श्रीमंत असो वा गरीब, तरुण असो वृद्ध, प्रत्येकाने आपापले जोडे काढून महाराजांच्या पायाला हात लावायचे होते. पण, एक साधासा तरुण त्यांच्या डोळ्यात पाहत राहिला, एखाद्या गजासारखा ताठ उभा राहिला. वाकण्यास नकार दिला. कोणता मतभेद निर्दयीपणे चिरडून टाकण्याची ख्याती असलेल्या राजासमोर केलेल्या या उघड विद्रोहाने पंजाबच्या जोगा गावातील ज्येष्ठ मंडळी घाबरून गेली आणि अत्याचारी राजादेखील संतापला.

या तरुणाचं नाव जागीर सिंग जोगा होतं. सेंट्रल इंडस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ)ची कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने बॉलिवूड तारका आणि आता हिमाचल प्रदेशातल्या मंडीची खासदार कंगना रनौत हिच्या कानशिलात मारली त्याच्या नऊ दशकं आधी जागीर यांनी असाच धाडसी आणि वैयक्तिक निषेध व्यक्त केला होता. जोगाची नाराजी पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंग यांच्यावर होती, ज्यांच्या सरंजामी गुंडांनी गरीब शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला होता. ते १९३० चं दशक होतं. त्यानंतर लगेच जे घडलं ते लोककथा आणि इतिहासात हरवून गेलं आहे. पण जोगा जगला. अशाच लढाया लढण्यासाठी.

दशकभरानंतर जोगा आणि तत्कालीन लाल पक्षाच्या त्याच्या साथीदारांनी किशनगढ (सध्याच्या संगरूर जिल्ह्यात) भोवती एक युगप्रवर्तक संघर्ष केला आणि भूपिंदर सिंग यांच्या मुलाकडून ७८४ गावांतील हजारो एकर जमीन हिसकावून घेतली. ही जमीन त्यांनी भूमीहिनांना वाटली. पटियालाचे माजी राजा, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे भूपिंदर सिंग यांचे नातू.

ह्या जमिनींच्या आणि इतर संघर्षानंतर १९५४ मध्ये जोगा नाभा तुरुंगात होते. कारावासात असतानाही  त्यांना विधानसभेवर निवडून दिलं. १९६२, १९७६ आणि १९७२ मध्येदेखील ते आमदार म्हणून निवडून आले.

PHOTO • Jagtar Singh

डावीकडेः १९३० च्या दशकात जागीर सिंग जोगाची नाराजी पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंग यांच्यावर होती . त्यां च्या सरंजामी गुंडांनी गरीब शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला होता. उजवीकडेः जून २०२४ मध्ये सीआयएसएफमध्ये हवालदार असलेल्या कुलविंदर कौर हिने नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत हिच्या कानशिलात लावून आपला रोष व्यक्त केला

“पंजाबच्या हवेतच विद्रोह आहे. कुलविंदर कौर म्हणजे पंजाबच्या वैयक्तिक, अनेकदा उत्स्फूर्त निदर्शनांच्या पूर्वीपासून चालत आलेल्या साखळीतला एक नवीन दुवा आहे. सुरुवात ना जोगाने होते ना कुलविंदर वर थांबते,” जोगा यांचे चरित्रकार जगतार सिंग सांगतात. जगतार सिंग निवृत्त महाविद्यालयीन शिक्षक असून ‘इन्किलाबी योद्धाः जागीर सिंग जोगा’ या पुस्तकाचे लेखक आहेत.

पंजाबमधले बहुतेक वैयक्तिक विद्रोह अगदी साध्या, सामान्य नागरिकांकडून केले गेले आहे. कुलविंदर ही सीआयएसएफची हवालदार असून ती कपूरथला जिल्ह्याच्या महिवाल गावतल्या एका छोट्याशा शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे. तिची आई वीर कौर हिची कंगना रनौतने टिंगल आणि निंदा केली असे कुलविंदरला वाटतं. वीर कौल आजही शेती करतात.

जोगाच्या आधी प्रेमदत्त वर्माने भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध लाहोर कट खटल्याच्या (१९२९-३०) दरम्यान कोर्टाच्या आत जय गोपाल यांच्यावर चप्पल फेकली होती. “ही पूर्वनियोजित रणनीती नव्हती. वर्मा यांचा निषेध उत्स्फूर्त होता. खटल्याच्या दरम्यान त्याचा आणि इतर आरोपींचा छळ करण्यात आला होता,” असं ‘द भगतसिंग रीडर’चे लेखक प्रा. चमनलाल म्हणतात.

इंग्रजांनी खटला चालवल्याचं नाटक केल्यानंतर, भगतसिंग आणि त्यांच्या दोन साथीदारांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. (त्यांच्यापैकी सर्वात लहान असलेल्या वर्माला पाच वर्षांची तुरुंगवासाठी शिक्षा झाली) बरोबर एक वर्षानंतर, त्यांच्या हौतात्म्याचा पहिला वर्धापन दिन साजरा करत असताना, दिसताक्षणी गोळी घालण्याच्या आदेशाची पायमल्ली करत १६ वर्षीय हरिकिशन सिंग सुरजीत याने होशियारपूर जिल्हा न्यायालयात असलेला ब्रिटिश ध्वज खाली उतरवून भारताचा तिरंगा फडकवला.

“मुळात युनियन जॅक उतरवण्याची साद काँग्रेस पक्षाने दिली होती, परंतु त्यांनी माघार घ्यायला सुरुवात केली. सुरजीतने स्वतः पुढाकार घेतला. नंतर जे घडलं तो इतिहास आहे,” स्थानिक इतिहासकार अजमेर सिद्धू पारीला सांगतात. अनेक दशकांनंतर, आठवणींच्या लडी उलगडत सुरजीत म्हणाले होते, “त्या दिवशी मी जे केलं त्याचा मला आजही अभिमान आहे.” ध्वजारोहण नाट्यानंतर सुमारे सहा दशकांनी, सुरजीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस झाले.

PHOTO • Daily Milap / courtesy Prof. Chaman Lal
PHOTO • Courtesy: Prof Chaman Lal

डावीकडेः १९३० च्या दशकात लाहोर कट खटल्यावरती दि डेली मिलाप या वर्तमानपत्रामध्ये छापून आलेलं एक पोस्टर. प्रेमदत्त वर्मा (उजवीकडे) यांनी भगत सिंग आणि त्याच्या साथीदारांवरचा खटला कोर्टात सुरू असताना माफीचा साक्षीदार झालेला साथी जय गोपाल याच्यावर चप्पल भिरकावली होती

PHOTO • Courtesy: Amarjit Chandan
PHOTO • P. Sainath

डावीकडेः १९३२ साली वयाच्या सोळाव्या वर्षी हरकिशन सिंग सुरजीत यांनी होशियारपूरच्या जिल्हा न्यायालयावरचा इंग्रजांचा बावटा खाली खेचला आणि तिथे भारताचा तिरंगा फडकवला. १९६७ साली फेब्रुवारी महिन्यात पंजाबच्या फिल्लौर विधानसभेत निवडून आल्यानंतर. उजवीकडेः क्रांतिकारक भगत सिंग यांचे भाचे प्रा. जगमोहन सिंग (निळ्या कपड्यांमध्ये) रामगडमध्ये भगत सिंग झुग्गियां यांच्यासोबत

१९३२ च्या ध्वजारोहणाच्या घटनेनंतर काही वर्षांनी, सूरजीत यांचा अगदी कोवळ्या वयातला मित्र भगतसिंग झुग्गियांने सर्वात नाट्यमयरित्या निषेध व्यक्त केला. फक्त ११ वर्षांच्या, शाळेत तिसऱ्या इयत्तेत पहिला आलेल्या झुग्गियांला पारितोषिक मिळालं होतं. शिक्षण विभागाच्या बक्षीस समारंभात मान्यवरांनी त्याला मंचावर बोलावलं आणि ‘ब्रिटेनिया जिंदाबाद, हिटलर मुर्दाबाद’ अशी घोषणा देण्यास सांगितलं. मात्र, या छोट्या झुग्गियांने प्रेक्षकांसमोर येऊन, “ब्रिटानिया मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद”चा नारा दिला.

त्याला मारण्यात आलं, शाळेबाहेर काढण्यात आलं. तो पुन्हा कधी शाळेत जाऊ शकला नाही. पण आयुष्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत झुग्गियांना त्यांनी जे केलं त्याचा अभिमान होता. तुम्ही त्यांची कथा येथे वाचू शकता. २०२२ मध्ये झुग्गियां यांच्या मृत्यूच्या एक वर्ष आधी पारीचे संस्थापक-संपादक पी. साईनाथ यांनी त्यांच्याशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांचे वय ९५ वर्ष होते.

१२ जून रोजी कुलविंदर कौरचा भाऊ शेरसिंग महिवाल मोहाली येथे बहिणीला भेटल्यानंतर माध्यमांशी चर्चा करण्यासाठी बाहेर पडले, तेव्हा त्यांचीही अशीच काहीशी प्रतिक्रिया होती, “तिनं जे केलं त्याबद्दल तिला किंवा आम्हाला बिलकुल खंत वाटत नाहीये. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितले. शेरसिंग यांच्याकडे सहा एकर जमीन आहे.

अगदी पंजाबचा अलीकडचा काळदेखील अशाच स्वरुपाच्या तीव्र वैयक्तिक निषेधांनी भरलेला आहे. शेतकरी आत्महत्या, अंमली पदार्थांचे व्यसन आणि व्यापक बेरोजगारीच्या लाटेमध्ये, २०१४ हे वर्ष पंजाबच्या कापूस पिकाच्या पट्ट्यातील एक अशांत वर्ष होतं. कुणाकडूनही कसलीच आशा न करता, विक्रम सिंह धनौला यांनी त्यांच्या गावापासून खन्ना शहरापर्यंत सुमारे १०० किलोमीटर प्रवास केला, तत्कालीन मुख्यमंत्री, प्रकाश सिंह बादल १५ ऑगस्ट २०१४ रोजी तिथे तिरंगा फडकवणार होते.

PHOTO • Courtesy: Vikram Dhanaula
PHOTO • Shraddha Agarwal

२०१४ साली विक्रम सिंग धनौला (डावीकडे) याने बेरोजगार तरुण आणि संकटात सापडलेले शेतकरी यांच्याप्रती असंवेदनशील असलेल्या राज्याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्यावर चप्पल भिरकावली होती. २०२०-२१ साली शेतकरी आंदोलनात पंजाबमधील स्त्रिया आघाडीवर होत्या (उजवीकडे)

बादल यांनी नुकतंच भाषण सुरू केलं होतं. तितक्यात धनौला यांनी त्यांचा दिशेने पायातील चप्पल भिरकावली. “मला त्याच्या चेहऱ्यावर सहज नेम धरता आला असता पण मी चप्पल मुद्दाम व्यासपीठावर फेकली. बनावट बियाणं आणि कीटकनाशकांमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची व्यथा, बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांचा त्रासाकडे मला त्यांचे लक्ष वेधायचं होतं,” असं धनौला सांगतात.

धनौला आजही बर्नाला जिल्ह्यातल्या धनौला गावी राहतात. ते २६ दिवस तुरुंगात होते. त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल काही पश्चात्ताप आहे का? असे विचारल्यावर त्यांनी पारीला सांगितलं, “कुलविंदर कौरने जे केलं किंवा मी १० वर्षांपूर्वी जे केलं ते कशातून येतं? कुठेच, कसलीच आशा दिसत नाही तेव्हा घडतात या गोष्टी.” ब्रिटीश राजवटीपासून ते सध्याच्या भाजप सरकारपर्यंत, अधून मधून काही लोक एकट्याने व्यक्त झाले आहेत. प्रत्येकाने आपापल्या मनातील आवाज ऐकला आणि परिणामांची पर्वा न करता आपला निषेध व्यक्त केला आहे.

कंगना रनौत यांचे पंजाबसोबतचे संबंध २०२० मध्येच बिघडले. शेतकरी आंदोलन तेव्हा तापलेलं होतं. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी केंद्र सरकारने अखेर तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले. या कायद्यांचा निषेध करणाऱ्या महिलाबद्दल तिने अपमानास्पद भाषा वापरली होती, तिने ट्वीट केलं होतं की, “हा हा हा... ह्या त्याच आज्जी आहेत, ज्यांना टाइम मासिकात सर्वात शक्तिशाली भारतीय म्हणून स्थान दिलं होतं. ती शंभर रुपयांत मिळू शकते.”

पंजाबचे लोक कंगनाचे हे शब्द विसरलेले नाहीत असं दिसतं आणि याची प्रचिती ६ जून रोजी आली. कुलविंदर कौर म्हणाली, “ती (कंगना) म्हणाली की जे शेतकरी दिल्लीत निषेध करतायत त्यांना १००-२०० रुपये दिले गेले आहेत. त्यावेळी त्या आंदोलकांमध्ये माझी आईसुद्धा होती.” विचित्र गोष्ट म्हणजे कुलविंदरने कंगनाच्या कानशिलात मारल्याचं फुटेज पाहिल्याचा दावा कुणीही केलेला नाही. पण जे काही झालं, ते ६ जूनला सुरू झालं नाही हे नक्की.

व्हिडिओ पहाः कंगनाच्या वक्तव्यावर व्यक्त होणाऱ्या संतापाची मुळं

पंजाबमध्ये विद्रोहाच्या बहुतेक कृती अगदी साध्या, सामान्य नागरिकांकडून झाल्या आहेत.

चंदीगढ विमानतळावरच्या ६ जूनच्या कथित थप्पड प्रकरणाच्या खूप आधी, ३ डिसेंबर २०२१ रोजी कंगना रनौत मनालीहून परत येत असताना, तिच्या कारने पंजाबमध्ये प्रवेश करताच महिला शेतकऱ्यांनी तिला अडवलं. कंगनाकडे तिच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याशिवाय पर्याय नव्हता. सध्या सुरू असलेल्या या संघर्षात कुलविंदर, तिचा भाऊ शेरसिंग महिवाल आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी कौटुंबिक प्रतिष्ठेचे प्रश्नदेखील गंभीर आहेत.

महिवाल पारीला सांगतात, “अनेक पिढ्यांपासून आम्ही सुरक्षा दलात काम करतोय. कुलविंदरच्या आधी माझ्या आजोबांच्या कुटुंबातील पाच जण सैन्यात होते. त्यात माझ्या आजोबांचाही समावेश आहे. त्यांच्या पाच मुलांपैकी तीन मुलांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. ते १९६५ आणि १९७१ च्या युद्धात या देशासाठी लढले होते, तरीही तुम्हाला असं वाटतं का की, कंगनासारख्या आमचा दहशतवादी म्हणून उल्लेख करणाऱ्या व्यक्तीकडून आम्हाला देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज आहे?”

कुलविंदर कौरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ३५ वर्षीय कुलविंदरचा पतीही सीआयएसएफ कॉन्स्टेबल आहे आणि तिला २ मुले आहेत. तिची मुलगी ९ वर्षांची आहे तर मुलगा ५ वर्षांचा आहे. तिची सीआयएसएफमधली नोकरी जाण्याची शक्यता आहे. पण तरीही ज्यांना पंजाब कळलाय ते म्हणतात की अशी विद्रोही कृती करणाऱ्या प्रत्येकालाच त्याची झळ सोसावी लागते, परंतु त्यांच्या अशा वैयक्तिक धाडसातच बऱ्याचदा उज्ज्वल भविष्याची बीज पेली जातात. “जोगा आणि कौर दोघेही आमची स्वप्नं अजूनही जिवंत असल्याचं प्रतीक आहेत,” असं भाकपचे माजी आमदार हरदेव सिंग अर्शी म्हणतात. ते साठ वर्षांपूर्वी पहिल्यांदा जागीर सिंग जोगा यांच्या संपर्कात आले. अर्शी जागीर सिंगच्या जोगा गावापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या दातेवास गावातले आहेत. ही दोन्ही गावे आजच्या मानसा जिल्ह्यात येतात.

जोगा नाभा तुरुंगात असताना १९५४ मध्ये पंजाबच्या विधानसभेवर निवडून आले. सुरजीत, भगतसिंग झुग्गियां आणि प्रेमदत्त वर्मा हे पंजाबच्या वैयक्तिक निषेधाच्या दीर्घ गाथेच्या आणि संघर्षाच्या लोककथेचा भाग आहेत.

या प्रसंगावर कुलविंदर कौर हिचा भाऊ शेरसिंग महिवाल यांचं भाष्य

अशी विद्रोही कृती करणाऱ्या प्रत्येकालाच त्याची झळ सोसावी लागते, परंतु बऱ्याचदा त्यातच उज्ज्वल भविष्याची बीज पेरली जातात

कुलविंदर कौरच्या समर्थनार्थ पंजाब आणि चंदीगढमध्ये रॅली आणि मिरवणुका काढल्या जात आहेत. त्यांनी ‘थप्पड मारणे’ साजरे केले नाही किंवा ते योग्य आहे असा आग्रह धरला नाही. पंजाबच्या शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेला आणि सचोटीला धक्का पोचू नये म्हणून एक प्रसिद्ध तारका आणि खासदाराविरुद्ध खड्या ठाकलेल्या कॉन्स्टेबलचं ते कौतुक करतायत. सोप्या भाषेत सांगायचं तर, त्यांना कुलविंदरची कृती पंजाबच्या वैयक्तिक निषेधाच्या परंपरेतली पुढची कडी वाटते.

या संपूर्ण प्रकरणाने राज्यभरात कविता, गाणी, मीम्स आणि व्यंगचित्रांचं पेव फुटलं आहे. आज पारी या कथेसह त्यातली एक कविता घेऊन येत आहे. प्रसिद्ध नाटककार आणि पंजाबी ट्रिब्यूनचे माजी संपादक कवी स्वराजबीर सिंग यांची ही कविता आहे.

कुलविंदर कौरला सुरक्षा दलातील तिची नोकरी गमवावी लागू शकते. परंतु, तिच्या समर्थनार्थ बक्षिसे, कायदेशीर मदत आणि तिच्यासाठी मदतीचे हात पुढे येताना दिसत आहेत. पण जोगाप्रमाणेच, पंजाब विधानसभेत तिच्यासाठी खूप मोठी नोकरी वाट पहात आहे, कारण पाच ठिकाणी पोटनिवडणुका जवळ आल्या आहेत. पंजाबमधील अनेकांना ती निवडणूक लढवेल अशी आशा आहे.

PHOTO • PARI Photos

डावीकडेः या प्रसंगानंतर कुलविंदर कौर चंदिगड विमानतळावर. उजवीकडेः ९ जून २०२४ रोजी कंगना रनौतच्या निषेधार्थ आणि कुलविंदरच्या समर्थनार्थ मोहालीमध्ये निघालेला मोर्चा

___________________________________________________

आई मला सांग ...

स्वराजबीर

आई, ए आई
तुझ्या हृदयात काय आहे ते मला सांग, प्रिय आई
माझ्यातले ज्वालामुखी फुटतात आणि उफाळून येतात.

मला सांगा, दररोज आम्हाला कोण थप्पड मारतं?
कोण आमच्या वाटेत येतात,
आणि पडद्यावर गरजतात?

आम्ही श्रीमंत आणि गर्विष्ठ लोकांच्या थपडा सहन करतो,
पृथ्वीतलावरचे शोषित आम्ही पीडा सहन करतो,
पण राज्याची आश्वासनं निघतात खोटी.

पण कधीकधी,
होय, अगदी क्वचित कधीकधी,
दुखावलेली एखादी गरीब मुलगी उठते
काळजातल्या भावनांचा होतो कल्लोळ,
हवेत उठतो तिचा हात
आणि ललकारते ती क्रूर राज्यकर्त्यांना.

ही थप्पड,
माझे आई, केवळ मारण्यासाठी नव्हतीच.
माझ्या गांजलेल्या, दुखऱ्या काळजाने घातलेली
हाक होती, किंकाळी होती.

काही म्हणतात योग्यच झालं,
काही म्हणतात चुकलंच.
सभ्य म्हणा किंवा असभ्य,
माझे काळीज रडतंय फक्त तुझ्यासाठी.

तुला आणि तुझ्या लोकांना धमकावलं बलाढ्यांनी,
आव्हानही दिलं.
त्याच शक्तीशाली बलाढ्यांनी
भोकं पाडली माझ्या काळजाला.

हे माझं काळीज आहे, आई,
माझं रडणारं काळीज.
सभ्य म्हण किंवा असभ्य म्हण,
ते तुझ्यासाठी रडतंय, ओरडतंय.
काही म्हणतात योग्यच झालं,
काही म्हणतात चुकलंच.

पण हे माझं काळीज आहे, आई.
माझं स्वाभिमानी काळीज, तुझ्यासाठी बोलणारं.

मूळ पंजाबी कवितेचा इंग्रजी अनुवादः चरणजीत सोहल

स्वराजबीर पटकथाकार आणि पत्रकार असून पंजाबी ट्रिब्यूनचे माजी संपादक आहेत.

Vishav Bharti

Vishav Bharti is a journalist based in Chandigarh who has been covering Punjab’s agrarian crisis and resistance movements for the past two decades.

Other stories by Vishav Bharti

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Illustration : Antara Raman

Antara Raman is an illustrator and website designer with an interest in social processes and mythological imagery. A graduate of the Srishti Institute of Art, Design and Technology, Bengaluru, she believes that the world of storytelling and illustration are symbiotic.

Other stories by Antara Raman
Translator : Ashwini Patil

Ashwini is a journalist based in Nashik with seven years of experience in Marathi print media. She has a keen interest in women and development, cultural studies, youth, finance and media.

Other stories by Ashwini Patil