हा लेख पारी निर्मित वातावरण बदलाच्या मागावरः रोजच्या जगण्यातल्या विलक्षण कहा ण्यांपैकी असून या लेखमालेस २०१९ सालासाठीच्या पर्यावरणविषयक लेखन विभागाअंतर्गत रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला आहे.

३०० हिमालयी याकांचा सिक्किममध्ये उपासमारीने मृत्यू

उत्तर सिक्किममध्ये बर्फात अडकून पडल्यामुळे ३०० याक मृत

‘बर्फवितळल्यावर सिक्किममधल्या याकांचे मृत्यू उघडकीस’

या वर्षी १२ मे रोजी आलेल्या या बातम्यांमुळे मला धक्का बसला. एक छायचित्रकार आणि पत्रकार म्हणून मी हिमालयात जी काही भटकंती केलीये त्यातून मला एक नक्की समजलंय की जे भटके पशुपालक याक पाळतात, ते त्यांची जिवापाड काळजी घेतात. या भव्य पर्वतांमधल्या ठराविक अशा उन्हाळी आणि हिवाळी कुरणांमध्ये आपलं पशुधन घेऊन भटकंती करणाऱ्या या उंचावरच्या पशुपालकांसाठी याक हे जीवनदायी आहेत. त्यांचा उत्पन्नाचा आणि हिवाळ्यातला अन्नाचा स्रोतही हे याकच आहेत.

वरचे मथळे असणाऱ्या बातम्यांमध्ये असं सूचित केलं होतं की याक प्राण्यांचे मृत्यू जागतिक तापमानवाढीशी संबंधित आहेत. आणि जर या काटक प्राण्यांवर ही पाळी आली असेल तर ते पाळणारे पशुपालकही संकटात असणार. मी लडाखच्या हान्ले खोऱ्यातल्या चांगपा कुटुंबांना परत भेट देऊन त्यांचं सगळं कसं चाललं आहे हे पहायचं ठरवलं.

तिबेची पठाराच्या पश्चिमेला असणाऱ्या भारताच्या चांगथांग भागातले चांगपा काश्मिरी लोकर तयार करण्यात आघाडीवर आहेत आणि ते याकही पाळतात. लेह जिल्ह्याच्या न्योमा तालुक्यात चांगपांचे अनेक मेंढपाळ गट वस्तीला असतात – डिक, खारलुंग, राक आणि युल्पा. डिक आणि राक खरं तर सर्वोत्तम याकपालक मानायला पाहिजेत.

“खूप सारे याक मरायला लागलेत,” हान्लेतला डिक समुदायाचा गुराखी ३५ वर्षीय झांपाल त्सेरिंग म्हणतो. “आता इथलं [या पर्वतांमधलं] वातावरण लहरी झालंय.” या खोऱ्यातल्या भारतीय खगोल वेधशाळेसोबत काम करणाऱ्या खाल्डो गावच्या सोनम दोरजींमुळे माझी त्सेरिंगशी भेट झाली. १४,००० फुटावर असलेल्या ताकनाकपो कुरणांवरच्या ऐसपैस खुर (लडाखी भाषेमध्ये सैन्यदलाचा तंबू) मध्ये त्सेरिंगने आमच्याशी गप्पा मारल्या.

मे २०१९ मधल्या या दुर्घटनेआधी ३ वर्षं नेपाळच्या आंतरराष्ट्रीय एकात्मिक पर्वत विकास केंद्राने एक शोधनिबंध प्रकाशित केला होता ज्यामध्ये नमूद केलं होतं की “भूतान, भारत आणि नेपाळमधली याक प्राण्यांची संख्या घटत चालली आहे.” संशोधकांना भारतातल्या याक प्राण्यांच्या संख्येत “१९७७ मध्ये १,३२,००० वरून १९९७ मध्ये ५१,०००” इतकी घट झाल्याचं आढळलं. तीन वर्षांत ६० टक्क्यांहून जास्त घट.

स्थानिक पशुधन व दुग्धव्यवसाय विभागाच्या आकडेवारीनुसार लेह जिल्ह्यात १९९१ साली ३०,००० याक होते, २०१० साली त्यांची संख्या १३,००० इतकी घटली आहे. म्हणजे दोन दशकात ५७ टक्के अशी प्रचंड घट. स्थानिक स्तरावरची आकडेवारी मात्र ‘वर’च्या आकड्यांशी मेळ खात नाही – २०१२ साली जिल्ह्यातली याक संख्या  होती १८,८१७ (हे आकडे ग्राह्य घरले तरीही गेल्या २१ वर्षांत ३७ टक्के दराने झपाट्याने घट झाली आहे).

PHOTO • Ritayan Mukherjee

भटक्या पशुपालक चांगपांसाठी शतकानुशतके जीवनदायी असलेला पूर्ण वाढ झालेला हिमालयी याक, लडाखच्या हान्ले खोऱ्यातल्या उंचावरच्या कुरणांमध्ये. (फोटोः रितायन मुखर्जी/पारी)

या डिक वस्तीवर पोचणं काही सोपं नव्हतं. इतर मेंढपाळ जातात त्यापेक्षा ही कुरणं जास्त उंचावर आहेत. शिवाय, त्यांच्या मुक्कामाची काही ठिकाणं भारत-चीन सीमेवर आहेत – जिथे सामान्य नागरिकांना प्रवेश नाही. पण वसंतऋतू असल्याने आणि सोनम दोरजीच्या मदतीने मी त्यांच्या वस्तीवर पोचू शकलो.

“याक हा अप्रतिम प्राणी आहे,” झांपाल त्सेरिंग म्हणतात. “गोठवून टाकणाऱ्या थंडीसाठी ते अनुकूल आहेत अगदी उणे ३५ ते ४० अंश तापमानातही ते जगू शकतात. मात्र तापमान १२ किंवा १३ अंशाच्या वर गेलं तर मात्र ते त्यांच्यासाठी मुश्किल होतं. कडाक्याच्या हिवाळ्यातही त्यांची चयापचयाची क्रिया संथ असल्याने शरीरातील उष्णता टिकून राहते आणि ते जगतात. पण तापमानातल्या चढ उतारांमुळे याक संकटात सापडले आहेत.”

डिक वस्तीहून ४० किलोमीटरवरच्या काला पारी (काळा पर्वत) इथे मी त्सेरिंग चोन्चुम यांना भेटलो. हान्ले खोऱ्यातल्या मोजक्या महिला याकपालकांपैकी त्या एक. “आजकाल आधीपेक्षा हवा गरम झाली आहे त्यामुळे मेंढ्या, याक आणि पश्मिना बकऱ्यांच्या अंगावर पूर्वीइतकी दाट लोकर तयार होत नाही. ती विरळ आणि हलकी होत चाललीये,” त्या म्हणतात. “याक अशक्त वाटतात. आणि याक जर अशक्त असेल तर त्याचा अर्थ आमच्यासाठी उत्पन्न कमी. कमी दूध, कमी कमाई. गेल्या पाच वर्षांत याकपासून मिळणाऱ्या कमाईत प्रचंड घट झाली आहे.” चोन्चुम राक गुराख्यांच्या समुदायातल्या हंगामी पशुपालक आहेत. स्वतंत्र संशोधकांनी केलेल्या अभ्यासांमधून असं दिसून येतं की इथल्या गुराखी कुटुंबाचं सगळ्या स्रोतांमधून येणारं महिन्याचं सरासरी उत्पन्न २०१२ साली सुमारे रु. ८,५००/- इतकं होतं.

एखाद्या पशुपालकासाठी याकचं दूध हा उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. याकपालनातून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या ६० टक्के वाटा दुधाचा आहे. चांगपांचं बाकी उत्पन्न खुलू (याकचे केस) आणि लोकरीतून येतं. म्हणूनच जेव्हा याक प्राण्यांची संख्या घटते आणि दुधाचं उत्पादन कमी होतं तेव्हा त्यांच्या खिशाला चांगलीच चाट बसते. या सगळ्या बदलांमुळे याक प्राण्यावर आधीरित अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे.

“आताशा पाऊसही वेळत येत नाही आणि बर्फही,” त्सेरिंग चोन्चुम म्हणतात. “त्यामुळे पर्वतांमध्ये पुरेसं गवतच नाहीये. आणि त्यामुळे इथे येणाऱ्या भटक्यांची [पशुपालकांची] संख्या रोडावली आहे. मी तर म्हणेन, या सगळ्या बदलांमुळे, गवताचा तुटवडा आणि त्यामुळे येणाऱ्या समस्यांमुळे ही संख्या ४० टक्क्यांवर आली आहे [इथे गुराख्यांची एकूण २९० कुटुंबं असावीत असा अंदाज आहे].”

"माझा मुलगा स्थानिक वेधशाळेत काम करतो – त्यामुळे मला जरा तरी निश्चिंती आहे. चांगपा कुटुंबांमधली अनेक तरुण मुलं आता सीमा सडक संघटना आणि राखीव  अभियंता दलाच्या रस्ते बांधणी कामांवर रोजंदारीवर काम करू लागली आहेत.” अनेक जण कामाच्या शोधात स्थलांतरित झाले आहेत.

स्थानिक वेधशाळेत काम करणारा हा मुलगा म्हणजे सोनम दोरजी, ज्यांच्या मदतीने मी ही सफर पूर्ण करू शकलो. सोनमकडे स्वतःपाशी पर्वतांमधल्या बदलांची बारीक निरीक्षणं आहेत.

PHOTO • Ritayan Mukherjee

‘हवामानात अनेक बदल झाले आहेत. मी १५ वर्षांचा होतो तेव्हा इथे जास्त थंडी असायची... जाणकार सांगतात पारा उणे ३५ अंशापर्यंत उतरायचा’

“हवामानात अनेक बदल झाले आहेत,” ते सांगतात. “मी १५ वर्षांचा होतो (आता माझं वय ४३ आहे, म्हणजे मी साधारण ३० वर्षापूर्वीचं सांगतोय), तेव्हा इथे जास्त थंडी असायची. मी काही तेव्हा तापमान मोजलं नव्हतं, पण जाणकार सांगतात की पारा उणे ३५ अंशापर्यंत खाली उतरायचा. तसल्या थंडीचा सामना करण्यासाठी लोकांना कपड्यात बदल करायला लागायचा. आजकाल ते घालतात तशी सिन्थेटिक कापडाची जाकिटं तेव्हा नव्हती. सगळे कपडे पश्मिना लोकरीपासून विणलेले असायचे – टोप्या, कपडे, सगळ्या गोष्टी. जोड्याच्या तळाला आतून याकच्या चामडीचा तुकडा शिवलेला असायचा आणि जोडेही इथेच विणलेल्या कापडाचा असायचे, अगदी वर गुडघ्यापर्यंत बांधायला चामड्याच्या पट्ट्या असायच्या. आता तुम्हाला तसले जोडे बघायलाही मिळणार नाहीत.”

पश्चिमी हिमालयातल्या लडाख व लाहौल आणि स्पिती प्रदेशावर वातावरण बदलांचा काय परिणाम होतोय या बद्दलच्या शोधनिबंधांमध्ये टुंडुप आंग्मे आणि एस एन मिश्र संशोधक म्हणतात, तापमानाचा पारा वाढलाय. “वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार (हवाई दल, लेह) गेल्या ३५ वर्षांमध्ये लेह भागात हिवाळ्याच्या सगळ्या महिन्यांमध्ये तापमान १ अंशाने तर उन्हाळ्याच्या काळात ०.५ अंशाने वाढल्याचं दिसतं. आणि नोव्हेंबर ते मार्च या काळात पावसाचं प्रमाण घटत चाललं आहे, अर्थात हिमवृष्टी कमी झाली आहे.”

ते पुढे असंही म्हणतात, “गेल्या काही वर्षांत जागतिक तापमान वाढीचे परिणाम लडाख आणि लाहौल व स्पितीच्या प्रदेशात अधिकाधिक जाणवू लागले आहेत. पाऊस आणि हिमवृष्टीत बदल होत आहेत, छोट्या हिमनद्या आणि कायमस्वरूपी बर्फाची ठिकाणं वितळू लागली आहेत, ज्यामुळे नद्या नाल्यांच्या प्रवाहावर परिणाम झाला आहे, तापमान आणि आर्द्रतेत वाढ झाल्यामुळे किडे आणि कीटकांच्या हल्ल्यांसाठी सुकर स्थिती तयार झाली आहे.” तिथे झांपाल त्सेरिंग यांच्या राहुटीत त्यांचा मित्र सांगदा दोरजी आम्हाला विचारतोः “या वेळी तुम्हाला किती रिबो पहायला मिळाले?”

चांगपा रिबो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुट्यांमध्ये राहतात. रिबो तयार करण्यासाठी याक लोकरीपासून घोंगडं विणून ते शिवलं जातं. कडाक्याची थंडी आणि बोचऱ्या वाऱ्यांपासून या पशुपालकांचं संरक्षण होतं.

“बहुतेक कुटुंबांकडे [आता] स्वतःचा रिबो नाही,” सांगदा सांगतात. “नवा रिबो शिवण्यासाठी आता लोकर कुठेय? गेल्या काही वर्षांत याकच्या लोकरीत प्रचंड घट झाली आहे. रिबो नाही त्यामुळे आमच्या भटक्या जगण्याचा एक मोठा हिस्साच गायब झाला आहे आणि त्याचा सगळा दोष मी हिवाळ्यातली थंडी नाहिशी होतीये त्याला देईन.”

मे महिन्यात सिक्किममध्ये घटलेली घटना अशी अचानक झालेली नव्हती हे आता माझ्या लक्षात यायला लागलं. पुढ्यात आणखी संकट वाढून ठेवलेलं असू शकतं. हे गुराखी वातावरण बदल असे शब्द वापरत नसले तरी त्याचा परिणामांचं वर्णन ते बारकाईने करतायत. आणि सोनम दोरजी आणि त्सेरिंग चोन्चुम यांच्या बोलण्यातून आपल्याला हेही समजतं की फार मोठी स्थित्यंतरं घडतायत हे त्यांना कळतंय. ते हेही समजून चुकलेत की यातले काही बदल किंवा अगदी स्थित्यंतरं माणसाच्या हस्तक्षेपामुळे झाली आहेत. आणि कदाचित म्हणूनच ज्येष्ठ गुराखी, साठीतले गुंबू ताशी मला म्हणालेः “मला कल्पना आहे की पर्वतांमधलं वातावरण फार चमत्कारिक आहे. लहरी. आम्ही डोंगरदेवाचा रोष ओढवून घेतलाय बहुतेक.”

PHOTO • Ritayan Mukherjee

या भव्य पर्वतरांगांमधल्या विस्तृत पट्ट्यात उंचावरच्या चांगपा पशुपालकांसाठी याक जीवनदायी आहेत, त्यांच्या उत्पन्नाचं साधन आणि हिवाळ्यात अन्नाचा स्रोत. (फोटोः रितायन मुखर्जी/पारी)

PHOTO • Ritayan Mukherjee

हवामानातल्या बदलांमुळे उंचावरच्या कुरणांवर चराईसाठी विसंबून असणाऱ्या चांगपा पशुपालकांच्या पशुधनावर – याक, पश्मिना बकऱ्या, मेंढ्या - परिणाम होत आहे. (फोटोः रितायन मुखर्जी/पारी)

PHOTO • Ritayan Mukherjee

राहणीत बदल झाले असल्याने, आता बरीचशी चांगपा कुटंबं याकच्या लोकरीपासून बनवलेला पारंपरिक रिबो वापरत नाहीत, त्याऐवजी ते लेहमधून आणलेले सैन्यदलाचे तंबू वापरतात. (फोटोः रितायन मुखर्जी/पारी)

PHOTO • Ritayan Mukherjee

अजूनही, याकच्या लोकर आणि इतर घटकांपासून हा समुदाय अनेक वस्तू बनवतो. लहानगी दोन्चेन याकच्या लोकरीपासून बनवलेल्या घोंगड्यात शांत झोपली आहे, तिची आई घरची जनावरं चारायला घेऊन गेली आहे. (फोटोः रितायन मुखर्जी/पारी)

PHOTO • Ritayan Mukherjee

चांगथांग पठारावरच्या भटक्या पशुपालक समुदायांसाठी याक हा अन्नाचा मुख्य स्रोत आहे – दूध व मांस. मांसासाठी प्राण्यांना मारणं हे या समुदायांच्या रितीविरोधात आहे, पण एखाद्या याकचा नैसर्गिक मृत्यू झाला तर लोक लांबलचक आणि खडतर हिवाळ्यात तगून राहण्यासाठी त्याचं थोडं मांस साठवून वापरतात. (फोटोः रितायन मुखर्जी/पारी)

PHOTO • Ritayan Mukherjee

चांगपा समुदायाच्या राक गटाचे गुंबू ताशी यांच्याकडे ८० याक आहेत. त्यांच्या पारंपरिक भटक्या आयुष्यासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांबद्दल ते आणि इतरही अनेक बोलतात. (फोटोः रितायन मुखर्जी/पारी)

PHOTO • Ritayan Mukherjee

गोन्पो दोन्रुप जवळच्याच एका कुरणाकडे निर्देश करतोय, जिथे आता अजिबात गवत उगवत नाही, त्यामुळे त्याच्या याक कळपाला चराईसाठी आणखी उंचावरच्या कुरणांमध्ये जावं लागतं. (फोटोः रितायन मुखर्जी/पारी)

PHOTO • Ritayan Mukherjee

एका अनाथ याक पिलासोबत त्सेरिंग चोनचुम. हानले खोऱ्यातल्या मोजक्या महिला याकपालकांपैकी त्या एक आहेत (फोटोः रितायन मुखर्जी/पारी)

PHOTO • Ritayan Mukherjee

आपल्या प्राण्यांसाठी कुरणांची टंचाई जाणवू लागल्यामुळे भटक्या पशुपालकांना पूर्वीपेक्षा आता  आपला मुक्काम कमी दिवसांतच हलवावा लागतो आहे. (फोटोः रितायन मुखर्जी/पारी)

PHOTO • Ritayan Mukherjee

कडाक्याच्या थंडीतलं आयुष्य मानव आणि प्राणी, दोघांसाठीही खडतर आहे. एक चांगपा गुराखी आपल्या कुटुंबासाठी औषधं आणण्यासाठी लेहला निघाला आहे. (फोटोः रितायन मुखर्जी/पारी)

PHOTO • Ritayan Mukherjee

हानले खोऱ्यातल्या उंचावरच्या पठारावर गवताचा मागमूस नसलेल्या ओसाड जमिनीवरून करमा रिनचेन (शीर्षक छायचित्रात नोरला दोन्द्रुप सोबत) चाललेत

साध्यासुध्या लोकांचं म्हणणं आणि स्वानुभवातून वातावरण बदलांचं वार्तांकन करण्याचा देशपातळीवरचा पारीचा हा उपक्रम संयुक्त राष्ट्रसंघ विकास प्रकल्पाच्या सहाय्याने सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा

अनुवादः मेधा काळे

Reporter : Ritayan Mukherjee

رِتائن مکھرجی کولکاتا میں مقیم ایک فوٹوگرافر اور پاری کے سینئر فیلو ہیں۔ وہ ایک لمبے پروجیکٹ پر کام کر رہے ہیں جو ہندوستان کے گلہ بانوں اور خانہ بدوش برادریوں کی زندگی کا احاطہ کرنے پر مبنی ہے۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Ritayan Mukherjee

پی سائی ناتھ ’پیپلز آرکائیو آف رورل انڈیا‘ کے بانی ایڈیٹر ہیں۔ وہ کئی دہائیوں تک دیہی ہندوستان کے رپورٹر رہے اور Everybody Loves a Good Drought اور The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom کے مصنف ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز پی۔ سائی ناتھ
Series Editors : P. Sainath

پی سائی ناتھ ’پیپلز آرکائیو آف رورل انڈیا‘ کے بانی ایڈیٹر ہیں۔ وہ کئی دہائیوں تک دیہی ہندوستان کے رپورٹر رہے اور Everybody Loves a Good Drought اور The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom کے مصنف ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز پی۔ سائی ناتھ
Series Editors : Sharmila Joshi

شرمیلا جوشی پیپلز آرکائیو آف رورل انڈیا کی سابق ایڈیٹوریل چیف ہیں، ساتھ ہی وہ ایک قلم کار، محقق اور عارضی ٹیچر بھی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز شرمیلا جوشی
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے