ह्यातल्या समुद्रवाणी गावातले बहुरुपी सुभाष शिंदे त्यांचा इरादा सांगतात. बहुरुपी लोक कलावंत आहेत, पुराणातली पात्रं वठवणारे पारंपरिक कथाकार आहेत. अलिकडे ते पोलिस, वकील किंवा डॉक्टरचंही सोंग घ्यायला लागलेत.

३२ वर्षीय सुभाष पोटापाण्यासाठी हजारो किलोमीटर भटकंती करणाऱ्या नाथपंथी डवरी गोसावी या जमातीचे आहेत. ते महाराष्ट्रातल्या गावांमधून एका वस्तीतून दुसऱ्या वस्तीत (आणि कधी कधी दारोदार) फिरतात आणि लोकांना विनोदी कविता ऐकवतात. गेल्या २० वर्षांपासून त्यांचा दिनक्रम असाच आहे. या कलेवर पोट भरणारे ते त्यांच्या घराण्यातले चौथ्या पिढीचे आणि बहुधा शेवटचेच सदस्य आहेत. “मी १२ वर्षांचा होतो तेव्हापासून ही भटकंती चालूच आहे. अलिकडे लोकावाला करमणुकीसाठी लई गोष्टी हायता, त्यामुळे आमची कला आता जास्त लोक बघंना गेलेत. आता काय, इंटरनेटवर बहुरुप्याचे व्हिडिओ यायलेत – मंग ही कला पहायला पैसे कशाला द्यावे असं लोकावाली वाटाया लागलंय.”

लहानपणापासूनच घरच्यांबरोबर भटकंती करत राहिल्याने सुभाष यांना औपचारिक शिक्षण मिळालेलं नाही आणि त्यांनी “शाळेची पायरीसुदिक पाह्यलेली नाही.” वरील छायाचित्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या रूई गावातलं आहे. ते आणि त्यांची पत्नी इथे जीर्ण अशा, पिवळ्या प्लास्टिकचं छत केलेल्या तंबूत मुक्काम करून राहतायत. “आमचा पक्का ठावठिकाणा न्हाई आन् रस्त्याच्या कडंला असं तंबूत ऱ्हायाचं, लई अवघडे,” ते तक्रारीच्या सुरात सांगतात. “आधी लोक आम्हाला धान्य द्यायाचे, पर आता रुपया किंवा झालंच तर दहा रुपये टाकतात – दिवसाला १०० रुपये कमवित असू आम्ही.”

सुभाष शिंदेना दोन मुली आणि एक मुलगा आहे. तिघंही उस्मानाबादेत आपल्या आजी-आजोबापाशी राहून शाळा शिकतायत. हे असं गरिबीचं जिणं त्यांच्या वाटेला येऊ नये म्हणून त्यांनी या कलेत यावं असं काही शिंदेंना वाटत नाही आणि “या कलेला मान नाही” हेही आणखी एक कारण. “आम्ही ही परंपरागत कला सादर करतो तर लोक आम्हाला हसतात, आमचा अपमान करतात. असं इनोदी कविता सांगून पैशे मागण्यापरीस कुठं कंपानीत काम का करीनास असा सवाल असतो लोकावाचा.”

अनुवादः मेधा काळे


Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is also a translator for PARI.

Sanket Jain

Sanket Jain is a journalist based in Kolhapur, Maharashtra, and a 2019 PARI Fellow.

Other stories by Sanket Jain