१० एप्रिल २०२१. सकाळी १०.३०. हैयुल रहमान अन्सारी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर आलाय. १२.३० वाजता झारखंडच्या रांजी जिल्ह्यातल्या हातियाला जाणारी हातिया एक्सप्रेस येईल. तिची तो वाट पाहतोय. तिथे उतरून रिक्षाने बस स्टँडला जायचं आणि तिथून शेजारच्या छत्रा जिल्ह्यातल्या आपल्या गावी, असारहियाला जाणारी बस पकडायची.

या सगळ्या प्रवासाला दीड दिवस तरी लागणार.

आपल्या गाडीत चढण्यापूर्वी स्थानकाच्या एका निवांत कोपऱ्यात उभ्या असलेल्या ३३ वर्षीय रहमानने मला सांगितलं की गेल्या वर्षभरातली मुंबई सोडून गावी जाण्याची ही त्याची दुसरी वेळ आहे.

घरी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत असलेल्या रहमानला काहीच दिवसांपूर्वी त्याच्या नव्या कामावर सांगण्यात आलं होतं की कामं कमी झालीयेत. “ते म्हणाले, ‘रहमान, सॉरी. आम्ही काही तुला कामावर घेऊ शकणार नाही. काही दिवसांनी परत बघ’.” इतक्या सहज त्याची नोकरी गेली. जी अजून सुरू देखील झाली नव्हती.

दहा वर्षांपूर्वी जमशेदपूरच्या करीम सिटी कॉलेजमधून मास कम्युनिकेशन विषयात बीए केल्यानंतर रहमान मुंबईला आला होता. व्हिडिओ एडिटर म्हणून तो छोटी छोटी कामं घ्यायचा. स्वतःपुरती कमाई करून तो घरी पैसे पाठवत असे.

व्हिडिओ पहाः ‘मला करोनाची नाही, माझ्या नोकरीची काळजी आहे’

२०२० साली मार्च महिन्यात देशभरात टाळेबंदी लागली आणि त्याचं काम सुटलं – आणि त्याच बरोबर महिना ४०,००० हा पगारही थांबला. रहमान त्याच्या गावच्या इतर चौघांसोबत भाड्याने एका खोलीत राहत होता. वांद्रे पश्चिमच्या लाल मिट्टी भागातल्या या खोलीचं प्रत्येक जण २,००० रुपये भाडं भरत होता. कठीण काळ होता. त्याला आठवतंय की एकदा तर अशीही वेळ आली होती की अन्नधान्यासाठी देखील पुरेसे पैसे त्याच्या हातात नव्हते.

“गेल्या वर्षी मला महाराष्ट्र शासनाकडून कुठलीही आणि कसल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही,” रहमान सांगतो. त्याच्या आधीच्या एका सहकाऱ्याने त्याला डाळ, तांदूळ, तेल आणि खजूर दिले होते. “मला तेव्हा फार वाईट वाटत होतं आणि मी त्याबद्दल कुणाशी बोलू पण शकत नव्हतो.”

गेल्या वर्षी मे महिन्याच्या मध्यावर रहमानने तीन महिन्याचं भाडं बाजूला काढलं आणि गावी, असरहियाला जायचं ठरवलं. मग त्याने आणि त्याच्या खोलीतल्या मित्रांनी खाजगी बस भाड्याने घेऊन गावी जाण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकाला १०,००० रुपये भाडं पडणार होतं. त्याने त्याच्या घरमालकाला भाडं नंतर भरतो अशी विनंती केली.

एकदा गावी पोचल्यानंतर रहमानने आपल्या पाच भावांसोबत शेतीत काम करायला सुरुवात केली. पेरणी आणि कापणीवर लक्ष ठेवलं. त्याचे आई-वडील, भाऊ आणि त्यांच्या घरचे सगळे गावी एकत्र राहतात. रहमानची बायको, सलमा खातुन, वय २५ आणि त्यांची दोघं मुलं, मोहम्मद अखलाक, वय ५ आणि सइमा नाझ, वय २ त्यांच्या सोबतच राहतात.

महामारी येण्याआधी रहमान घरखर्चासाठी, शेतीसाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी घरी १०,०००-१५,००० रुपये पाठवत असे. टाळेबंदीचे निर्बंध शिथिल झाले आणि काम मिळण्याच्या शक्यता पाहून तो मुंबईला परत आला. १० महिने गावी राहिल्यानंतर तो २०२१ मध्ये फेब्रुवारीच्या शेवटी मुंबईला परतला.

Haiyul Rahman Ansari posing for a selfie at his farm in Asarhia (left), and on April 10, 2021 at the Lokmanya Tilak Terminus before leaving Mumbai
PHOTO • Haiyul Rahman Ansari
Haiyul Rahman Ansari posing for a selfie at his farm in Asarhia (left), and on April 10, 2021 at the Lokmanya Tilak Terminus before leaving Mumbai
PHOTO • Haiyul Rahman Ansari

असरहियातल्या आपल्या शेतात सेल्फीसाठी उभा हैयुल रहमान अन्सारी (डावीकडे) आणि १० एप्रिल २०२१ रोजी मुंबई सोडण्याआधी लोकमान्य टिळक टर्मिनसवर

त्याचं १० महिन्यांचं भाडं थकलं होतं. शेतीतल्या कामातून आणि लखनौमध्ये एडिटिंगची छोटी छोटी कामं करून मागे टाकलेले १८,००० रुपये त्याने मुंबईला परत आल्यावर घरमालकाला देऊन टाकले.

पण नव्या ठिकाणी कामाला सुरुवात करण्याआधीच ५ एप्रिल नंतर महाराष्ट्रात अंशतः टाळेबंदी जाहीर झाली (१४ एप्रिलपासून पूर्ण टाळेबंदी लागली). कोविड-१९ची दुसरी लाट जोर धरत असल्यामुळे कामं कमी व्हायला लागली आणि रहमान जिथे कामाला लागला होता त्यांनी त्याला सांगितलं की ते काही त्याला कामावर घेऊ शकत नाहीत म्हणून.

पूर्वी काम मिळेल का नाही याची फारशी चिंता रहमानला सतावत नसे. “जेव्हा कधी मी एखाद प्रोजेक्ट घ्यायचो तेव्हा कधी सहा महिने, कधी दोन वर्षं तर कधी तीन महिने सलग काम असायचं. मला त्याची सवय झालीये,” तो सांगतो. “पण जेव्हा अचानकच ऑफिसं बंद होतात, तेव्हा सगळंच फार अवघड होऊन जातं.”

पूर्वी कसं, एखाद्या ठिकाणी कामाचं काही झालं नाही तर तो दुसऱ्या ठिकाणी अर्ज करू शकायचा. “पण आता दुसरीकडे कुठे काम मिळवणं सुद्धा सोपं राहिलेलं नाही. टाळेबंदीमुळे करोनाची तपासणी करावी लागते, सॅनिटाइझ करायला लागतं... आणि लोक अनोळखी लोकांना त्यांच्या इमारतींमध्ये येऊ पण देत नाहीत. आमच्यासाठी ही फार मोठी समस्या झालीये,” रहमान सांगतो.

आपल्या गावी राहण्यासारखं दुसरं सुख नाही, पण तो म्हणतो, “पण मी हे असं [व्हिडिओ एडिटिंग] काम गावी करू शकत नाही ना. तुम्हाला पैसा हवा असतो ना तेव्हा शहरातच यावं लागतं.”

अनुवादः मेधा काळे

Subuhi Jiwani

Subuhi Jiwani is a writer and video-maker based in Mumbai. She was a senior editor at PARI from 2017 to 2019.

Other stories by Subuhi Jiwani
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale