तसं पाहिलं तर लाड हाइको करायला काहीच कष्ट पडत नाहीत कारण यात दोनच पदार्थ लागतात – बुलुम (मीठ) आणि ससांग (हळद). पण हो आदिवासींच्या म्हणण्यानुसार सगळं कौशल्य आहे ती करण्यात.

ही पाककृती आपल्याला समजावून सांगतायत बिरसा हेमब्रोम. ते झारखंडमधले हो आदिवासी आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार लाड हाइकोशिवाय पावसाळ्याला काही अर्थच नाही. आपल्या मुडईंकडून (आई-वडील) ते हा पारंपरिक पदार्थ करायला शिकले.

एक्काहत्तर वर्षांचे हेमब्रोम शेती करतात आणि मासे धरतात. खुंटपाणी तालुक्यातलं जानकोसासन हे त्यांचं गाव. ते फक्त हो भाषा बोलतात. हो एक ऑस्ट्रोआशियाई आदिवसी भाषा आहे आणि हो समुदायाचे लोकच ती बोलतात. मागच्या जनगणनेनुसार झारखंडमध्ये हो समुदायाचे नऊ लाखाहून थोडे जास्त लोक आहेत. ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही हो समुदायाचे काही लोक राहतात ( अनुसूचित जमाती - संख्याशास्त्रीय आढावा - २०१३ )

पावसाळ्यामध्ये हेमब्रोम गावाजवळच्या तळ्यांमधून आणि पाणी भरलेल्या शेतांमधून हाड हाइको, इचे हाइको, बुमबुई, दांडिके आणि डुडी असे वेगवेगळे मासे पकडतात आणि नीट साफ करून घेतात. त्यानंतर ते काकारु पत्ता म्हणजेच लाल भोपळ्याच्या पानात मासे ठेवतात. मीठ आणि हळदीचं प्रमाण जमणं हे यात सगळ्यात महत्त्वाचं. “जास्त झालं तर मासा खारट लागतो, कमी झालं तर अळणी. चव जमून यायला अगदी नेमकं हळद-मीठ पाहिजे!” ते सांगतात.

मासे करपू नयेत म्हणून ते भोपळ्याच्या पानाची गुंडाळी साल वृक्षाच्या जाडसर पानांमध्ये ठेवतात. यामुळे पानं आणि आतले ताजे मासे नीट राहतात. मासे शिजले की भोपळ्याच्या पानासकट खायचे. “एरवी मासे गुंडाळतो ती पानं मी फेकून देतो. पण ही भोपळ्याची पानं आहेत. त्यामुळे मी खाणार. नीट सगळं जमलं तर पानंसुद्धा चवीला चांगली लागतात.”

पहाः बिरसा हेमब्रोम यांनी बनवलेला लाड हाइको

हो भाषेतून हिंदी अनुवादासाठी अरमन जामुडा यांचे मनापासून आभार.

भारतभरातल्या अनेक भाषा आज लोप पावत आहेत. अशा भाषा नोंदवून ठेवण्याचं काम पारीने हाती घेतलं आहे. तेही या भाषा बोलणाऱ्या समुदायांचं जगणं टिपत  आणि सामान्य माणसांच्या शब्दांत.

हो ही ऑस्ट्रोआशियाई भाषांच्या मुंडा शाखेतील भाषा असून भारताच्या मध्य आणि पूर्व प्रांतातले हो आदिवासी ती बोलतात. युनेस्कोच्या टलस ऑफ लँग्वेजेसनुसार (भाषांचा नकाशासंग्रह) भविष्यात धोक्यात येऊ शकणाऱ्या भारतीय भाषांमध्ये हो भाषेचा समावेश होतो.

या चित्रफितीतील भाषा झारखंडच्या पश्चिमी सिंगभूम जिल्ह्यामध्ये बोलली जाणारी हो भाषा आहे.

Video : Rahul Kumar

Rahul Kumar is a Jharkhand-based documentary filmmaker and founder of Memory Makers Studio. He has been awarded a fellowship from Green Hub India and Let’s Doc and has worked with Bharat Rural Livelihood Foundation.

Other stories by Rahul Kumar
Text : Ritu Sharma

Ritu Sharma is Content Editor, Endangered Languages at PARI. She holds an MA in Linguistics and wants to work towards preserving and revitalising the spoken languages of India.

Other stories by Ritu Sharma