हे स्थलांतर काही मनमर्जीने होत नाही. माणसांनी पाळलेल्या म्हशींचं हे स्थलांतर आहे. दर वर्षी ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातले गवळी लोक म्हशींचे कळप देवी नदी पार करून नेतात. हे सगळं घडतं ते कडक उन्हाळ्यात. पल्याडच्या किनाऱ्यावरच्या नव्या कुरणांच्या शोधात. आणि नंतर त्या म्हशी पोहत माघारीही येतात. सेरेनगेट्टी अभयारण्यातल्यासारखं भव्य नसलं तरी हे एक विलक्षण दृश्य आहे हे निश्चित.
एक दिवस नहाराना ग्राम पंचायतीजवळ मी हा सगळा ताफा पाहिला. गाव देवी नदीच्या किनारी हे गाव वसलं आहे. देवी नदी ओडिशाच्या पुरी आणि जगतसिंगपूर या किनारी जिल्ह्यांमधून वाहते आणि ती महानदीची मुख्य शाखा आहे.
नहराना ग्राम पंचायतीच्या भोवताली असणाऱ्या गावांमध्ये अनेक मच्छीमार समुदाय राहतात. देवी नदी हीच त्यांच्या उपजीविकेचा मुख्य स्रोत आहे. या किनारी प्रदेशात अनेक गवळ्यांचे समुदायही राहतात. इतरही अनेक कुटुंबांकडे गुरं आहेत ज्यांच्यापासून त्यांना जास्तीचं उत्पन्नही मिळतं.
ओडिशा राज्य सहकारी दूध उत्पादक संघाचं इथे चांगलं बस्तान बसलं आहे. गवळी आणि ज्यांच्या गाई-म्हशी आहेत त्यांना दूध कुठे घालायचं याची चिंता करण्याची गरज नाही कारण दूध संघ त्यांच्याकडून दूध संकलित करतो.
नहरानापासून खाडी जास्तीत जास्त १० किलोमीटरवर आहे. आणि नदीचं मुख रुंद असल्याने इथे अनेक छोटी खोरी तयार झाली आहेत. ज्यांच्या जमिनी कालांतरात नदीच्या पात्रात गेल्या आहेत ते गावकरी या खोऱ्यांमध्ये अधून मधून शेती करतात किंवा वस्त्या उभारतात. ही खोरी म्हणजे या भागातली सर्वात जास्त हिरवळ असणारी गायरानं आहेत.
शेजारच्या ब्रमुंडली ग्राम पंचायतीतल्या पातारपाडा गावातल्या एक गवळ्याचं घर त्यांच्या मालकीच्या १५० म्हशींचं दूध विकतं. परंपरेने जमीनदार नसलेल्या अशा कुटुंबांसाठी गोठा बांधणं किंवा त्यांच्या म्हशीच्या दलासाठी गायरानं शोधणं सोपं काम नाहीये. मग देवी नदीचे काठ आणि खोरं त्यांच्या मदतीला येतं. म्हशींचे मालक या खोऱ्यातल्या गायरानांवर म्हशी चरू द्याव्यात म्हणून दर वर्षी या जमिनींच्या मालकांना तब्बल दोन लाख रुपये इतकी रक्कम अदा करतात. दिवसा या म्हशी या गायरानांवर चरण्यासाठी पोहत जातात. पावसाळ्यात या खोऱ्यात गोड्या पाण्याची तळी तयार होतात तोपर्यंत हा दिनक्रम चालू राहतो आणि याच तळ्यांवर नंतर म्हशी पाण्याला जातात.
ओल्या चाऱ्यासाठी गायरानांच्या शोधात निघालेल्या या म्हशींचा एका बाजूचा प्रवास पुढील छायाचित्रांमध्ये टिपला आहे.
अनुवादः मेधा काळे