महाराजांच्या बालेकिल्ल्यातल्या शयनयानात धक्का पोचेपर्यंत बरीच पडझड झाली होती. तटबंदी मजबूत करायला उसीर झाला आणि आपल्या सत्राप आणि हुजऱ्यांना सुद्धा निरोज द्यायला वेळ मिळाला नाही.

खंदकांसारख्या नव्या भेगा राज्यभर चमचमत होत्या. नुकत्याच कापलेल्या गव्हाच्या पेंढ्यासारखा त्यांचा वास हवेत भरून राहिला होता. भुकेल्या प्रजेबद्दल राजाच्या मनात असलेल्या घृणेहून अधिक खोल भेगा. महाकाय छातीहून अधिक रुंद अशा या भेगा रस्त्यातून महालाकडे जायला लागल्या. बाजारातून, त्याच्या लाडक्या पवित्र गोशाळांच्या भिंतीही त्यांनी सोडल्या नाहीत. खरंच फारच उशीर झाला होता.

हे धक्के त्रासदायक असून फार काही लक्ष देण्याइतके मोठे नाहीत हे कोकलून सांगणारे पाळीव कावळे पिंजऱ्यातून सोडण्याइतकाही वेळ मिळाला नाही. मोर्चेकऱ्यांची दमदार पावलं त्यांना आवडू नयेत यासाठी काही करताच आलं नाही. उशीर झालाच. आपल्या चिरलेल्या, उन्हानी रापलेल्या याच पावलांनी त्याचं सिंहासनच डळमळत केलं हो! पुढचे एक हजार वर्षं तरी महाराजांचं हे दैवी साम्राज्य असंच टिकून राहणार असल्याची शिकवण द्यायचीच राहून गेली. शेणा-मातीतून मक्याची कणसं फुलवणारे हे हिरवे हात आता थेट आकाशालाच जाऊन पोचले की.

पण या असुरी मुठी आहेत तरी कुणाच्या? निम्म्या तर दिसतायत स्त्रिया आणि तिघांतल्या एकाजवळ आहेत गुलामीच्या खुणा. चारातला एक आहे पुरातन, इतरांपेक्षा फार फार जुना. काही होते सप्तरंगी, काही किरमिजी, काहींची माथी पिवळ्या रंगात झाकलेली तर काहींच्या अंगावर केवळ फाटकी-तुटकी कापडं. पण ही कापडं महाराजांच्या करोडो रुपयांच्या उंची वस्त्रांपेक्षाही मौल्यवान. मोर्चे काढत, गात, नाचत, हसत खिदळत निघालेल्या मृत्यूंजयांचा सोहळा होता तो. हातात नांगर घेतलेल्या या रांगड्या लोकांना तोफांचे गोळेही भेदत नाहीत किंवा बंदुकीच्या गोळ्याही.

राजाच्या शरीरात हृदयाच्या जागी एक पोकळी आहे. तिथे हे धक्के पोचले तेव्हा मात्र खरंच खूप उशीर होऊन गेला होता.

प्रतिष्ठा पंड्या यांच्या आवाजात ही कविता ऐका

शेतकऱ्यांसाठी

१)

फाटक्या तुटक्या शेतकऱ्या, हसतोस का रे?
“बंदुकीच्या गोळ्यांसारखे माझे हे डोळे
उत्तर म्हणून पुरे.”

बहुजन शेतकऱ्यांनो, का ओघळतंय रक्त?
“माझा वर्ण आहे पाप
आणि भूक सच्ची फक्त.”

२)

लढवय्या स्त्रियांनो, मोर्चा तुमचा कसा?
“लाखोंचं लक्ष, आमचा
सूर्याचा आणि कोयत्याचा वसा”

कफल्लक शेतकऱ्या, तुझा कसा उसासा?
“वैशाखीच्या जवासारखा
मूठभर गव्हाचा ओवासा”

३)

लाली ल्यालेल्या शेतकऱ्यांनो, घेता कुठे श्वास?
“वादळाच्या अंतरातल्या
लोहरीच्या आसपास.”

या मातीतल्या शेतकऱ्या, कुठे जातोस पळत?
“सूर्याचा वेध घेत
हातोडा उगारत.”

४)

भूमीहीन कास्तकारा, स्वप्न पाहतोस केव्हा?
“पावसाच्या थेंबाने
तुझी सत्ता जळेल तेव्हा.”

घरासाठी आसुसलेल्या सैनिका, पेरणी कधी करणार?
“जेव्हा हा नांगराचा फाळ
कावळ्यांची कावकाव बंद पाडणार.”

५)

आदिवासी शेतकऱ्या, कसलं गाणं गातो?
“जशास तसे होणार
राजाचा धिक्कार करतो.”

मध्यरात्रीच्या शेतकऱ्या, ओढत जातोस काय?
“साम्राज्याच्या अस्तानंतर
अनाथ धरणीमाय.”

स्मिता खाटोर हिने या एकत्रित प्रयत्नासाठी भरीव योगदान दिले आहे. तिचे आभार.

Poems and Text : Joshua Bodhinetra

Joshua Bodhinetra is the Content Manager of PARIBhasha, the Indian languages programme at People's Archive of Rural India (PARI). He has an MPhil in Comparative Literature from Jadavpur University, Kolkata and is a multilingual poet, translator, art critic and social activist.

Other stories by Joshua Bodhinetra
Paintings : Labani Jangi

Labani Jangi is a 2020 PARI Fellow, and a self-taught painter based in West Bengal's Nadia district. She is working towards a PhD on labour migrations at the Centre for Studies in Social Sciences, Kolkata.

Other stories by Labani Jangi
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale