"हा नरक
हा गरगरणारा भोवरा
हे ठणकणारे कुरूप
ही घुंगणारी वेदना..."

(नामदेव ढसाळ यांच्या 'कामाठीपुरा' या कवितेतून)

कायम गजबजलेला हा रस्ता कित्येक वर्षांत पहिल्यांदाच सामसूम झाला होता. पण तिथे राहणाऱ्या महिलांना फार काळ धंद्यावाचून राहता आलं नाही. भाडं द्यायचं होतं, त्यांची मुलं टाळेबंदी दरम्यान आपल्या वसतिगृहांतून परतली होती, आणि खर्च एकूणच वाढला होता.

जवळपास चार महिन्यांनंतर, जुलैच्या मध्यात, २१ वर्षीय सोनी पुन्हा एकदा सेंट्रल मुंबईच्या कामाठीपुऱ्यात फॉकलंड रोडच्या फूटपाथवर रोज सायंकाळची उभी राहू लागली होती. आपल्या पाच वर्षांच्या चिमुकल्या ईशाला मालकिणीच्या भरवशावर सोडून स्वतः जवळच्या लहान हॉटेलात किंवा एखाद्या मैत्रिणीच्या खोलीत गिऱ्हाईकांना भेटायची. ईशा घरी होती त्यामुळे ती त्यांना स्वतःच्या खोलीत आणू शकत नव्हती. (या कहाणीतील सगळी नावं बदलली आहेत.)

४ ऑगस्ट रोजी, सोनीने रात्री ११ वाजता धंद्यातून विश्रांती घेतली आणि ती आपल्या खोलीवर परतली, तेव्हा पाहिलं तर ईशा रडत होती. "मी तिला पाहायला यायची तोवर ती झोपलेली असायची," सोनी सांगते. "पण [त्या रात्री] ती आपलं अंग दाखवून सारखं दुखतंय, दुखतंय म्हणत होती. मला सगळं ध्यानात यायला थोडा वेळ लागला…"

त्या रात्री, सोनी धंद्यावर असताना ईशाचा बलात्कार झाल्याचा आरोप आहे. काही खोल्या सोडून राहणारी दुसरी एक धंदा करणारी बाई या चिमुकलीला खाऊचा लोभ दाखवून आपल्या खोलीत घेऊन गेली. तिथे तिचं गिऱ्हाईक वाट पाहत होतं. "तो नशेत होता अन् तिला सोडण्यापूर्वी त्यानं माझ्या बेटीला कोणाजवळ एक शब्दही काढायचा नाही असं धमकावलं होतं," सोनी म्हणते. "तिला दुखत होतं, तिने घरवालीला [कुंटणखान्याची मालकीण] सांगितलं, तिला ती आपली नानीच वाटायची. मीच बावळट आहे, आम्हाला कधीच कोणी भरवशाचं भेटणार नाही. भीतीपोटी माझ्या बेटीने मला हे कधी सांगितलंच नसतं तर? ईशाला ती ओळखीची अन् भरवशाची वाटायची म्हणून ती त्यांच्या खोलीत गेली, नाही तर मी नसताना या इलाक्यात कोणाशीच बोलायचं नाही, हे तिला चांगलं कळतं."

'I am a fool to believe that people like us can have someone to trust' says Soni, who filed a complaint at Nagpada police station after her daughter was raped
PHOTO • Aakanksha
'I am a fool to believe that people like us can have someone to trust' says Soni, who filed a complaint at Nagpada police station after her daughter was raped. Clothes hanging outside Kavita’s (Soni) room
PHOTO • Aakanksha

'मीच बावळट आहे, आम्हाला कधीच कोणी भरवशाचं भेटणार नाही' सोनी म्हणते. तिने आपल्या मुलीवर बलात्कार झाल्यावर नागपाडा पोलीस चौकीत तक्रार दाखल केली

डॉली या भागात पूर्वी धंदा करायची. तिला आपल्या मुलीला फसवण्याचा कट माहीत असल्याचं सोनी सांगते. तिने सोनीला प्रकरण दाबून टाक असं सुचवलं होतं. "इथे मुलींचं काय होतं ते सगळ्यांना माहित्येय. पण सगळे त्याकडे डोळेझाक करतात, अन् वरून किती तरी जण आमचंही तोंड दाबू पाहतात. पण, मी शांत नाही बसणार," ती म्हणते.

त्याच दिवशी, ४ ऑगस्ट रोजी, सोनीने जवळच्या नागपाडा पोलीस चौकीत तक्रार दाखल केली. पुढल्याच दिवशी पॉक्सोअंतर्गत (लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा, २०१२) एक एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) दाखल करण्यात आला. कायद्याच्या तरतुदीनुसार पोलिसांनी राज्याच्या बाल कल्याण समितीशी संपर्क साधला, जिने या प्रकरणात न्यायिक साहाय्य आणि सल्लागार म्हणून मदत तसेच सुरक्षित वातावरणात पुनर्वसन करणं अपेक्षित आहे. ईशाला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय जे. जे. इस्पितळात नेण्यात आलं. १८ ऑगस्ट रोजी तिला सेंट्रल मुंबईतील एका शासन-अनुदानित बाल-संगोपन संस्थेत हलवण्यात आलं.

******

मात्र, असे प्रसंग इथे कायमचेच आहेत. २०१० मध्ये कोलकात्यातील धंदा चालणाऱ्या वस्तीत केलेल्या एका सर्वेक्षणानुसार मुलाखत घेतलेल्या १०१ पैकी ६९% कुटुंबांच्या मते लहानांच्या, खासकरून मुलींच्या स्वास्थ्यासाठी त्या भागातील वातावरण अनुकूल नव्हतं. “... आयांसोबत झालेल्या चर्चेतून पुढे आलं की, गिऱ्हाईकाने आपल्या मुलींना स्पर्श, छेडखानी, किंवा शेरेबाजी केली तर त्यांना असहाय वाटायचं,” असं सर्वेक्षणात नमूद केलंय. आणि मुलाखत घेतलेल्या १०० टक्के मुलांनी आपले मित्र, भावंडं आणि शेजारच्या मुलांचं लैंगिक शोषण झाल्याचे किस्से ऐकले असल्याचं कबूल केलं."

"त्यानं आमच्यापैकी कुणाच्या पोरीला काहीबाही केलं किंवा जवळीक करू पाहिली किंवा तिला जबरदस्ती अश्लील व्हिडिओ दाखवले, हे आम्हाला नवीन नाही. फक्त पोरीच नाही, तर इथल्या पोरांचेही तेच हाल आहेत, पण कोणीच तोंड उघडणार नाही," कामाठीपुऱ्यात आमचं संभाषण चालू असताना बसलेली आणखी एक धंदा करणारी बाई म्हणते.

२०१८ मधील आणखी एका शोधनिबंधात म्हटलंय की "धंदा करणाऱ्या स्त्रिया, मानसिकदृष्ट्या दुर्बल तरुण मुली, आणि शाळाबाह्य, मजुरी-काम करणारी किशोरवयीन मुलं-मुली यांसारख्या विशिष्ट समूहांमध्ये बाल लैंगिक शोषणाचा धोका वाढला आहे.”

Charu too has to leave three-year-old Sheela in the gharwali’s house when she goes for work, which she resumed in August. 'Do I have a choice?' she asks
PHOTO • Aakanksha
Charu too has to leave three-year-old Sheela in the gharwali’s house when she goes for work, which she resumed in August. 'Do I have a choice?' she asks
PHOTO • Aakanksha

चारूदेखील धंद्यावर जाते तेव्हा तीन वर्षांच्या शीलाला घरवालीकडे सोडते, ऑगस्टमध्ये तिने परत धंदा सुरू केला . 'काही इलाज आहे का ?' ती विचारते

टाळेबंदीमुळे धोका आणखीच वाढला असावा. विविध प्रकारच्या संकटांत असलेल्या बालकांनी महिला व बालविकास मंत्रालयाच्या आपात्कालीन चाईल्डलाईनवर केलेल्या कॉल्सची संख्या एप्रिलमधील टाळेबंदीच्या दोन आठवड्यांदरम्यान ५० टक्क्यांनी वाढली, असं युनिसेफद्वारे जून २०२० मध्ये प्रकाशित स्ट्रॅटेजी फॉर एंडींग व्हायलेन्स अगेन्स्ट चिल्ड्रेन या शीर्षकाच्या अहवालात म्हटलंय. शिवाय, अहवालात स्वतंत्रपणे नमूद केलंय की, "बाल लैंगिक शोषणाच्या ९४.६ टक्के घटनांमध्ये आरोपी कोणत्या ना कोणत्या प्रकारे बाल पीडितांच्या ओळखीचे होते; ५३.७ टक्के घटनांमध्ये ते त्यांचे कुटुंबीय किंवा नातलग/मित्र होते."

कामाठीपुऱ्यातील काही समाजसेवी संस्था बाया धंद्यावर गेल्या असता त्यांच्या मुला-मुलींसाठी दिवसा किंवा रात्री पाळणाघर चालवतात, त्यांनी टाळेबंदी दरम्यान त्यांची पूर्ण वेळ राहण्याची व्यवस्था केली. मात्र शहरातील इतर वसतिगृहं बंद झाली आणि त्यांनी मुलांना घरी पाठवलं. ईशा तिच्या पाळणाघरातच राहायची, पण सोनी धंदा करत नसल्याने ती आपल्या मुलीला जूनच्या सुरूवातीला आपल्या खोलीवर घेऊन आली. सोनीला जुलैमध्ये धंदा पुन्हा सुरू करावा वाटला, तेव्हा तिने ईशाला पुन्हा त्या केंद्रावर नेऊन सोडलं. "कोरोनाच्या भीतीनं त्यांनी तिला आत घेतलं नाही," ती म्हणते.

टाळेबंदीच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्थानिक समाजसेवी संस्थांकडून राशनची थोडी मदत झाली होती, पण तरी स्वयंपाकासाठी रॉकेल लागणार होतं. आणि धंदा पुन्हा सुरू करण्यापूर्वी सोनीला दोन महिन्यांचं मिळून रू. ७,००० भाडं पण द्यायचं होतं. (लैंगिक शोषणाच्या या घटनेनंतर १० ऑगस्ट रोजी सोनी जवळच्या एका गल्लीतील खोलीत राहायला गेली. नव्या घरवालीचं भाडं दिवसाला रू. २५० असलं तरी ते ती सध्या मागत नाहीये.)

सोनीवर इतक्या वर्षांत या भागातल्या घरवाल्या आणि इतरांचं मिळून रू. ५०,००० च्या वर कर्ज झालंय, त्यातलं ती थोडं थोडं करून फेडतेय. त्यातला काही खर्च तिच्या वडलांच्या औषधपाण्याला लागला, ते आधी रिक्षा चालवायचे, नंतर श्वसनाच्या त्रासामुळे फळं विकू लागले आणि फेब्रुवारी २०२० मध्ये मरण पावले. "मला धंदा करणं भागच होतं, नाही तर पैसा कोणी परत केला असता?" ती विचारते. सोनी पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील तिच्या घरी आपली आई, जी सगळं घर सांभाळते आणि तीन बहिणींना (दोघी शिकतायत, एकीचं लग्न झालंय) पैसे पाठवत असते. पण, टाळेबंदी झाल्यापासून तेही बंद झालं होतं.

******

कामाठीपुऱ्यात धंदा करणाऱ्या इतर बायाही असाच संघर्ष करत आहेत. तिशीतली प्रिया सोनीच्याच गल्लीत राहते. वसतिगृह लवकरात लवकर आपल्या मुलांना परत बोलवतील यासाठी ती आसुसली आहे. टाळेबंदी सुरू झाली तेव्हा तिची इयत्ता चौथीत शिकणारी नऊ वर्षांची मुलगी शेजारच्या मदनपुऱ्यातील आपल्या आश्रम शाळेतून परत आली.

Priya too is hoping residential schools and hostels will soon take back their kids (who are back home due to the lockdown). 'They should come and see our rooms for duri duri banake rakhne ka [social distancing]', she says, referring to the 10x10 feet room divided into three rectangular boxes of 4x6
PHOTO • Aakanksha
Priya too is hoping residential schools and hostels will soon take back their kids (who are back home due to the lockdown). 'They should come and see our rooms for duri duri banake rakhne ka [social distancing]', she says, referring to the 10x10 feet room divided into three rectangular boxes of 4x6
PHOTO • Aakanksha

आश्रमशाळा आणि वसतिगृह लवकरच आपल्या मुलांना (जी टाळेबंदीमुळे घरी आली आहेत) परत बोलवतील या साठी प्रिया देखील आ सुसली आहे. 'दूरी दूरी बनाके रखने का [सामाजिक अंतर पाळा] म्हणणाऱ्यांनी इथे येऊन आमच्या खोल्या प हा म्हणावं ,' ती आपल्या ४×६ च्या तीन आयताकार चौकटीत वाटलेल्या १०×१० फु टी खोली बद्दल म्हणते.

"खोलीच्या बाहेर पाऊलही टाकायचं नाही, खोलीत जे करायचं ते कर," प्रिया आपल्या मुलीला बजावते. रिद्धीच्या हालचालींवर लावलेले हे ढीगभर निर्बंध कोविडच्या भीतीमुळे नाहीत. "आम्ही अशा ठिकाणी राहतो की जिथे आमच्या मुलींना या माणसांनी खाऊन जरी टाकलं तरी कोणी विचारायला येणार नाही," प्रिया म्हणते. ती सध्या तिच्या नेहमीच्या गिऱ्हाईकांनी उधार दिलेल्या तुटपुंज्या पैशात कसं तरी भागवतीये.

टाळेबंदी इतकेच या कुटुंबाला त्यानंतरचे परिणामही जड जातायत. "माझी हालत खराब आहे, भाडं देता येईना अन् धंदा पण सुरू करायचा होता. धंदा करताना मी रिद्धीला जवळ ठेवू शकत नाही, ती निदान तिच्या होस्टेलवर सुखरूप तरी राहील," प्रिया म्हणते. ती महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातून आली असून गेली दहा वर्षं कामाठीपुऱ्यात राहतेय.

प्रियाचा १५ वर्षांचा मुलगा, विक्रमसुद्धा तिच्यासोबतच राहतोय. टाळेबंदीपूर्वी तो भायखळ्यातील नगरपालिका शाळेत इयत्ता आठवीत शिकत होता. त्याची आई गिऱ्हाईक करायची तेव्हा तो शेजारच्या खोलीत लोळायचा, इकडे तिकडे फिरायचा किंवा एका सेवाभावी संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या स्थानिक संगोपन केंद्रात वेळ घालवायचा.

आपले मुलंही इथे राहून शोषणाला बळी पडतील, किंवा मादक पदार्थांच्या किंवा इतर व्यसनांच्या नादी लागतील हे जाणून असल्याने येथील महिला त्यांनाही वसतिगृहांत पाठवून देतात. प्रियाने विक्रमला दोन वर्षांपूर्वी वसतिगृहावर पाठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो तिथून पळून परत आला. यावर्षी एप्रिलमध्ये तो आपल्या कुटुंबाला मदत व्हावी म्हणून मिळेल ती कामं करू लागला – मास्क आणि चहा विकणं, घरवालीची घरं साफ करणं इत्यादी. (पाहा पुन्हा पुन्हा, तीच ती, बिकट आणि खडतर वाट )

"दूरी दूरी बनाके रखने का [सामाजिक अंतर पाळा] म्हणणाऱ्यांनी इथे येऊन आमच्या खोल्या पहा म्हणावं," प्रिया आपल्या ४×६ च्या तीन आयताकार तुकड्यांत वाटलेल्या १०×१० फूटी खोलीबद्दल म्हणते. प्रत्येक तुकड्यात पूर्ण जागा भरेल असा दिवाण आणि दोन कपाट आहेत. एका खोलीत प्रिया राहते, दुसऱ्या खोलीत आणखी एक कुटुंब राहतं आणि मधली खोली (कोणी राहत नसेल तेव्हा) त्या धंद्यासाठी वापरतात, किंवा त्या आपापल्या तुकड्यांमध्येच गिऱ्हाईक करतात. कोपऱ्यात एकत्र वापर असलेलं स्वयंपाकघर आणि शौचालय आहे. इथली बरीच घरं आणि कामाच्या खोल्या आहेत – काही तर याहून लहान आहेत.

Even before the lockdown, Soni, Priya, Charu and other women here depended heavily on private moneylenders and loans from gharwalis; their debts have only grown during these last few months, and work, even with their kids back from schools and hostels in their tiny rooms, is an imperative
PHOTO • Aakanksha
Even before the lockdown, Soni, Priya, Charu and other women here depended heavily on private moneylenders and loans from gharwalis; their debts have only grown during these last few months, and work, even with their kids back from schools and hostels in their tiny rooms, is an imperative
PHOTO • Aakanksha

टाळेबंदीपूर्वीच सोनी, प्रिया, चारू आणि इथल्या इतर महिला सावकार आणि घरवालीकडून मिळणाऱ्या कर्जावर अवलंबून होत्या; मागील काही महिन्यांत त्यांच्या कर्जाचा बोजा आणखीच वाढला आहे, आणि मुलं शाळा आणि वसतिगृहांतून त्यांच्या लहानशा खोलीत परत आली असली तरी त्यांना धंदा करणं भाग आहे

नुकत्याच घेतलेल्या कर्जाचा बारीक हप्ता वगळला तर गेले सहा महिने प्रिया या लहानशा जागेसाठी महिन्याचं रू. ६,००० भाडं देऊ शकली नाहीये. "दर महिन्याला मला ५०० किंवा १,००० रुपये मागावे लागायचे. तेव्हा विक्रमची कमाई कामी आली," ती म्हणते. "कधीकधी आम्ही घासलेट विकत घ्यायला [समाजसेवी संस्था आणि इतर ठिकाणाहून मिळालेलं] थोडं राशन [स्थानिक दुकानांना] विकतो."

२०१८ मध्ये प्रियाने ४०,००० रुपये कर्जाने घेतले होते – व्याज धरून आता ते ६२,००० रुपयांच्या वर गेलंय. आणि आतापर्यंत त्यातले ती केवळ ६,००० रुपयेच फेडू शकलीये. प्रियासारख्या बऱ्याच जणी या भागातल्या सावकारांवर फार अवलंबून आहेत.

प्रियाला जास्त काळ धंदा करता येत नाही, तिच्या ओटीपोटात दुखरा जंतुसंसर्ग झालाय. "इतक्या वेळा गर्भ पाडला ते मला महागात पडलंय," ती म्हणते. "मी दवाखान्यात जाऊन आले पण सगळे कोरोनाच्या मागे लागलेत अन् ऑपरेशन [गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया] करायचं म्हटलं तर रू. २०,००० मागतात, ते काही मी देऊ शकत नाही." टाळेबंदीत जी काही बचत होती तीही संपली. ऑगस्ट महिन्यात तिला एक घरकाम मिळालं होतं, दिवसा ५० रुपये रोजावर. तेही महिनाभरात सुटलं.

आता वसतिगृह पुन्हा कधी उघडतात यासाठी प्रिया आसुसली आहे. "दैवाने रिद्धीच्या वाट्याला काही वाईट येऊ नये म्हणजे झालं," ती म्हणते.

तिची आणि सोनीची मुलगी टाळेबंदी दरम्यान आपल्या आयांजवळ परतल्या, त्याच दरम्यान प्रेरणा नामक एका समाजसेवी संस्थेने केलेल्या एका रॅपिड असेसमेंट स्टडीनुसार धंदा करणाऱ्या ७४ पैकी (३० कुटुंबांची मुलाखत घेण्यात आली होती) ५७ बायांची मुलं टाळेबंदी दरम्यान आपल्या कुटुंबासोबत राहत होती. आणि भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या १८ पैकी १४ कुटुंबांना या काळात भाडं भरता आलं नाही, तर ११ कुटुंबांनी या महामारी दरम्यान जास्तीचं कर्ज घेतलं.

PHOTO • Aakanksha

'त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट गोष्टींचा त्यांच्यावर इतका गंभीर आघात होतो की त्यांना योग्य काय तेच कळत नाही. जर धंदा करणाऱ्या बायां ना किंवा त्यांच्या मुलांना काही झालं तर इथे साधारणपणे लोकांची प्रतिक्रिया असते, त्यात काय एवढं? जर मुलां च्या हक्कांचं हनन झालं तर ते सगळा दोष आई च्या माथी मारतात’

चारूची तीन वर्षीय मुलगी शीला आजारी पडल्यावर तिलादेखील मेमध्ये कामाठीपुऱ्यात एका सेवाभावी संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या निवारा केंद्रातून परत आणण्यात आलं होतं. "तिला कसली तरी ॲलर्जी आहे, पुरळ येत राहतं. मला तिचं टक्कलच करावं लागलं," ३१ वर्षीय चारू म्हणते. तिला आणखी चार मुलं आहेत: एक दत्तक मुलगी बदलापूरला असते आणि तीन मुलं बिहारमधील कटीहार जिल्ह्यातील आपल्या गावी मजुरी करणाऱ्या नातलगांकडे आहेत. ती दर महिन्याला त्यांच्याकरिता रू. ३,००० ते रू. ५,००० पाठवायची, पण टाळेबंदीपासून तिला जास्तीचं कर्ज घ्यावं लागलं. "मी आणखी कर्ज घेऊ शकत नाही, ते परत कसं फेडणार ते मला नाही माहीत," ती म्हणते.

म्हणून चारूला धंद्यावर जाण्यापूर्वी शीलाला घरवालीकडे सोडून जावं लागतं. ऑगस्टपासून तिने पुन्हा धंदा सुरू केलाय. "काही इलाज आहे का?" ती विचारते.

मात्र या महिलांना धंद्यात फार पैसा मिळत नाहीये. "हप्त्याला एखाद दोन गिऱ्हाईक येतंय," सोनी म्हणते. कधी कधी त्याचे चार-पाच होतात, पण क्वचितच. पूर्वी इथल्या बायांना दिवसाला रू. ४०० ते रू. १,००० मिळायचे – मासिक पाळी आली, तब्येत अगदीच खराब असली, किंवा मुलं घरी आली असली तरच सुट्टी. "आता तर दिवसाचे २०० किंवा ५०० मिळाले तरी खूप झालं," सोनी म्हणते.

*****

"ही अत्यंत वंचित कुटुंबं आहेत, इथकी की ज्यांनी पुढे येऊन आपले मुद्दे मांडले तरी कोणी लक्षही देणार नाही," जेसिंटा सलडाणा, मजलिस लीगल सेंटरच्या एक वकील आणि या केंद्राच्या राहत प्रकल्पाच्या प्रबंधक सांगतात. त्या मुंबईत लैंगिक हिंसा पीडितांना सामाजिक-न्यायिक मदतीचं काम करतात. त्या व त्यांची संस्था आता ईशाचा खटला हाताळतायत. "सोनीने पुढे येऊन खरंच धाडस केलंय. इतर लोक तर आवाजही उठवत नाहीत. शेवटी पोटापाण्याचा सवाल आहे. आणि व्यापक परिस्थिती पाहिली तर अनेक गोष्टी एकमेकात गुंतलेल्या असतात."

PHOTO • Aakanksha

वरून डावीकडे: प्रियाची खोली; दिवाणाच्या वरच त्यांच्या वस्तू ठेवायला दोन खण आहेत. वरून उजवीकडे: प्रत्येक खोलीत तीन छोट्या तुकड्यांमध्ये स्वयंपाकघराची आणि पिण्याच्या पाण्याची भांडी ठेवायला एकच जागा आहे, आणि तिच्यामागे साडी किंवा दुपट्ट्याचा पडदा करून एक छोटं न्हाणीघर. खालील रांगेत: मध्य मुंबईतील कामाठीपुरा वस्ती

त्या पुढे म्हणतात की सामाजिक संस्था, वकील, सल्लागार आणि इतर जणांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन धंदा करणाऱ्या बायांच्या अधिकारांकडे लक्ष द्यायला हवं. "त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट गोष्टींचा त्यांच्यावर इतका गंभीर आघात होतो की त्यांना योग्य काय तेच कळत नाही जर धंदा करणाऱ्या बाय किंवा त्यांच्या मुलांना काही झालं तर इथल्या लोकांची साधारणपणे प्रतिक्राय असते की त्यात काय एवढं? जर मुलांच्या हक्कांचं हनन झालं तर ते त्याचा दोष ते आईच्याच माथी मारतात."

दरम्यान, पॉक्सोअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या ईशाच्या खटल्यात आरोपीला ५ जुलै रोजी अटक करण्यात आली असून सहआरोपींविरुद्ध (प्रोत्साहन दिल्याबद्दल त्याची जोडीदार, घरवाली आणि पूर्वी धंदा करणारी एक बाई) अजून आरोपपत्र दाखल करून त्यांना ताब्यात घ्यायचं बाकी आहे. पॉक्सोअंतर्गत आरोपीला 'किमान दहा वर्षं कारावास, प्रसंगी जन्मठेपेची' तरतूद असून मृत्युदंड आणि या व्यतिरिक्त 'पीडितेचा वैद्यकीय खर्च आणि पुनर्वसनासाठी न्याय्य आणि वाजवी' दंड भरायचीही तरतूद आहे.

पण (ज्यांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत खटले दाखल केलेत) अशा पीडित बालकांच्या कुटुंबांच्या मते " सध्याच्या यंत्रणेवर, न्याय व्यवस्थेवर देखील असलेल्या विश्वासाचा अभाव" हे त्यांचं प्राथमिक आव्हान आहे, असं नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बेंगळुरू इथल्या सेंटर फॉर चाईल्ड अँड द लॉच्या फेब्रुवारी २०१८ मधील एका अहवालात म्हटलंय.

सलढाणा याला दुजोरा देतात. "[बालकाची] साक्ष चार वेळा नोंदवण्यात येते, पहिल्यांदा पोलीस चौकीत, नंतर वैद्यकीय तपासणी दरम्यान, आणि दोनदा न्यायालयात [दंडाधिकारी आणि न्यायाधीशापुढे]. काही वेळा बालकांना इतका धक्का बसला असतो की, ते सगळ्या आरोपींची नावंही घेत नाहीत, ईशाच्या बाबतीतही तसंच झालं. घरवालीचा सहभाग होता त्याबद्दल [अपराध थांबवणं किंवा त्याची माहिती देण्यात अयशस्वी] ती आता बोललीये."

शिवाय, त्या म्हणतात की, न्यायव्यवस्थेत खटला पुढे जायला फार वेळ लागतो, अगदी खटला दाखल करण्यापासून ते अंतिम निकाल लागेपर्यंत. जून २०१९ च्या अखेरीस, विधी व न्याय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार पॉक्सो कायद्याअंतर्गत एकूण १,६०,९८९ खटले प्रलंबित असून (उत्तर प्रदेशानंतर) त्यात १९,९६८ खटल्यांसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

PHOTO • Aakanksha

या महिलांना मात्र धंद्यात सध्या फार पैसा मिळत नाहीये

"खूप काम आहे आणि रोज किती तरी खटल्यांची भर पडत राहते," सलढाणा म्हणतात. "आम्हा सर्वांनाच ही प्रक्रिया जलद व्हायला हवीय आणि एक तर न्यायाधीशांची संख्या किंवा कामाचे तास वाढणं गरजेचं आहे." मागील सहा महिन्यांतले, शिवाय टाळेबंदीमुळे सुनावण्या स्थगित झालेले मार्च २०२० अगोदरचे खटले न्यायालय कसं हाताळतंय, याचंच त्यांना आश्चर्य वाटतंय.

*******

सोनी जेमतेम १६ वर्षांची होती तेव्हा तिच्या मैत्रिणीने कोलकात्यात तिचा सौदा केला. १३ वर्षांची असतानाच तिचं लग्न झालं. "माझं नवऱ्यासोबत [जो अधूनमधून एका कपड्याच्या कारखान्यात मदतनीस म्हणून काम करायचा] सारखं भांडण व्हायचं अन् मी माहेरी निघून यायची. एकदा असंच मी स्टेशनवर बसले होते, तर माझी एक मैत्रीण आली अन् म्हणाली की ती मला एका सुखरूप ठिकाणी घेऊन जाईल म्हणून." सोनीच्या मैत्रिणीने एका घरवालीशी सौदा करून तिला शहरातील धंद्याच्या भागात सोडून दिलं. तेव्हा जेमतेम एका वर्षाची तिची मुलगी ईशा तिच्या सोबत होती.

कालांतराने सोनीने चार वर्षांपूर्वी मुंबईच्या कामाठीपुऱ्याची वाट धरली. "घरी जावं वाटत नाही," ती म्हणते. "पण मी ना धड इथली, ना धड तिथली. इथे [कामाठीपुऱ्यात] मी कर्ज घेऊन ठेवलीयेत, ती फेडायची आहेत अन् माझ्या शहरात सगळ्यांना माझ्या धंद्याची माहिती आहे त्यामुळे मला ते गाव सोडावं लागलं."

ईशाला बाल संगोपन संस्थेत पाठवल्यापासून (कोविड संबंधित प्रतिबंधांमुळे) ती ईशाला भेटू शकली नाहीये, मग ती तिच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलते. "माझ्यासोबत जे घडलं, ते मी भोगतेच आहे. मी अशीही बरबाद बाई आहे, पण निदान माझ्या मुलीचं आयुष्य तरी बरबाद करू नका," ती म्हणते. "तिनं माझ्यासारखं जगू नये, मी जे भोगलं ते भोगू नये, असं वाटतं. मी लढतेय कारण उद्या माझ्या बाबतीत झालं तसं आपल्या पाठी कोणीच उभं राहिलं नाही असं तिला वाटायला नको."

आरोपीला अटक झाल्यावर त्याची जोडीदार (जिने मुलीच्या लैंगिक शोषणाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे) सोनीला त्रास देतीये. "ती माझ्या खोलीत येऊन माझ्याशी भांडते अन् तिच्या आदमीला जेलमध्ये पाठवलं म्हणून मला शिव्याशाप देते. ते म्हणतात की मी तिचा बदला घेतेय, काही जण म्हणतात की मी दारूडी अन् बेफिकीर आई आहे. पण नशीब, ते मला निदान आई तरी म्हणतायत."

शीर्षक छायाचित्र: चारू आणि तिची मुलगी शीला (फोटो: आकांक्षा)

अनुवादः कौशल काळू

Aakanksha

Aakanksha is a reporter and photographer with the People’s Archive of Rural India. A Content Editor with the Education Team, she trains students in rural areas to document things around them.

Other stories by Aakanksha
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo