कृषी हा राज्य शासनाच्या अखत्यारीतला विषय असूनसुद्धा केंद्र शासनाने सप्टेंबरमध्ये संसदेत रेटून पारित केलेल्या कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांनी चालवलेलं संतप्त आंदोलन देशभरातील कवी आणि कलाकारांना स्पर्शून गेलंय. पंजाबमध्ये एका लहान शेतकऱ्याच्या रोजच्या संघर्षावरील कष्टमय चिंतनातून कवीला ही कविता स्फुरली आहे. सोबत बंगळुरूतली एक अत्यंत तरुण चित्रकार या कवितेवरून सुचलेली चित्रं काढते.

सुधन्वा देशपांडे यांच्या आवाजात इंग्रजीत ही कविता ऐका

चित्रे: अंतरा रामन

कहाणी एका शेतकऱ्याची

मशागत, पेरणी अन् कापणी करून
मी पाळतो माझा शब्द
पायाखालील धरणीमाईला दिलेला
अगदी अखेरच्या श्वासापर्यंत
असंय माझं जीवन...

माझ्या घामाने चिंब भिजली माती
वादळं जिरवते माझी पोलादी छाती
बोचरी थंडी असो वा रणरणती गरमी
शिणली न कधी माझी उर्मी
अगदी अखेरच्या श्वासापर्यंत
असंय माझं जीवन...

निसर्ग झुकला पण शासक झाला वैरी
आपल्या मजेखातर
त्यानं रोवलं सुगीच्या मळ्यात
माझ्या आत्म्याचं बुजगावणं
अगदी अखेरच्या श्वासापर्यंत
असंय माझं जीवन...

गेले ते दिवस
जेंव्हा माझं शेत होतं क्षितिजाला टेकून
आता माझ्याजवळ उरली फक्त
एकरभर जमीन अन् ढीगभर कर्ज
अगदी अखेरच्या श्वासापर्यंत
असंय माझं जीवन...

माझं पीक सोनेरी, शुभ्र, हिरवंगार
आणिक बाजारभावाच्या आशा हजार
रिकामी ओंजळ अन् आशांचा अव्हेर
धरणीमाय करी असा आहेर
या दुःखातून मुक्त करेल मरण
तोवर हेच माझं जीवन..

लेकरं राहिली उपाशी अन् अंगठाछाप
विखुरलं त्यांचं सपान
छपराखाली मलबा नुसता
भंगलं शरीर, तडकला आत्मा
अगदी अखेरच्या श्वासापर्यंत
असंय माझं जीवन...

रत्न, दागिने गेले सारे विरून
जीव टांगणीवर, पोट हातावर धरून
तरी लोकांची भूक अन् लालसा शमवायला
मी पाळतो माझा शब्द
अगदी अखेरच्या श्वासापर्यंत
असंय माझं जीवन...

माझं सुगीचं सोनेरी धान
मिळेना त्याला हक्काचं दुकान
कर्जबाजारी मी, पुरता खचलोय
काळजाची धडधड थांबलीय
अगदी अखेरच्या श्वासापर्यंत
असंय माझं जीवन...

ह्यातून निघेल का काही मार्ग?
गळफास नाही तर क्रांतीचं सर्ग
कोयता अन् विळा नाहीत नुसते अवजार
हाती घेऊन त्यांचं मी केलंय हत्यार
अगदी अखेरच्या श्वासापर्यंत
असंय माझं जीवन...

सरबजोत सिंह बहल यांच्या आवाजात पंजाबीत ही कविता ऐका


मूळ पंजाबी कवितेचा अनुवाद अमृतसर स्थित आर्किटेक्ट जीना सिंह यांनी केला आहे.

मराठी अनुवादः कौशल काळू

शीर्षक चित्र : अंतरा रामन, हिने नुकतीच सृष्टी कॉलेज ऑफ आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, बेंगळूरु येथून व्हिजुअल कम्युनिकेशन या विषयात पदवी घेतली आहे. सर्व प्रकारच्या विचारात्मक कला आणि कथाकथन यांचा तिच्या कलाकुसरीवर मोठा प्रभाव आहे.

इंग्रजी कवितेचा स्वरः सुधन्वा देशपांडे हे जन नाट्य मंचाशी निगडित अभिनेता व दिग्दर्शक आहेत आणि लेफ्टवर्ड बुक्समध्ये संपादक आहेत.

Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo