टाळेबंदीमुळे अब्दुल सत्तार यांना बंगळुरू सोडून गावी परतावं लागलं त्याला आता चार महिने होऊन गेलेत.
"काहीही करून निघून जाऊ, उशिरा का होईना," ते म्हणाले होते. ही गोष्ट आहे २० मे रोजी अम्फान चक्रीवादळ जमिनीवर धडकण्यापूर्वीची. तरीही, अब्दुल आणि त्यांचे मित्र काहीही करून १,८०० किमी अंतर पार करून पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील चाक लछीपूर या गावी आपल्या घरी परतण्यास सज्ज होते.
अब्दुल मुंबईहून बंगळुरूला येऊन अजून काहीच महिने झाले होते. जानेवारी किंवा फेब्रुवारीत कधी तरी, ते म्हणतात. त्यांच्या पत्नी हमीदा बेगम, वय ३२, गृहिणी असून त्यांची मुलं, सलमा खातून, वय १३, आणि यासिर हमीद, वय १२, घाटाल तालुक्यातील त्यांच्या गावी तीन खोल्यांच्या लहानशा घरात राहतात. त्यांच्या कुटुंबाकडे २४ दिस्मिल (पाव एकर) जमीन आहे, जिच्यावर त्यांचा भाऊ भातशेती करतो.
अब्दुल यांनी इयत्ता आठवीत शाळा सोडून गावातील बहुतांश जणांप्रमाणे भरतकाम शिकायला सुरुवात केली होती. तेव्हापासून, ते कायम फिरस्तीवर असतात, काही वर्षं दिल्लीत काम केलं, आणि नंतर मुंबईत, दर ५-६ महिन्यांनी घरी भेट देतात. "मी मशीनची कशिदाकारी करतो. मुंबईत जास्त काम मिळत नव्हतं, म्हणून विचार केला की आपल्या भावासोबत काम करावं," ते म्हणाले.
चाळिशीचे अब्दुल आपला चुलत भाऊ, ३३ वर्षीय हसनुल्ला सेख (त्यांच्या आधार कार्डवर लिहिल्याप्रमाणे) याच्यासोबत त्याच्या दक्षिण बंगळुरूमधील लहानशा शिवण उद्योगात सामील झाले. ते पाच जणांसोबत एक खोली करून राहायचे, सगळे चाक लछीपूरचे. हे सहा जण हसन यांच्या दुकानात शिंपी आणि कशिदाकार म्हणून काम करायचे.


परिस्थिती डामाडौल असूनसुद्धा मशीनची कशिदाकारी करणारे अब्दुल सत्तार (डावीकडे) आणि त्यां चा चुलत भाऊ हसनुल्ला सेख (उजवीकडे) काहीही करून, १ , ८०० किमी अंतर पार करून पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील चाक लछीपूर या गावी आपल्या घरी परतण्यास सज्ज होते
हसन आपली पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलासोबत १२ वर्षं बंगळुरूत मुक्कामी होते. एप्रिल व मे महिन्यांतली लगीनसराई व रमझानमुळे त्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. "आम्हाला या महिन्यांत पुष्कळ ऑर्डरी मिळायच्या," ते म्हणाले. या हंगामात प्रत्येक कामगाराला दिवसाला अंदाजे किमान रू. ४००-५०० मिळाले असते. प्रत्येकाला महिन्याचे किमान रू. १५,०००-१६,००० मिळतील अशी अपेक्षा होती आणि सगळा खर्च वजा जाऊनही हसन यांनी रू. २५,००० कमावले असते.
"आमच्यापैकी जवळपास सगळे जण आपला किराया आणि राहण्याचा खर्च रू. ५,०००-६,००० मध्ये भागवतात आणि राहिलेली पैसा घरी पाठवून देतात," अब्दुल म्हणाले. "मला घर चालवायचं असतं, मुलांच्या शाळेचा खर्च द्यावा लागतो. थोडा पैसा आईवडिलांच्या औषधपाण्याला पण देतो." (त्यांचे आईवडील त्यांच्या थोरल्या भावाकडे राहतात; हे चार भाऊ आणि एक बहीण आहेत. भातशेती करणाऱ्या त्यांच्या सर्वांत मोठ्या भावाचं अम्फान चक्रीवादळाने शेतात पाणी साचल्यामुळे खूप नुकसान झालं.)
पण टाळेबंदी झाल्यापासून अब्दुल यांनी बंगळुरूमध्ये जेमतेम दोन महिने काम केलं होतं. त्यांचा काम ठप्प झालं, तसतसं राशन संपू लागलं. "बाहेर पाऊल टाकता येईना," हसन म्हणाले. "आमच्या इलाक्यातील सगळी दुकानं बंद झाली होती. अन्न विकत घ्यायला कुठे जावं, काही पत्ता नव्हता. नशीब आमचं, जवळच एक मशीद आहे. तिथले स्वयंसेवक आम्हाला दोन वेळचं जेवण देऊ लागले."
"इथे बंगलोरमध्ये आमच्या गावातले आणि आसपासच्या ठिकाणचे बरेच लोक आहेत," अब्दुल यांनी मला सांगितलं. "सगळे एकाच पेशात आहेत – शिलाई आणि कशिदाकारी. सहसा ५-६ जण एका खोलीत राहतात. आम्हाला कळलं की त्यांच्यातील पुष्कळ जणांकडे किराणा किंवा पैसे उरले नव्हते." सेवाभावी नागरिकांनीही त्यांना राशनची मदत केली, ते म्हणाले. "आम्ही पण आम्हाला मिळालेल्या वस्तू ओळखीच्या लोकांमध्ये वाटून थोडीफार मदत केली. आम्ही इतरांना मदत करतोय हे पाहून पोलिसही आम्हाला गाड्यांवर फिरू देत होते."


घरी पत्नी ह मी दा आणि मु लं, सलमा व यासिर यांच्याकडे परतल्यावर अब्दुल यांनी घर चालव ण्यासाठी शेतमजुरी केली
दोन महिने कमाई नसल्याने आणि परिस्थिती डामाडौल झाल्यामुळे अब्दुल, हसन आणि त्यांचे साथीदार गावकरी चाक लछीपूरला परतण्यास उतावीळ झाले होते. "इतरांच्या भरवशावर किती वेळ राहणार?" हसन म्हणाले होते. "परत गेलो तर तिथे आमचे नातेवाईक आहेत, निदान आमच्या जेवणाची सोय तरी होईल."
"आता आम्हाला फक्त परत जायचंय," अब्दुल म्हणाले. "आमच्या घरचे पण आता परत या म्हणतायत. इथे बीमार पडणं आम्हाला परवडणार नाही. आमचा एक नातेवाईक मुंबईत घरच्यांपासून आणि नातेवाईकांपासून दूर या कोरोनाच्या बिमारीने मेला. आम्हाला इथे असं काही झालं तर विचार करा! आमची काळजी घ्यायला इथे कोणी घरचं नाही. आता, आमचा इरादा पक्का झालाय."
पण घरी परत येणं जोखमीचं ठरलं. परवानगीसाठी अर्ज कुठे करायचा, पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करायला त्यांना परवाना हवा की नाही, आणि ट्रेन कधी सुटणार, याबाबत बराच गोंधळ होता. इंटरनेटची फारशी सुविधा नसतानाही त्यांनी कसंबसं राज्य शासनाच्या सेवा सिंधू संकेतस्थळावर अनिवार्य असलेला प्रवास अर्ज भरला. त्यानंतर मंजुरीचा एसएमएस येण्याची त्यांनी १० दिवस वाट पाहिली. अब्दुल यांनी आपली प्रवास याचिका दाखल करण्यासाठी नजीकच्या पोलीस चौकीतही भेट दिली.
"माझे रोजे सुरू आहेत. त्यात एवढ्या उन्हात पोलीस स्टेशनच्या बाहेर तासन् तास वाट पाहत उभं राहणं मुश्किल आहे," ते मला म्हणाले. ट्रेनबाबत अनिश्चितता आणि जागा मिळण्याअगोदरच त्यांच्या परवान्याची मुदत संपेल या भीतीने हे लोक इतर पर्याय शोधू लागले. खासगी व्हॅन पाच जणांचे रू. ७०,००० मागत होत्या. एका बस चालकाने तर या प्रवासाचे त्यांना रू. २.७ लाख मागितले.

अब्दुल यांच्या सर्वांत मोठ्या भावासह चाक लछीपूर गावातील शेतकऱ्यां चं अ म्फा न चक्रीवादळामुळे खूप नुकसान झालं
पुष्कळ प्रयत्नानंतर अब्दुल आणि हसन यांनी एका बसची (शीर्षक छायाचित्र पहा) व्यवस्था केली. "आमच्या गावातील एकजण बस सेवा चालवतो, त्याला बस पाठवायला खूप मनवावं लागलं," हसन यांनी मला मेमध्ये सांगितलं. "त्यांनीच बंगालमधून आमच्या पासेस अन् परवाने काढलेत. आम्ही ३० जण गोळा केलेत, आम्ही सगळे एकाच गावचे आहोत, सगळे याच शिलाई आणि कशिदाकारीच्या पेशात आहोत. आम्ही रू. १.५ लाख देत आहोत. काही मुलांना यासाठी जमीन-जेवरात गहाण ठेवावे लागले. बस उद्या सकाळी येईल अन् आम्ही निघालेलो असू."
ह्या मंडळींना ठरल्याप्रमाणे पुढल्या दिवशी प्रस्थान करता आलं नाही, कारण बस आंध्र सीमेवर ताटकळत राहिली. अखेर एक दिवस उशिरा, २० मे रोजी, ज्या दिवशी अम्फान चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या जमिनीवर धडकलं, त्यांनी प्रस्थान केलं. ठिकठिकाणच्या गस्तनाक्यांवर विलंब होत अखेर २३ मे रोजी बस चाक लछीपूर गावी पोहोचली. घरी आल्यावर अब्दुल आणि इतर जणांनी आपल्या लहानशा घरांमध्ये दोन आठवडे विलगीकरणात काढले.
ते निघाले तेव्हा हसन आणि त्यांच्या कुटुंबाने आपलं बंगळुरूमधील घर रिकामं केलं, पण त्यांनी आपल्या शिलाई यंत्रांसह दुकानाची जागा, आणि कामगार राहायचे ती खोली तशीच ठेवली. मालकिणीने दोन महिन्यांसाठी रू. १०,००० आगाऊ रकमेच्या बदल्यात एप्रिल व मेचं थकीत भाडं काढून घेतलं. मे नंतरच्या महिन्यांचं भाडं घ्यायला ते परत येईस्तोवर थांबायचं तिने मान्य केलं.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हसन बंगळुरूला परत आला. मात्र टाळेबंदी शिथिल झाली तरी धंद्यात तेजी आली नाही, तो म्हणतो. "आम्ही दुकान खुलं ठेवलं तरी अजून काही काळ तरी कशिदाकारी किंवा शिलाईचं मोठं काम घेऊन कोणी गिऱ्हाईक येणार नाही. काही काळ कारोबार नरमच राहणार. आमचा छोटा धंदा आहे. रोज पैसा मिळाला नाही तर या शहरात राहणं परवडणार नाही."
अब्दुल अजूनही आपल्या गावातच आहेत, जिथे त्यांना जवळपास २५ दिवस रू. ३०० रोजंदारीवर धानाच्या शेतात काम मिळालं. ते म्हणतात की ते आपल्या बचतीतून, आणि त्या काही दिवसांच्या शेतमजुरीतून घर चालवत आहेत. "आता गावात अजिबात काम मिळत नाहीये. म्हणून तर आम्ही गाव सोडून गेलो होतो," ते पुढे म्हणतात. "आम्ही [बंगळुरूला] परत गेलं पाहिजे."
पण बंगळुरूमध्ये कोविड-१९ च्या केसेस वाढू लागल्याने अब्दुल साशंक आहेत. "हसनभाई म्हणत होते त्या हिशेबाने मी प्रवासाचं बघीन. असं कमाई न करता बसून थोडी राहणार आहे. [कशिदाकारीपासून] फार काळ लांब राहू शकत नाही. आम्ही परत जाऊ. एकदा सगळं ठीक होऊ द्या, आम्ही परत जाऊ."
अनुवादः कौशल काळू