विक्रम त्या रात्री घरी परतला नाही, तरी त्याची आई प्रिया निश्चिंत होती. तो कामाठीपुऱ्यातल्या आणखी एका गल्लीत एका घरवालीकडे काम करायचा आणि सहसा रात्री २:०० पर्यंत घरी यायचा किंवा कधी कधी त्याच्या कामाच्या ठिकाणी झोपी गेला तर दुसऱ्या दिवशी सकाळी.

तिने त्याला फोन लावून पाहिला, पण काहीच उत्तर नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी, ८ ऑगस्ट रोजीही तो आला नाही, तेव्हा मात्र तिला काळजी वाटू लागली. तिने मध्य मुंबईच्या नागपाडा पोलीस चौकीत व्यक्ती हरवल्याची तक्रार केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. "तो मुंबई सेंट्रलमध्ये एका मॉलशेजारी पैदलपुलाजवळ दिसला होता."

तिची घालमेल वाढू लागली. "कोणी पळवलं तर नसेल ना? त्याला नवी बिमारी [कोविड] तरी झाली नसेल ना?" ती विचार करु लागली. "या भागात कोणाला काय झालं याची कोणी फिकिरही करत नाही," ती म्हणते.

विक्रम मात्र एकटाच प्रवासावर निघाला होता, ज्याची तयारी त्याने अगोदरच करून ठेवली होती. त्याची तिशीतली आई टाळेबंदी दरम्यान धंदा करू शकली नव्हती, आणि तिची आर्थिक परिस्थिती खालावत चाललीये आणि कर्जाचा बोजा वाढतोय हे पाहत होता. त्याची नऊ वर्षांची बहीण रिद्धी शेजारच्या मदनपुऱ्यातल्या वसतिगृहातून घरी परत आली होती, आणि घर सामाजिक संस्थांनी वाटलेल्या राशनच्या पाकिटांवर चालत होतं. (या कहाणीतील सगळी नावं बदलली आहेत.)

आणि मार्चमध्ये टाळेबंदी झाल्यानंतर विक्रम जायचा ती भायखळ्यातील नगरपालिकेची शाळा देखील बंद झाली होती. म्हणून १५ वर्षांचा विक्रम बारीकसारीक कामं करू लागला.

घरी स्वयंपाकाला रोज रू. ६०-८० रुपयांचं घासलेट लागायचं. कामाठीपुऱ्यातील त्यांच्या लहानशा खोलीचं भाडं देणं त्यांना अवघड होत चाललं होतं. औषधपाण्याला पैसा हवा होता, आणि आधीचं कर्ज फेडायलाही. प्रिया तिच्या गिऱ्हाईकांकडून किंवा आसपासच्या लोकांकडून आणखी कर्ज घेत राहिली. गेल्या काही वर्षांत एका सावकाराकडून घेतलेलं कर्ज व्याज धरून रू. ६२,००० वर गेलं होतं. आणि गेले सहा महिने तिला घरवालीला (कुंटणखान्याची मालकीण) महिन्याच्या रू. ६,००० भाड्याचे, कसं तरी करून निम्मेच पैसे देता आले होते, शिवाय तिने तिच्याकडून अंदाजे रू. ७,००० उधार घेतले होते.

PHOTO • Aakanksha

विक्रम आणि त्याची आई प्रिया यांचं ७ ऑगस्ट रोजी भांडण झालं होतं कारण तिला तो काम झाल्यावर घरवालीच्या खोलीवर झोप तो ते पटत नव्हतं

ती किती दिवस धंदा करते त्यावर तिची कमाई अवलंबून होती. टाळेबंदीपूर्वी तिला दिवसाला रू. ५०० ते रू. १,००० मिळायचे. "नेहमी नाही काही. रिद्धी होस्टेलवरून परत आली किंवा मी बीमार असली की, मी सुट्टी घ्यायची," प्रिया म्हणते. शिवाय, ओटीपोटात कायम दुखत असल्यामुळे ती बरेचदा धंदा करू शकत नाही.

टाळेबंदी झाल्याच्या काही काळानंतर, आपल्याला एखादा कंत्राटदार रोजीसाठी बांधकामाच्या ठिकाणी घेऊन जाईल या अपेक्षेत विक्रम कामाठीपुऱ्यातील त्यांच्या गल्लीच्या निर्जन कोपऱ्याशी उभा राहू लागला. कधी तो फरशा लावायचा, कधी बांबूची परात बांधायचा किंवा ट्रक भरायचा. आणि रू. २०० रोजी कमवायचा. दिवसाला दोन्ही पाळ्या केल्या तरी जास्तीत जास्त रू. ९००. पण, ही कामं एखाद दोन दिवसच चालायची.

त्याने आपल्या परिसरातील रस्त्यांवर छत्र्या आणि मास्कही विकून पाहिलेत. तो या वस्तू आपल्या आधीच्या कमाईतून अंदाजे एक किलोमीटर लांब असलेल्या नल बाजारातून ठोक भावात विकत घ्यायचा. पैसे कमी पडले, तर स्थानिक सावकार किंवा आईकडे मागायचा. एकदा एका दुकानदाराने त्याला कमिशनवर इअरफोन विकायला सांगितले. "पण काही नफा झाला नाही," विक्रम म्हणतो.

त्याने टॅक्सी चालकांना आणि रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या लोकांना चहा विकून पाहिला. "काहीच जमत नव्हतं तेव्हा माझ्या मित्राला ही आयडिया सुचली. तो चहा बनवायचा आणि मी तो मिल्टनच्या थर्मासमध्ये नेऊन विकायचो." ५ रुपये कप, पैकी त्याला रू. २ मिळायचे, आणि दिवसाला तो रू. ६० ते १०० नफा काढायचा.

त्याने कामाठीपुऱ्यात राहणाऱ्या आणि येणाऱ्या लोकांना एका स्थानिक दारूच्या दुकानातून बियरच्या बाटल्या आणि गुटख्याच्या पुड्यादेखील विकल्या – टाळेबंदी दरम्यान दुकानं बंद असताना यांची मागणी असायची आणि बऱ्यापैकी नफा व्हायचा. पण पुष्कळ तरुण मुलं हाच उद्योग करत असल्याने चुरस होती, नियमित आवक नसायची आणि आपले उद्योग आईला माहीत पडतील, याची त्याला भीतीही वाटायची.

कालांतराने, विक्रम एका घरवालीकडे साफसफाई आणि इमारतीतल्या बायांसाठी किरणा माल आणून देणं अशा कामाला लागला. त्याला दर दोन दिवसांना रू. ३०० मिळू लागले, पण हे कामही अधूनमधून मिळायचं.

PHOTO • Courtesy: Vikram

टाळेबंदी सुरू झाल्यानंतर विक्रमने चहा, छत्र्या आणि मास्क विकणं, बांधकामाच्या ठिकाणी आणि खानावळीत काम करणं, अशी बरीच बारीकसारीक कामं करून पाहिली.

महामारीमुळे मजुरी करणं भाग पडलेल्या बालकामगारांच्या दलाचा विक्रम एक भाग होता. जून २०२० मध्ये आयएलओ आणि युनिसेफ यांनी प्रकाशित केलेल्या कोविड-१९ अँड चाईल्ड लेबर: अ राईम ऑफ क्रायसिस, अ टाईम टू ॲक्ट नामक लेखात महामारी दरम्यान पालकांच्या बेरोजगारीचा आर्थिक फटका बसल्याने मुलांना हातभार लावावा लागला अशा राष्ट्रांच्या यादीत भारताचा समावेश आहे. "कायद्याने सज्ञान नसलेली मुलं असंघटित क्षेत्रात आणि घरगुती कामं शोधून पाहतात, जिथे त्यांना धोकादायक आणि शोषक कामासोबतच अत्यंत वाईट स्वरूपाची बालमजुरी सहन करावी लागण्याचा मोठा धोका असतो."

टाळेबंदीनंतर प्रियादेखील काम शोधू लागली, आणि ऑगस्टमध्ये तिला कामाठीपुऱ्यात रू. ५० रोजीवर घरकाम मिळालं. पण ते महिनाभरच चाललं.

अशात ७ ऑगस्ट रोजी विक्रमचं तिच्याशी भांडण झालं. काम झाल्यावर तो घरवालीच्या खोलीत झोपतो हे प्रियाला पटत नव्हतं. नुकतंच, शेजारी एका चिमुकलीचा लैंगिक छळ झाल्यापासून ती सावध झाली होती, आणि रिद्धीला वसतिगृहावर परत पाठवण्यासाठी आसुसली होती. (पहा, 'इथे मुलींचं काय होतं ते सगळ्यांनाच माहितीये' )

त्या दुपारी, विक्रमने घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. तो काही काळापासून तयारी करतच होता, पण आईशी त्याबद्दल बोलून काय ते करावं असं त्याने ठरवलं होतं. त्या दिवशी, तो म्हणतो, "मी रागात होतो अन् थेट निघून जायचं ठरवलं." त्याने एका मित्राकडून ऐकलं होतं की अहमदाबादेत कामाच्या आकर्षक संधी आहेत.

तर आपला छोटा जिओ फोन आणि खिशात रू. १०० घेऊन, ७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७:०० वाजता त्याने गुजरातची वाट धरली.

त्याने निम्म्या पैशात स्वतःसाठी गुटख्याची पाच पाकिटं, आणि सोबत एक ग्लास फळाचा रस आणि हाजी अलीजवळ थोडं खायला घेतलं. तिथून पुढे विक्रम चालत गेला. त्याने सवारीसाठी हात दाखवून पाहिला, पण कोणीच थांबलं नाही. मध्ये आपल्याकडे असलेल्या रू. ३०-४० पैकी थोडे पैसे खर्च करून तो थोडंसं अंतर एका बेस्ट बसमध्ये चढला. ८ ऑगस्ट रोजी रात्री २:०० वाजेपर्यंत १५ वर्षांचा हा थकला-भागला मुलगा विरारमधल्या एका ढाब्याजवळ पोहोचला आणि उरलेली रात्र त्याने तिथेच घालवली. त्याने जवळपास ७८ किमी अंतर पार केलं होतं.

ढाब्याच्या मालकाने तो पळून वगैरे तर आला नाही ना, याची विचारपूस केली. विक्रमने थाप मारली की तो अनाथ असून अहमदाबादेत कामाच्या शोधात निघालाय. "ढाबावाल्याने मला सुचवलं की मी घरी परत जावं, तो म्हणाला की मला कोणीच कामावर ठेवणार नाही, आणि कोरोनामध्ये अहमदाबादला जाणं मुश्किल होतं." त्याने विक्रमला चहा, पोहे आणि ७० रुपये दिले. "मला घरी परत जावंसं वाटलं पण हातात थोडी कमाई घेऊनच," विक्रम म्हणतो.

PHOTO • Aakanksha

'मा झ्या [कामाठीपुऱ्यात ले ] पुष्कळ मि त्रांनी शाळा सोड लीये आणि ते काम करतात,' विक्रम म्हणतो, 'त्यांना पैसे कमा णं चांगलं वाटतं कारण पैसा साठवून ते स्वतःचा धंदा सुरू करू शकतात'

तो पुढे चालत गेला आणि त्याने पेट्रोल पंपाजवळ काही ट्रक पाहिले. त्याने सवारीची विचारपूस केली, पण फुकटात कोणीच घेऊन जायला तयार होईना. "काही बसमध्ये काही कुटुंबं होती, पण मी मुंबईचा [जिथून कोविडच्या पुष्कळ केसेस पुढे येत होत्या] आहे हे माहीत झाल्यावर कोणी मला चढू देईना." विक्रमने पुष्कळ जणांची अजीजी केली तेव्हा कुठे एक टेम्पो चालक त्याला न्यायला तयार झाला. "तो एकटाच होता, त्यानं विचारलं की मी आजारी आहे का, मी म्हटलं नाही, मग त्यानं मला आत घेतलं." त्या चालकानेही या किशोरवयीन मुलाला बजावलं की त्याला काम मिळणं शक्य नाही. "तो वापीवरून जाणार होता, म्हणून त्यानं मला तिथपर्यंत सोडायचं कबूल केलं."

तो गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील वापीमध्ये – मुंबई सेंट्रलपासून अंदाजे १८५ किमी लांब – ९ ऑगस्ट रोजी सकाळी ७:०० वाजता पोहोचला. तिथून विक्रमचा अहमदाबादला जायचा इरादा होता. दुपारी त्याने कोणाच्या तरी फोनवरून आपल्या आईला कॉल लावला. त्याच्या फोनची बॅटरी संपली होती आणि टॉकटाईम पण शिल्लक नव्हता. त्याने प्रियाला सांगितलं की तो वापीत सुखरूप आहे आणि फोन ठेवून दिला.

दरम्यान, मुंबईत प्रिया नागपाडा पोलीस चौकीला नियमित भेट देत होती. "पोलीस मलाच बेजबाबदार ठरवत होते, माझ्या धंद्यावरून मला बोलले, आणि म्हणाले की तो स्वतःच पळून गेलाय अन् काही काळाने परत येईल," ती सांगते.

विक्रमचा क्षणिक फोन संपताच तिने काळजीपोटी परत फोन केला. पण तो फोन मालकाने उचलला. "तो म्हणाला की तो विक्रम सोबत नव्हता अन् तो कुठे गेला त्याला माहीत नाही. त्याला एका हायवेवर चहाच्या टपरीवर विक्रम भेटला होता अन् तेवढ्यात त्यानं आपला फोन दिला होता."

विक्रमने ९ ऑगस्टची रात्र वापीतच घालवली. "माझ्याहून मोठा एक मुलगा एका छोट्या हॉटेलवर राखण करत होता. मी त्याला सांगितलं की अहमदाबादला कामासाठी चाललोय अन् कुठंतरी झोपायला जागा शोधतोय. तो म्हणाला की याच हॉटेलवर राहा आणि काम कर, मी मालकाशी बोलतो."

'I too ran away [from home] and now I am in this mud,' says Vikram's mother Priya, a sex worker. 'I want him to study'
PHOTO • Aakanksha

'मी पण [घरून] पळाली होती अन् आता या चिखलात फसलीये,' विक्रमची आई प्रिया म्हणते. ती धंदा करते. 'त्यानं शिकावं अशी माझी इच्छा आहे’

पहिला कॉल केल्याच्या चार दिवसांनंतर १३ ऑगस्ट रोजी पहाटे ३:०० ला विक्रमने आपल्या आईला आणखी एक कॉल केला. तो तिला म्हणाला की त्याला वापीच्या एका खानावळीत काम मिळालंय, भांडी धुण्याचं आणि खाण्याच्या ऑर्डरी घेण्याचं. प्रिया सकाळी नागपाडा पोलीस चौकीत पोलिसांना तडक खबर द्यायला गेली, पण त्यांनी तिला सांगितलं की तिनेच त्याला घेऊन यावं.

संध्याकाळी प्रिया आणि रिद्धी यांनी विक्रमला परत आणण्यासाठी मुंबई सेंट्रलहून वापीची ट्रेन पकडली. यासाठी प्रियाने घरवाली आणि एका स्थानिक सावकाराकडून रू. २,००० चं कर्ज घेतलं. ट्रेनचं भाडं रू. ४०० प्रति प्रवाशी होतं.

प्रियानी आपल्या मुलाला परत आणण्याचं ठामपणे ठरवलं होतं. त्याने तिच्यासारखं ध्येयहीन आयुष्य जगू नये, असं तिला वाटतं. "मी पण [घरून] पळाली होती अन् आता या चिखलात फसलीये, त्यानं शिकावं अशी माझी इच्छा आहे," प्रिया म्हणते. ती विक्रमच्या वयाची असताना महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातल्या आपल्या घरातून पळून गेली होती.

ती पळून आली कारण तिचा दारुडा बाप, जो कारखान्यात काम करायचा आणि तिची अजिबात काळजी घ्यायचा नाही (तिची आई ती दोन वर्षांची असतानाच मरण पावली होती), तिचे नातेवाईक तिला मारहाण करायचे आणि ती १२ वर्षांची असताना तिचं लग्न लावून द्यायला निघाले होते, तिच्या नात्यातलाच एक माणूस तिचा विनयभंग करत होता. या सगळ्याला कंटाळून ती पळून आली होती. "मी ऐकलं होतं की मला मुंबईत काम मिळेल," ती म्हणते.

छत्रपती शिवाजी टर्मिनसला उतरल्यावर प्रियाला कालांतराने मदनपुऱ्यात घरकाम मिळालं, त्यातून महिन्याला रू. ४०० कमवत ती त्या कुटुंबासोबत राहू लागली. कालांतराने, ती दक्षिण मुंबईतील रे रोडवर एका किराणा दुकानदारा सोबत काही महिने राहिली, नंतर ती म्हणते की तो गायब झाला. ती रस्त्यावर राहू लागली आणि तिच्या लक्षात आलं की ती गरोदर आहे. "भीक मागून जगत होते." (जे.जे. रुग्णालयात २००५ मध्ये) विक्रमचा जन्म झाल्यानंतरही ती फूटपाथवरच राहत होती. "एका रात्री मला एक धंदेवाली भेटली अन् तिनं मला खाऊ घातलं. तिनं मला सुचवलं की मला एक पोर पोसायचंय त्यामुळे मी धंदा सुरू करावा." बऱ्याच शंकाकुशंकांनंतर अखेर प्रिया राजी झाली.

कधी कधी ती कामाठीपुऱ्यातील काही बायांसह, कर्नाटकात बिजापूरला, त्यांच्या गावी धंदा करायला जायची. एकदा अशाच प्रवासादरम्यान त्यांनी तिची एका माणसाशी ओळख करून दिली. "त्या म्हणाल्या की तो माझ्याशी लग्न करेल, अन् मी अन् माझं पोर सुखाचं आयुष्य जगू." त्यांनी खासगीत 'पाट लावला' आणि ती ६-७ महिने त्याच्यासोबत राहिली, पण मग त्याच्या घरच्यांनी तिला हाकलून लावलं. "तेव्हा रिद्धी पोटात होती," प्रिया म्हणते. तिला नंतर कळलं की तो माणूस खोटं नाव लावत होता. त्याचं लग्न झालं होतं आणि त्या बायांनी तिला त्या माणसाला 'विकलं' होतं.

२०११ मध्ये रिद्धीचा जन्म झाल्यावर प्रियाने विक्रमला अमरावतीत तिच्या एका नातेवाईकाच्या घरी पाठवून दिलं. "तो वयात येत होता अन् या वस्तीतली एकेक गोष्ट पाहत होता…" पण त्यांनी त्याला बेशिस्त वागला म्हणून मारहाण केली, असं सांगून तो तिथूनही पळाला. "त्या टायमाला पण आम्ही तो हरवल्याची तक्रार केली होती. दोन दिवसांनी तो परतला." विक्रम ट्रेन पकडून दादर स्थानकावर पोहोचला, आणि ट्रेनच्या रिकाम्या डब्यांमध्ये रहायचा, लोक त्याला भिकारी समजून खायला द्यायचे तो खायचा.

Vikram found it hard to make friends at school: 'They treat me badly and on purpose bring up the topic [of my mother’s profession]'
PHOTO • Aakanksha

विक्रमला शाळेत मैत्री करणं अवघड जायचं: 'ते माझ्याशी वाईट वागतात अन् मुद्दाम तो [आईच्या कामाचा] विषय काढतात'

तो ८ किंवा ९ वर्षांचा असेल तेव्हा त्याला आठवडाभर मध्य मुंबईच्या एका बालगृहात 'बेघर' म्हणून डांबून ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर, प्रियाने त्याला अंधेरीत एका धर्मादाय संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या एका आश्रमशाळेत पाठवलं, तिथे तो इयत्ता ६ वीपर्यंत शिकला.

"विक्रम कायम असले काही तर उद्योग करतो. त्याच्या मामल्यात मला जास्त काळजी घ्यावी लागते," प्रिया म्हणते. तिला तो अंधेरीतील वसतिगृहातच राहायला हवा होता (तिथे त्याला काही वेळा समुपदेशकाकडे नेण्यात आलं होतं), पण एका राखणदाराशी हाणामारी करून तो तिथूनही पळाला होता. २०१८ मध्ये तिने त्याला भायखळ्यातल्या एका नगरपालिकेच्या शाळेत इयत्ता ७ वीत घातलं आणि तो कामाठीपुऱ्यात परत आला.

विक्रमला भायखळ्यातील शाळेतूनही असभ्य वर्तन आणि इतर मुलांशी भांडण केल्यामुळे बरेचदा काढून टाकण्यात आलं होतं. "शाळेतली मुलं अन् आसपासचे लोक माझ्या धंद्यावरून त्याला चिडवतात, ते त्याला आवडत नाही. तो लगेच चिडतो," प्रिया म्हणते. तो सहसा कोणाला आपल्या कुटुंबाविषयी सांगत नाही, आणि त्याला शाळेत मैत्री करणंही अवघड जातं. "ते माझ्याशी वाईट वागतात अन् मुद्दाम तो [आईच्या कामाचा] विषय काढतात," विक्रम म्हणतो.

तसा तो हुशार विद्यार्थी आहे, त्याचे मार्क नेहमी ९०च्या घरात असतात. पण त्याच्या इयत्ता ७ वीची गुणपत्रिका पाहिली तर दिसतं की कधी कधी तो महिन्यातून तीनच दिवस शाळेत गेलाय. तो म्हणतो की तो आपला अभ्यास भरून काढू शकतो आणि त्याला शिकायची इच्छा आहे. नोव्हेंबर २०२० च्या सुरूवातीला त्याला त्याची इयत्ता ८ वीची गुणपत्रिका मिळाली (शैक्षणिक वर्ष २०१९-२०) आणि त्याला सात विषयांत अ श्रेणी मिळाली असून उरलेल्या दोन विषयांत ब श्रेणी मिळाली आहे.

"[कामाठीपुऱ्यातल्या] माझ्या पुष्कळ मित्रांनी शाळा सोडून काम करायला सुरुवात केलीये. काही जणांना शिकण्यात रसच नाहीये, त्यांना पैसा कमावणं चांगलं वाटतं कारण पैसा साठवून ते स्वतःचा धंदा सुरू करू शकतात," विक्रम म्हणतो. (२०१० मध्ये कोलकात्यात धंदा करणाऱ्यांच्या वस्तीत राहणाऱ्या मुलांचा एक अभ्यास झाला, त्यानुसार, इथे शाळाबाह्य मुलांचा दर ४० टक्क्यांइतका असून "यातून शाळेतील कमी उपस्थिती ही धंदा करणाऱ्यांच्या वस्तीत राहणाऱ्या मुलांच्या नेहमीच्या समस्यांपैकी एक आहे, हे दुर्दैवी वास्तव अधोरेखित होतं," असं नमूद केलंय.)

आम्ही बोलत असताना विक्रम गुटख्याची पुडी उघडतो. "आईला सांगू नका," तो म्हणतो. पूर्वी तो धूम्रपान आणि प्रसंगी मद्यपानही करायचा, पण त्याला ते कडू लागायचं म्हणून त्याने ते थांबवलं. पण तो म्हणतो, "गुटख्याची आदत नाही सोडता येणार. मी चाखून पाहिला अन् त्याची तल्लफ कशी लागली, काय माहीत." कधीकधी प्रियाने त्याला गुटखा खाताना सापडला म्हणून मारलं आहे.

"इथल्या मुलांना सगळ्या घाण सवयी लागतात, म्हणून मला ती होस्टेलमध्येच अभ्यास करत असलेली बरी वाटतात. रिद्धी पण इथल्या बायांचीच नक्कल करते, कधी लिपस्टिक लावून तर कधी त्यांच्यासारखं चालून," प्रिया म्हणते. "इथं तुम्हाला रोज फक्त मारामारी, भांडणंच दिसतील."

The teenager's immediate world: the streets of the city, and the narrow passageway in the brothel building where he sleeps. In future, Vikram (left, with a friend) hopes to help sex workers who want to leave Kamathipura
PHOTO • Aakanksha
The teenager's immediate world: the streets of the city, and the narrow passageway in the brothel building where he sleeps. In future, Vikram (left, with a friend) hopes to help sex workers who want to leave Kamathipura
PHOTO • Aakanksha

या किशोरवयीन मुलाच्या भोवतालची दुनिया: शहरात ले रस्ते, आणि तो ज्या कुंटणखान्यात झोपतो तिथला अरुंद वऱ्हांडा. ज्या बायां ना कामाठीपुरा सोडून जायचाय, अ शांना विक्रम (डावीकडे, एका मित्रासोबत) भविष्यात मदत करू इच्छितो

टाळेबंदीपूर्वी, विक्रम दुपारी १:०० ते ६:०० दरम्यान शाळेत असायचा, आणि सायं ७:०० वाजेपर्यंत एका सामाजिक संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या नाईट सेंटर आणि शिकवण्यांना जायचा, जेव्हा या मुलांच्या आया धंदा करायच्या. मग तो एक तर घरी परतायचा – त्याची आई ज्या खोलीत गिऱ्हाईक करायची तिच्या शेजारच्या वऱ्हांड्यात – किंवा कधीकधी निवाऱ्यातच रात्र काढायचा.

टाळेबंदी झाल्यापासून त्याची बहीणही घरी परत आल्यामुळे त्यांच्या खोलीत, त्याच्या शब्दांत सांगायचं तर "ट्रेनचा डब्बा", आणखीच अडचण होऊ लागली. मग तो कधी कधी रात्री रस्त्यावर भटकायचा, किंवा काम मिळेल तिथे राहू लागला. त्यांची खोली जेमतेम १०×१० फुटांची असेल, ४×६ च्या तीन आयताकार तुकड्यांत विभागलेली, प्रत्येक खोलीत एक भाडेकरू राहणार – धंदा करणारी एकटी बाई किंवा सोबत तिचं कुटुंब. बाया सहसा याच खोल्या धंद्यासाठी वापरतात.

१४ ऑगस्ट रोजी प्रिया आणि आपल्या बहिणीसोबत ट्रेनने परत आल्यावर विक्रम दुसऱ्या दिवशी शेजारच्या नाक्यावर काम शोधू लागला. तेव्हापासून त्याने भाज्या विकून पाहिल्या, बांधकामाच्या ठिकाणी काम केलं, पोती वाहून नेलीत.

त्याची आई विक्रमच्या शाळेतून काही निरोप येतोय का याची वाट पाहत बसली होती आणि ऑनलाईन वर्ग सुरू झालेत, हे तिला माहीतही नव्हतं. त्याच्याकडे स्मार्टफोन नाहीये आणि जरी असता, तरी त्याचा वेळ सध्या कामात जातो, आणि वर्गांसाठी इंटरनेट वापरायला त्यांना पैसे लागले असते. शिवाय, दीर्घकाळ अनुपस्थितीमुळे शाळेनं त्याचं नाव हजेरीपटावरून काढून टाकलंय, प्रिया सांगते.

तो जर असाच काम करत राहिला तर त्याचं शिक्षणच थांबेल या भीतीने तिने विक्रमला एका आश्रमशाळेत पाठवण्यासाठी डोंगरीतील बालकल्याण समितीशी संपर्क साधलाय. अर्ज प्रक्रियेत आहे. तो मंजूर झाला, तरी त्याचं एक शैक्षणिक वर्ष (२०२०-२१) वाया गेलेलं असेल. "एकदाची शाळा सुरू झाली की त्यानं काम न करता अभ्यास करावा, असं वाटतं. त्यानं लफंडर व्हायला नको," प्रिया म्हणते.

Vikram has agreed to restart school, but wants to continue working and helping to support his mother
PHOTO • Aakanksha
Vikram has agreed to restart school, but wants to continue working and helping to support his mother
PHOTO • Aakanksha

विक्रम शाळेत परत जायला राजी झालाय, पण त्याला काम सुरूच ठेवून आपल्या आईला मदत करायची आहे

रिद्धीला दादरच्या एका आश्रमशाळेत प्रवेश मिळालाय, आणि नोव्हेंबरच्या मध्यात तिला तिथे पाठवण्यात आलंय. ती शाळेत गेल्यामुळे प्रियाने, अधूनमधून आणि पोटदुखीतून आराम मिळेल तसा पुन्हा धंदा पुन्हा सुरू केला

विक्रमला शेफ बनण्यात आपलं नशीब आजमावून पाहायचंय, त्याला स्वयंपाकाची आवड आहे. "मी कोणाला सांगितलं नाहीये, ते म्हणतील "क्या लडकियों का काम हैं," तो म्हणतो. त्याचं आणखी मोठं स्वप्न म्हणजे ज्या बायांना कामाठीपुरा सोडून जायचंय, त्यांना मदत करणं. "त्यांना मदत करायला अगोदर मला खूप पैसा कमवावा लागेल, नंतर प्रत्येकीला मनापासून जे काम करायचंय, ते शोधून द्यायचं," तो म्हणतो. "खूप जण म्हणतात की त्यांना इथल्या बायांना मदत करायची आहे, पण या वस्तीत नव्या दीदी येतच राहतात, मारपीट अन् घाण घाण गोष्टी [लैंगिक शोषण] करून इथं टाकून दिलेल्या. स्वतःच्या मर्जीनं कोण येणार? अन् त्यांना कोण वाचवतं."

ऑक्टोबरमध्ये विक्रम वापीतील खानावळीत परत गेला तिथे त्याने दोन आठवडे दिवसाचे बारा तास काम केलं, भांडी धुणं, फरशा व टेबल साफ करणं, आणि बरंच काही. त्याला दोन वेळचं जेवण आणि संध्याकाळी चहा मिळायचा. नवव्या दिवशी त्याचं एका सहकाऱ्याशी वाजलं, दोघांनीही एकमेकांना बदडून काढलं. दोन आठवड्यांसाठी ठरलेल्या रू. ३,००० ऐवजी हाती रू. २,००० रुपये घेऊन तो ऑक्टोबर अखेरीस घरी परतला.

तो आता एका भाड्याच्या सायकलवर मुंबई सेंट्रलच्या आसपासच्या हॉटेलांतून पार्सल पोहोचवण्याचं काम करतो. कधी कधी, तो कामाठीपुऱ्यातील एका फोटो स्टुडिओमध्ये पेन ड्राईव्ह आणि एसडी कार्ड पोहोचवण्याचं कामही करतो. त्याची आवक जेमतेमच आहे.

प्रिया वसतिगृहातून प्रतिसाद मिळण्याची वाट पाहतेय आणि तिला आशा आहे की तिचा गरम दिमाखाचा व त्रासलेला मुलगा तिथून तरी पळून जाणार नाही. विक्रम शाळेत परत जायला राजी झालाय पण त्याला काम सुरूच ठेवून आपल्या आईला मदत करायची आहे.

अनुवादः कौशल काळू

Aakanksha

Aakanksha is a reporter and photographer with the People’s Archive of Rural India. A Content Editor with the Education Team, she trains students in rural areas to document things around them.

Other stories by Aakanksha
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo