मी वही बंद केली आणि कान उघडे ठेवले, आणि हृदयही. मी दिल्लीमध्ये सेक्स वर्करशी बोलत होते, त्यांच्या मुलाखती घेत होते, आणि त्या जे सांगत होत्या ते सगळं माझ्या  काळ्या डायरीत खरडत होते. महामारीचा काळ होता, आम्ही सुरक्षेचे सगळे नियम पाळत होतो, पण एका क्षणी त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल सगळं सांगण्यासाठी मास्क काढले आणि माझ्याबद्दल त्यांना विश्वास वाटावा आणि त्यांच्याबाबत मी संवेदनशील आहे हे कळावं म्हणून मीही मास्क काढला.

त्यांच्याबद्दल लिहणे ही कृती आम्हांला जोडणारा पूल होता आणि त्याचबरोबर आमच्यातली एक दरी सुद्धा.

जेव्हा आमची मुलाखत संपली, तेव्हा आमच्या मुलाखतीचे आयोजन करणाऱ्या समन्वयकाने विचारले, तुम्ही यांच्यातील एका महिलेला घरी सोडू शकाल का? तुमच्या घराच्या रस्त्यावरच आहे, असे तिची ओळख करून देत तो म्हणाला. तिचा नावाचा अर्थ सीमा/मर्यादा. आम्ही दोघी एकमेकींकडे पाहून हसलो. मी जेव्हा गटाशी बोलत होते तेव्हा ती तिथे नव्हती. पण जेव्हा आम्ही गाडीत बसलो तेव्हा आम्ही आमच्या व्यावहारिक जगातील ओळखी विसरून गेलो. ती म्हणाली की, काही ग्राहकांना  बुकिंग करण्याच्या आधी सेक्स वर्करचा चेहरा बघायचा असतो, आणि सांगितलं की आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात ही व्यवस्था कशी काम करते ते. मी तिच्या कामाबाबतच्या आतल्या गोष्टीही विचारल्या. आणि ती सगळं काही सांगत गेली. आम्ही प्रेमाबाबत बोललो. मी गाडीचा वेग कमी केला होता. तिचे डोळे खूप सुंदर होते. पण ह्दय मात्र मेलं होतं.

माझे हात स्टेरिंगवर होते. मी यावेळी काहीच लिहित नव्हते. तिने तिच्या प्रियकराचा जुना फोटो दाखवला, जो अजूनपर्यंत तिच्या फोनमध्ये पडून होता. मी हे सगळं लेखात लिहू शकत नव्हते. मला वाटलं की असं करणं चुकीचं होईल. मर्यादाभंगच. म्हणून मी एवढंच लिहिलं

शालिनी सिंग यांच्या आवाजात ही कविता ऐका

काजळ भरले डोळे

चकमकत्या बंद खोलीपासून दूर
दूर काळ्या आणि पांढऱ्या दृश्यातल्या एकटक नजरांपासून
लाजिरवाण्या किंवा भीतीदायक शब्दांपासून दूर
चकचकीत कागदाच्या बाहेर
अशी शाई जी लिहतांना फिकी पडते
मोकळ्या रस्त्यावर,
तू मला तुझ्या जगात येऊ दिलंस
उघड्या डोळ्यांनी, झापडांशिवाय, प्रेमाने

तरुण विधवा होण्याचा अर्थ काय,
सैनिकावर प्रेम करणे  म्हणजे काय?,
खोट्या आशा दाखवणाऱ्या प्रियकराबरोबर असणे म्हणजे काय
ठेवतो सुरक्षित जगापासून दूर,
आणि शरीराच्या बदल्यात स्वप्नं दाखवतो
आणि पैशासाठी शरीर
एखाद्याच्या डिजिटल पसंतीने
जिवंत गाडून घेतांना कसं वाटतं
आणि एखाद्याबरोबर खोटा खोटा प्रणय करत जगतांना
तू म्हणतेस, “मला मुलांचं पोट भरायचं आहे.”

मावळणारा सूर्य, नाकातल्या नथीवर येऊन बसला आहे
आणि चमकतात ते काजळ भरले डोळे, जे कधी गात असत.
स्वस्त मलमाचा आधार घेत,
थकलेलं शरीर उत्तेजित होतं
धूळ उडते, रात्र संपत जाते
आणखी एक दिवस
प्रेमहीन श्रमाचा

अनुवादः अश्विनी बर्वे

Shalini Singh

Shalini Singh is a founding trustee of the CounterMedia Trust that publishes PARI. A journalist based in Delhi, she writes on environment, gender and culture, and was a Nieman fellow for journalism at Harvard University, 2017-2018.

Other stories by Shalini Singh
Illustration : Priyanka Borar

Priyanka Borar is a new media artist experimenting with technology to discover new forms of meaning and expression. She likes to design experiences for learning and play. As much as she enjoys juggling with interactive media she feels at home with the traditional pen and paper.

Other stories by Priyanka Borar
Translator : Ashwini Barve