“मी कधीच दोन फलक एका पद्धतीनं रंगवले नाहीयेत,” अहमदाबादमधील नामफलक चित्रकार शेख जलालुद्दीन कमरुद्दीन सांगतात. कात्री उत्पादनासाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजबजलेल्या ‘घीकांता’तले सर्व फलक त्यांनी रंगवलेले आहेत. बहुतांश दुकानांमध्ये एकाच उत्पादनाची विक्री होत असली तरीही जलालुद्दीन यांनी रंगवलेली वैविध्यपूर्ण नावं प्रत्येक दुकानाची वेगळी ओळख अधोरेखित करतात.

या ज्येष्ठ चित्रकाराचं काम, “भिंती, दुकानं आणि दुकानाचे शटर” यावर आणि चित्रपटांच्या रंगमंचाच्या मागील बाजूला असलेल्या पडद्यावर देखील दिसतं. नाम फलक चित्रकाराला अनेक स्थानिक भाषांमधील लिपी, अक्षरं कशी काढायची आणि रंगवायची हे माहीत असणं आवश्यक असतं. अहमदाबादच्या माणेक चौकातल्या एका सराफाच्या दुकानात गुजराती, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या भाषांमध्ये लिहिलेला फलक पन्नास वर्षानंतरही पहायला आणि वाचायला मिळतो.

जलालुद्दीन सांगतात की, चित्रकला त्यांच्यात उपजत होती. ‘जेके पेंटर’ या नावानं ओळखले जाणारे ७१ वर्षांचे जलालुद्दीन अहमदाबादमधले सर्वात वयस्कर नाम फलक चित्रकार आहेत. ते सांगतात की ५० वर्षांपूर्वी त्यांनी फलक रंगवायला सुरुवात तेली. तेव्हाच्या तुलनेत आता मिळणारी कामं कमी आहेत.

या ज्येष्ठ चित्रकारानं इयत्ता सातवीपर्यंत घेतलं आहे आणि ते गुजराती, इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि अरबी अशा पाच भाषांमध्ये फलक रंगवू शकतात. शाळा सोडल्यानंतर दलघरवाड मार्केटमधल्या रहीम यांच्या दुकानात चित्रकला शिकण्याआधी त्यांनी दोऱ्या वळणं, पुस्तकांचं बाइंडिंग आणि गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम केलं.

वयाच्या सत्तरीतही जल्लालुद्दीन नाम फलक रंगवण्यासाठी २० किलोची शिडी घेऊन जातात. पण बायपास शस्त्रक्रिया झाल्यापासून डॉक्टरांनी त्यांना जास्त वजन न उचलण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे त्यांचं ऑनसाइट काम कमी झालंय आणि ते फक्त त्यांच्या दुकानात रंगकाम करतात. “मी शिडीवर जास्त वेळ उभा राहिलो तर माझे गुडघे दुखतात,” त्यांनी सांगितलं पण पटकन पुढे म्हणाले, “जोपर्यंत माझे हात आणि पाय काम करताय तोपर्यंत मी हे काम करत राहीन.”

PHOTO • Atharva Vankundre
PHOTO • Atharva Vankundre

डावीकडे : जलालुद्दीन त्यांनी रंगवलेल्या नाम फलकांसमोर. उजवीकडे : माणेक चौकातल्या एका दुकानाचा फलक गुजराती, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी अशा चार भाषांमध्ये दिसतो

PHOTO • Atharva Vankundre
PHOTO • Atharva Vankundre

कात्री उत्पादकांसाठी घीकांतामध्ये (डावीकडे) आणि स्टेशनरी दुकानासाठी (उजवीकडे) जलालुद्दीन यांनी रंगवलेले नाम फलक

अलीकडेच त्यांनी अहमदाबादच्या तीन दरवाजा भागात क्रॉकरी दुकानाचे मालक असलेल्या मुंतझीर पिसुवाला यांच्यासाठी एक नामफलक रंगवला. त्यासाठी त्यांना ३,२०० रुपये मानधन मिळालं आणि पिसुवाला सांगतात की, “ही प्रक्रिया एकमेकांच्या सहयोगानं होते, आम्ही रंग आणि इतर सर्व गोष्टींची निवड एकत्र केली.”

जलालुद्दीननी त्यांच्या घरासमोरच्या पीर कुतूब मशिदीच्या आवारात दुकान थाटलंय. ऊन आणि दमट वातावरणात त्यांनी दुपारचं जेवण केलं आणि वामकुक्षीनंतर ते दुकानात परतले. त्यांनी रंगानं माखलेला पांढरा शर्ट परिधान केला होता आणि जुन्या शहरातल्या हॉटेलच्या खोलीचे दर दाखवणारा फलक रंगवण्याच्या कामासाठी ते तयार झाले. काम करताना ते एक दोरी आणि स्टीलची खुर्ची वापरतात जेणेकरून बसलेले असताना त्यांना हातांची हालचाल मोकळेपणानं करता येईल.

त्यांनी त्यांच्या हातानं बनवलेला चित्रफलक ठराविक उंचीवर ठेवला अन् त्यावर एक कोरी पाटी ठेवली. २५ वर्षांपूर्वी त्यांनी बनवलेला फलक जीर्ण झाला म्हणून दुकान मालकाने त्यांना नवीन फलक त्याच शैलीत बनवायला सांगितलाय.

“मी रंगाचे तीन हात देतो”, त्यांनी सांगितलं. लाकडी बोर्ड आधीच पांढऱ्या रंगात रंगवलाय. “बिलकुल फिनिशिंगवाला कलर आयेगा,” त्यांनी त्यांचं मत सांगितलं. पेंटचा प्रत्येक कोट सुकण्यासाठी एक दिवस लागतो.

चित्रकारांच्या फलक रंगवण्याच्या शैली लक्षवेधी असतात. “त्यांची शैली आपल्या शिल्प, मंदिरं आणि प्रिंटमध्ये आढळणारी अलंकारिक व स्तरित भारतीय दृश्य शैली आहे,” अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (NID) चे ग्राफिक डिझाइनचे प्राध्यापक तरुण दीप गिरधर सांगतात.

PHOTO • Atharva Vankundre
PHOTO • Atharva Vankundre

जलालुद्दीन गेल्या ३० वर्षांपासून वापरत असलेल्या खारीच्या केसांच्या ब्रशने (उजवीकडे) नाम फलकावर (डावीकडे) पांढऱ्या रंगाचा थर लावण्याची प्रक्रिया सुरू करताना

PHOTO • Atharva Vankundre
PHOTO • Atharva Vankundre

हे ज्येष्ठ चित्रकार सरळ रेषा (डावीकडे) निश्चित करण्यासाठी लाकडी पट्टी वापरतात आणि नंतर थेट रंगाने अक्षरे काढायला सुरुवात करतात (उजवीकडे)

जलालुद्दीननी ते कॉपी करत असलेल्या मजकुरावर नजर टाकली. त्यांनी सांगितलं, “अक्षरं किती मोठी असावीत किंवा लहान असावीत हे मी पाहतो,” ते सांगतात. “कुछ ड्रॉइंग नही करता हूँ, लाइन बनाके लिखना चालू, कलम से.” हे निपुण चित्रकार आधी पेन्सिलमध्ये अक्षरे लिहित नाहीत. पण, सरळ रेषेसाठी लाकडी पट्टी वापरतात.

रंगाच्या पेटीतून खारीच्या केसांचे जुने ब्रश काढताना ते मला अभिमानाने सांगतात, “मी माझा स्वतःचा पेंट बॉक्स बनवलाय.” जलालुद्दीन सुतार म्हणूनही काम करतात आणि त्यांनी ही पेटी १९९६ मध्ये बनवली आहे. बाजारात मिळणारे नवीन प्लास्टिकचे ब्रश त्यांना आवडत नाहीत आणि म्हणूनच ते हाताने बनवलेल्या पेटीत सांभाळून ठेवलेले अंदाजे ३० वर्षे जुने ब्रश वापरणं पसंत करतात.

दोन ब्रश निवडून त्यांनी ते टर्पेन्टाइनने स्वच्छ केले आणि लाल रंगाचा डबा उघडला. हा डबा १९ वर्षे जुना आहे. त्यांच्या स्कूटरची चावी वापरून, ते योग्य पद्धतीने एकत्रित होईपर्यंत त्यात टर्पेन्टाइन मिक्स केले. त्यानंतर त्यांनी ब्रश सपाट केला आणि विस्कटलेले केस उपटले.

ह्या वयात हात थरथरत नाही याबद्दल जलालुद्दीन म्हणाले, हातांची स्थिरता त्यांच्या कामातला अविभाज्य घटक आहे. पहिले अक्षर लिहायला त्यांना पाच मिनिटे लागतात पण ते योग्य उंचीवर नसते. तेव्हा ते ओले असताना ते पुसून टाकतात आणि पुन्हा त्या भागावर लिहितात. “हमको जरासा भी बाहर निकलो नही चलेगा,” ते म्हणतात.

ते म्हणतात की, त्यांच्या कामातला नीटनेटकेपणा आणि अचूकतेमुळे ग्राहक त्यांच्याकडे परत परत काम घेऊन येतात. डायमंड प्रकाराच्या लेखनात त्यांचा हातखंडा आहे. यात अक्षरं त्रिमितीत काढली जातात. हिऱ्यासारखी दिसतात. हे बऱ्यापैकी गुंतागुंतीचं आहे आणि जलाल चाचा स्पष्ट करतात की, प्रकाश, सावल्या आणि मिडटोन अगदी अचूक असेल तर अक्षरांना उठाव येतो.

हा नाम फलक पूर्ण व्हायला आणखी एक दिवस लागेल आणि दोन दिवसांच्या कामासाठी त्यांना ८०० ते १००० रुपये मिळतील, जलालुद्दीन १२०-१५० प्रति चौ. फूट दरम्यान शुल्क आकारतात, हा ठरलेला दर आहे पण त्यांनी महिन्याचा अंदाज दिला नाही. “हिसाब लिखोगे तो घाटा ही होगा, इस लिये बेहिसाब रहता हूँ.”

PHOTO • Atharva Vankundre
PHOTO • Atharva Vankundre

डावीकडे : जलालुद्दीन यांचा हातखंडा डायमंड प्रकारात आहे, ज्यामध्ये अक्षरं त्रिमितीत काढली जातात. त्याचा चमकदार, हिऱ्यासारखा प्रभाव पडतो. उजवीकडे : “त्यांची (नाम फलक चित्रकारांची) शैली आमच्या शिल्प, मंदिरं आणि प्रिंट्समध्ये आढळणारी अलंकारिक आणि स्तरित भारतीय दृश्य शैली आहे,” ग्राफिक डिझाइनचे प्राध्यापक तरुण दीप गिरधर म्हणतात

PHOTO • Atharva Vankundre
PHOTO • Atharva Vankundre

डावीकडे : अहमदाबादच्या मानेक चौकातील डिजिटल प्रिंटिंग दुकानासाठी हाताने रंगवलेला नाम फलक. उजवीकडे : “हाताने रंगवलेले फलक आयुष्यभर टिकतात, डिजिटल नाही,” डिजिटल प्रिंटिंग दुकानाचे मालक गोपाळभाई ठक्कर म्हणतात

जलालुद्दीन यांना दोन मुले आणि एक मुलगी अशी तीन अपत्यं आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाने नाम फलक चित्रांचं काम हाती घेतलं, पण लवकरच त्याने हा व्यवसाय सोडला आणि आता तो कपडे शिवण्याच्या दुकानात काम करतो.

जलालुद्दीन यांच्या मुलांप्रमाणेच अनेक तरुणदेखील हा व्यवसाय सोडतायत. हाताने रंगकाम करण्याची कला आज लुप्त होत चालली आहे. कॉम्प्युटरने चित्रकाराच्या कामाची जागा घेतली, आशिक हुसेन म्हणतात. त्यांनी ३५ वर्षांपूर्वी नामफलक रंगवायला सुरुवात केली. धीरुभाई या दुसऱ्या पिढीतल्या चित्रकाराचा अंदाज आहे की, अहमदाबादमध्ये आता फक्त ५० नाम फलक चित्रकार उरले आहेत.

फ्लेक्सवरल्या डिजिटल प्रिंट्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि आता क्वचितच काही लोकांना हाताने रंगवलेले बोर्ड हवे आहेत. त्यामुळे आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी चित्रकार आशिक ऑटो रिक्षादेखील चालवतात.

स्वतःसाठी सहजपणे फलक मुद्रित करून शकणारे प्रिंटिंग दुकानाचे मालक गोपाळभाई ठक्कर हाताने रंगवलेल्या फलकांची ओळख काय आहे याबद्दल सांगतात की, ते जास्त खर्च असला तरीही हाताने बनवलेल्या नाम फलकांचा वापर करण्याला प्राधान्य देतात, “हाताने रंगवलेल्या फलकांना जे आयुष्य असतं ते डिजिटल फलकांना नसतं.” खरंतर हीच हाताने रंगवलेल्या फलकाची खरी ओळख आहे.

PHOTO • Atharva Vankundre
PHOTO • Atharva Vankundre

डावीकडे : आशिक हुसेन आता त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ऑटोरिक्षा चालवतात. उजवीकडे : अरविंदभाई परमार, अडालज येथील ज्येष्ठ साइन बोर्ड पेंटर यांनी प्लेक्सी कटर मशीन विकत घेतली आणि आता ते फलक छापण्याचे काम करतात

PHOTO • Atharva Vankundre
PHOTO • Atharva Vankundre

डावीकडे : ७५ वर्षीय हुसेनभाई हाडा त्यांच्या डिजिटल फ्लेक्स आणि स्टिकर प्रिंटिंगच्या दुकानात त्यांचा मुलगा आणि नातवासोबत. उजवीकडे : वली मोहम्मद मीर कुरेशी डिजिटल फलकांचं काम करतात आणि केवळ फलक रंगवण्याचं काम अधूनमधून करतात

अनेक चित्रकारांनीही नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले आहे. अरविंदभाई परमार ३० वर्षांपासून गांधीनगरपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या अडालजमध्ये नाम फलक रंगवतात. सात वर्षांपूर्वी त्यांनी स्टिकर्स प्रिंट करणारं प्लेक्सी कटर मशीन विकत घेतलं. ही मोठी गुंतवणूक होती, मशीनसाठी त्यांना २५,००० रुपये आणि कॉम्प्युटरसाठी २०,००० रुपये खर्च आला. कॉम्प्युटर कसा वापरायचा हे त्यांच्या मित्रांकडून शिकून घेतलं.

मशीन रेडियम पेपरवर स्टिकर्स आणि अक्षर कापतं, जी नंतर धातूवर चिकटवली जातात. पण अरविंदभाई म्हणतात की, ते हाताने फलक रंगवायला प्राधान्य देतात कारण एकतर कॉम्प्युटर किंवा मशीन सतत खराब होतं आणि आम्हाला त्यांची दुरुस्ती करत रहावी लागते.

वली मोहम्मद मीर कुरेशी, ४१ वर्षीय नाम फलक चित्रकारही आता डिजिटल फलकांचं काम करतात. त्यांना अधूनमधून नाम फलक रंगवण्याचं काम मिळतं.

वली यांना इतर अनेक चित्रकारांप्रमाणे हुसेनभाई हाडा यांनी शिकवलं आणि मार्गदर्शन केलं. परंतु या ७५ वर्षीय वृद्धाचं म्हणणं आहे की, त्यांच्या स्वत:च्या मुलांना ही कला माहीत नाही. त्यांचा मुलगा हनीफ, नातू हाजीर आणि अमीर गांधीनगरच्या सेक्टर १७ मधल्या त्यांच्या दुकानात स्टिकर्स, फलक, फ्लेक्स डिझाइन आणि प्रिंट करण्याचा व्यवसाय चालवतात.

“और लोगों को करना चाहिये,” हुसेनभाई म्हणतात.

Student Reporter : Atharva Vankundre

Atharva Vankundre is a storyteller and illustrator from Mumbai. He has been an intern with PARI from July to August 2023.

Other stories by Atharva Vankundre
Editor : Sanviti Iyer

Sanviti Iyer is Assistant Editor at the People's Archive of Rural India. She also works with students to help them document and report issues on rural India.

Other stories by Sanviti Iyer
Photo Editor : Binaifer Bharucha

Binaifer Bharucha is a freelance photographer based in Mumbai, and Photo Editor at the People's Archive of Rural India.

Other stories by Binaifer Bharucha
Translator : Ashwini Patil

Ashwini is a journalist based in Nashik with seven years of experience in Marathi print media. She has a keen interest in women and development, cultural studies, youth, finance and media.

Other stories by Ashwini Patil