“आपल्याला तरंगत्या मळ्यांमध्ये काम करायचंय असं ऐकल्यावर दलच्या बाहेरचे कामगार पाण्यात बुडण्याच्या भीतीने घाबरतात!” मोहम्मद मकबूल मट्टू हसत हसत सांगतात.

श्रीनगरमधल्या दल सरोवराच्या परिसरातल्या मोती मोहल्ला खुर्दमध्ये राहणारे ४७ वर्षीय मट्टू शेतकरी आहेत. मजुरांना २०० रुपये जादा म्हणजेच ७०० रुपये रोज द्यावा लागतोय. श्रीनगर किंवा आसपासच्या परिसरात शेतमजुरी ५०० रुपये रोज अशी आहे. मजुरीवरचा खर्च कमी व्हावा म्हणून, “मी आणि माझी पत्नी तस्लीमा रोज इथे [कामासाठी] येतो, बाकी कितीही गडबड असली तरी,” ते सांगतात.

दल सरोवरातल्या आपल्या ७.५ एकराच्या मळ्यात जाण्यासाठी शिकाऱ्याचा वापर करतात. या तरंगत्या मळ्यांना इथे दल के गार्डन म्हणतात. इथे ते वर्षभर नवलकोल, हाख सारख्या वेगवेगळ्या भाज्या पिकवतात. हिवाळ्यात - ११ अंश तापमानात सुद्धा ते इथे येतात. शिकारा पाण्यातून नेताना बर्फाचा थर फोडून जावं लागतं. “आजकाल या धंद्यात फारसा पैसा राहिलेला नाही. मी हे काम करतोय कारण मला तेवढंच काम करता येतं,” ते म्हणतात.

१८ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं दल सरोवर इथल्या हाउसबोट, शिकारे आणि पुरातन चिनार वृक्ष असलेल्या चार चिनार बेटांसाठी प्रसिद्ध आहे. सरोवराच्या काठाने मुघल कालीन बागा आहेत. श्रीनगरमधलं हे सगळ्यात महत्त्वाचं पर्यटनस्थळ आहे.

या सरोवरात अनेक तरंगती घरं आणि तरंगते मळे आहेत. २१ चौरस किलोमीटर नैसर्गिक पाणथळ जागेत हे सरोवर आहे. तरंगते मळे दोन प्रकारचे आहेतः राध आणि देंब. राध प्रकारचा तरंगता मळा शेतकरी दोन प्रकारचं गवत विणून तयार करतातः पेच (Typha angustata) आणि नरगासा (Phragmites australis). विणून पूर्ण झाल्यावर मळ्याची ही चटईसारखी ‘जमीन’ चार गुंठे ते १२ गुंठे इतकी मोठी असू शकते. सरोवरातच ती ३-४ वर्षांपर्यंत सुकवली जाते आणि त्यानंतर तिचा शेतीसाठी वापर केला जातो. एकदा का ही पूर्ण वाळली की त्यावर मातीचे थर दिले जातात आणि मग यात भाजीचे वाफे तयार केले जातात. शेतकरी ही राध सरोवराच्या वेगवेगळ्या भागात हलवतात.

डेंब ही सरोवराच्या काठाला असलेली दलदलीची जागा आहे. तीसुद्धा तरंगती असते पण ती मुद्दामहून हलवता येत नाही.

PHOTO • Muzamil Bhat

मोहम्मद मकबूल मट्टू आणि त्यांची पत्नी तस्लीमा दलमधल्या मोती मोहल्ला खुर्दमधल्या आपल्या तरंगत्या मळ्यात हाख लावतायत. त्यांचं घर याच परिसरात असून इथे यायला त्यांना अर्धा तास लागतो. ते सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत काम करतात.

सत्तरीचे गुलाम मोहम्मद मट्टू गेल्या ५५ वर्षांपासून दलमधल्याच कुरागमध्ये त्यांच्या तरंगत्या मळ्यात भाज्या पिकवतायत. ते इथून १.५ किलोमीटर मोती मोहल्ली खुर्दमध्ये राहतात. “आम्ही आमच्या मळ्यांसाठी हिल नावाचं स्थानिक खत वापरतो. पाण्यातनं उपसून ते आम्ही उन्हात २०-३० दिवस सुकवतो. ते एकदम नैसर्गिक असतं आणि भाजीपाल्याला त्यामुळे छान चव येते,” ते सांगतात.

त्यांच्या मते दल सरोवरात एकूण १,२५० एकर जलक्षेत्र आणि पाणथळ भागात शेती केली जाते. हिवाळ्यात इथे नवलकोल, मुळा, गाजर आणि पालक या भाज्या घेतल्या जाता आणि उन्हाळ्यामध्ये खरबुजं, टोमॅटो आणि भोपळा.

“हा व्यवसाय आता मरणपंथाला लागलाय आणि आता फक्त म्हातारी माणसंच या धंद्यात उरली आहेत,” गुलाम मोहम्मद मट्टू सांगतात. “हे तरंगते मळे सुपीक ठेवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात – पाण्याच्या पातळीवर सारखं लक्ष ठेवावं लागतं, त्यात मोजून मापून हिल घालावं लागतं. पिकावर डोळा ठेवून असलेले पक्षी आणि इतर हल्लेखोरांवरही नजर ठेवावी लागते.”

शेकडो शेतकरी आपल्या तरंगत्या मळ्यांमधली भाजी मंडईत विकतात. दलच्या कारापोरा भागात असलेल्या या मंडईला इथे गुड्डेर म्हणतात. सरोवराला सूर्यकिरणांचा स्पर्श झाला की मंडई सुरू होते. आणि ताज्या भाजीने भरलेल्या शेकडो बोटी रांग करून उभ्या असतात.

सरोवराच्या पलिकडच्या बाजूला राहणारे अब्दुल हमीद दररोज पहाटे ४ वाजता आपलं घर सोडतात आणि गाजरं, नवलकोल आणि हाखनी भरलेली आपली नाव काढतात. “मी गुद्देरमध्ये ही भाजी विकतो आणि रोजचे ४००-५०० रुपये कमावतो,” ४५ वर्षीय अब्दुलभाई सांगतात.

गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून हीच मंडई श्रीनगरच्या रहिवाशांना ताजी भाजी पुरवतीये, गुलाम मोहम्मद मट्टू म्हणतात. बहुतेक भाजी श्रीनगरच्या जवळपासच्या ठोक व्यापाऱ्यांना विकली जाते. हे लोक पहाटे पहाटे मंडईत येतात. थोडा भाजीपाला बाकी किराणा खरेदी करण्यासाठी राखून ठेवला जातो. वस्तूविक्रय अजूनही काही अंशी शिल्लक असल्याने भाजापील्याच्या बदल्यात भात, गहू आणि बटाट्यासारखी दुसरी भाजी घेतली जाते.

PHOTO • Muzamil Bhat

मोहम्मद अब्बास मट्टू आणि त्यांचे वडील गुलाम मोहम्मद मट्टू नुकतीच लावलेली हाख सुकू नये म्हणून वर पाणी शिंपतायत.

श्रीनगरमधले भाजीचे मोठे व्यापारी शबीर अहमद दररोज गुद्देरमध्ये भाजी घेतात. ते सांगतात की या मंडईमध्ये रोज ३.५ टन ताज्या मालाची उलाढाल होते. “मी माझा ट्रक घेऊन पहाटे ५ वाजताच इथे येतो आणि शेतकऱ्यांकडून ८-१० क्विंटल माल घेऊन जातो. नंतर मी रस्त्यावरच्या भाजीवाल्यांना भाजी विकतो आणि काही माल बाजारात विकतो,” ३५ वर्षीय अहमद सांगतात. त्यांची रोजची कमाई १,०००-२,००० इतकी आहे. अर्थात भाजीला किती उठाव आहे त्यावर हे अवलंबून असतं.

अनेकांचं असं म्हणणं आहे की दलमधली भाजी चवीला जास्तच चांगली असते. पन्नास वर्षांच्या फिरदौसा गृहिणी आहेत आणि श्रीनगरच्या नावकादाल भागात राहतात. त्या म्हणतात “मला दलमधलंच नदुर (कमळाचं देठ) आवडतं. इतर सरोवरातल्या नदुरपेक्षा याची चव खूपच वेगळी असते.”

भाजीला वाढती मागणी असली तरी दलमधल्या भाजीच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि ठोक व्यापाऱ्यांना मात्र आता आपला पाय गर्तेत जात असल्याचा घोर लागून राहिला आहे.

“या सरोवरातली भाजीची शेती आता कमी व्हायला लागलीये कारण सरकारने इथल्या शेतकऱ्यांना बेमिनाजवळ राख-इ-अर्थमध्ये हलवलंय,” ३५ वर्षीय शबीर अहमद सांगतात. ते श्रीनगरच्या रैनवारीचे रहिवासी असून दलमध्ये शेती करतात. दल सरोवर संवर्धनाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा भाग म्हणून जम्मू काश्मीर जलमार्ग विकास प्राधिकरणाने दलच्या रहिवाशांना इथून दुसरीकडे हलवण्याचा घाट घातला आहे. २००० सालापासून इथल्या एक हजारहून अधिक कुटुंबांना सरोवरातून हलवण्यात आलं आहे. तत्कालीन शासनाने इथून २० किलोमीटरवर असलेल्या बडगम जिल्ह्यातल्या राख-इ-अर्थ या नियोजित रहिवासी संकुलात त्यांची रवानगी करण्यात आली.

वयस्क शेतकऱ्यांनी मात्र दलमध्ये शेती सुरूच ठेवली आहे. पण तरूण लोक मात्र इथून बाहेर पडलेत. कमाई फारशी नसल्याचं कारण ते देतात असं शबीर सांगतात.

“कधी काळी दलचं पाण स्फटिकासारखं नितळ होतं. आता मात्र ते प्रदूषित झालंय. २५ वर्षांपूर्वी आम्ही जास्त भाजी पिकवत होतो,” ५२ वर्षीय गुलाम मोहम्मद सांगतात. त्यांची सरोवरात अर्धा एकर देंब शेती आहे. पत्नी, एक मुलगा आणि मुलगी अशा चार जणांच्या आपल्या कुटुंबांचं पोट भरणं देखील त्यांच्यासाठी अवघड झालंय. “माझी रोजची कमाई ४००-५०० रुपये आहे. आणि त्यातूनच मला शाळेची फी, अन्नधान्य, औषधपाणी असा सगळा खर्च भागवावा लागतो.”

“सरकार आम्हालाच दलच्या प्रदूषणासाठी जबाबदार ठरवतंय. पण पूर्वी इथे राहणाऱ्यांपैकी निम्मेच आता इथे आहेत. सगळे इथे राहत होते तेव्हा हे सरोवर एकदम स्वच्छ होतं, ते कसं काय?” ते विचारतात.

PHOTO • Muzamil Bhat

शेतकरी सरोवरातून हिल काढतायत. आधी उन्हात वाळवून मग त्याचा भाजीसाठी खत म्हणून वापर केला जातो.


PHOTO • Muzamil Bhat

दलच्या निगीन भागात हिल घेऊन जात असलेला शेतकरी

PHOTO • Muzamil Bhat

मोती मोहल्ला खुर्दमध्ये तरंगत्या मळ्यांमध्ये हाखची लागवड सुरू आहे

PHOTO • Muzamil Bhat

सरोवरातल्या देंब मळ्यात काम करत असलेले गुलाम मोहम्मद. “२५ वर्षांपूर्वी आम्ही जास्त भाजीपाला पिकवत होतो,” ते म्हणतात

PHOTO • Muzamil Bhat

मोती मोहल्ला खुर्द भागात नवलकोल लावणारी एक शेतकरी महिला

PHOTO • Muzamil Bhat

दलमधून इतरत्र हलवण्यात आलेल्या शेतकऱ्यांपैकी एक नझीर अहमद (काळ्या कपड्यात). सरोवरापासून काही किलोमीटर लांब असलेल्या लाल बझार भागामध्ये, बोटा कदलमध्ये ते राहतात

PHOTO • Muzamil Bhat

अब्दुल माजीद मोती मोहल्ला खुर्दमधल्या त्यांच्या तरंगत्या मळ्यातली भाजी काढतायत

PHOTO • Muzamil Bhat

शेतकरी गुड्डेरमध्ये म्हणजेच तरंगत्या मंडईत त्यांचा माल विकायला येतायत. इथून हा भाजीपाला श्रीनगर शहराच्या वेगवेगळ्या बाजारांमध्ये पोचेल

PHOTO • Muzamil Bhat

गुड्डेरमधले भाजीविक्रेते. भाजीची खरेदी विक्री पहाटेच होते, हिवाळ्यात ५ ते ७ आणि उन्हाळ्यात ४ ते ६ मध्ये

PHOTO • Muzamil Bhat

शेतकरी त्यांचा भाजीपाला शहरातल्या व्यापाऱ्यांना विकतात. हे व्यापारी नंतर तोच भाजीपाला बाजारपेठत आणि रस्त्यावरच्या भाजीविक्रेत्यांना विकतात

PHOTO • Muzamil Bhat

मोहम्मद मकबूल मट्टू हिवाळ्यात पहाटे दलच्या गुड्डेरमध्ये भाजी विकतायत

अनुवादः मेधा काळे

Muzamil Bhat

Muzamil Bhat is a Srinagar-based freelance photojournalist and filmmaker, and was a PARI Fellow in 2022.

Other stories by Muzamil Bhat