छाटिना गावाच्या मध्यभागी जाणाऱ्या वाटेवरच्या घराच्या भिंती जशा मातीच्या, तसंच इथलं संगीतही, मातीतलं. पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातल्या या आदिवासी पाड्याच्या वाटा कधी काळी बनाम आणि गबगुबी या अनोख्या, सुरेल वाद्यांच्या सुरावर डोलत असत. ही दोन्ही वाद्यं संथाल आदिवासी वाजवतात.
आता मात्र ती गाणी आणि ते नाद दोन्ही विरत चालले आहेत.
“आम्ही शक्यतो आमच्या परब [जत्रा] मध्ये ही वाद्यं वाजवतो,” ४२ वर्षीय गणेश सोरेन सांगतात. राजनगर तालुक्यातल्या गुलालगाच्ची गावाच्या या पाड्याचे ते रहिवासी आहेत. शेतमजूर असणारे सोरेन बनाम वाजवतात आणि ते वाजवतात ती दोनतारी गबगुबी त्यांनी स्वतः तयार केली आहे. संथाल आणि इतर आदिवासी समूहांसाठी एकतारी बनाम या पुरातन वाद्याचं महत्त्व ऐतिहासिक आणि सांस्कृतिकही आहे.
“आम्ही सिधु-कान्हू उत्सवात बनाम वाजवलाय,” छातिनामध्ये शेतमजुरी करणारे ४६ वर्षीय होपोन सोरेन सांगतात. हा उत्सव सिधु मुर्मू आणि कान्हू मुर्मू या दोन संथाल नेत्यांच्या स्मृतीत भरवला जातो. त्या दोघांनी १८५५ साली इंग्रजांविरोधात मोठं हूल (बंड) उभारलं होतं. इंग्रजांनी त्यांना पकडणाऱ्याला १०,००० रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं – त्या काळी ही रक्कम खूपच मोठी होती – यातच त्यांचं आव्हान किती कडवं होतं ते समजून येतं. या उठावात रक्ताचे पाट वाहिले, धनुष्य-बाणधारी ६०,००० संथालांपैकी किमान १५,००० जण इंग्रजांच्या बंदुकींनी टिपले. या दोघांच्या स्मरणात भरवल्या जाणाऱ्या या उत्सवात बनाम त्यांची आठवण जागती ठेवतो.
“आमच्या लहानपणी बनाम वाजवणारे एकदम विख्यात कलाकार होते, आम्ही त्यांचं वादन रेडिओवर ऐकायचो,” होपोन सोरेन सांगतात. “आम्ही त्यांना बघून, त्यांनी वाजवलेली गाणी आणि धून ऐकून वाद्यं बनवायला आणि वाजवायला शिकलो.”
गणेश सोरेन यांच्या गबगुबीचे स्वर देखील इतिहासात उमटले आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी निर्माण केलेल्या वाद्याचे स्वर म्हणजे संथालांच्या जल-जंगल-जमिनीसाठी सुरू असलेल्या संघर्षांचे प्रतीक आहे, जो आजही सुरूच आहे. गणेश आणि होपोन दोघंही गावातल्या महाजनाच्या (जमीनदार सावकार) शेतात मजुरी करतात. इथला रोजंदारीचा अधिकृत दर २४० रुपये रोज असला तरी तो फक्त कागदावर. गेले कित्येक महिने त्यांना फक्त १००-२०० रुपये रोज मिळतोय. क्वचित कधी त्यांना गवंडी काम मिळालं तर त्यांना दिवसाला २६० रुपयांपर्यंत रोज मिळू शकतो. पश्चिम बंगालमध्ये मनरेगाचा मजुरीचा दर २४० रुपये प्रति दिन आहे, प्रत्यक्षात मात्र त्यांना १८०-२०२ रुपये मिळतात. आणि वर्षभरात जास्तीत जास्त २५ दिवस अशी मजुरी मिळते असा त्यांचा अनुभव आहे.


डावीकडेः होपोन त्यांची आई मैनो सोरेन यांच्या शेजारी बसले आहेत. त्यांच्या हातात त्यांचं नाजूक लाकडी बनाम आहे. उजवीकडेः होपोन यांचे थोरले भाऊ मुसुरी सोरेन यांनी बनवलेलं बनाम
या भागातले स्थानिक लोक सांगतात की इथे (मनरेगा सोडून) मजुरीचा दर जास्त होता, पण गेल्या काही वर्षांत तो कमी झालाय. २०११ च्या सुमारास किंवा त्यानंतर काही काळाने तो २४० रुपये इतका ठरवण्यात आला. तसाही खालावत जाणारा मजुरीचा दर, त्यात महामारी आणि टाळेबंदीचा घाला बसला. पण, पाऊस चांगला झाला आणि सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्यामुळे परत एकदा दिवसाला २४० रुपये रोज मिळू शकतो – अर्थात आठवड्यातले काही दिवस तरी.
प्रत्येक बनाम आणि गबगुबी नव्याने बनवली जाते, आणि त्यामध्ये त्या कलावंताचं स्वतःचं वेगळेपण, कल्पकता दिसून येते. त्यामुळे ही वाद्यं बनवणाऱ्या आणि ती वाजवणाऱ्या कलावंताच्या स्वभावाप्रमाणे त्यांचं रुप आणि रचना बदलत जाते. होपोन यांनी घडवलेलं बनाम लाकडातून कोरून तयार केलेलं आहे. त्यासाठी बासली (आरीसारखं गोल पातं असणारी कुऱ्हाड) आणि रुका (छिन्नी) अशी अवजारं वापरली आहेत.
गणेश सोरेन यांनी बनवलेली बनाम मात्र अतरंगी आहे, त्यात नारळाच्या करवंट्या, प्राण्याचं कातडं अशा वेगवेगळ्या वस्तूंचा वापर केलाय – त्यात छत्रीची काडी देखील सापडते.
कोलकात्याच्या रबीन्द्र भारती विद्यापीठातील आदिवासी संगीतशास्त्रज्ञ डॉ. निबेदिता लाहिरी म्हणतात, “बनाम हे एकतारी वाद्य आहे, जे व्हायोलिनच्या कुळात मोडू शकतं. ते एक बो वापरून वाजवलं जाणारं तंतुवाद्य आहे. ते थेट बोटांनी तारा छेडून वाजवता येत नाही. ते छारचा [बो] वापर करूनच वाजवलं जाऊ शकतं. त्यासाठी तारा किंवा काही प्राण्यांच्या केसाचा वापर केला जातो. तुम्हाला बंगालमध्ये अनेक प्रकारचे बनाम पहायला मिळतील – फान्तोर बनाम, बेले बनाम आणि इतरही अनेक – त्यांचे निर्माते त्यांच्या त्यांच्या अनोख्या शैलीत ही वाद्यं तयार करतात.”

वर डावीकडेः गणेश सोरेन आणि त्यांचं अतरंगी फानतोर बनाम. वर उजवीकडे, खाली डावीकडेः गणेश यांची खासियत असलेली गबगुबी, त्यातला मुख्य भाग त्यांच्या मुलाच्या ढोलाचा आहे आणि सोबत पॉण्ड्सची डबी. खाली उजवीकडेः प्राण्याच्या कातड्यांनी झाकलेल्या नारळाच्या करवंट्या, छत्रीच्या हाताला खिळे आणि स्क्रू बसवून बनाम तयार झालंय
गणेश सोरेन यांची गबगुबी बंगाली लोकसंगीतातल्या प्रसिद्ध खोमोकचा पूर्वीचा अवतार आणि त्याचं आदिवासी रुप म्हणायला पाहिजे. त्यांनी त्यामध्ये ढोल आणि गंमतीचा भाग म्हणजे त्यांच्या मुलाच्या खेळण्यांचा वापर केलाय. त्याची धून ऐकली की त्यांना त्यांच्या मुलाचं निरागस, आनंदी असं खुदूखुदू हसणं आठवतं आणि त्याचा ठेका जंगलाची आठवण करून देतो. “मी गेली १५ वर्षं ही दोन्ही वाद्यं वाजवतोय, का तर माझं मन ताजंतवानं रहावं म्हणून,” ते म्हणतात. “एक काळ तर असा होता जेव्हा मी दिवसभराच्या पिळवटून टाकणाऱ्या कामानंतर पूर्ण संध्याकाळ ही वाद्यं वाजवायचो आणि ते संगीत ऐकायला लोक गोळा व्हायचे. पण आज काल त्यांच्याकडे किती तरी दुसऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे या म्हाताऱ्याचं गाणं ऐकायला कुणी येत नाही.”
त्यांच्या गावातले बरेच लोक गवंडीकाम करतात. किंवा काही जण वेगवेगळ्या शहरात रोजंदारीवर कामं करतात. आणि अजूनही त्यातले काही जण त्यांच्यासोबत बनाम घेऊन जातात. पण या वाद्याची संगीताची परंपरा मात्र आता कुणालाच शिकून घ्यावीशी वाटत नाही असं गणेश आणि होपोन सांगतात. “आता हा अनोखा नाद निर्माण करण्याचं ज्ञान आणि कला माहित असणारे आमच्या गावात आणि आमच्या समुदायात मोजकेच लोक आहेत,” होपोन म्हणतात.
“आता आमच्या गावातल्या शाळेत जाऊन आम्ही शिकवू पण तिथे थोड्या तरी मुलांना यात रस वाटला पाहिजे ना,” गणेश म्हणतात. पण आताच्या मुलांना मोबाइलवर एका क्लिकमध्ये गाणी उपलब्ध आहेत. त्यांना बनाममध्ये का रस वाटेल?
गणेश किंवा होपोन, दोघांकडेही मोबाइल फोन नाही, ना तो घेण्याची त्यांची ऐपत आहे.
या दोघांनाही असं वाटतं की त्यांच्या लाडक्या बनामला अशी अवकळा आलीये त्याचा संबंध त्यांच्या स्वतःच्या आर्थिक परिस्थितीशी देखील आहे. कमी मजुरीत जादा तास काम करणारे ते गरीब शेतमजूर आहेत. “मी बनाम वाजवत बसलो तर माझं अख्खं कुटुंब कित्येक दिवस उपाशी राहील,” गणेश म्हणतात.
“नुसत्या नादावर आमची भूक थोडी भागणारे,” इति होपोन.
अनुवादः मेधा काळे