“पश्चिम बंगालमधल्या लोकांना डुली बनवता येत नाही.”

बबन महातो साळी साठवण्यासाठी बनवलेल्या सहा फूट उंच आणि चार फूट रुंद मोठ्या ‘धान धोरार डुली’बद्दल सांगतात.

शेजारच्या बिहारचे कारागीर महातो म्हणतात, “डुली बनवणं सोपं नाही. किती तरी काम असतं, ‘कंडा साधना, काम साधना, तल्ली बिठाना, खडा करना, बुनाई करना, तेरी चढाना” (बाबूंच्या आडव्या उभ्या पट्ट्या काढायच्या, गोलाकार सांगाडा तयार करायचा, टोपलीला उभा आकार द्यायचा, ती विणायची आणि त्याच्या आतलं काड्यांचं काम करायचं)

PHOTO • Shreya Kanoi
PHOTO • Shreya Kanoi

बबन महातो बांबूच्या टोपल्या बनवण्यासाठी बिहारमधून पश्चिम बंगालच्या अलीपुरद्वार जिल्ह्यात स्थलांतरित झाले आहेत. टोपल्या विणण्यासाठी तयार करण्यासाठी, ते बांबूचे देठ सूर्यप्रकाशात (डावीकडे) वाळवतात (उजवीकडे)

PHOTO • Shreya Kanoi
PHOTO • Shreya Kanoi

टोपल्या (डावीकडे) विणत असताना बबनची बोटे चपळपणे हालतात. एकदा तो आधार पूर्ण केल्यानंतर, टोपली उभी राहण्यासाठी ते (उजवीकडे) फिरवत राहतात.

५२ वर्षांचे बबन महातो गेल्या चाळीस वर्षांपासून हे काम करताय. “माझ्या लहानपणी माझ्या आईवडिलांनी मला हेच काम शिकवलं. त्यांनी हेच काम केलं. सर्व बिंद लोक डुली बनवतात. ते छोट्या छोट्या टोकऱ्या बनवतात, मासे धरतात आणि नाव चालवतात.”

बबन बिंद समाजाचे आहेत. हा समाज २०२२-२३ साली झालेल्या जातीय जनगणनेनुसार राज्यातला अत्यंत मागास वर्ग म्हणून नोंदवला गेला आहे. ते म्हणतात, डुली बनवणारे बहुतांश कारागीर बिंद समाजातले असले तरीही, कानू आणि हलवाई समुदायातले लोकही हे काम करतात. अनेक दशके बिंद लोकांसोबत राहून त्यांनी हे कौशल्य अवगत केलंय.

“मी हाताच्या अंदाजाने काम करतो. माझे डोळे बंद असले किंवा बाहेर अंधार असला तरीही, माझ्या हातांची हुशारी मला मार्गदर्शन करण्यासाठी पुरेशी आहे” बबन सांगतात.

त्यांनी बांबूच्या आडव्या छेदाचा तुकडा करून त्याच्या सहज वाकू शकणाऱ्या १०४ पट्ट्या तयार केल्या. ह्या कामाची सगळी भिस्त हाताच्या कौशल्यावर असते. त्यानंतर अचूक आकडेमोड करून बांबूचा गोलाकार सांगाडा “छे या सात हाथ” (अंदाजे ९ ते २० फूट) व्यासामध्ये, हव्या असलेल्या आकारमानानुसार तयार केला जातो. हाथ म्हणजे हाताचे मधले बोट ते कोपरापर्यंत घेतलेले हाताचे माप. संपूर्ण भारतातील कारागीर मोठ्या प्रमाणावर हेच मोजमापाचे एकक म्हणून वापरतात.

PHOTO • Gagan Narhe
PHOTO • Gagan Narhe

महातो बनात जाऊन योग्य असा बांबू निवडून घेऊन येतात

PHOTO • Gagan Narhe

बबन डुलीच्या टोपलीचा तीन फूट रुंदीचा गोलाकार आधार त्यात बांबूचे तुकडे विणून तयार करतात.

अलीपूरदुआर या जिल्ह्यात (पूर्वीचा जलपायगुडी) येथे आम्ही महातोंसोबत बोलत होतो. इथून ६०० किलोमीटर अंतरावरच्या बिहारच्या भगवानी छपराहून दरवर्षी पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील मैदानी भागात कामासाठी जातात, कार्तिक (ऑक्टोबर-नोव्हेंबर) महिन्यात जेव्हा खरिपाचा भात कापणीसाठी तयार होतो तेव्हा ते येथे येतात. आता पुढचे दोन महिने ते डुली बनवतील आणि विकतील.

ते एकटे नाहीत. “बंगालच्या अलीपुरदुआर आणि कूचबिहार जिल्ह्यांतील प्रत्येक हाट (आठवडे बाजार) मध्ये आमच्या भगवानी छपरा गावातले डुली बनवणारे असतात,” पूरण साहा सांगतात. ते देखील डुली बनवतात आणि दरवर्षी बिहारमधून कूचबिहार जिल्ह्यातील खगराबारी शहरातल्या दोडेर हाटमध्ये स्थलांतर करतात. या कामासाठी येणारे बहुतेक स्थलांतरित पाच ते दहा लोकांच्या गटाने एकत्र येतात. ते एक हाट निवडतात आणि तेथे तळ तयार करतात, आणि पालं टाकून त्यात राहतात.

महातो पश्चिम बंगालला आले तेव्हा १३ वर्षांचे होते. त्यांचे गुरू राम परवेश महतो यांच्यासोबत ते इथे आले. “मी माझ्या गुरूंसोबत १५ वर्षं प्रवास केला. तेव्हा मला हे काम (डुली बनवणे) पूर्णपणे समजू शकलं,” बबन सांगतात. त्यांचं अख्खं कुटुंब डुली कारागिरांचं आहे.

PHOTO • Gagan Narhe

मथुरा, अलीपुरद्वार येथील आठवडे बाजार म्हणजे हाटमध्ये टोपली विणकरांचा एक गट त्यांच्या तंबूसमोर उभा आहे जेथे ते राहतात, डुली बनवतात आणि विकतात

*****

महातोंच्या दिवसाची सुरुवात शेकोटी पेटवून होते. त्यांच्या पालावर रात्री खूप थंडी वाजते, म्हणून ते बाहेरच्या शेकोटी जवळच बसतात. “मी रोज पहाटे ३ वाजता उठतो. मला रात्री थंडी वाजते. म्हणून मी माझ्या अंथरुणातून बाहेर पडतो आणि शेकोटी पेटवून तिच्याजवळ बसतो.” तासाभरानंतर ते कामाला लागतात आणि बाहेर अंधार असला तरीही, रस्त्यावरचा मंद दिवा त्यांचं काम सुरू करण्यासाठी पुरेसा असतो.

ते म्हणतात की डुली बनवण्याच्या प्रक्रियेचा अविभाज्य भाग म्हणजे योग्य प्रकारच्या बांबूची निवड. ते सांगतात, “तीन वर्ष जुना बांबू याच्यासाठी उत्तम असतो कारण तो सहज कापला जाऊ शकतो आणि जाड असतो.”

बांबूचा गोलाकार सांगाडा योग्य आकडेमोड करून बांधणं हे अगदी अवघड काम आहे. बांबू कापण्यासाठी ते दाव (कोयता) वापरतात. पुढचे १५ तास त्यांचे हात थांबतील ते फक्त जेवण आणि बिडीसाठी.

एका सामान्य डुलीची उंची ५ फूट आणि व्यास ४ फूट असतो. बबन त्यांच्या मुलाच्या मदतीने दिवसातून दोन डुली बनवू शकतात आणि अलीपूरदुआर जिल्ह्यात सोमवारच्या आठवडे बाजारात म्हणजे मथुरा हाटमध्ये विकू शकतात. मी आठवडे बाजारात जातो तेव्हा १० मण, १५ मण, २० मण, २५ मण भात मावेल अशा वेगवेगळ्या आकाराच्या डुली घेऊन जातो. एक मण म्हणजे ४० किलो, त्यामुळे १० मणाच्या डुलीत ४०० किलो धान्य ठेवता येतं. ते गिऱ्हाइकांना त्यांच्या गरजेनुसार हव्या असलेल्या आकाराची डुली बनवून देतात. आकारमानानुसार डुलीचा आकार ५ ते ८ फूट उंचीपर्यंत बदलता येतो.

व्हिडिओ पाहा: बबन महातोच्या बांबूच्या भव्य टोपल्या

लहानपणापासून माझ्या आईवडिलांनी मला डुली कशी बनवायची हे शिकवलं. त्यांनी आयुष्यभर हेच काम केलं

“कापणीचा हंगाम सुरू झाला की, एका डुलीसाठी आम्हाला ६०० ते ८०० रुपये मिळतात. जेव्हा हंगाम संपतो तेव्हा मागणी कमी असते म्हणून मी तीच वस्तू स्वस्तात विकतो. ५० रुपये जास्त मिळावे म्हणून मी टोपल्या घरपोच नेऊन देतो,” ते म्हणतात.

एका डुलीचं वजन आठ किलो असतं आणि बबन त्यांच्या डोक्यावर तीन डुली (अंदाजे २५ किलो वजन)  वाहून नेतात. “थोड्या वेळासाठी मी माझ्या डोक्यावर २५ किलोचा भार वाहू शकत नाही का?” ते विचारतात. ही काही फार मोठी गोष्ट नाही असंही आवर्जून सांगतात.

आपलं दुकान असलेल्या आठवडी बाजारातून महातो चालत असताना बिहारच्या त्यांच्या गावकऱ्यांना हात हलवून नमस्कार करतात. त्यांच्या समुदायातल्या लोकांची दुकानं व मदत करणाऱ्या स्थानिक बंगाली लोकांकडे निर्देश करून म्हणतात, “सब जान पहचान के हैं...” (सगळेच ओळखीचे आहेत). “माझ्याकडे एक पैसाही नसला आणि मला डाळ-भात आणि रोटी हवी असली तर माझ्याकडे पैसे आहेत की नाही ह्याची पर्वा न करता ते मला सर्व काही देतील,” ते पुढे म्हणतात.

PHOTO • Gagan Narhe
PHOTO • Gagan Narhe

बबन एका ग्राहकाला (डावीकडे) देण्यासाठी डुली घेऊन जाताना जो त्यांच्या मागे (उजवीकडे) सायकल चालवत आहे

फिरस्तीने त्यांना त्यांच्या मूळ भोजपुरी भाषेपलिकडे इतर भाषा शिकवल्या. ते हिंदी, बंगाली आणि आसामी भाषा बोलतात आणि अलीपूरदुआर जिल्ह्यातल्या शेजारच्या दक्षिण चाकोयखेती गावात राहणाऱ्या मेच समुदायाची मेचिया भाषादेखील त्यांना समजते.

ते म्हणतात की, ते दिवसाला दारुच्या दोन बाटल्या १० रुपयांना विकत घेतात. “दिवसभरातल्या अंगमेहनतीने शरीर ठणकायला लागतं. दारूमुळे या वेदना जाणवेनाशा होतात.”

त्यांचे बिहारी सहकारी एकत्र रहात असले तरीही, बबन स्वतः एकटं राहणं पसंत करतात. “मला ५० रुपयांत जेवायचं असेल आणि माझ्यासोबत बाकीचे लोक असतील तर ते म्हणू शकतात, ‘मला माझा वाटा हवाय.’ म्हणून मी एकटं रहाणं पसंत करतो. त्यामुळे मी जे काही खातो ते माझं आहे आणि मी जे कमावतो तेही माझं आहे.”

बिहारमध्ये बिंद लोकांसाठी उदरनिर्वाहाच्या संधी फार कमी असल्याचं त्यांनी सांगितलं आणि म्हणून ते लोक पिढ्यानपिढ्या असेच स्थलांतर करत आहेत. बबन यांचा ३० वर्षांचा मुलगा अर्जून महातोनं सुद्धा लहान असताना त्यांच्यासोबत प्रवास केला आहे. आता तो मुंबईत चित्रकार म्हणून काम करतो. “आमच्या बिहारमध्ये पुरेसं उत्पन्न मिळत नाही. वाळू उपसा हाच इथला एकमेव उद्योग आहे आणि संपूर्ण बिहार त्यावर अवलंबून राहू शकत नाही.”

PHOTO • Shreya Kanoi

दरवर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान, बबन पश्चिम बंगालच्या अलीपुरद्वारमध्ये हायवेवर राहतात आणि काम करतात

PHOTO • Shreya Kanoi

डावीकडे : तात्पुरती ताडपत्री हे बबनचे तात्पुरते घर आहे जिथे ते डुली देखील बनवतात. उजवीकडे : बबनने महत्त्वपूर्ण टप्पे पूर्ण केल्यानंतर त्यांचा मुलगा चंदन टोपली विणण्याचे काम पूर्ण करताना

बबनच्या आठ मुलांपैकी सर्वात लहान असलेला चंदन या वर्षी (२०२३) त्यांच्यासोबत आला आहे. त्यांनी पश्चिम बंगालपासून आसामपर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-१७ जवळ एक तात्पुरतं घर उभारलं आहे, जिथं पूर्वी चहाच्या बागा होत्या. त्यांचं घर म्हणजे एक जुनं गॅरेज आहे ज्यामध्ये तीनही बाजूंनी ताडपत्री, पत्र्याचं छत, मातीची चूल, अंथरूण आणि डुलीच्या टोपल्या ठेवण्यासाठी थोडी जागा आहे.

वडील आणि मुलगा शौचासाठी रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेचा वापर करतात; आंघोळीसाठी ते जवळच्या हातपंपावरून पाणी आणतात. “मला असं राहण्यात कोणतीही अडचण नाही. “मैं हमेशा अपने काम के सूर में रहता हूँ (मी नेहमी माझ्या कामाच्या तंद्रीत असतो),” बबन म्हणतात. ते बाहेरच्या भागात डुली बनवतात व विकतात आणि आतली जागा स्वयंपाक आणि निजण्यासाठी.

जेव्हा घर सोडण्याची आणि घरी परत जाण्याची वेळ येते तेव्हा इथून निरोप घेणं हुरहुर लावणारं असतं असं महातो म्हणतात: “माँने, म्हणजे माझ्या घरमालकीणीने तिच्या शेतातल्या तमालपत्रांची पिशवी माझ्यासोबत घरी देण्यासाठी भरून ठेवली आहे.”

*****

धान्य साठवण्यासाठी प्लॅस्टिकच्या गोण्यांची वाढलेली आवक, प्रक्रिया आणि साठवणुकीच्या बदलत्या पद्धतींचा डुली उत्पादकांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे. “मागच्या पाच वर्षात आमच्या कामाला मोठा फटका बसला आहे कारण या परिसरात तांदळाच्या गिरण्या वाढल्या आहेत. शेतकरी त्यांचं धान्य पूर्वीप्रमाणे साठवण्याऐवजी पुढील प्रक्रियेसाठी थेट शेतातून गिरण्यांना विकतायत. लोकांनी साठवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या गोण्यांचा वापर करायला सुरुवात केली आहे,” बिहारमधील डुली बनवणाऱ्यांच्या एका गटाने पारीला सांगितले.

PHOTO • Gagan Narhe
PHOTO • Gagan Narhe

डावीकडे : या हंगामात (२०२४) डुली निर्माते त्यांच्या सर्व टोपल्या विकू शकले नाहीत. उजवीकडे : शेतकरी बस्ता (प्लास्टिकच्या गोण्या) पसंत करतात कारण त्या स्वस्त आणि साठवायला सोयीच्या आहेत

इतर, लहान आकाराच्या टोपल्या बनवणं शक्य आहे, परंतु ते स्थानिक लोकांसोबत सलोख्यानं राहू इच्छितात कारण ते देखील हेच काम करतात आणि त्यांनी ह्या कारागीरांना विनंती केलीये की, “देखो भाई, ये मत बनाओ, अपना बडा वाला डुली बनाओ.. हमलोग का पेट में लात मत मारो” (दादा तुम्ही लहान टोपल्या बनवू नका. तुम्ही तुमच्या मोठ्याच टोपल्या बनवा. आमच्या पोटावर पाय नका देऊ).

कूचबिहार आणि अलीपूरदुआर जिल्ह्यांतल्या हाटांवर, एक बस्ता (प्लास्टिकची गोणी) २० रुपयांना मिळतो तर डुलीची किंमत ६०० ते १००० रुपये इतकी असते. गोणीमध्ये ४० किलो तांदूळ साठवता येतात तर डुलीमध्ये ५०० किलो तांदूळ ठेवता येतो.

सुशीला राय या भातशेती करणाऱ्या शेतकरी असून त्या डुलीला प्राधान्य देतात. अलीपुरदुआरमधल्या दक्षिण चकोयाखेती गावातली ही ५० वर्षीय महिला म्हणते, “आम्ही भात प्लास्टिकच्या गोणीत साठवल्यावर त्याला कीड लागते. म्हणून, आम्ही डुली वापरतो. आम्ही वर्षभराच्या वैयक्तिक वापरासाठी तांदळाचा मोठा साठा ठेवतो.”

२०२१-२२ मध्ये वार्षिक १६.७६ दशलक्ष टनांसह पश्चिम बंगाल हा देशातले सर्वात मोठे तांदूळ उत्पादक राज्य असल्याचे (भारताच्या एकूण तांदूळ उत्पादनाच्या १३ टक्के) कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

PHOTO • Shreya Kanoi
PHOTO • Gagan Narhe

डावीकडे : बबन अलीपुरद्वारमध्ये कापणी केलेल्या भाताच्या शेतातून अर्धवट झालेली डुली घेऊन जाताना. उजवीकडे : कापणी केलेला भात पुढील वर्षभर शेतकऱ्यांना वापर व साठवण्यारकिता टोपल्यांचा वापर केला जातो. त्यावर गोबर (शेण) लेपले जाते जेणेकरून टोपलीतील पोकळी भरून तांदळाचे दाणे बाहेर पडणार नाहीत

*****

महातो ऑक्टोबरच्या मध्यापासून डिसेंबरपर्यंत पश्चिम बंगालमध्ये घालवतील आणि नंतर थोड्या काळ बिहारला परत येतील. फेब्रुवारीमध्ये, ते आसाममधील चहाच्या मळ्यांकडे रवाना होतील आणि पुढील सहा ते आठ महिने चहाची तोड होते त्या काळात ते तिथेच राहतील. “आसाममध्ये अशी एकही जागा नाही की जिथे मी गेलो नाही, दिब्रुगढ, तेजपूर, तिन्सुकिया, गोलाघाट, जोरहाट, गुवाहाटी,” ते मोठी शहरे आणि गावांची नावं सांगतात.

आसाममध्ये त्यांनी बनवलेल्या बांबूच्या टोपल्यांना ‘ढोको’ म्हणतात. डुलीपेक्षा, ‘ढोको’ उंचीने खूपच लहान असतात म्हणजे तीन फूट. चहाची पाने तोडून यात टाकली जातात. ते एका महिन्यात तब्बल ४०० टोपल्या बनवतात, अनेकदा चहाच्या मळ्यांकडून ऑर्डर दिल्यावर त्यांना कामासाठी बांबू पुरवले जातात आणि त्यांची राहण्याची सोयदेखील केलेली असते.

“बांस का काम किया, गोबर का काम किया, माटी का काम किया, खेती में काम किया, आइस्क्रीम का भी काम किया...” अष्टपैलू बबनने सांगितलं आणि त्यांच्या वर्षभराच्या कामाचे वर्णन केलं.

आसाममध्ये टोपलीच्या ऑर्डरचे काम कमी पडल्यास, ते राजस्थान किंवा दिल्लीमध्ये फिरतात आणि रस्त्यावर आइस्क्रीम विकतात. त्याच्या गावातले आणखी काही पुरुष आहेत जे असंच करतात, म्हणून जेव्हा गरज असेल तेव्हा मिरवणूकीच्या पुढे बॅण्डसाठी असलेली गाडीदेखील चालवतात. “माझं संपूर्ण आयुष्य राजस्थान, दिल्ली, आसाम, बंगाल इथंच गेलंय,” त्यांनी सांगितलं.

PHOTO • Shreya Kanoi
PHOTO • Shreya Kanoi

डावीकडे : डुलीचे तळ तयार करण्यासाठी, विणकराला काळजीपूर्वक आकडेमोड करावी लागते आणि हे एक कौशल्य आहे ज्यामध्ये हातखंडा मिळविण्यासाठी बराच वेळ लागतो. तळ टोपलीचा समतोल राखतो. उजवीकडे : बबन त्यांची पूर्ण झालेली डुली देण्यासाठी तयार आहे. एक निष्णात विणकर, त्याला टोपली बनवण्यासाठी फक्त एक दिवस लागतो

कारागीर म्हणून अनेक दशकं काम करूनही, बबन नोंदणीकृत कारागीर नाही आणि हस्तकला विकास आयुक्त कार्यालयाने (वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत) जारी केलेलं कारागीर ओळखपत्रही (पहचान कार्ड) त्यांच्याकडे नाही. हे कार्ड कारागिराला विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि कर्ज, पेन्शन, कारागिरीला मान्यता देणाऱ्या पुरस्कारांसाठी पात्रता, तसेच कौशल्य सुधारण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचे सहाय्य करण्यासाठी औपचारिक ओळख देते.

“आमच्यापैकी बरेच (कारागीर) आहेत, पण गरिबांची काळजी कोणाला आहे? प्रत्येकजण आपापला विचार करतो,” बबन म्हणतात, ज्यांचं बँक खातंही नाही. “मी माझ्या आठ मुलांना वाढवलं आहे. आता, जोपर्यंत माझ्यात ताकद आहे तोपर्यंत, मी कमवेन आणि खाईन. मला यापेक्षा जास्त काय हवंय? कुणी आणखी काय करू शकतो?”

हे वार्तांकन मृणालिनी मुखर्जी फाउंडेशनच्या फेलोशिपअंतर्गत करण्यात आले आहे.

Shreya Kanoi

Shreya Kanoi is a design researcher working at the intersection of crafts and livelihood. She is a 2023 PARI-MMF fellow.

Other stories by Shreya Kanoi

Gagan Narhe is a professor of communication design. He has served as a visual journalist for BBC South Asia.

Other stories by Gagan Narhe
Photographs : Shreya Kanoi

Shreya Kanoi is a design researcher working at the intersection of crafts and livelihood. She is a 2023 PARI-MMF fellow.

Other stories by Shreya Kanoi
Editor : Priti David

Priti David is the Executive Editor of PARI. She writes on forests, Adivasis and livelihoods. Priti also leads the Education section of PARI and works with schools and colleges to bring rural issues into the classroom and curriculum.

Other stories by Priti David
Translator : Ashwini Patil

Ashwini is a journalist based in Nashik with seven years of experience in Marathi print media. She has a keen interest in women and development, cultural studies, youth, finance and media.

Other stories by Ashwini Patil