पूर्व दिल्लीतील दिल्ली-नॉयडा थेट पुलाच्या जवळ, यमुना नदीपाशी एक कच्चा रस्ता हिरव्यागार शेतांकडे घेऊन जातो. आणि तिथे आहे चिल्ला खादर हा भाग (जनगणनेनुसार चिल्ला सरोदा खादर).

इथले बहुतेक रस्ते कच्चे आणि खडबडीत, विजेचे खांब तर दिसतात पण इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे की त्यांना वीज पुरवठा होत नाही. इथे ५० वर्षांहून अधिक काळ वास्तव्य केलेले सत्तरीचे सुभेदार सिंग यादव त्यांच्या चुलत्यांबरोबर इथे खरबुजाची शेती करायला आले. ते मूळचे उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यातल्या करंदा तहसिलातल्या धरममारपूर उपरवार गावचे. खरबुजानंतर ते आता भाजीपाला, गहू आणि तांदूळ पिकवतायत आणि गाईगुरं सांभाळतायत. ते घरच्यांच्या साथीने भाडेपट्ट्याने १५ बिघा (सुमारे तीन एकर) शेती करतात आणि त्यांच्याकडे कामाला दोन शेतमजूर आहेत.

यमुनेचं पाणी प्रदूषित झाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेताला पाणी देण्यासाठी ट्यूबवेल खोदल्या आहेत. यादव सांगतात, चिल्ला खादरला पुराचा आणि जंगली प्राण्यांचा मोठा धोका आहे. पण पुराने जरी काही नुकसान झालं तर त्याचा मोबदला भाड्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्याला मिळत नाही, तो मिळत शेतमालकाला. आणि बाजारातही दलालच शेतकऱ्याच्या मालाचा भाव ठरवतात त्यामुळे त्यांना तिथेही नुकसान सहन करावं लागतं.

शेतकऱ्यांचं जरी म्हणणं असलं की ते इथे अनेक दशकं शेती करतायत, इथल्या अधिकाऱ्यांच्या नजरेत त्यांनी अतिक्रमण केलंय आणि त्यामुळे ते अधून मधून त्यांची घरं आणि पिकांचं नुकसान करत असतात. “अगदी १० दिवसांपूर्वीच डीडीएने (दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी) कुणाच्या तरी शेतात बुलडोझर फिरवला,” यादव सांगतात. “उभं पीक नष्ट झालं आणि आमच्या झोपड्याही. सरकारला जमीनच हवी आहे तर आम्ही काही तुमच्या वोटेत येत नाही असं आम्ही त्यांना सांगितलंय. पण अशा रितीने आमची घरं उद्ध्वस्त करणं चुकीचं आहे.”

या चित्रफितीत यादव आणि चिल्ला खादरचे इतर रहिवासी त्यांच्या चिंतांविषयी बोलत आहेत.

चिल्ला खादरमध्ये अनौपचारिक शाळा चालवणाऱ्या आणि वस्तीतील रहिवाशांना घरातून बाहेर काढल्यास त्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या बस्ती सुरक्षा मंचच्या अब्दुल शकील बाशा यांचे आभार

अनुवादः मेधा काळे

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

Subuhi Jiwani

सुबुही जिवानी पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडियासोबत कॉपी एडिटर म्हणून काम करतात.

Other stories by Subuhi Jiwani