“माझ्या मालकीची शेतजमीन नाही, माझ्या पूर्वजांचीही कुणाची नव्हती,” कमलजीत कौर सांगतात. “पण मी इथे येऊन या शेतकऱ्यांना मदत करून माझा खारीचा वाटा उचलतीये. कारण मला अशी भीती आहे की आज जर मी इथे आले नाही तर उद्या माझ्या लेकरांना चार घास खाऊ घालायचे तर मला आधी कॉर्पोरेट कंपन्यांची हाव आहे ना त्याला तोंड द्यावं लागेल.”

३५ वर्षीय कमलजीत पंजाबच्या लुधियानामध्ये शिक्षिका आहेत आणि इथे सिंघुच्या सीमेवर सावलीमध्ये त्या त्यांच्या दोघी मैत्रिणींसोबत त्या दोन शिवणयंत्रं चालवतायत. त्या आळीपाळीने, तीन-तीन दिवस आंदोलनाच्या ठिकाणी येतात आणि आंदोलक शेतकऱ्यांना कपडे दुरुस्त करायचे असले, शर्टाची बटनं तुटलीयेत, सलवार-कमीज कुठे उसवलाय, तर ते शिवून देतात. दररोज त्यांच्या सेवेचा लाभ घ्यायला सुमारे २०० लोक तरी येतात.

सिंघु सीमेवर ही अशीच सेवा अनेक प्रकारे, मनोभावे केली जात आहे – आणि त्यातून आंदोलकांप्रती आपली एकजूट व्यक्त केली जातीये.

यातलेच एक आहेत ईर्शाद (पूर्ण नाव उपलब्ध नाही). सिंघुपासून चार किलोमीटरवर कुंडली औद्योगिक वसाहतीतल्या टीडीआय मॉलबाहेरच्या एका बारक्या बोळात ते एका शीख आंदोलकाच्या डोक्याला चंपी करून देतायत. इतरही अनेक रांगेत आहेत. ईर्शाद कुरुक्षेत्रात नाभिक आहेत आणि बिरादरीच्या – बंधुभावातून इथे आले आहेत.

त्यांच्याच वाटेवर आपल्या मिनी-ट्रकबाहेर बसलेल्या सरदार गुरमीत सिंग यांच्या भोवतीही आंदोलकांचा गराडा पडलाय. यातल्या अनेकांना दुखऱ्या स्नायूंना मालिश करून घ्यायचीये. पंजाबहून सिंघुचा रस्ता खचाखच भरलेल्या ट्रॉलींमध्ये केल्याने अंग आंबून गेलंय. “सध्या त्यांना इतरही अनेक प्रकारच्या वेदना सहन कराव्या लागतायत ना...” मुळात हे लोक इथे का आले त्याबद्दल ते म्हणतात.

चंदिगडच्या डॉ. सुरिंदर कुमार यांच्यासाठी सिंघु सीमेवर इतर डॉक्टरांसोबत वैद्यकीय शिबिर चालवणं हीच सेवा आहे. आंदोलन स्थळी सुरू असलेल्या अनेक दवाखान्यांपैकी हा एक आहे – काही तर थेट कोलकाता किंवा हैद्राबादहून आलेल्या डॉक्टरांनी चालवले आहेत. “आम्ही पदवी घेतली त्या वेळी शपथ घेतली होती त्याला जागतोय फक्त – इतके दिवस या बोचऱ्या थंडीत उघड्या रस्त्यावर राहणाऱ्या म्हाताऱ्या लोकांना वैद्यकीय सेवा पुरवतोय,” सुरिंदर सांगतात.

Kamaljit Kaur, a teacher from Ludhiana, and her colleagues have brought two sewing machines to Singhu, and fix for free missing shirt-buttons or tears in salwar-kameez outfits of the protesting farmers – as their form of solidarity
PHOTO • Joydip Mitra

कमलजीत कौर , लुधियानाच्या शिक्षिका आहेत. त्या आणि त्यांच्या मैत्रिणींनी दोन शिवणयंत्रं आणली आहेत आणि सिंघुच्या सीमेवर त्या पैसे न घेता शर्टाची बटनं लावून देतायत, सलवार-कमीज उसवले असतील तर शिवून देतायत – एकजूट व्यक्त करण्याचा त्यांचा हा मार्ग आहे

आंदोलकांचं धैर्य टिकून रहावं म्हणून सत्पाल सिंग आणि त्यांच्या दोस्तांनी लुधियानाहून सिंघुला एका खुल्या ट्रकवर लादून चक्क एक उसाचा भला मोठा चरकच आणलाय. ही यंत्रं एरवी साखर कारखान्यांमध्ये वापरली जातात. इथे आंदोलनाच्या ठिकाणी या चरकातून उसाचा गोड रस येणाऱ्या जाणाऱ्याला दिला जातोय. ते या ‘रसवंतीवर’ रोज एक ट्रकभर उसाचा रस काढून वाटतायत आणि हा ऊसदेखील लुधियानाच्या सीमेवर असलेल्या त्यांच्या अलिवालच्या गावकऱ्यांनी दिलेल्या देणगीतून विकत घेतला जातोय.

आणि याच कुंडलीच्या लॉनवर भटिंड्याहून आलेला निहंग अमनदीप सिंग आपल्या काळ्या घोड्याला अंघोळ घालतोय. तो म्हणतो की पंजाबची कृषी अर्थव्यवस्था सुरक्षित रहावी यासाठी तो इथे आलाय. मॉलजवळच्या लंगरवर येईल त्याला खाणं देण्याचं काम तो करतो. तसंच तो आणि इतर निहंग (शीख योद्ध्यांचा पंथ) रोज संध्याकाळी दिल्ली पोलिसांनी अडथळे म्हणून जे कंटेनर उभे केले आहेत त्याच्या सावलीत उभ्या केलेल्या तंबूंमध्ये कीर्तनही सादर करतो.

अमृतसरचा गुरवेज सिंग पंजाब विद्यापीठाचा विद्यार्थी आहे आणि इतर विद्यार्थ्यांसोबत सिंघुच्या सीमेवर असलेल्या शेतकऱ्यांना ट्रॉली टाइम्स या पाक्षिकाचे अंक वाटतोय. त्यांनी एक मोठा मंडप टाकलाय आणि तिथे कागद आणि पेनं ठेवलीयेत. कुणीही जाऊन तिथे पोस्टरवर घोषणा लिहू शकतं – या अशा पोस्टरच एक प्रदर्शन तिथे कायमच मांडलेलं असतं. आणि ते एक मोफत वाचनालय देखील चालवतायत. पंजाब विद्यापीठाच्या आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे सदस्य देखील सिंघु सीमेवर एक मोफत वाचनालय चालवतायत. आणि ते पोस्टर देखील तयार करतात (शीर्षक छायाचित्र पहा).

रात्र होत जाते आणि आम्ही सिंघु सीमेपासून कुंडलीच्या दिशेने चालत जायला लागतो, आणि वाटेत अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या असतात आणि लोकांचे घोळके हात पाय शेकत बसलेले असतात. तिथेच आम्हीही.

आम्ही त्याच वाटेवरच्या बाबा गुरुपाल सिंग यांच्या तंबूत जाऊन त्यांची भेट घेतो आणि आलेल्यांसाठी कायमच तयार असलेला चहा आम्हालाही मिळतो. संन्यासी असलेले ८६ वर्षीय बाबा गुरुपाल पतियाळाजवळच्या खानपूर गोंडिया गुरुद्वारेमध्ये ग्रंथी आहेत. ते ज्ञानी आहेत आणि आम्हाला अस्मितेच्या मुद्द्यावरचं शिखांचं राजकारण आणि त्याचा इतिहास आम्हाला समजावून सांगतात. ते असंही म्हणतात की हे आंदोलन आता मर्यादा लांघून देशव्यापी झालं आहे आणि ते सर्वांच्याच भल्यासाठी सुरू आहे.

मी त्यांना विचारतो की ते आणि त्यांच्यासारखेच किती तरी वयोवृद्ध लोक इथे सिंघुपाशी दिवसाचे आठ तास चहा देत हे आंदोलन का करतायत म्हणून. शेकोट्यांच्या एकमेकात मिसळत जाणाऱ्या ज्वाळा आणि धुरांनी सजलेल्या बाहेरच्या रात्रीच्या दृश्याकडे नजर टाकत ते म्हणतात, “आता बाहेर पडून आपलं योगदान देण्याची वेळ आली आहे कारण आता हा लढा थेट सुष्ट आणि दुष्टामधला आहे. कुरुक्षेत्राच्या महायुद्धातही हेच तर घडलं होतं.”

PHOTO • Joydip Mitra

कुरुक्षेत्रहून आलेल्या या वयोवृद्ध सेवेकऱ्याचा दिवसातला बराच वेळ आलेल्या कुणासाठीही मेथीचे पराठे तयार करण्यात जातो. सिंघुसीमेवरच्या अनेक लंगरमध्ये रोटी तयार करण्यासाठी स्वयंचलित यंत्रं वापरली जातात (काही तर एका तासात २,००० रोट्या तयार करू शकतात) – ते मात्र स्वतःच एक पराठा बनवणारं यंत्र बनलेत आणि आपली सेवा बजावतायत.

PHOTO • Joydip Mitra

सत्पाल सिंग (उजवीकडे बसलेले, रसात मीठ भुरभुरणारे) आणि त्यांच्या दोस्तांनी लुधियानाहून सिंघुला एका खुल्या ट्रकवर लादून चक्क एक उसाचा भला मोठा चरकच आणलाय. ही यंत्रं एरवी साखर कारखान्यांमध्ये वापरली जातात. इथे आंदोलनाच्या ठिकाणी या चरकातून उसाचा गोड रस येणाऱ्या जाणाऱ्याला दिला जातोय.

PHOTO • Joydip Mitra

ट्रकच्या बाजूने आरसे लटकवलेत, शीख बांधवांना त्यांच्या पगड्या बांधायला आणि इतरांच्या वापरासाठी उपयोगी. या ट्रकमधून दिवसभर टूथब्रश, टूथपेस्ट, साबण आणि सॅनिटायझरसारख्या गरजेच्या वस्तू पुरवल्या जातात.

PHOTO • Joydip Mitra

हरयाणाऱ्या एका गावाने सिंघुला एक सोलर पॅनेल बसवलेला ट्रक पाठवलाय, ज्याच्या ऊर्जेवर ट्रकच्या बाजूने लटकवलेली चार्जिंग पोर्ट चालतायत. या खऱ्याखुऱ्या ‘मोबाइल’ चार्जरवर आंदोलक आपले फोन चार्ज करून घेतायत.

PHOTO • Joydip Mitra

पंजाबच्या मोगा जिल्ह्यातल्या खुक्कराना गावच्या तरुणांनी एका चर्मकारालाच इथे कामावर ठेवलंय आणइ ते आंदोलक शेतकऱ्यांचे जोडे दुरुस्त करायला त्याला मदत करतायत.

PHOTO • Joydip Mitra

खुल्या महामार्गावर मुक्काम करावा लागत असला तरी कपडे धुऊन स्वच्छ व्हावेत यासाठी अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांनी मोफत धुलाई सेवा सुरू केली आहे. या ठिकाणी एका बंद जागेत ६ धुलाई यंत्रं ठेवलेली आहेत. इथे कुणीही येऊन इथल्या कार्यकर्त्यांना आपले कपडे धुऊन देण्याची विनंती करू शकतात.

PHOTO • Joydip Mitra

अमनदीप सिंग निहंग त्याच्या घोड्याला अंघोळ घालतोय, संध्याकाळच्या कीर्तनाची तयारी. प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रमांसोबतच सिंघु सीमेवर असलेला निहंगांचा हा गट आल्यागेल्याला त्यांच्या लंगरमधून खाणं देतोय.

PHOTO • Joydip Mitra

जालंधरहून आलेल्या बलजिंदर कौर शिक्षिका आहेत. एका मंडपामध्ये अनेक गाद्या, रजया आणि उशा आहेत. आंदोलक किंवा त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या कुणालाही जर एक-दोन दिवस सिंघू सीमेवर मुक्काम करायचा असेल तर त्यांची सोय इथे करण्यात येते. इथलं काम बलजिंदर पाहतात.

PHOTO • Joydip Mitra

फ्रेंडस ऑफ भगत सिंग सोसायटीचे सदस्य आंदोलकांसाठी तयार केलेलं वार्तापत्र, ट्रॉली टाइम्सचं वाटप करतायत. ते एक मोफत वाचनालयही चालवतात आणि पोस्टर प्रदर्शन भरवतात. रोज संध्याकाळी ते एक चर्चासत्र देखील आयोजित करतात.

PHOTO • Joydip Mitra

पंजाबच्या एका सामाजिक संस्थेने सिंघुमधल्या एका पेट्रोल पंपाच्या आवारात गिर्यारोहणासाठी वापरण्यात येणारे १०० तंबू ठोकलेत ज्यात आंदोलक थंडीच्या कडाक्यापासून सुरक्षित मुक्काम करू शकतात. त्यांनी या जागेला ‘टेंट सिटी’ असं नाव दिलंय.

PHOTO • Joydip Mitra

चंदिगडच्या डॉ . सुरिंदर कुमार यांच्यासाठी सिंघु सीमेवर इतर डॉक्टरांसोबत वैद्यकीय शिबिर चालवणं हीच सेवा आहे . आंदोलन स्थळी सुरू असलेल्या अनेक दवाखान्यांपैकी हा एक .

PHOTO • Joydip Mitra

सरदार गुरमीत सिंग हकीम असून ते स्वप्रशिक्षित हाडवैद्य आहेत आणि शिरा आणि नसा ओढून ठीक करतात. तेदेखील सिंघुच्या सीमेवर आहेत. ट्रॉलीत कोंबून खूप सारं अंतर प्रवास केल्याने अंग आंबून गेलेल्या आंदोलकांना आणि आंदोलनाच्या इथे मुक्कामी असणाऱ्यांना ते मालिश करून देतात.

PHOTO • Joydip Mitra

सिंघुमधला ‘पगडी लंगर’, पगडी वापरणाऱ्यांना इथे पगड्या बांधून मिळतात. आणि पगडी न बांधणारे देखील इथे येतात आणि आंदोलकांसोबत एकजूट व्यक्त करण्यासाठी इथे येऊन पगडी बांधून घेतायत.

PHOTO • Joydip Mitra

८६ वर्षांचे बाबा गुरुपाल सिंग पतियाळा जवळच्या खानपूर गोंडियामध्ये ग्रंथी आहेत. ते ज्ञानी असून शिखांच्या अस्मितेच्या राजकारणाबद्दलचा इतिहास आम्हाला समजावून सांगतात. ते म्हणतात की आता सगळ्या मर्यादा लांघून हे सर्वांच्याच भल्यासाठीचं देशव्यापी आंदोलन बनलं आहे. ‘आता बाहेर पडून प्रत्येकानेच आपला खारीचा वाटा उचलण्याची वेळ आली आहे, कारण आता हा लढा सुष्ट आणि दुष्टांमधला आहे’.

अनुवादः मेधा काळे

Joydip Mitra

Joydip Mitra is a freelance photographer based in Kolkata, who documents people, fairs and festivals across India. His work has been published in various magazines, including ‘Jetwings’, ‘Outlook Traveller’, and ‘India Today Travel Plus’.

Other stories by Joydip Mitra
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale