‘‘तीन आणि दोन किती?’’ प्रतिभा हिलीम मुलांना विचारतात. त्यांच्‍या समोर सात ते नऊ वयोगटातली दहा मुलं बसली आहेत. ती काहीच बोलत नाहीत. प्रतिभा फळ्यावर लिहितात, मागे वळून मुलांकडे बघतात आणि त्यांच्‍या ‘हाताने’ फळ्याकडे इशारा करत मुलांना म्हणायला सांगतात, ‘‘पाच!’’

प्रतिभांचे हात कोपरापर्यंत आहेत आणि पाय गुडघ्यापर्यंत. चामडं आणि स्‍टील यांच्‍यापासून तयार केलेले पायांच्‍या खुंटांचे ‘संरक्षक’ त्यांना दिलेले आहेत, त्‍यांच्‍या आधाराने त्या उभ्या आहेत. बुटांसारखेच, पण मोठे आणि जडही असणारे हे संरक्षक दोन्‍ही गुडघ्यांतून घातलेले आहेत आणि खडूचा एक तुकडा वेलक्रोच्‍या मदतीने कोपराजवळ बांधलेला आहे.

‘शाळा’ चालू आहे... पालघर जिल्ह्यातल्‍या कर्‍हे गावातल्‍या हिलीम कुटुंबाच्‍या तीन खोल्‍यांच्‍या सिमेंटच्‍या घरात ती रोज भरते आहे. गेल्‍या जुलैपासून प्रतिभा इथे मुलांना इंग्रजी, इतिहास, मराठी आणि गणित शिकवतायत. पालघर जिल्ह्यातल्‍या विक्रमगड तालुक्‍यातल्‍या या गावातली तीस आदिवासी मुलं त्यांच्‍याकडे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत गटागटाने येतात. १,३७८ लोकसंख्या असलेल्‍या या गावात जिल्‍हा परिषदेच्‍या दोन शाळा आहेत आणि शाळांमधून मुलांना पुस्‍तकं दिली आहेत. तीच घेऊन मुलं प्रतिभांकडे येतात.

‘‘ऑपरेशनपासून अगदी छोट्याछोट्या गोष्टी करायलाही मला खूप वेळ लागतोय. हे असं लिहिणंही कठीण होतंय...’’ प्रतिभा सांगतात. त्यांची एक विद्यार्थिनी त्यांच्‍या हाताला वेलक्रोने खडू बांधत असते.

वारली आदिवासी असणाऱ्या प्रतिभा हिलीम गेल्‍या वर्षीपर्यंत जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत शिकवत होत्या. गेली २८ वर्षं नोकरी करतायत त्या शिक्षिकेची. वयाच्‍या विसाव्‍या वर्षी त्यांचं लग्‍न झालं आणि त्या भिवंडी शहरात राहायला गेल्या. त्यांच्या कर्‍हे गावापासून साधारण १०० किलोमीटरवर असलेल्‍या या शहरात त्यांचा नवरा, पांडुरंग हिलीम पाटबंधारे कार्यालयात नोकरी करत होता. (पन्‍नाशीचे पांडुरंग हिलीम आज या कार्यालयात वरिष्ठ लिपीक आहेत.) २०१५ मध्ये त्‍यांची ठाणे जिल्ह्यातल्‍या कळव्‍याला बदली झाली तेव्‍हा प्रतिभा आपली शिक्षिकेची नोकरी चालू ठेवण्‍यासाठी रोज कळव्‍याहून भिवंडीला ये-जा करत होत्या.

जून २०१९ पासून भिवंडीमधल्‍याच जिल्‍हा परिषदेच्‍या नव्‍या शाळेत प्रतिभाची बदली झाली. त्‍याच महिन्‍यात त्या कर्‍हे या आपल्‍या गावी आल्या होत्या. तशी महिन्‍यातून एकदा त्यांची गावी फेरी असायचीच. या वेळी मात्र त्या आजारी पडली. गँगरीन झाल्‍याचं निदान झालं. गँगरीनमध्ये शरीरातल्‍या ऊती मरतात. एखादा न दिसणारा आजार, जखम किंवा संसर्ग यामुळे त्‍यांना रक्‍तपुरवठा होत नाही आणि त्‍या मरतात.

त्‍यानंतर थोड्याच दिवसात त्यांचे दोन्‍ही हात कोपरापासून आणि पाय गुडघ्यापासून कापावे लागले.

PHOTO • Shraddha Agarwal

कर्‍हे गावातल्‍या प्रतिभा हिलीम यांच्‍या घरात ‘शाळा’ चालू आहे. आपल्‍या पायांच्‍या संरक्षकांच्‍या मदतीने प्रतिभा चालतात आणि हाताला बांधलेल्‍या खडूने लिहितात

‘‘हे असं काही मला होईल असं कधीच वाटलं नव्हतं,’’ प्रतिभा सांगते. ‘‘इथे गावाला आले आणि अचानक मला ताप आला. चांगलंच आठवतंय मला, १६ जून २०१९ चा दिवस होता तो. रात्रीचे आठ वाजले होते. मी पॅरासिटॅमोल घेतली. त्‍याने ताप उतरेल असं वाटलं मला. पण दुसर्‍या दिवशी सकाळी मला खूपच गळून गेल्‍यासारखं वाटायला लागलं. बरंच वाटेना अजिबात. मग माझा नवरा आणि मुलगा यांनी मला हॉस्‍पिटलमध्ये नेलं. मला हे काही आठवतच नाहीये. तो संपूर्ण दिवस मी शुद्धीतच नव्‍हते.’’

१७ जूनच्‍या सकाळी घरातल्‍या कारने कळव्‍याच्‍या एका खाजगी ग्रामीण रुग्‍णालयात प्रतिभांना नेण्‍यात आलं. ‘‘तिथे डॉक्टरांनी माझ्‍या नवर्‍याला सांगितलं की माझी परिस्‍थिती गंभीर आहे आणि मला ताबडतोब ठाण्‍याला खाजगी रुग्‍णालयात हलवायला हवं.’’ प्रतिभा सांगते. लगेच ॲम्‍ब्‍युलन्‍सची व्‍यवस्‍था करून त्यांना ठाण्‍याच्‍या एका खाजगी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आलं.

‘‘मी शुद्धीवर आले तेव्‍हा मला जाणवलं की आपण हॉस्‍पिटलमध्ये आहोत. डॉक्टरनी मला सांगितलं की तुला डेंग्‍यू झालाय. त्‍यांनी मला विचारलं, शेतात काम करताना काही झालं होतं का? पण काहीच घडलं नव्‍हतं. बाबांना भेटायला येतो तेव्‍हा शनिवार-रविवारी आम्ही नेहमीच शेतात कामं करतो. बाबा वयस्‍कर आहेत. त्‍यांना मदत करतो आणि आमच्‍या शेतात भात पेरतो.’’ कर्‍हे गावात पांडुरंग यांच्‍या वडलांची चार एकर जमीन आहे. हिलीम कुटुंब त्‍यात भात, ज्‍वारी, तूर आणि उडीद करतं. ‘‘तसं खूप काम नसतं, आता अनियमित पावसामुळे आम्ही शेतात जास्त काही काम करणं सोडून दिलंय,’’ प्रतिभा सांगतात.

रुग्‍णालयातच असताना, १९ जूनला प्रतिभांना जाणवलं की आपले हात आणि पाय काळे पडायला लागलेत. ‘‘डॉक्‍टरांना सांगितलं तर ते म्‍हणाले, शेतात काम करताना एखादा किडा वगैरे चावला असेल. माझा विश्‍वास बसला नाही त्‍यावर. पण माझा ताप वाढायला लागला आणि मला अजिबातच बरं वाटेनासं झालं. दोन्‍ही पायांची आणि उजव्‍या हाताची आग व्‍हायला लागली. सुरुवातीला डॉक्‍टर म्‍हणाले, फार काही नाही, वाटेल बरं. पण दुसर्‍याच दिवशी रात्री माझे हात-पाय अक्षरशः बर्फासारखे थंड पडले. मी ओरडायला लागले आणि त्‍यानंतर १९ दिवस ओरडतच राहिले. माझे दोन्‍ही पाय हातांपेक्षा अधिक दुखत होते आणि आग होत होती.’’

तीन दिवसांनी प्रतिभाला गँगरीन झाल्‍याचं निदान करण्‍यात आलं. ‘‘सुरुवातीला डॉक्टरांनाही कळेना की हे कसं घडलं. त्‍यांनी खूप टेस्‍ट्‌स केल्‍या. माझा ताप उतरतच नव्‍हता आणि अंग प्रचंड दुखत होतं. पायांची आग होत होती, त्‍यामुळे मी सतत ओरडत असायचे. आठवड्याभरानंतर डॉक्टर म्हणाले की, आता बरं वाटेल, कारण अजूनही डाव्‍या हाताच्‍या तीन बोटांची हालचाल होते आहे. माझ्‍या नवर्‍याला प्रचंड धक्‍का बसला होता. काय करावं सुचतच नव्‍हतं त्‍याला. शेवटी माझ्‍या मुलाने सगळं आपल्‍या हातात घेतलं.’’

'When the doctors first told me about the operation I went into shock... Since then, every small task takes longer to complete. Even writing with this chalk is difficult'
PHOTO • Shraddha Agarwal
'When the doctors first told me about the operation I went into shock... Since then, every small task takes longer to complete. Even writing with this chalk is difficult'
PHOTO • Shraddha Agarwal

‘डॉक्टरांनी मला ऑपरेशनबद्दल सांगितलं तेव्‍हा मला प्रचंड धक्का बसला... तेव्‍हापासून अगदी छोट्या-छोट्या गोष्टी करायलाही मला खूप वेळ लागतो. या खडूने लिहिणंही आता कठीण होऊन बसलंय.’

प्रतिभांचा मुलगा २७ वर्षांचा सुमीत सिव्‍हिल इंजिनीअर आहे. मुंबईतल्‍या एका मोठ्या बांधकाम कंपनीत तो नोकरी करत होता. पण प्रतिभा रुग्‍णालयात असताना त्‍याला रजा वाढवून मिळाली नाही आणि त्‍याने ती नोकरी सोडली. ‘‘माझ्‍या ऑपरेशनसकट सगळे निर्णय त्‍यानेच घेतले. सगळ्‍या कागदपत्रांवर त्‍यानेच सह्या केल्‍या. तो मला भरवायचा, मला अंघोळ घालायचा... सगळं केलं माझ्‍या मुलाने,’’ प्रतिभा सांगतात.

गेल्‍या वर्षीच्‍या जून महिन्‍याच्‍या अखेरीला ठाण्‍याच्‍या रुग्‍णालयातल्‍या डॉक्टरांनी प्रतिभाचा उजवा हात कापला. ‘‘ते ऑपरेशन व्‍यवस्‍थित झालं नाही. त्‍यांनी खूप वाईट पद्धतीने तिचा हात कापला,’’ प्रतिभाच्‍या हातावरच्‍या खुणांकडे बोट दाखवत सुमीत सांगतो. ‘‘एका हाताच्‍या ऑपरेशनचे त्‍यांनी आमच्‍याकडून साडेतीन लाख रुपये घेतले आणि तेही व्‍यवस्‍थित केलं नाही. तिला खूप दुखायचं, रडत राहायची ती. माझ्‍या वडिलांनी मग सांगितलं, आता आम्‍हाला हे हॉस्‍पिटल परवडणार नाही.’’

भिवंडीच्‍या जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेने ऑगस्‍टमध्ये प्रतिभांना तीन महिन्‍यांचा पगार दिला. त्यांना दरमहा साधारण ४० हजार रुपये हातात यायचे. ‘‘ठाण्‍याच्‍या त्‍या हॉस्‍पिटलमध्ये आमचे बरेच पैसे खर्च झाले. वीस दिवसांचं त्‍यांचं बिल होतं १३ लाख रुपये. माझ्‍या भावाने आम्‍हाला काही पैसे कर्जाऊ दिले. माझ्‍या शाळेतल्‍या मित्र-मैत्रिणींनीही मदत केली. माझ्‍या नवर्‍याने कर्ज काढलं. आता आमच्‍याकडे काहीच उरलं नव्‍हतं,’’ प्रतिभा सांगते.

खिशाला परवडत होतं त्‍यापेक्षा कितीतरी अधिक पैसे खर्च करून शेवटी प्रतिभाच्‍या कुटुंबाने १२ जुलैला तिला मुंबईतल्‍या जे.जे. या सरकारी रुग्‍णालयात आणलं. प्रतिभा तिथे जवळजवळ महिनाभर होती. ‘‘जे.जे.मध्ये आलो तेव्‍हाही माझे पाय दुखतच होते. कोणी नुसता हात लावला तरी ओरडायचे मी,’’ प्रतिभा सांगते. ‘‘नऊ दिवस मी काहीही खाऊ शकत नव्‍हते. झोपू शकत नव्‍हते. प्रचंड आग होत होती पायांची. डॉक्‍टरांनी मला दोन-तीन दिवस निरीक्षणाखाली ठेवलं आणि नंतर ऑपरेशन करण्‍याचा निर्णय घेतला.’’

१५ जुलैला पाच तास चाललेल्‍या त्‍या ऑपरेशनमध्ये प्रतिभाची उरलेली तीन अंगं, डावा हात आणि दोन्‍ही पाय कापले गेले.

‘‘या ऑपरेशनबद्दल मला डॉक्टरांनी पहिल्‍यांदा सांगितलं तेव्‍हा मला प्रचंड धक्‍का बसला,’’ प्रतिभा म्‍हणते. ‘‘आपण आता शाळेत शिकवायला जाऊ शकणार नाही... मी माझ्‍या भविष्याचा विचार करायला लागले. आपल्‍याला आता नुसतं घरात बसून राहायला हवं... प्रत्येक गोष्टीसाठी दुसर्‍यावर अवलंबून राहायला हवं. साधं रोजचं जेवणही नाही करू शकणार आपण... मी रडायला लागले. पण माझे नातेवाईक, मित्रमंडळी रोज मला भेटायला यायची. त्‍यांनी या सगळ्याला तोंड देण्‍याची हिंमत मला दिली. डॉक्टरांनीही मला सांगितलं की कृत्रिम अवयवांच्‍या मदतीने मी शाळेत जाऊ शकेन आणि पूर्वी जे जे करत होते ते सगळं करू शकेन. या सगळ्‍यांनी मला हे सगळं स्‍वीकारणं सोपं केलं. मी घाबरले होते, पण माझ्‍या आई-वडिलांनीही मला हिंमत दिली. त्‍यांचं तर मी खूपच देणं लागते.’’

Pratibha Hilim with her son Sumeet and daughter Madhuri, who says, 'We tell her we are there for you. We children will become your arms and legs'
PHOTO • Shraddha Agarwal
Pratibha Hilim with her son Sumeet and daughter Madhuri, who says, 'We tell her we are there for you. We children will become your arms and legs'
PHOTO • Shraddha Agarwal

मुलगा सुमीत आणि मुलगी माधुरी यांच्‍यासोबत प्रतिभा हिलीम. मुलं म्हणतात, ‘आम्‍ही तिला सांगतो की आम्ही आहोत तुझ्‍यासाठी. आम्‍ही मुलं तुझे हात आणि पाय होऊ’

११ ऑगस्‍ट २०१९ ला प्रतिभांना जे.जे. हॉस्‍पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. त्या पालघर जिल्ह्यातल्‍या जव्‍हार तालुक्‍यातल्‍या चलतवाड या गावी, आपल्‍या माहेरी राहायला आल्या. तिच्‍या आई, सुनीता वाघ (६५ वर्षे) शेतकरी आणि गृहिणी. त्‍यांची सहा एकर जमीन आहे, त्‍यात ते भात, ज्‍वारी, बाजरी, तूर ही पिकं घेतात. प्रतिभाचे ७५ वर्षांचे वडील अरविंद वाघ शेतमजुरांच्‍या बरोबरीने अजूनही शेतावर कामं करतात. प्रतिभा मार्च २०२० पर्यंत चलतवाडला राहिल्या आणि मग लॉकडाऊन लागला. आता त्यांचं संपूर्ण कुटुंबच कर्‍हे गावी राहायला आलं. प्रतिभाही मग कर्‍ह्याला गेल्या. (नंतर सप्‍टेंबरमध्ये तिचे पतीही गावी राहायला आले. आता ते मोटरसायकलवरून जव्‍हारच्‍याच पाटबंधारे कार्यालयात जातात.)

गेल्‍या वर्षभरात प्रतिभा आपल्‍या मुलाबरोबर तीन-चार वेळा फॉलोअप, तपासणी आणि टेस्‍ट्‌स यासाठी जे.जे. हॉस्‍पिटलमध्ये जाऊन आल्या. फेब्रुवारी २०२० पासून त्यांनी कृत्रिम अवयव लावण्‍यासाठी आवश्‍यक असणारी ‘प्री-प्रोस्‍थेटिक फिजिओथेरपी’ घ्यायला सुरुवात केली. मुंबईत हाजी अलीच्‍या ‘ऑल इंडिया इन्‍स्‍टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन ॲण्‍ड रिहॅबिलिटेशन’मध्ये त्‍यासाठी त्या येत होत्या. आरोग्‍य आणि कुटुंब कल्‍याण विभागामार्फत ही संस्‍था चालवली जाते. तिकडच्‍या डॉक्‍टरांनी उजवा हात संपूर्ण बरा होईपर्यंत थांबायला सांगितलं. चलतवाडपासून ही इन्‍स्‍टिट्यूट १६० किलोमीटरवर आहे. सुमीत गाडीतून प्रतिभांना एक दिवसाआड तिथे घेऊन जायचा. जायला चार तास, यायला चार तास. ‘‘माझ्‍या जखमा संपूर्ण बर्‍या झाल्‍यावर त्‍यांनी आम्हाला फिजिओथेरपीसाठी बोलावलं. पण ती घेऊनही माझा उजवा हात कित्‍येक महिने रोज दुखायचा,’’ प्रतिभा सांगते. ‘‘माझ्‍या मुलीने, माधुरीने या काळात घरातल्‍या सगळ्या कामांची जबाबदारी घेतली. अजूनही ती तिच्‍या हातांनी मला भरवते. हाताला चमचा बांधून खाण्‍याचा मी प्रयत्न केला, पण चमचा सारखा पडतो.’’

प्रतिभाची सर्वात धाकटी मुलगी, २५ वर्षांची माधुरी सावंतवाडीला आयुर्वेदाचं शिक्षण घेत आहे. जुलै २०१९ मध्ये प्रतिभांचं ऑपरेशन झालं तेव्‍हा तिची परीक्षा सुरू होती. आईची काळजी घेण्‍यासाठी तेव्‍हा ती येऊ शकली नाही. ‘‘पण देवाने आमच्‍यासाठी आईला दुसरी संधी दिली,’’ ती म्हणते. ‘‘आता तिच्‍या या लढाईत साथ देण्‍यासाठी मी काहीही करायला तयार आहे. बस, यावर मात करायची आहे. आपले हात आणि पाय आता नाहीत म्हणून कधीकधी ती खूप रडते. आधी तिने आमच्‍यासाठी खूप केलंय, आता आमची पाळी आहे. आम्ही तिला सतत सांगत असतो, आम्ही आहोत तुझ्‍यासाठी. आम्‍ही मुलं आता तुझे हात आणि पाय होऊ.’’ प्रतिभाची मोठी मुलगी, २९ वर्षांची प्रणाली दरोठे जिल्ह्यातल्‍या कृषी कार्यालयात सहाय्‍यक कृषी अधिकारी आहे. तिला एक वर्षाचा मुलगा आहे.

प्रतिभा आणि त्यांचं कुटुंब आता हाजी अलीच्‍या सेंटरमधून मिळणार्‍या कृत्रिम अवयवांची आतुरतेने वाट पहातंय. सध्या त्या वापरत असलेले संरक्षक बूटही तिथूनच मिळाले आहेत. ‘‘खरं तर गेल्‍या वर्षी मार्चमध्येच मला माझे कृत्रिम हात आणि पाय मिळणार होते. मला लागतील त्‍या साइझचे बनवून ठेवले आहेत तिथे,’’ प्रतिभा सांगते. ‘‘पण मग लॉकडाऊन लागला आणि डॉक्‍टरांनी मेसेज केला की काही महिने थांबा आणि मग या. आता हे केंद्र जेव्‍हा सुरू होईल, तेव्‍हा मला पुन्‍हा एकदा ट्रेनिंग घ्यावं लागेल आणि मग ते मला कृत्रिम हात आणि पाय लावतील.’’

Some of Pratibha's students: 'Their parents are really poor. How will they get a phone for online education?' she asks. 'School has always been my whole world. Being with kids also helps me feel like I am normal again'
PHOTO • Shraddha Agarwal

प्रतिभांचे काही विद्यार्थी : ‘यांचे पालक खरंच खूप गरीब आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी फोन कुठून आणणार ते?’ त्या विचारतात. ‘शाळा हेच माझं जग आहे. मुलांबरोबर असले की मला आपण नॉर्मल असल्‍यासारखं वाटतं’

गेल्‍या जानेवारीपासून प्रतिभा दोन्‍ही गुडघ्यांत संरक्षक बूट घालून चालत आहेत. त्‍यांच्‍याकडे बघत प्रतिभा सांगते, ‘‘सेंटरने मला हे दिले, कारण याची सवय केली की मला कृत्रिम पाय घालून चालायला त्रास नाही होणार, तोल सांभाळण्‍याचाही सराव होईल. सुरुवातीला हे घातले की पाय खूप ठणकायचे. त्‍यांची सवय व्‍हायला महिना गेला.’’ कृत्रिम अवयव घालून कसं बसायचं, कसं उभं राहायचं, नेहमीच्‍या हालचाली कशा करायच्‍या याचा सराव सेंटरमध्ये करून घेतला गेला. एवढंच नाही, हाडं आणि स्‍नायू मजबूत होण्‍यासाठी प्रतिभाला योग आणि इतर व्‍यायामही शिकवले गेले. वेलक्रोच्‍या पट्टीच्‍या सहाय्‍याने चमचा, पेन किंवा खडू हाताने कसे उचलायचे, याचासुद्धा सराव त्यांच्‍याकडून करून घेतला.

२०१९ मध्ये हात आणि पाय कापल्‍यावर जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत जाणं प्रतिभांसाठी अशक्‍यच होतं. त्यांचं ते काम संपूर्ण थांबलंच होतं. आणि मग मार्चमध्ये कोविडचा लॉकडाऊन लागला. त्यांना जाणवलं की, या लॉकडाऊनच्‍या काळात सरकारतर्फे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे, पण गावातल्या मुलांना मात्र या पद्धतीने शिक्षण घेणं शक्‍यच होत नाहीये. दिवसभर मुलं गावात फिरत असायची, कधी शेतात काम करत असायची. ‘‘गरीब लोक आहेत हे. त्‍यांना ऑनलाइन शिक्षण कळत नाही,’’ प्रतिभा सांगतात. ‘‘त्‍यांचे आई-वडील खूप गरीब आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी ते फोन कुठून आणणार?’’

त्‍यामुळे प्रतिभांनी या मुलांना शिकवायचं ठरवलं, एकही पैसा न घेता. ‘‘इथल्‍या आदिवासी मुलांची परिस्‍थिती खूपच वाईट आहे. दोन वेळच्‍या खाण्‍याचीही मारामार असते. काही मुलं इथे उपाशीच येतात. माझी मुलगी कधीकधी त्‍यांच्‍यासाठी काही तरी बनवते. बहुतेक रोज त्‍यांना आम्ही केळी देतो. कधी सणासुदीला मात्र फरसाण आणि चॉकलेट देतो.’’

‘‘पण तरीही काही मुलं आता माझ्‍याकडे शिकायला येतच नाहीत. शेतीचे पेरणीचे, लावणीचे, काढणीचे, कापणीचे दिवस असतात. आई-वडील मुलांना शेतावर कामाला नेतात. काही मुलांना बाळगे म्हणून आपल्‍या धाकट्या भावंडांना सांभाळण्‍यासाठी घरी थांबावं लागतं. मला पाय असते, तर मी गावातल्‍या प्रत्येक घरी गेले असते आणि मुलांना माझ्‍याकडे शिकायला पाठवण्‍यासाठी पालकांचं मन वळवलं असतं.’’

ऑगस्‍ट २०२० मध्ये प्रतिभांनी भिवंडीच्‍या जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेतून कर्‍हे गावात बदली व्‍हावी म्हणून अर्ज केलाय. आजारी पडल्‍यावर ऑगस्‍ट २०१९ पर्यंतचा तीन महिन्‍यांचा पगार तिला मिळाला, आता त्या बिनपगारी रजेवर आहेत. ‘‘शाळा सुरू होईपर्यंत मी मुलांना माझ्‍या घरीच शिकवणार आहे,’’ त्या सांगतात. कृत्रिम अवयव मिळाले की त्‍यांच्‍या सहाय्‍याने आपण सहज पुन्‍हा शाळेत जाऊ शकू, याची तिला खात्री आहे.

‘‘मला माझ्‍या स्‍वतःच्‍या पायावर उभं राहायचंय. पुन्‍हा शाळेत जायचंय आणि मुलांना शिकवायचंय. स्‍वतःचं काम स्‍वतः करायचंय,’’ प्रतिभा म्हणतात. ‘‘शाळा हे नेहमीच माझं सगळं जग होतं. मुलांबरोबर असले की मला आपण नॉर्मल आहोत असं वाटतं.’’ बोलता बोलता प्रतिभा मला निरोप द्यायला सोफ्‍यावरून उठतात. पण गुडघ्यांना संरक्षक बूट घातलेले नसतात. त्यांचा तोल जातो, त्या धडपडतात पण लगेचच स्‍वतःला सावरतात, पण त्याचा चेहरा पडतो. ‘‘आता पुढच्‍या वेळी येशील ती जेवायलाच ये,’’ पुन्‍हा सोफ्‍यावर बसता बसता हात हलवत त्या म्हणतात.

अनुवादः वैशाली रोडे

Shraddha Agarwal

Shraddha Agarwal is a Reporter and Content Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Shraddha Agarwal
Translator : Vaishali Rode

Vaishali Rode is an independent journalist and a writer with prior experience in Marathi print media. She has penned the autobiography of a transgender, MI HIJDA MI LAXMI, which has been translated in many languages.

Other stories by Vaishali Rode