तर, सुरुवात करुया?

२०१४ साली भारताचं वैविध्य आणि बहुपेडी जगणं नोंदवण्याचं काम पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया अर्थात पारीने सुरू केलं. आणि त्याच्या गाभ्याशी होत्या भाषा. गावपाड्यात राहणाऱ्या ८३ कोटीहून अधिक लोकांच्या तोंडी असणाऱ्या ७०० वेगवेगळ्या भाषा. ८६ लिप्यांमध्ये लिहिल्या जाणाऱ्या काही आणि लिपीच नसणाऱ्याही काही. या बोली आणि भाषांशिवाय लोकांच्या जगण्याचा संग्रह कसा तयार होणार? अशी कल्पना तरी करता येईल का? त्यामुळे विविध भाषांमधले अनुवाद पारीवरच्या प्रत्येक मजकुरासाठी मोलाचे आहेत.

“पत्रकारितेच्या क्षेत्राचा विचार करता पारीचा हा संग्रह सामाजिक न्यायाच्या अंगाने अनुवादाकडे पाहतो,” स्मिता खटोर सांगते. “ज्ञानाची निर्मिती आणि प्रसार केवळ इंग्रजी बोलणाऱ्या, इंग्रजीतून शिकलेल्यांची मक्तेदारी राहणार नाही हे आम्ही सुनिश्चित करतो. भारतातले बहुसंख्य लोक इंग्रजीपासून कित्येक प्रकाशवर्षं दूर असताना हे फार महत्त्वाचं ठरतं.”

आमचे अनुवादक आणि भाषा संपादक शब्दांचे सांस्कृतिक संदर्भ, योग्य-अयोग्य वापर या सगळ्याबद्दल कायम चर्चा करतात, वाद घालतात आणि आपली मतं मांडतात. एक दिवस अशाच गप्पा रंगल्या होत्या...

स्मिताः पुरुषोत्तम ठाकूर यांची ती गोष्ट आठवते? कुरुमपुरी पंचायतीतले लोक तेलंगणातल्या वीटभट्टीवर कामासाठी गेले होते. पुरु दा त्यांना तिथे भेटले असता त्यातले एक वयस्क काका त्यांना म्हणतात, ‘ओडिया बोलणारं कुणी तरी फार दिवसांनी भेटलं. बरं वाटलं तुम्हाला भेटून!’

महाराष्ट्रातून ज्योती शिनोळी स्थलांतरिl मजुरांच्या मुलांबद्दल लिहिते . रघू नावाचा एक मुलगा नव्या शाळेत जायला राजी नसतो. तिथले शिक्षक आणि मुलं त्याला न समजणाऱ्या भाषेत बोलत असतात. त्याची आई गायत्री सांगते, ‘चेन्नईत तो फक्त तीन आठवडे शाळेत गेला. एक दिवस रडत घरी आला. म्हणाला, त्याला शाळेत जायचंच नाहीये. एक तर त्याला तिथे काय बोलतायत ते समजत नाही आणि सगळे जण रागावून बोलतायत असं वाटतं.’

गावपाड्यातल्या लोकांसाठी भाषेतून मिळणारी ओळख फार मोलाची आहे. खास करून पोटापाण्यासाठी लोकांना दूरदेशी जावं लागतं तेव्हा तर भाषाच त्यांची स्वतःची ओळख असते.

PHOTO • Labani Jangi

शंकरः पण स्मिता, लोकच नाही, कधी कधी शब्द देखील स्थलांतर करतात बरं. सेंतलिरच्या एका गोष्टी वर मी काम करत होतो. हाताने परागीकरण करणाऱ्या या बाया चक्क एक इंग्लिश शब्द वापरतात – 'क्रॉस' किंवा 'क्रॉसिंग'. हा इंग्रजी शब्द आता त्यांच्या भाषेचा भाग झालाय. तुम्हाला गावाकडे असे अनेक शब्द ऐकायला मिळतील.

आता यात गंमत तर आहेच पण आव्हानही आहे. पण कधी कधी मी माझ्याच राज्यातल्या, कर्नाटकातल्या काही गोष्टी वाचतो, इंग्रजीत वार्तांकन झालेल्या. पण त्यातल्या मजुरांची, कामगारांची भाषा त्यांची स्वतःची वाटत नाही. एखाद्या पुस्तकातली पात्रं असावीत अशी वाटतात ती मंडळी. निर्जीव, रंग उडाल्यासारखी. मी जेव्हा अनुवाद करायला घेतो, तेव्हा माझा कायम हाच प्रयत्न असतो की लोकांची त्यांची गोष्ट त्यांची स्वतःचीच रहावी, त्यांच्याच भाषेत इतरांनी वाचावी. ती केवळ दुसऱ्या कुणाची कलाकारी बनू नये.

प्रतिष्ठाः ही सगळी प्रक्रिया इतकी साधी किंवा सरळसोपी नसते. आपल्या स्वतःच्या भाषेत लिहिणाऱ्या वार्ताहरांच्या लेखांवर काम करणं कायम आव्हानात्मक असतं. मुळात गुजराती किंवा हिंदीत लिहिलेली स्टोरी त्या भाषेत अगदी छान वाटते वाचायला. पण अगदी अचूक इंग्रजी अनुवाद केल्यानंतरही त्या वाक्यांची रचना, भाषा फारच कशी तरी वाटते वाचायला. मग माझ्या मनात प्रश्न येतो, अशा वेळी नक्की काय करायचं? त्या गोष्टीच्या गाभ्याप्रती निष्ठा ठेवायची, त्यातल्या वंचित समुदायांचे अनुभव जसेच्या तसे व्यक्त करायचे का मूळ मजकूर, त्यातले शब्द आणि वाक्यरचनांमध्ये फेरफार करायचाच नाही? मूळ भाषेत संपादन करायचं का इंग्रजीत? शेवटी ही अगदी लांब-लचक प्रक्रिया होऊन जाते. चर्चा, वाद-विवादही होतात चिक्कार.

मला वाटतं की मुळात अनुवाद होऊ शकतो कारण भाषा-भाषांमध्ये जोडता येईल, संवाद साधता येईल असं बरंच काही आहे. पण त्या पलिकडे जाऊन प्रतिमा, नाद, बोली, भाषेतला ज्ञानसाठा, तिचं सांस्कृतिक विश्व आणि आगळेपण या सगळ्याचं एकमेकांशी असणारं नातं मला पारीसोबत काम करायला लागल्यानंतरच जास्त कळालं. अनेकदा आम्ही एकच मजकूर दोन वेगळ्या भाषांमध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीने सादर केला आहे. दोन वेगळ्या गोष्टी नसल्या तरी एक दुसऱ्याचं रुपांतर आहे असं म्हणण्याचं धाडस होणार नाही इतक्या वेगळ्या पद्धतीने हे मजकूर सादर झाले आहेत.

जोशुआः प्रतिष्ठा दी, अनुवाद ही नवनिर्मिती असते असं नाही वाटत तुम्हाला? नवनिर्मिती किंवा रुपांतरण? बांग्लामध्ये ओव्यांवर काम करत असताना मी खरं तर अनुवाद नाही तर त्या गाण्यांचं नव्याने नव्या भाषेत रुपांतर करत असतो. माझ्या स्वतःच्या भाषेत ओव्यांचं भाषांतर करताना मला मात्रा, शब्द नव्याने शिकावे लागतात, आधीची शिकवण विसरून नवे अर्थ शोधावे लागतात. मला वाटायचं कवी होणं फार कठीण आहे, पण कवितेचा अनुवाद तर त्याहून महाकठीण काम आहे.

मराठीतलं मौखिक साहित्य त्यातले भाव, कल्पना, बोल, गमक, लय आणि रुपक तसेच ठेवून नव्याने आपल्या भाषेत कसं आणायचं? गावाकडच्या या गायिका आणि कवयीत्रींपासून प्रेरणा घेऊन मी एका स्त्रीसारखा विचार करायला लागतो. जात, पितृसत्ता आणि वर्गसंघर्षाच्या जात्यात पिचल्या जाणाऱ्या धान्यासारखं स्वतःला झोकून देतो. आणि प्रत्येक ओवीचा विचार करत असताना बंगालच्या बायांच्या गेय-काव्य परंपरांचा आधार घेतो. तुसु, भादु, कुलो-झरा गान किंवा ब्रोतोकथा.

वैतागून जायला झालं तरी वेड लावणारं काम आहे हे.

PHOTO • Labani Jangi

मेधाः सगळ्यात अवघड काय आहे सांगू? विनोदाचा अनुवाद. खास करून साईनाथ यांची खासियत असणारा नर्मविनोद. Elephant man and the belly of the beast ही गोष्ट मी वाचली तेव्हा मला हसू आवरत नव्हतं. प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द एक चित्र उभं करतो. पार्बती या प्रेमळ हत्तिणीच्या पाठीवर बसलेले तीन गडी, तिचे लाड करणारा परभू हा माहूत. कितीही प्रयत्न केले तरी या महाकाय हत्तिणीचं पोट कसं काय भरत असेल याचा थांगपत्ता काही त्यांना शेवटपर्यंत लागत नाही.

आता ही गोष्ट तिच्या सगळ्या तपशिलांसह, त्यातल्या विनोदासह मराठीत आणायची होती. तीही हत्तिणीची मंद चाल आणि लय राखत.

आणि मी शीर्षकालाच अडखळले. पारीवरच्या अनेक गोष्टींचा अनुवाद करताना येणारा हा अनुभव. अखेर बराच वेळ डोकं खाजवल्यावर मला आठवला बकासुर. अख्खं गाव ज्याला रोज खाऊ घालत होतं तो बकासुर. आणि मग मराठीत शीर्षक झालं - हत्ती दादा आणि बकासुराचं पोट .

आपल्या वाचकांना समजणाऱ्या, त्यांच्या ओळखीच्या असणाऱ्या संज्ञा, पात्रांचा वापर करणं फार महत्त्वाचं असतं. इंग्रजीतल्या अनेक शब्दांसाठी आपल्या मातीतले शब्द शोधावे लागतात. पँडोराज बॉक्स, थिएटर ऑफ द ऑप्टिक्स, इत्यादी.

प्रतिष्ठाः वेगळ्या संस्कृतीतल्या कवितेचा अनुवाद करायचा असतो तेव्हा असं स्वातंत्र्य घ्यावं लागतं हा माझाही अनुभव आहे. पण पारीच्या गोष्टींसाठीही ते करावं लागत असणार हेही दिसतंच आहे. ज्या वाचकासाठी अनुवाद करायचा त्यानुसार अनुवादही बदलतो, नाही का?

PHOTO • Labani Jangi

'सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? पारीसाठी अनुवाद म्हणजे इंग्रजीत जे प्रकाशित झालंय ते इतर भाषांमध्ये सांगणं इतकंच मर्यादित नाहीये. आपल्या परिचयाच्या नसणाऱ्या अनेक संदर्भांच्या गाभ्यापर्यंत पोचण्याचं काम हे अनुवाद करतायत' - पी. साईनाथ

कमलजीतः पंजाबीची मजा सांगते तुम्हाला. कधी कधी मला माझ्याच भाषेचे नियम मोडून माझ्या मनाने अनुवाद करावा लागतो. आणि अनेकदा त्यासाठी मला टीकाही सहन करावी लागते.

आता इंग्रजीत कसंय, सगळ्यांसाठी एकच सर्वनाम वापरलं जातं. त्यामध्ये सामाजिक किंवा इतर भेद नसतात. पण पंजाबीचं तसं नाही. खरं तर बाकी भारतीय भाषांचंही नाही. वय, हुद्दा, वर्ग, सामाजिक स्थान, लिंग, जात या सगळ्यावर त्या व्यक्तीसाठी कोणतं सर्वनाम वापरायचं याची पद्धत प्रत्येक भाषेत रुळून गेली आहे.

पण हे काम हाती घेतानाच मी ठरवून टाकलं होतं की अनुवाद करताना सगळ्यांचा विचार समान केला जाणार. प्रत्येकाला, मग तो गुरू असेल, राजकारणी, शास्त्रज्ञ किंवा सफाई कर्मचारी, सारखाच आदर दिला पाहिजे. पुरुष असो, स्त्री किंवा ट्रान्सजेंडर, सगळे समान असतील.

तरन तारनमधल्या मनजीत कौर या दलित महिलेची गोष्ट जेव्हा पंजाबीमध्ये छापली गेली तेव्हा मला अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. “तुम्ही मनजीत कौर यांचा असा आदराने उल्लेख कशासाठी करताय?” मनजीत कौर इक मजहबी सिख हन. ओ जमीनदारां दे घरां दा गोहा चुकदी हन? असं माझं वाक्य होतं. हन हे पंजाबीत आदरार्थी वापरलं जातं. मनजीत कौर या दलित महिलेसाठी हन वापरल्याने भाषेचे नियम मी पाळले नसल्याने त्यांना असा संशय आला की मी सॉफ्टवेअरचा वापर करून अनुवाद केला आहे म्हणून.

देवेशः अरे, हिंदीमध्येही परिघावरच्या समुदायांबद्दल बोलताना फारसे आदरार्थी शब्द, रचना वापरल्या जात नाहीत. लोकांच्या जगण्याची खिल्ली न उडवणारे शब्द फार कष्टाने शोधावे लागतात. अनुवादाच्या प्रक्रियेत हे सगळे हे अडथळे येतात. मग इतर भाषांचं बोट धरून आम्ही ते पार करण्याचा प्रयत्न करत राहतो.

इतकंच नाही निसर्ग, विज्ञान, लिंगभाव, लैंगिकता किंवा अपंगत्व या संबंधी शब्द शोधणं पण कधी कधी अवघड असतं. हिंदी भाषेत या सगळ्यांसाठी फारसे योग्य शब्द नाहीत. कधी कधी तर भाषा त्याल गोड मुलामा देते आणि मूळ प्रश्नच गायब करते. आता पहाः स्त्रियांना थेट देवी म्हणायचं किंवा अपंगत्व असणाऱ्यांना दिव्यांग. प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर लोकांची परिस्थिती अगदीच विपरित आहे, पूर्वीपेक्षा वाईटच झाली आहे.

आता कविता अय्यरच्या एका गोष्टीचा अनुवाद, ‘मैं नलबंदी कराने के लिए घर से अकेली ही निकल गई थी’ , करत असताना असं लक्षात आलं की साहित्यापलिकडे लोकांच्या जगण्यात किती पीडा आहेत हे सांगण्यासाठी हिंदीमध्ये योग्य शब्दच सापडत नाहीत. ज्ञान, विज्ञान, वैद्यक किंवा आरोग्य आणि समाज या सगळ्यांसाठी आवश्यक असणारे पुरेसे शब्दच हिंदी भाषेच्या शब्दभांडारात नाहीत.

PHOTO • Labani Jangi

स्वर्ण कांताः भोजपुरीचीही तीच गत आहे. किंबहुना त्याहूनही वाईट आहे म्हणा ना. या भाषेची गोची अशी आहे की ती बोलणारे लोक जास्त आहेत आणि लिहिणारे मोजकेच. शिक्षणाचं माध्यम म्हणून भोजपुरी वापरली जात  नसल्याने वैद्यक, अभियांत्रिकी, इंटरनेट किंवा समाजमाध्यमं अशा विविध व्यवसायांशी संबंधित शब्दच या भाषेत आलेले नाहीत.

देवेश तू म्हणतोस तसं नव्या संज्ञा, शब्द वापरता येऊ शकतात, पण ते तितकं सहज नाही. ट्रान्सजेन्डर या शब्दासाठी ‘हिजडा’, ‘छक्का’, ‘लौंडा’ असे शब्द वापरात आहेत जे इंग्रजी शब्दांच्या तुलनेत फार अवमानकारक आहेत. शिवाय अनेक असे इतर शब्द आहेत, जसं महिला दिन, मानसिक आरोग्य किंवा कायद्यांची नावं, क्रीडा स्पर्धा, इत्यादींसाठी समर्पक शब्द शोधणं म्हणजे महाकठीण काम आहे.

मला आठवतंय बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातल्या शिवानी या महादलित समाजातल्या मुलीच्या गोष्टी चा अनुवाद मी करत होते. स्वतःच्या घरच्यांशी, जात आणि लिंगभेदाशी तिचा झगडा सुरू आहे. या भेदभावाचा मी अगदी जवळून अनुभव घेतला असला तरी अशा खऱ्याखुऱ्या गोष्टी आम्हाला आमच्या भाषेत कधीही वाचायला मिळाल्या नव्हत्या.

मला असं वाटतं की एखाद्या समाजाच्या बौद्धिक आणि सामाजिक वाढीसाठी अनुवादांचा निश्चित उपयोग होऊ शकतो.

निर्मलः माझ्या भाषेबद्दलही हेच घडतं. कारण तिचं कुठलंही मानक अजून तयार झालेलं नाही. छत्तीसगडच्या उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि मध्य अशा पाच भागांमध्ये किमान बारा प्रकारची छत्तीसगडी बोलली जाते. त्यामुळे प्रमाण अशी एक भाषा नसण्याने अनुवाद करताना, लिहिताना अडचण येते. अनेकदा एखादा शब्द निवडताना मी पुरता गोंधळून जातो. मग मी माझे पत्रकार मित्र, संपादक, लेखक, शिक्षकांची मदत घेतो आणि पुस्तकांचाही संदर्भ घेतो.

साईनाथ यांच्या Beware of contractors bearing gifts या गोष्टीवर काम करत असताना अनेक छत्तीसगडी शब्द माझ्या वाचनात आले जे आता फारसे वापरात नाहीत. सरगुजा हा छत्तीसगडमधला भाग झारखंडच्या सीमेलगत आहे. तिथे उरांव आदिवासींची संख्या जास्त आहे. ते जी छत्तीसगडी बोलतात त्यामध्ये जंगलाविषयीचे शब्द जास्त आढळून येतात. ही गोष्ट एका उरांव आदिवासी महिलेसंबंधी असल्याने मी या समाजाच्या आदिवासींच्या बोलीत असलेले शब्द इथे वापरण्याचा प्रयत्न केला. मात्र या समाजातले लोक कुरुख भाषा बोलतात.

या भाषेतले अनेक शब्द, सुकुडदुम, कउव्वा, हांका, हांके, लांदा, फांदा, खेदा, अलकरहा पूर्वी लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग होते, मात्र आता जल-जंगल-जमीन जसजशी त्यांच्यापासून हिरावून घेतली जातीये, तसे हे शब्दही त्यांच्या बोलण्यातून गायब होऊ लागले आहेत.

PHOTO • Labani Jangi

आपल्या भाषा टिकल्या तर आपल्या जीविका, परिसंस्था आणि लोकशाही टिकून राहणार आहे. आणि या भाषांसोबत येणारी विविधता आजइतकी महत्त्वाची कधीच नव्हती. आणि आजइतकी संकटातही कधी नव्हती - पी. साईनाथ

पंकजः मला असं वाटतं की अनुवाद करायचा असेल तर ज्यांच्याबद्दलचा मजकूर किंवा गोष्ट आपण अनुवादित करणार आहोत त्यांच्या दुनियेत डोकावून बघता आलं पाहिजे. आरुषच्या गोष्टीचा अनुवाद करत असताना मला एक पारलिंगी पुरुष आणि एका स्त्रीमधलं प्रेम किती खोल आहे ते जाणवलं. त्यांचा संघर्ष किती अवघड होता हेही. या गोष्टीचा अनुवाद करत असताना योग्य शब्द, संज्ञा वापरल्या जाव्यात यासाठी फार काळजी घ्यावी लागते हे मला शिकायला मिळालं. उदा. सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी हा शब्द आता वापरत नाहीत तर जेन्डर रिअफर्मेशन सर्जरी हा शब्द वापरला पाहिजे.

पारलिंगी व्यक्तींसाठी अवमानकारक नसलेले किंवा त्यांची अवहेलना न करणारे शब्द मी शोधले: रुपांतरकामी पुरुष किंवा नारी असा शब्द मिळाला. जर रुपांतर झालं असेल तर रुपांतरितो पुरुष किंवा नारी असा शब्द वापरला जातो. फार सुंदर शब्द आहेत हे. समलिंगी स्त्री किंवा पुरुषासाठी समकामी असा शब्द आहे. पण आजही क्वियर या समुदायासाठी त्यांची प्रतिष्ठा जपणारा योग्य, प्रमाण शब्द आम्हाला मिळालेला नसल्याने आम्ही आमच्या लिपीत क्वियर असं लिहितो.

राजासंगीतनः पंकज, कोविड-१९ च्या महामारीमध्ये धंदा करणाऱ्या स्त्रियांसंबंधी एक गोष्ट आली होती, ती आठवते. ती वाचून मी अगदी हेलावून गेलो होतो. अख्खं जग या नवख्या आजाराला तोंड देण्याचा प्रयत्न होतं. आणि नेहमीप्रमाणे आपल्या यंत्रणांनी अगदी संवेदनहीनपणे गरिबांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. आपल्या देशातल्या सामान्य माणसाचे प्रचंड हाल झाले. वाढतच गेले. अगदी सुस्थितीत असलेल्या श्रीमंतांनाही जगणं कठीण झालेलं असताना परिघावर असलेल्या लोकांकडे लक्ष देण्याइतका वेळ कुणाकडे होता? आकांक्षाच्या कामाठीपुऱ्यातल्या या गोष्टीने आपल्याला लोकांच्या हलाखीकडे, त्यांच्या वेदनेकडे पहायला लावलं. ते दुःख आपल्यापर्यंत पोचलंच नव्हतं.

त्यांच्या त्या कोंदट, छोट्या खोल्या. त्या रहायच्या तिथेच आणि गिऱ्हाईकही तिथेच करायच्या. देशभरात टाळेबंदी लागल्यानंतर घरी परत आलेली लहानगी मुलंही त्याच खोल्यांमध्ये कशी राहणार होती? त्यांच्यावर या सगळ्या परिस्थितीचा काय परिणाम होणार होता? धंदा करणारी बाई आणि आई या दोन भूमिकांमध्ये प्रियाची फरफट होत होती. आपल्या भावना आणि जगण्याचा संघर्ष यातही तिची दमछाक सुरू होती. तिचा मुलगा विक्रम आजूबाजूच्या सगळ्या अंधःकारात आयुष्याचा अर्थ शोधू पाहत होता.

कुटुंब, प्रेम, आशा, आनंद आणि संगोपन या सगळ्यांबद्दलच्या आपल्या कल्पना इथे फार वेगळ्या रुपात आपल्यासमोर येतात. या गोष्टींचा अनुवाद केल्यानंतरच मला माणसाच्या मनात असलेली अमर्याद आशा काय असते ते समजू शकलं.

सुधामयीः अगदी खरंय. अनुवादाचं काम सुरू करण्याआधी मला एलजीबीटीक्यूएआय समुदायाविषयी काहीही माहित नव्हतं. आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मला या लोकांची किंवा या विषयाचीच भीती वाटायची. रस्त्यात, सिग्नलपाशी कधी मला पारलिंगी लोक दिसले, किंवा कधी माझ्या घरी कुणी आलं तर त्यांच्याकडे सरळ बघायची पण मला भीती वाटत असे. त्यांचं वागणं मला विकृत वाटायचं.

अशा गोष्टी अनुवादासाठी आल्यावर हा विषय कळत असलेल्या, त्या विषयाला न्याय देऊ शकतील अशा लोकांना मी त्या पाठवत असते. त्यांनी पाठवलेले अनुवाद वाचत असताना, संपादित करत असताना मला या समुदायाबद्दल कळायला लागलं. आणि मग माझ्या मनात असलेली त्यांच्याबद्दलची भीती नाहीशी झाली. आता तर मला कुठेही कुणी भेटलं तर मी त्यांच्याशी थोडंसं बोलते आणि तेही अगदी मनापासून.

मी तर म्हणेन, आपल्या मनातले पूर्वग्रह दूर करण्याचा, आपल्या कक्षा रुंदावण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अनुवाद.

PHOTO • Labani Jangi

प्रणतीः आपण अनुवादित केलेल्या सांस्कृतिक संदर्भातल्या अनेक गोष्टींबाबत मलाही तसंच वाटतंय. एखादा अनुवादक स्वतःच्या घरी बसून वेगवेगळ्या संस्कृतीसंबंधी वाचू शकतो, जाणून घेऊ शकतो. विभिन्न संस्कृतींमधून आलेला मजकूर जर नीट वाचला आणि अनुवाद केला तर किती वेगवेगळ्या जगात आपल्याला फेरफटका मारता येईल. आणि हे सगळ्यात चांगलं मूळ भाषेतच समजू शकतं.

भारतासारख्या इंग्रजांची वसाहत असलेल्या देशात इंग्रजी हीच सगळ्यांना जोडणारी भाषा झाली आहे. अनेकदा आपल्याला मूळ भाषा माहित नसते आणि कामासाठी इंग्रजीवरच अवलंबून रहावं लागतं. पण अनुवादक जर आपल्या कामाशी प्रामाणिक असेल, चिकाटीने आणि धीर न सोडता विविध सांस्कृतिक प्रथा-परंपरा, विविध प्रांतांचे इतिहास आणि भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर अनुवाद तितका चांगला होऊ शकतो.

राजीवः पण माझा अनुभव सांगू? कितीही चिकाटीने काम केलं, तरी कधी कधी माझ्या भाषेत मला योग्य किंवा समर्पक शब्दच सापडत नाही. खासकरून एखाद्या विशिष्ट व्यवसायाविषयी गोष्ट असेल तर ते जास्तच कठीण होऊन जातं. उपकरणं, अवजारं, हत्यारांची योग्य नावंच नसली तर त्या सगळ्या अतिशय नाजूक, क्लिष्ट प्रक्रिया समजावून सांगणं अशक्य होऊन जातं. उफक फातिमा यांच्या काश्मीरमधल्या विणकरांवरच्या या लेखाचा अनुवाद करत असताना मला त्यातल्या चारखाना आणि चष्म-इ-बुलबुल या शब्दांचा काय अनुवाद करायचा तेच कळत नव्हतं. या विणकामातल्या पॅटर्नसाठी मल्याळममध्ये शब्दच नाहीत त्यामुळे मी केवळ त्यांचं वर्णन करू शकलो. पट्टू या शब्दाचीही तीच गंमत झाली. काश्मीरमध्ये लोकरीच्या कापडाला पट्टू म्हणतात आणि मल्याळममध्ये पट्टू म्हणजे रेशमी कापड.

कमारः ऊर्दू भाषेसाठीही कधी कधी हीच अडचण होते. पुरेसा शब्दसाठाच आमच्याकडे नाही, खास करून वातावरणातील बदल किंवा स्त्रियांच्या प्रजनन अधिकारांविषयी पारीवरच्या गोष्टींबाबत हे जास्त जाणवतं. हिंदीची गोष्ट जराशी वेगळी आहे. या भाषेला केंद्र सरकारचंच पाठबळ आहे आणि राज्य शासनही तिच्या प्रसाराकडे लक्ष देतं. हिंदी भाषेसाठी विशेष संस्थांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे या भाषेमध्ये नवनव्या संकल्पना, संज्ञा येतात. ऊर्दूसाठी तसं काहीच होत नसल्याने आम्ही आजही इंग्रजी शब्दच आमच्या अनुवादांमध्ये वापरत आहोत.

कधी काळी ऊर्दू महत्त्वाची भाषा होती. इतिहासात डोकावून पाहिलं तर कळतं की दिल्ली कॉलेज आणि हैद्राबादचं उस्मानिया विद्यापीठ ऊर्दू संहितांच्या अनुवादासाठी प्रसिद्ध होतं. कलकत्त्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजच्या उभारणीचा मुख्य उद्देश इंग्रज अधिकाऱ्यांना भारतीय भाषा शिकवणे आणि अनुवाद करणे हा होता. आज या सगळ्या संस्था मृतवत आहेत. ऊर्दू आणि हिंदीतला झगडा आपण पाहिलाय. १९४७ नंतरही हा संघर्ष संपलेला नाही आणि आता तर ऊर्दूवर कुणाचंच लक्ष नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

PHOTO • Labani Jangi

कमलजीतः फाळणीनंतर भाषांमध्ये अशी दुही तयार झाली असं तुम्हाला वाटतं का? मला नाही वाटत भाषा लोकांमध्ये अंतर आणतात. ते काम माणसंचं करू शकतात.

कमारः असाही एक काळ होता जेव्हा ऊर्दू संपूर्ण देशाची भाषा होती. दक्षिणेतही ऊर्दू बोलली जायची. दख्खनी ऊर्दू म्हणायचे तिला. या ऊर्दूत काव्य रचणारे कवी होते आणि त्यांची कविता ऊर्दूच्या अभ्यासक्रमात असायची. पण मुस्लिम राजवट अस्ताला गेली आणि त्याबरोबर तिथली भाषाही. आता आधुनिक भारतात केवळ उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगालसह हिंदी पट्ट्यामध्ये ऊर्दू टिकून आहे.

इथल्या शाळांमध्ये ऊर्दू शिकवली जायची. आणि या भाषेचा हिंदू, मुस्लिम अशा कुठल्याही धर्माशी संबंध नव्हता. मला कित्येक लोक माहित आहेत, हिंदू, माध्यमांमधले वरिष्ठ लोक आहेत ज्यांना ऊर्दू येते. ते लहानपणी ऊर्दू शिकलेत, शाळेत. पण आता ऊर्दू शिकवली जात नाही. आणि एखादी भाषा शिकवलीच नाही तर ती कशी टिकेल?

पूर्वी, ऊर्दू शिकल्यावर नोकरी मिळत असे. पण आता तसं नाहीये. अगदी अलिकडेपर्यंत काही वर्तमानपत्रं छापली जात होती, आणि ऊर्दू माध्यमांसाठी लिहिणारे लोकही होते. पण २०१४ नंतर ती निधी आटल्यामुळे वर्तमानपत्रंही बंद पडली. लोक आजही ऊर्दू बोलतात पण ती लिहिता-वाचता येणाऱ्यांची संख्या मात्र लक्षणीयरित्या कमी झाली आहे.

देवेशः कमार भाई, एखादी भाषा आणि राजकारणाची ही शोकांतिकाच म्हणायला पाहिजे. पण मग मला सांगा की तुम्ही जे अनुवाद करताय, ते कोण वाचतं? तुमच्या कामाचा अर्थ तुम्ही कसा पाहता?

कमारः मी पारीसाठी काम करायला लागल्यानंतर लगेचच पारीची वार्षिक परिषद झाली होती आणि तेव्हा मी म्हणालो होतो की इथे माझी भाषा जतन करण्यात रस असलेली मंडळी मला दिसतायत. आणि आजही अगदी त्याच कारणासाठी मी पारीसोबत काम करतोय. आणि हे केवळ ऊर्दूबद्दल नाहीये. ज्या ज्या भाषा लुप्त होण्याची शक्यता आहे, लोकांच्या विस्मरणात जाण्याची शक्यता आहे अशा प्रत्येक भाषेचं जतन करणं पारीचं ध्येय आहे.

लेखनः पारीभाषा. पंकज (आसामी), जोशुआ बोधिनेत्र/स्मिता खटोर (बांग्ला), स्वर्णकांता (भोजपुरी), निर्मलकुमार साहू (छत्तीसगडी), प्रतिष्ठा पंड्या (गुजराती), देवेश (हिंदी), शंकर केचनुरु (कन्नड), राजीव चेलनट (मल्याळम) मेधा काळे (मराठी), प्रणती पारिदा (ओडिया), कमलजीत कौर (पंजाबी) राजासंगीतन (तमिळ), सुधामयी सत्तेनपल्ली (तेलुगु), मोहम्मद कमार तबरेज (ऊर्दू). संपादनः प्रतिष्ठा पंड्या, संपादन सहाय्यः स्मिता खटोर, मेधा काळे, जोशुआ बोधिनेत्र. फोटो संपादनः बिनायफर भरुचा

PARIBhasha Team

PARIBhasha is our unique Indian languages programme that supports reporting in and translation of PARI stories in many Indian languages. Translation plays a pivotal role in the journey of every single story in PARI. Our team of editors, translators and volunteers represent the diverse linguistic and cultural landscape of the country and also ensure that the stories return and belong to the people from whom they come.

Other stories by PARIBhasha Team
Illustrations : Labani Jangi

Labani Jangi is a 2020 PARI Fellow, and a self-taught painter based in West Bengal's Nadia district. She is working towards a PhD on labour migrations at the Centre for Studies in Social Sciences, Kolkata.

Other stories by Labani Jangi
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale