व्हिडिओ पहाः लक्ष्मी पारधी आणि माथेरानच्या इतर हमाल बाया त्यांच्या कामाबद्दल सांगतायत

पिली पारधी, पन्नाशीला टेकलीये. कस्तुरबा हॉटेलच्या गेटबाहेर पर्यटक येण्याची वाट बघत थांबलीये. सकाळचे ९ वाजलेत. हॉटेलचा चेक आउट टाइम. तिची सून अरुणादेखील तिथेच आहे. या दोघी जणी आणि पिलीचा मुलगा, इथे हमाली करतात.

जया पेढकरही तेच काम करते. इतर हमाल बायांप्रमाणे तिशीतली जया दिवसातून तीन चार वेळा डोक्यावर १० ते ४० किलोच्या बॅगा घेऊन हॉटेल ते दस्तुरी वाहनतळ अशा फेऱ्या करते. माथेरानच्या मुख्य बाजारातून हे अंतर साडेतीन किलोमीटर आणि डोंगरात दूरवर असलेल्या हॉटेल्सपासून अजूनच जास्त.

या थंड हवेच्या लोकप्रिय ठिकाणी येणारे पर्यटक आपल्याकडचं सामान हॉटेलपर्यंत वाहून नेण्यासाठी जया पेढकर (डावीकडे) आणि पिली पारधी (उजवीकडे) सारख्या हमालांची मदत घेतात.

पन्नाशीला टेकलेली लक्ष्मी पारधी सांगते की दर खेपेचे ती २५०-३०० रुपये कमवते. शनिवारी-रविवारी पर्यटक जास्त संख्येने येतात तेव्हा तिची जास्त कमाई होते. एरवी मात्र ही संख्या कमी असते आणि त्यामुळे त्यांचे दर खेपेचे दरही – एका खेपेला रु. २००.

रायगड जिल्ह्यातल्या या लोकप्रिय पर्यटनस्थळी दस्तुरी वाहनतळापासून पुढे वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळे मग पर्यटक स्वतः त्यांच्याकडचं सामान घेऊन जातात किंवा मग ते पिली किंवा लक्ष्मीसारख्या हमालांची मदत घेतात.

माथेरानपासून सगळ्यात जवळचं रेल्वे स्थानक आहे नेरळ. गाडी रुळावरून घसरण्याच्या दोन घटनांनंतर मे २०१६ पासून इथली छोटी रेल्वे बंद स्थगित करण्यात आली आहे. माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्यामुळे दस्तुरीपाशी मोठा ताफाच सज्ज असतो – घोडे, घोडेवाले, हात रिक्षा आणि डोक्यावर सामान वाहून नेणारे हमाल.

लक्ष्मी पारधी इथनं ४.५ किलोमीटरवर असलेल्या जुम्मापट्टी पाड्यावरून माथेरानला येते

सगळ्या हमालांकडे माथेरान पोलिसांनी दिलेलं ओळखपत्र आहे. प्रत्येक कार्डवर अनुक्रमांक आहे. लक्ष्मीच्या मुलाच्या मते माथेरानमध्ये सुमारे ३०० हमाल आहेत, त्यातल्या १०० बाया आहेत. लक्ष्मीचा ९० क्रमांक आहे. दस्तुरीला माथेरानमध्ये प्रवेश करण्यासाठी पर्यटकांना तिकिट काढावं लागतं, तिथे लक्ष्मी रांगेत थांबते. तिचा नंबर जवळ आला की तिकिटखिडकीवरचा माणूस तिला हाक मारतो. कधी कधी तर आलेले पर्यटकच तिला थेट हाक मारतात.

इथले बहुतेक सगळे हमाल जवळपासच्या गावांमध्ये राहतात. लक्ष्मी इथनं ४.५ किलोमीटरवर असलेल्या जुम्मापट्टी पाड्यावरून माथेरानला येते, पिलीचं गाव इथनं तीन किलोमीटरवर आहे.

जया माथेरानमधल्या एका हॉटेलच्या कर्मचारी निवासात राहते. ती तिच्या नणंदेसोबत तिथे भांडी विसळण्याचं काम करते. दोघी मिळून महिन्याला ४००० रुपये कमवतात. जयाचं कुटुंब कर्जतजवळच्या टेपाची वाडीत राहतं. घरात कमावणारी ती एकटीच आहे. त्यामुळे सकाळचं भांड्यांचं काम झालं की दिवसभरात ती हमाल म्हणून एखाद दुसरी खेप करायचा प्रयत्न करते.

PHOTO • Suman Parbat

हिराबाई आणि माथेरानमधल्या इतर हमाल बाया डोक्यावर १०-४० किलो वजनाचं सामान घेऊन दर दिवशी हॉटेल ते वाहनतळ अशा तीन चार फेऱ्या करतात

Suman Parbat

Suman Parbat is an onshore pipeline engineer from Kolkata, presently based in Mumbai. He has a B-Tech degree in civil engineering from the National Institute of Technology, Durgapur, West Bengal. He is also a freelance photographer.

Other stories by Suman Parbat
Sinchita Maji

Sinchita Maji is a Senior Video Editor at the People’s Archive of Rural India, and a freelance photographer and documentary filmmaker.

Other stories by Sinchita Maji
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale