हा लेख पारी निर्मित वातावरण बदलाच्या मागावरः रोजच्या जगण्यातल्या विलक्षण कहा ण्यांपैकी असून या लेखमालेस २०१९ सालासाठीच्या पर्यावरणविषयक लेखन विभागाअंतर्गत रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला आहे.

“आजकाल आमच्या लोकांना झोमो (Dzomo) फार आवडायला लागलेत,” वेस्ट कामेंग जिल्ह्याच्या लागाम गावातली भटकी पशुपालक ३५ वर्षीय पेम्पा त्सुरिंग सांगते.

झोमो? हे काय असतं? आणि अरुणाचल प्रदेशाच्या पर्वतराजींमध्ये ९,००० फुटावर हे का बरं लोकप्रिय होऊ लागले आहेत?

याक आणि खास करून डोंगररांगांमध्ये आढळणाऱ्या कोट या गुराच्या संकरातून तयार झालेली प्रजात म्हणजे झोमो. नर, ज्याला झो (Dzo) म्हणतात, तो नपुंसक असतो त्यामुळे गुराख्यांची पसंती माद्यांना झोमोंना असते. आता हे काही नवीन प्राणी नाहीत, मात्र या हंगामी भटकंती करणाऱ्या समुदायाने आपल्या कळपांमध्ये या प्राण्यांची संख्या आता वाढवायला सुरुवात केली आहे – पूर्व हिमालयात होत असलेल्या वातावरणातल्या बदलांचा मुकाबला करण्यासाठी.

पेम्पांच्या कळपात ४५ गुरं आहेत आणि यात याक आणि झोमो दोन्ही आहेत. ती म्हणते की याक आणि गुरांच्या संकरातून तयार झालेले हे प्राणी “जास्त उष्णता सहन करू शकतात आणि कमी उंचीवर आणि वाढत्या तापमानाशी जास्त सहज जुळवून घेतात.”

उंचावरच्या या कुरणांमध्ये, उष्णता किंवा ‘उकाडा’ हे दोन्ही एकीकडे वास्तव आणि दुसरीकडे सापेक्ष आहेत. इथे काही वर्षभरात पारा ३२ अंशावर जाईल असे दिवस नाहीत. पण उणे ३५ अंश तापमानही सहज सहन करू शकणाऱ्या याकला तापमान १२-१३ अंशाच्या वर गेलं तर मात्र त्रास व्हायला लागतो. आणि खरंच, असे बदल झाले की संपूर्ण परिसंस्थेसमोरच संकट उभं राहतं. आणि गेल्या काही काळात पर्वतांमध्ये हे बदल घडू लागले आहेत.

मोन्पा जमातीची पोट जमात असणारे ब्रोकपा हे भटके पशुपालक (अरुणाचलमध्ये सुमारे ६०,०००, जनगणना, २०११) शतकानुशतकं पर्वतांमधल्या उंचावरच्या कुरणांमध्ये याक पाळतायत. कडक हिवाळ्यात ते खालच्या भागात राहतात आणि उन्हाळ्यात उंचावरच्या प्रदेशात जातात – ९,००० ते १५,००० फूट असा त्यांचा प्रवास सुरू असतो.

पण लडाखच्या चांगथांगमधल्या चांगपांप्रमाणे ब्रोकपांनाही आता दिवसेंदिवस अधिकच लहरी बनत चाललेल्या वातावरणाचा फटका बसू लागला आहे. अनेक शतकांपासून याक, गुरं, शेळ्या आणि मेंढ्या पाळणं हीच त्यांची उपजीविका आणि खरं तर त्यांच्या समुदायांचा आधार आहे. यातही ते सर्वात जास्त याकवर निर्भर असतात – आर्थिक, सामाजिक आणि अगदी अध्यात्मिक पातळीवरही. आता मात्र तो बंध फार नाजूक होऊ लागला आहे.

“अगदी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच याक थकायला लागले आहेत,” चांदर गावच्या पशुपालक लेकी सुझुक मला सांगतात. मे महिन्यात वेस्ट कामेंगच्या दिरांग तालुक्यात फिरत असता मी त्यांच्या घरी राहिलो होतो. “गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळा लांबायला लागलाय, तापमान वाढतंय. याक क्षीण झालेत,” पन्नाशीला टेकलेल्या लेकी सांगतात.

PHOTO • Ritayan Mukherjee

याक आणि खास करून डोंगररांगांमध्ये आढळणाऱ्या कोट या गुराच्या संकरातून तयार झालेली प्रजात म्हणजे झोमो. भटके पशुपालक असणाऱ्या ब्रोकपांनी पूर्व हिमालयातल्या बदलत्या तापमानाचा मुकाबला करण्यासाठी आपल्या कळपांमध्ये या प्राण्यांची संख्या वाढवायला सुरुवात केली आहे

तापमानाचा मुद्दा आहेच पण ब्रोकपा सांगतात की तिबेट, भूतान आणि म्यानमारच्या सीमेला लागून असणाऱ्या अरुणाचल प्रदेशातल्या पर्वतांमध्ये गेल्या दोन दशकांपासून हवामान जास्तीत जास्त लहरी होतंय आणि अंदाज बांधणंच अवघड होत चाललं आहे.

“सगळं उशीरा होतंय,” पेमा वांगे म्हणतो. “उन्हाळा उशीरा सुरू होतो. बर्फ उशीरा पडायला लागतं. आमचा भटकंतीचा हंगाम उशीरा सुरू होतो. आणि उंचावरच्या कुरणांवर पोचल्यावर ब्रोकपांना दिसतं की तिथे अजून बर्फ आहे. म्हणजे बर्फ वितळायला देखील उशीर होतोय,” चाळिशीकडे झुकलेला पेमा सांगतो. तो स्वतः ब्रोकपा नाही तर मोनपा जमातीच्या थेम्बांग गावातला निसर्ग संवर्धक आहे आणि वर्ल्ड वाइड फंडसाठी तो काम करतो.

या वेळी मी त्याच्याशी फोनवर संपर्क साधला. जोरदार पावसामुळे मी एरवी पोचू शकायचो त्यातल्या बऱ्याच भागाचा संपर्क तुटला होता. पण या वर्षी मे महिन्यात मी तिथे होतो, चांदर गावच्या नागुली त्सोपा या ब्रोकपा गुराख्याबरोबर एका कड्यावर उभं राहून वेस्ट कामेंग जिल्ह्यातलं घनदाट जंगल मी पाहत होतो. या जमातीची बहुतेक लोकं या आणि तवांग जिल्ह्यात राहतात.

“इथून ते आमचं उन्हाळ्याचं ठिकाण, मागो हा मोठा लांबलचक प्रवास आहे,” पन्नाशीकडे झुकलेले नागुली सांगतात. “आम्हाला तिथे पोचण्यासाठी ३-४ रात्री जंगलांतून वाट तुडवत तिथे पोचावं लागतं. पूर्वी [१०-१५ वर्षांपूर्वी] आम्ही मे किंवा जून महिन्यात [उंचावर चारणीसाठी] निघायचो. पण आता आम्हाला लवकरच, अगदी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात निघावं लागतं आणि २-३ महिने उशीराने परतावं लागतं.”

या भागातल्या जंगलांमध्ये वाढणारा उत्तम दर्जाचा बांबू गोळा करण्यासाठी नागुली निघाले तेव्हा मीही त्यांच्या बरोबर त्या धुकं भरलेल्या जंगलांतल्या लांबच्या प्रवासावर निघालो. तेव्हा त्यांनी आणखी काही समस्यांकडे माझं लक्षं वेधलं: “उन्हाळा लांबायला लागलाय,” ते म्हणतात, “त्यामुळे इथे उगवणाऱ्या काही औषधी वनस्पती ज्या आम्ही याक प्राण्यांवर उपचार करण्यासाठी वापरायचो, त्या आताशा येतच नाहीयेत. आता आम्ही आमच्या जनावरांची काळजी कशी घ्यायची?”

अरुणाचल प्रदेश हा खरं तर भरपूर पावसाचा प्रदेश आहे आणि वर्षभरात इथे ३,००० मिमीहून अधिक पाऊस पडतो. मात्र गेल्या दहा वर्षातल्या अनेक वर्षांमध्ये इथे पाऊसमान कमी झाल्याचं दिसतं आणि भारतीय वेधशाळेच्या आकडेवारीनुसार यातल्या किमान चार वर्षांसाठी ही तूट २५ ते ३० टक्के इतकी आहे. पण या वर्षी जुलै महिन्यात इथे इतका तुफान पाऊस झाला की अनेक रस्ते वाहून गेले किंवा खचले.

या सगळ्या बदलांमध्ये एकच गोष्ट बदलली नाहीये ती म्हणजे तापमानातली वाढ.

PHOTO • Ritayan Mukherjee

वेस्ट कामेंग जिल्ह्यातल्या उंचावरच्या कुरणांमध्ये गुरं चारताना चहासाठी घटकाभर थांबलेले नागुली त्सोपा म्हणतात, ‘याक प्राण्यांवर उपचारासाठी आम्ही ज्या औषधी वनस्पती वापरायचो त्या आताशा उन्हाळा लांबत चालल्यामुळे येतच नाहीयेत. असं व्हायला लागलं तर आमच्या गुरांची काळजी आम्ही कशी घ्यायची?’

२०१४ साली विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाने एका अभ्यासाद्वारे पूर्व तिबेटच्या पठारावरील (व्यापक भूभाग ज्यात अरुणचाल प्रदेश स्थित आहे) तापमानातले बदल नोंदवले. दिवसाच्या किमान तापमानात (१९८४ ते २००८) या “गेल्या २४ वर्षांत लक्षणीय वाढ” झाल्याची नोंद आहे. दिवसाच्या कमाल तापमानात १०० वर्षांत ५ अंश सेल्सियस या वेगाने वाढ होत आहे.

“आम्ही या लहरी हवामानाचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करतोय,” आम्हाला वाटेत भेटलेला एक गुराखी, तिशीतला त्सेरिंग दोंदुप सांगतो. “आम्ही आमचा भटकंतीचा काळ दोन-तीन महिन्यांनी वाढवलाय. आम्ही जास्त शास्त्रीय पद्धतीने [मुक्त चराई सोडून जास्त विचारपूर्वक] आमची कुरणं वापरू लागलोय.”

त्याच्याप्रमाणेच बहुतेक ब्रोकपा वातावरणातील बदलांबद्दल जागरुक आहेत. हे का घडतंय याबद्दल ते जास्त बोलत नाहीत मात्र त्यातून काय नुकसान होतंय हे मात्र त्यांना कळालंय. आणि तिथे आशादायक काही घडतंयः ते या बदलांशी जुळवून घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग चोखाळतायत, असं अनेक संशोधकांचं म्हणणं आहे. या जमातीची पाहणी करणाऱ्या एका गटाने इंडियन जर्नल ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज या पत्रिकेत २०१४ साली याची नोंद केली आहे. त्यांच्या संशोधनाचा निष्कर्ष असा होता की वेस्ट कामेंगचे ७८.३ टक्के आणि तवांग जिल्ह्यातले ८५ टक्के ब्रोकपा – म्हणजेच अरुणाचलमधल्या एकूण भटक्या जमातींपैकी ८१.६ टक्के लोक – “...बदलत्या वातावरणाबद्दल जाणून होते.” आणि यातल्या ७५ टक्क्यांहून अधिक जणांनी “वातावरणातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी किमान एक तरी बदल नव्याने केल्याचं सांगितलं.”

संशोधकांनी इतरही काही नव्या उपायांची नोंद घेतली आहे – ‘कळपात विविध प्राण्यांचा समावेश’, उंचावरच्या कुरणांकडे स्थलांतर, भटकंतीच्या हंगामात बदल. या शोधनिबंधामध्ये “वातावरणातील दुष्परिणामांना” उत्तर म्हणून “सामना करण्याच्या १० उपायांची” दखल घेतली आहे. या इतर उपायांमध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेत, कुरणांच्या वापरात बदल, उंचावरच्या निकृष्ट ठरलेल्या कुरणांचं पुनरुज्जीवन, पशुपालनाच्या पद्धतींचा फेरविचार आणि गुरं आणि याक यांचा संकर. तसंच जिथे गवत दुर्मिळ होत चाललंय तिथे इतर पशुखाद्याचा वापर, जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या नव्या पद्धती आणि कमाईच्या इतर स्रोतांचा विचार, उदा. रस्त्याच्या कामावर मजुरी, छोटे व्यवसाय आणि फळं गोळा करणे.

यातले काही किंवा सर्व उपाय लागू पडणार का व्यापक स्तरावर घडत असलेल्या प्रक्रिया त्यांना भारी ठरणार हे कळायचा आता तरी काही मार्ग नाही. पण ते काही तरी तर करतायत – त्यांना ते करणं भागच आहे. हे पशुपालक मला सांगतात की याक आधारित अर्थव्यवस्था मोडकळीस येऊ लागल्यामुळे एखाद्या सर्वसाधारण कुटुंबाचं वर्षाचं उत्पन्न २०-३० टक्क्यांनी घटलं आहे. याकच्या दुधात घट झाल्यामुळे घरी बनणारं तूप आणि छुरपी (याकचं दूध आंबवून बनवण्यात येणारं चीज) यांचं उत्पादनही कमी झालं आहे. झोमो जास्त काटक असले तरी दूध आणि चीजचा दर्जा तसंच धार्मिक महत्त्व पाहता त्यांची याकच्या पासंगाला पुरतीलच असं नाही.

“याकच्या कळपांची संख्या घटू लागलीये किंवा त्यांचं स्वास्थ्य ढळू लागलंय, तसतसं त्यांच्यापासून मिळणारं ब्रोकपांचं उत्पन्नही कमी होऊ लागलं आहे,” मे महिन्यातल्या माझ्या भेटीदरम्यान पेमा वान्गे मला सांगत होता. “आता [औद्योगिक उत्पादन असलेलं] तयार चीज स्थानिक बाजारात सहज मिळू लागलंय. त्यामुळे छुरपीलाही बाजार नाही. ब्रोकपांसाठी दुष्काळात तेरावा अशी गत झाली आहे.”

मी परतीच्या प्रवासाला निघणार तितक्यात ११ वर्षांच्या नोरबू थुप्तेनशी माझी गाठ पडली. ब्रोकपांच्या भटकंतीच्या वाटेवरच्या एकाकी अशा थुमरी पाड्यावर तो आपल्या कळपासोबत होता. “माझ्या आज्याचा काळच भारी होता,” तो एकदम ठामपणे म्हणाला. आणि कदाचित त्याच्या घरातल्या मोठ्यांचं बोलणं ऐकून असेल, तो पुढे म्हणतो, “कुरणं जास्त अन् लोक कमी. मोठे म्हणतात आम्हाला ना सीमांचं बंधन होतं ना वातावरणाचा त्रास. पण ते सुखाचे दिवस आता केवळ भूतकाळात रमण्यापुरते.”

PHOTO • Ritayan Mukherjee

अरुणाचल प्रदेशच्या वेस्ट कामेंग आणि तवांग जिल्ह्यातले, फारसं कुणात न मिसळणाऱ्या पशुपालक मोनपा जमातीची पोटजमात असणारे ब्रोकपा ९,००० ते १५,००० फूट उंचीवरच्या पर्वतांमध्ये राहतात. दिवसेंदिवस अनाकलनीय होत चाललेल्या हवामानामुळे त्यांच्या भटकंतीमध्ये बदल होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे

PHOTO • Ritayan Mukherjee

थोरली मंडळी भटकंतीला निघायची तयारी करत असताना बच्चे कंपनी रेशन भरून घेतीये. ‘सगळंच उशीरा होतंय,’ पेमा वान्गे म्हणतो. ‘उन्हाळा उशीरा सुरू होतो. बर्फ उशीरा पडायला लागतं. आमचा भटकंतीचा हंगाम उशीरा सुरू होतो’

PHOTO • Ritayan Mukherjee

चांदर गावाबाहेर ब्रोकपा पशुपालकांचा एक गट भटकंतीच्या मार्गाबद्दल बोलतोय. आताशा उंचावरचा बर्फ उशीरा वितळत असल्यामुळे त्यांना त्यांची वाट बदलावी लागते किंवा त्यांच्या कळपासोबतच वाटेतच थांबावं लागतं

PHOTO • Ritayan Mukherjee

ब्रोकपा गुराख्यांचा गट मागोच्या कुरणांकडे जाताना, वाटेत उंचावरच्या तीन खिंडीः ‘पूर्वी, आम्ही मे किंवा जूनमध्ये निघायचो. पण आता आम्हाला लवकर, फेब्रुवारी किंवा मार्चमध्येच निघावं लागतं आणि आम्ही परततोदेखील अगदी २-३ महिने उशीरा’

PHOTO • Ritayan Mukherjee

लागाम गावाजवळच्या जंगलांमध्ये ताशी त्सेरिंग झोमोचं दूध काढतीये. झोमो उष्णतेत आणि कमी उंचीवर तग धरू शकतात पण दूध आणि चीजचा दर्जा किंवा धार्मिक महत्त्व पाहता त्यांची याकशी तुलनाच होऊ शकत नाही. त्या खुज्या असतात, त्यांना आजारांची लागण लगेच होते आणि या सगळ्याचा ब्रोकपांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय

PHOTO • Ritayan Mukherjee

जंगलातून फळं गोळा करून परतः बदलांशी जुळवून घेण्यासाठी ब्रोकपा गुराखी कमाईच्या इतर स्रोतांकडे वळत आहेत जसं की रस्त्याच्या कामावर मजुरी, छोटे व्यवसाय आणि फळं गोळा करणं – ज्यासाठी चिखलाच्या वाटा तुडवत तासंतास चालावं लागतं

PHOTO • Ritayan Mukherjee

जंगलातून बांबू गोळा करून परतीच्या वाटेवरः ब्रोकपांच्या दैनंदिन जगण्यात बांबू केंद्रस्थानी असतो, त्यांची तात्पुरती स्वयंपाकघरं आणि घरगुती साहित्य बनवण्यासाठी त्याचाच वापर होतो. पण आता ही लय हरवत चाललीये

PHOTO • Ritayan Mukherjee

ब्रोकपा गुराखी आणि पर्वतांवरून उतरताना मरण पावलेला एक झो. या उंचावरच्या गावांमध्ये अन्नाचा तुटवडा असल्यामुळे काहीही वाया घातलं जात नाही

PHOTO • Ritayan Mukherjee

ब्रोकपांच्या स्वयंपाकघरात चूल कायम पेटलेली असते. त्यांना – आणि त्यांच्या प्राणीमित्रांना – कडाक्याच्या थंडीत ती ऊब देते. २०१४ सालच्या एका अभ्यासात असं नोंदवलं आहे की १९८४ ते २००८ या काळात दिवसाचं किमान तापमान ‘लक्षणीयरित्या वाढलं’ आणि दिवसाचं कमाल तापमान १०० वर्षांत ५ अंश सेल्सियस वेगाने वाढलं

PHOTO • Ritayan Mukherjee

नागुली त्सोपा घरी पारंपरिक चीज, छुरपी घेऊन. ब्रोकपा गुराख्यांसाठी उत्पन्नाचा हा महत्त्वाचा स्रोत आटत चालला आहे कारण कळपातल्या याक प्राण्यांची संख्या घटत चाललीये आणि स्थानिक बाजारात तयार चीज उपलब्ध होऊ लागलं आहे

PHOTO • Ritayan Mukherjee

चांदरला आपल्या घरीः लेकी सुझुक आणि नागुली त्सोपा. जेव्हा एखादं ब्रोकपा जोडपं एकत्र नांदू लागतं, तेव्हा ते त्यांचे कळपही एक करतात जेणेकरून उपलब्ध कुरणांचा सुयोग्य वापर केला जाईल

PHOTO • Ritayan Mukherjee

लहानगा नोरबू, लेकी सुझुक आणि नागुली त्सोपांचा सर्वात धाकटा मुलगा, सोसाट्याच्या वाऱ्यात छत्री सांभाळतोय

साध्यासुध्या लोकांचं म्हणणं आणि स्वानुभवातून वातावरण बदलांचं वार्तांकन करण्याचा देशपातळीवरचा पारीचा हा उपक्रम संयुक्त राष्ट्रसंघ विकास प्रकल्पाच्या सहाय्याने सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा

अनुवादः मेधा काळे

Reporter : Ritayan Mukherjee

رِتائن مکھرجی کولکاتا میں مقیم ایک فوٹوگرافر اور پاری کے سینئر فیلو ہیں۔ وہ ایک لمبے پروجیکٹ پر کام کر رہے ہیں جو ہندوستان کے گلہ بانوں اور خانہ بدوش برادریوں کی زندگی کا احاطہ کرنے پر مبنی ہے۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Ritayan Mukherjee

پی سائی ناتھ ’پیپلز آرکائیو آف رورل انڈیا‘ کے بانی ایڈیٹر ہیں۔ وہ کئی دہائیوں تک دیہی ہندوستان کے رپورٹر رہے اور Everybody Loves a Good Drought اور The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom کے مصنف ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز پی۔ سائی ناتھ
Series Editors : P. Sainath

پی سائی ناتھ ’پیپلز آرکائیو آف رورل انڈیا‘ کے بانی ایڈیٹر ہیں۔ وہ کئی دہائیوں تک دیہی ہندوستان کے رپورٹر رہے اور Everybody Loves a Good Drought اور The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom کے مصنف ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز پی۔ سائی ناتھ
Series Editors : Sharmila Joshi

شرمیلا جوشی پیپلز آرکائیو آف رورل انڈیا کی سابق ایڈیٹوریل چیف ہیں، ساتھ ہی وہ ایک قلم کار، محقق اور عارضی ٹیچر بھی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز شرمیلا جوشی
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے