एका नजरेत त्यांना खऱ्या सोन्याची पारख करता येते. “एखादा दागिना निस्ता माझ्या हातात ठेवा, तो किती कॅरटचा आहे मी सांगतो ना तुम्हाला,” रफिक पापाभाई शेख सांगतात. “मी एक ‘जोहरी’ आहे” (जवाहिऱ्या, दागिने घडवणारा कारागीर). शिरूर-सातारा महामार्गावर पडवी गावामध्ये आमच्या या गप्पा चालू होत्या, आणि इथेही कदाचित त्यांच्या हाती सोनंच लागलंय. या वेळी एका सुरू होऊ घातलेल्या एका हॉटेलच्या रुपात.

पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या दौंड तालुक्यातून आम्ही प्रवास करत होतो जेव्हा आम्ही हे हॉटेल पार केलं. एकदम भडक रंगानी रंगलवलेलं एखाद्या टपरीसारखं – ‘हॉटेल सेल्फी’. हॉटेलचं नाव दारावरती गडद हिरव्या आणि लाल रंगात लिहिलं होतं. ते पाहताच आम्ही तिथेच मागे वळलो. हे हॉटेल न पाहून कसं चालेल?

“मी खरं तर हे हॉटेल माझ्या लेकासाठी टाकलंय,” रफिक सांगतात. “मी तर जवाहिऱ्याचंच काम करतोय. पण मग मी विचार केला, लेकासाठी, या लाइनमध्ये येऊन पहायला काय हरकत आहे? हायवेला या भागात गर्दी असते आणि लोक चहा-नाश्त्यासाठी थांबतात.” बाकीच्या काही हॉटेल्सप्रमाणे त्यांनी हायवेला लागून हॉटेल बांधलं नव्हतं, समोर प्रशस्त जागा ठेवली होती. लोकांना गाडी लावता यावी म्हणून – आम्हीही तेच केलं होतं.

PHOTO • P. Sainath

रफिक शेख, हॉटेलमालक आणि एक जवाहिरे – नाही नाही, हा काही त्यांचा सेल्फी नाहीये

आम्ही त्यांना सांगितलं की त्यांच्या हॉटेलच्या नावाने आम्हाला वळून उलटं यायला भाग पाडलं आणि खरं तर आम्हाला साताऱ्यात काही कार्यक्रमाला घाईने पोचायचं होतं – हे ऐकून गडी खूश झाला. ते एकदम खुलून हसले आणि आपल्या मुलाकडे पाहताना पूर्ण वेळ त्यांच्या चेहऱ्यावर ‘बघ-तुला-म्हटलं-होतं-की-नाही’ असा भाव होता. हे नाव त्यांनीच निवडलं होतं.

छे छे, आम्ही काही त्यांच्या या पिटकुल्या हॉटेलसमोर सेल्फी काढताना वगैरे त्यांचा फोटो बिलकुल काढला नाही. हे म्हणजे अगदीच सरधोपट झालं असतं. आणि त्यामुळे त्यांनीच पहिल्यांदा दिलेल्या या एकमेव अशा नावाची मजाच निघून गेली असती. कुणी तरी कुठे तरी ‘सेल्फी’ नावाचं हॉटेल काढणं भागच होतं. त्यांनी काढलं, इतरांच्या आधी. अर्थात आम्ही पाहिलेलं तरी हे पहिलंच. (भारताच्या खेड्यापाड्यात सगळ्या खानावळी, उपहारगृहं, धाबे आणि चहाच्या टपऱ्यादेखील ‘हॉटेल’च असतात.)

अर्थात, एकदा का हॉटेल सुरू झालं की इथे प्रवाशांची आणि पर्यटकांची भरपूर गर्दी येणार आणि ते त्यांचे स्वतःचे सेल्फी चोचले पुरवूनही घेणार. आणि कदाचित खाण्यापेक्षा सेल्फीसाठीच जास्त. इथल्या चहाची चव कदाचित विस्मृतीतही जाईल, पण हॉटेल सेल्फी कायम तुमच्या ध्यानात राहणार. ईगल या बॅण्डच्या अगदी प्रसिद्ध गाण्याच्या ओळींना स्मरून असं म्हणता येईल – यू कॅन चेक आउट एनी टाइम यू लाइक, बट यू कॅन नेव्हर लीव्ह... थोडक्यात काय – एकदा याल तर येतच रहाल...

खात्री बाळगा, रफिक शेख यांचं हॉटेल सेल्फी गर्दी खेचणार. रफिक यांना त्याची पुरेपूर जाणीव आहे. नुसत्या नजरेनंच त्यांना अस्सल सोनं कळतं.

अनुवादः मेधा काळे

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is also a translator for PARI.

P. Sainath is Founder Editor of the People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought'.

Other stories by P. Sainath