मी मुंबईतल्या ज्या झोपडपट्टीत लहानाची मोठी झाले, तिथे रोज संध्याकाळी ६ च्या सुमारास किराणा दुकानाबाहेर खूप गर्दी जमायची. ते साल म्हणजे २००० चं. पाव किलो तांदूळ, १ रुपयाचं तिखट-मीठ, एक-दोन रुपयांचं तेल, चाराणे-आठाण्याची राई-हळद वगैरे, एक-दोन कांदे, पाव किलो तूरडाळ आणि गव्हाचं पीठ, स्टोव्ह पेटवण्यापुरतं घासलेट अशी सगळी सामग्री घ्यायला किरकोळ ग्राहक त्या मोठाल्या दुकानासमोर गर्दी करायचे.

ते लोक १५० रुपयांच्या रोजंदारीतून रोज थोडं-थोडं सामान भरायचे. २५ आणि ५० पैसेही चलनात होते तेंव्हा. अगदी स्वस्तातला स्वस्त तांदूळही २० रुपये किलोला आणि तुरीची डाळ २४ रुपये किलोला मिळायची. बहुतेक लोक पाव किलो-अर्धा किलो असंच खरेदी करायचे. कुणास ठाऊक, पण आमच्या राशनच्या दुकानावर आम्हाला फक्त साखर, पाम तेल आणि घासलेट मिळायचं. बाकी सगळी खरेदी किराणा दुकानातूनच व्हायची.

सकाळी ८ वाजल्यापासून सलग काम करून थकून भागून आलेली मजूर मंडळी ७०-८० रुपयांची सामग्री विकत घेऊन ३-४ जणांच्या दिवसभराच्या खाण्याची सोय करायची. महिन्याचं घराचं भाडं, वीजबील, पाणीबील, याचा हिशोब मांडून उरलेली रक्कम – रू. २,००० हून कमी – महिन्याअखेरीस पोस्टाने किंवा कोणी ओळखीचं जात असल्यास त्याच्या हाती गावी पाठवली जायची.

रोज कमवा, रोज भागवा असं त्यांचं आयुष्य. आमचं घरही लिंबू-मिर्ची विकून चालायचं, त्यामुळे रोजची कमाई. मग आई रोज संध्याकाळी मला दुकानात पाठवायची, थोडं-थोडं तिखट-मीठ-तांदूळ आणायला. मी तेंव्हा नऊ वर्षांची होते. मला दुकानातल्या आज्जी “काय पाहिजे तुला?” असं विचारेपर्यंत मी नुसतं त्यांच्याकडे पाहत राहायचे.

राशनच्या दुकानावर बरेच चेहरे ओळखीचे झाले होते. मग एकमेकांना नुसतं पाहून हसायचो. ते मराठीत बोलत नव्हते. पिक्चरमध्ये जसं बोलतात, त्या हिंदी भाषेत बोलायचे. ते दुसऱ्या राज्यातून आले असावेत, याची काहीच कल्पना नव्हती मला.

अगदी अरुंद गल्ल्यांमध्ये एकमेकांना चिकटून असलेल्या, दहा बाय दहाच्या आमच्या खोल्या. आजही या शहरात निमुळत्या गल्लीबोळात अशी लागून असलेली बरीच घरं आहेत. काही घरांमध्ये १०-१२ जणही एकत्र भाड्यानं राहायचे, सगळे पुरुषच असायचे. काही घरांमध्ये बिऱ्हाडंही असायची.

चित्र: अंतरा रामन

“क्या भाभी, खाना हो गया?” असं म्हणत माझ्या आईला आवाजही देऊन जायचे. तर कधी मला “पढाई हो गयी?” असं विचारायचे. कधी सुट्टीच्या दिवशी दाराच्या उंबरठ्यावर बसून बोलत बसायचे. “अब क्या बताये भाभी, खेती तो होती नहीं, ना पिने को पानी, ना नोकरी. तो आ गये दोस्तो के साथ बंबई. अब बच्चो का जिंदगी तो बनाना है ना.”

हिंदी चित्रपटांमुळे त्यांचं हिंदीतलं बोलणं थोडं समजून येत होतं. त्यावर आईचं मोडक्या-तोडक्या हिंदीत उत्तर देणं. पण संवाद, विचारपूस कधीच नाही थांबायची. त्यांची मुलं आमच्यासोबत मराठी माध्यमातच शिकायची. आम्ही एकत्र खेळायचो, एकमेकांची भाषा समजून घ्यायचो.

पण वर्षभरानंतर ते निघून जायचे.

ती सगळी कामगार, मजुरांची कुटुंबं होती. गगनचुंबी, आकर्षक अशा इमारती, उड्डाणपुलं, रस्ते, विविध कंपन्यांतल्या उत्पादन-वस्तू, सारं काही त्या मजुरांच्या मेहनतीवर. या देशाची अर्थव्यवस्था निव्वळ त्यांच्याच बळावर. त्यांचं स्थलांतर मात्र कायम सुरूच. आज इथे, तर उद्या तिथे. शहर मुंबई असो किंवा इतर कुठलं, त्यांना स्थिरता नसते.

सगळं तात्पुरतं असतं. राहण्यापासून-खाण्यापर्यंत सर्वकाही.

आज दोन दशकांनंतर खर्च पैशांवरून शेकडोंच्या घरात आलाय. माझ्यासाठी मात्र आजचं २०२० हे कोरोना महामारी आणि टाळेबंदीचं वर्ष तिथेच स्थिरावलंय, २००० च्या त्या सालात.

आज माझ्या शेजारच्या मजुराचा चेहरा बदललाय, पण त्याची व्यथा २० वर्षांपूर्वीचीच आहे. तो आज शेजार सोडून निघून गेलाय, पण नेहमीसारखा नाही. त्याने त्याच्या गावचा रस्ता धरलाय – जोखमीचा, असहायपणाचा, नाईलाजाचा रस्ता.

चार भिंतींच्या आत चालणारं शासन, प्रशासन, सरकार, व्यवस्थेला, उपाशी पोटी मैलोंचं अंतर पायी केल्यानं किती शीण येतो याची तिळमात्रही कल्पना नाही. थकून, गळून पडलेल्या शरीराला अंगाखाली लागत असलेला दगडही मऊ गादीसारखा वाटू लागतो. मग त्यांची वाटचालच थांबते, त्यांचा प्रवास त्या दगडाखालीच चिरडला जातो. गोंधळलेली व्यवस्था आणि संभ्रमित निर्णयांमुळे भरडला जाणारा तोच हा ‘स्थलांतरित मजूर’.

Jyoti Shinoli is a Senior Reporter at the People’s Archive of Rural India; she has previously worked with news channels like ‘Mi Marathi’ and ‘Maharashtra1’.

Other stories by Jyoti Shinoli
Illustration : Antara Raman

Antara Raman is an illustrator and website designer with an interest in social processes and mythological imagery. A graduate of the Srishti Institute of Art, Design and Technology, Bengaluru, she believes that the world of storytelling and illustration are symbiotic.

Other stories by Antara Raman