माहितीपट पहा; त्याचा गर्भितार्थ स्पष्ट आहे.

सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचं जंगल आहे. यातलं १०,३६० चौ.कि.मी. क्षेत्र पश्चिम बंगालच्या साउथ २४ परगणा जिल्ह्यात येते. खाऱ्या व गोड पाणथळ भागावर विस्तारलेला हा प्रदेश, प्राणी, पक्षी, वृक्षवेली अशा जैवविविधतेने नटलेला आहे. सुंदरबनच्या समन्वित आणि अद्वितीय गुणांमुळे युनेस्कोने हे जागतिक वारसा क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे.

येथे पिढ्यान् पिढ्या लोककथांमधून बोनबिबीचं पुराण सांगितलं जातं. पुराणात असं संगितलय की वाघाच्या वेशात दक्षिणराय नावाच्या दुष्ट ब्राह्मणापासून लोकांना वाचवण्यासाठी अरबी भागातून जंगलांच्या देवतेला (बोनबिबीला) सुंदरबनमध्ये – म्हणजेच अठरा भरतींच्या क्षेत्रात पाठवलं गेलं. अशा रितीने एकसमान संकटांना तोंड देताना हिंदू व मुस्लिम पौराणिक कथा एकमेकींच्या हातात हात घालून येतात. फक्त सुंदरबन मध्येच अनुभवता येईल अशा या अद्वितीय संमिश्र जीवनपद्धतीत धार्मिक भेद मिटून गेले आहेत.

नदीच्या बेटांवर अनेक छोट्या छोट्या गवती देव्हाऱ्यांमध्ये राजा दक्षिणरायवर आरुढ झालेल्या बोनबिबी व भाऊ शाह जंगली यांच्या मूर्ती दिसतात. “मा बोनबिबी अल्लाह, अल्लाह” आणि “बाबा दक्षिणराय हरी, हरी” असा दोन्हींचा एकत्रित जयघोष करून, त्यांना नमन करून स्थानिक लोक मध गोळा करायला किंवा मासे धरायला वाघाच्या क्षेत्रात शिरतात.

बेटवासीयांचा असा विश्वास आहे की सुंदरबनचं जंगल केवळ गरीब आणि जगण्यासाठी आवश्यक तेवढंच जंगलातून आणणाऱ्यांसाठी आहे. जास्तीची कोणतीही गोष्ट जंगलातून आणायचा त्यांचा हेतू नाही. त्यांच्या मते चांगलं जगायला फक्त शुद्ध मन आणि रिक्त हात लागतात. मानव आणि जंगलातील इतर राहिवाशांमधल्या या अलिखित करारामुळे जंगलावर अवलंबून असलेला प्रत्येक जण एकमेकांच्या गरजांचा आदर करतो. इथे ‘शुद्ध मन’ म्हणजे जंगलात असताना हव्यास आणि हिंसा रहित वागणूक आणि ‘रिक्त हात’ म्हणजे जंगलात बंदुकीशिवाय प्रवेश करणे असा आहे.

बोनबिबी लोकांसाठी जंगलाचा अवतार आहे. स्थानिक लोकांच्या जंगलाबद्दल, व्याघ्र संवर्धनाबद्दल असलेल्या त्यांच्या वचनाचं ही श्रद्धा म्हणजे एक प्रतीक आहे. बोनबिबीची जत्रा (ज्यात कलाकार तिच्या शौर्याच्या लोककथा सादर करतात) ही सुंदरबनच्या खास कलाकृतीची ओळख बनली आहे. हे सादरीकरण अतिरंजित असलं तरी त्यातील गर्भितार्थ स्पष्ट असतो “जंगल टिकलं तरच वाघ जगतो आणि त्यातूनच आपली भरभराट होऊ शकते.”

सुंदरबन – अठरा भरतींची भूमी आणि एक देवी हा माहितीपट जगातील सर्वात मोठ्या त्रिभुज (डेल्टा) क्षेत्रातील लोकांच्या भावविश्वावर केंद्रित आहे. तेराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात लघु आणि अॅनिमेशन चित्रपट श्रेणी २०१४ साठी या माहितीपटाची अधिकृतरित्या निवड झाली होती.

Malay Dasgupta

Malay Dasgupta is an independent documentary filmmaker; he heads the broadcast management department at the Calcutta Media Institute. Several films on folk art and culture, music and environment, produced and directed by him have been screened at national and international film festivals.

Other stories by Malay Dasgupta
Translator : Anuja Date

Anuja Date is a Bengaluru-based PhD student and works on issues of rights of forest dwellers.

Other stories by Anuja Date