“या जगात गरिबीसारखं दुसरं दुःख नाही,” मेहत्र राम टंडन १६ व्या शतकातल्या कवी तुलसीदासांचं वचन उद्धृत करतात. छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातल्या चुरेला गावचे मेहत्र राम रामनामी आहेत. रामनामी मूळचे चांभार जातीतले. त्यांनी जात व्यवस्था नाकारली आणि भक्तीचा मार्ग धरला, ज्याच्या केंद्रस्थानी राम आहे.
“आम्ही आमचं आडनाव राम असं लावतो. अर्थात आम्ही इतरही काही आडनाव लावू शकतो. तुम्हाला आम्हा लोकांमध्ये शर्मा, बॅनर्जी, सिंग, पटेल किंवा इतरही आडनावं सापडतील,” बिलासपूर जिल्ह्याच्या चापोरा गावचे चंदू राम सांगतात. “चांभार तर आहोतच पण आम्ही श्रेष्ठी, बैश्य आणि बानिक (वाणी) देखील आहोत. सगळ्या समाजाचे आहोत आम्ही.”
या पंथाचे साधक रायगड, जांजगीर-चांपा, बिलासपूर आणि इतर काही जिल्ह्यात मुख्यतः महानदीच्या काठाने वसलेल्या गावांमध्ये राहतात. काही ओदिशा आणि महाराष्ट्राच्या सीमेलगतही राहतात. (या लेखातले फोटो मी एप्रिल २०१५ ते ऑगस्ट २०१७ या काळात छत्तीसगडच्या माझ्या प्रवासात काढले आहेत.)
अधिकृत कागदपत्रांत रामनामींची गणना हिंदू अशी केली गेल्यामुळे त्यांची संख्या नक्की किती हे सांगणं मुस्किल आहे. पण या पंथाचे ज्येष्ठ सांगतात त्याप्रमाणे स्त्री पुरुष दोन्ही धरून आता २० हजाराहून जास्त रामनामी नसावेत. डिसेंबर-जानेवारी महिन्यातल्या भजन मेळ्याला तरी इतक्या संख्येने रामनामी येतात.
हिंदू धर्मातल्या जातीच्या आणि व्यवसायांच्या उतरंडीमध्ये ज्या खालच्या जाती आहेत, रामनामी त्या जातींमधले आहेत. रॅप्ट इन द नेमः द रामनामीस, रामनाम अँड अनटचेबल रिलीजन इन सेंट्रल इंडिया (२०१२, मालिका संपादकः वेन्डी डॉनिगर) या आपल्या पुस्तकात हवाई विद्यापीठ, मनोआ येथे धर्म या विषयाचे सहयोगी अध्यापक असणारे रामदास लँब म्हणतात की १८२० मध्ये चांभारांचा एक गट (ही जात नंतर अनुसूचित जाहीर झाली) रामनामी झाला, त्यांनी जातीने लादलेलं काम जसं ढोरं ओढणं, कातड्याचं, चामड्याचं काम करणं सोडून दिलं आणि शेती, कुंभारकाम आणि धातुकाम सुरू केलं.
हा पंथ जरी शंभर वर्षंच जुना असला तरी लँब लिहितात, रामनामी पंथ हा १५ व्या शतकातल्या कबिराच्या नामस्मरणाच्या भक्ती परंपरेचाच मार्ग अनुसरतात. यामध्ये कोणत्याही जातीच्या किंवा सामाजिक स्तराच्या व्यक्तीला देवाचं नाव घेऊन भक्तीचा मार्ग खुला आहे.
चांभार असलेल्या परसुराम यांनी पहिल्यादा कपाळावर ‘राम’ असा एकच शब्द कोरला असं मानलं जातं. साधारण १८७० मध्ये चापोरा गावी ते जन्माला आले असं मानलं जातं. यासंबंधी कुठलाही दस्तावेज उपलब्ध नाही मात्र ज्येष्ठ, वयोवृद्ध रामनामी त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी सांगतात. “आम्ही कोणत्या देवाकडून नाही तर एका साध्यासुध्या माणसाकडून दीक्षा घेतलीये,” रायपूर जिल्ह्याच्या अर्जुनी गावचे साधू राम त्यांच्या या थोर नायकाविषयी सांगतात.
त्यांच्या वस्तीतल्या इतर दलितांहून हे लगेच वेगळे कळतात त्याचं कारण त्यांचा पेहराव आणि त्यांचं दिसणं. बरेच जण अंगभर ‘राम’ नाम गोंदून घेतात (याला गोंडी भाषेत ‘अंकित करना’ म्हणतात), रामनाम लिहिलेली एक ओढणी लपेटून घेतात आणि मोरपिसाचा एक मुकुट डोक्यावर धारण करतात. “आमच्या अंगभर राम लिहिलंय,” रायगड जिल्ह्याच्या पांडरीपाणी गावचे पितांबर राम सांगतात. “म्हणूनच बघा, आम्हीच रामायण आहोत.” आणि त्यांच्या अंगावरचं गोंदण म्हणजे देवाचे ठसे आहेत असं ते मानतात.
मी ज्या रामनामींशी बोललो त्यांनी मला सांगितलं की एक जात, वर्ग आणि लिंगभेदमुक्त असा समाज तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. परसुराम यांनी कुणालाही त्यांचं वारस जाहीर केलं नाही आणि आता काही निवडक स्त्री पुरुषांची समिती या पंथाचं सगळं काम पाहते.
ज्यांनी अंगभर गोंदून घेतलं आहे – ज्यांना पूर्णनक्षिक म्हणतात – ते बहुतेक जण आता त्यांच्या सत्तरीत आहेत. त्यांची मुलं जी ७० च्या दशकात शिक्षण घेऊ लागली आता शहरांमध्ये नोकरी करत आहेत. लोक चेष्टा करतील किंवा आपल्या माथी ‘मागास’ असा ठपका बसेल किंवा कुणी कामच देणार नाही अशा भीतीने त्यांना आता अंगावर गोंदवून घेण्यात रस नाहीये.

रायगड जिल्ह्यातल्या चुरेला गावचे मेहत्र राम टंडन या आधी तांबट होते आणि आता ते त्यांचा बहुतेक वेळ त्यांच्या नातवाबरोबर घालवतात. उडाकाकन गावाच्या भजन घराबाहेर ते उभे आहेत, देव्हाऱ्यात देवाच्या जागी तुलसीदासाचं रामचरितमानस ठेवलं आहे

चापोरा गावचे प्रिय राम रामनामी समाजाच्या गाभा समितीचे सदस्य आहेत; निराधारांची सेवा, सरकारी मदत मिळावी यासाठी पाठपुरावा आणि शाळा उभारणी असं या समितीचं काम आहे. देणग्या आणि सरकारी अनुदानातून निधी गोळा होतो

कोडावा गावच्या ९० वर्षीय पंडित राम दासांनी शाळा पाहिलेली नाही मात्र त्यांच्या सांगण्यानुसार ते चार भाषांमध्ये लिहू शकतात. रामनामींसाठी पवित्र ग्रंथ असलेल्या तुलसीदासाच्या रामचरितममानस या ग्रंथात जिथे वर्गभेद किंवा लिंगभेदाचा संदर्भ आला आहे ते भाग त्यांनी नव्याने लिहिले आहेत

जांजगीर-चांपा जिल्ह्यातील खापराडीह गावचे तीर्थ राम यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आहे आणि ते अनेक वर्षं रामनामी समाजाच्या गाभा समितीचे संचालक होते

डिसेंबर-जानेवारी मध्ये कापण्या झाल्या की रायपूरच्या सरसिवा गावामध्ये तीन दिवसांच्या भजन मेळ्याला रामनामी हजेरी लावतात. ते ‘अजयस्तंभ’ (‘राम’ असं लिहिलेला पांढरा स्तंभ) उभा करतात, दिवसभर रामचरितमानसाचं पठण करतात. किती तरी लोक या ग्रंथाचं दर्शन घेण्यासाठी येतात

अवध राम यांच्या एकुलत्या एक मुलाला शाळा शिक्षकाची नोकरी मिळाली आणि मग त्यांनी चुरेला गावातल्या आपल्या घरी एक मुक्त शाळा सुरू केली. ते ज्या वर्कशॉपमध्ये लोहाराचं काम करायचे तिथे त्यांनी आपला डेरा हलवला

मुक्ती राम विधवा आहेत, बिलाईगड गावाजवळ नवराना या छोट्या गावात त्या राहतात, घर सांभाळतात. त्यांचा मुलगा शेती पाहतो

रायपूर जिल्ह्याच्या अर्जुनी गावचे साधु राम सहा वर्षांचे असताना त्यांची दृष्टी गेली. ते पूर्णनक्षिक आहेत – म्हणजेच त्यांच्या संपूर्ण शरीरावर गोंदलेलं आहे. त्यांच्या समाजानेच त्यांची आयुष्यभर काळजी घेतली आहे असं ते सांगतात

भातगाव-चांपा मार्गावरच्या गोरबा गावातल्या नव्वद वर्षीय पुनिया बाई राम या सर्वात वयोवृद्ध पूर्णनक्षिक आहेत. त्यांचे पती २० वर्षांपूर्वी निवर्तले. पुनिया बाई सांगतात त्यांनीच त्यांच्या अंगावर १००० वेळा ‘राम’ नाम गोंदलं आहे

रामचरितमानसातल्या चौपाई (चार ओळींच्या रचना) गाताना, स्त्रिया आधी गातात आणि पुरुष त्यांच्या मागून

रामनामी रामचरितमानसातल्या चौपाई गातात तेव्हा तालासाठी घुंगरांची साथ असते

रामनामी त्यांच्या पेहरावामुळे वेगळे ओळखू येतात – डोक्यावर मोरपिसांचा मुकुट आणि अंगावर ‘राम’ नाम छापलेली ओढणी

मागच्या पिढीतल्या रामनामींनी अंगभर रामाचं नाव गोंदून घेतलं असलं तरी तरुण पिढी मात्र तसं करताना दिसत नाही

जांजगीर-चांपा जिल्ह्यातल्या खापराडीह गावात तीर्थ राम यांची वहिनी (नाव माहित नाही) त्यांच्या समाजातल्या इतर अनेक स्त्रियांप्रमाणे बोलायला परखड आहे, पठण-भजनात बायका पुढाकार घेतात आणि त्यांना त्यांच्या समाजामध्ये समान दर्जा आहेसं दिसतं
अनुवादः मेधा काळे