चारुबाला कालिंदींच्या हातातला रंगीत गमजा एखाद्या वीजप्रमाणे लककन् चमकून जातो. झुमुर गीतावरती लाल आणि निळ्या रंगाचा घागरा थिरकतो. या खेळातले साथीदार एका वाद्यांवर एक ठेका धरतात.

खेळ पहायला ८०-९० लोक – आबालवृद्ध, स्त्रिया, पुरुष – जमलेत. पश्चिम बंगालच्या अर्शा तालुक्यातल्या सेनाबाना गावी हा खेळ सुरू आहे. वयाची पासष्टी गाठली असली तर चारुबाला झोकात नाचतायत.

असं म्हणतात की ‘झुमुर’ हा शब्द नर्तकींच्या पायातल्या पैंजणांच्या आवाजावरून आलाय. नाचाचा हा प्रकार पश्चिम बंगालच्या नैऋत्येकडच्या भागात आणि शेजारच्या झारखंडमध्ये लोकप्रिय आहे (आसाममध्ये याचाच वेगळा प्रकार सादर केला जातो). पारंपरिक झुमुर गीतं लिहिणारे बहुतेक सगळे कवी दलित जातींमधले होते आणि त्यांची काही पदं सामाजिक मुद्द्यांबद्दल, दुष्काळ, पूर, राजकारण आणि इतर समस्यांबद्दल असतात. राधा आणि कृष्णामधलं प्रेम हा तर झुमुर गीतांमधला नेहमीचा विषय असतो.

चारुबालाचं स्वतःचं आयुष्यही या सगळ्या गोष्टींना स्पर्शून जातं. त्या पूर्वी पुरुलिया जिल्ह्याच्या पुरुलिया २ तालुक्याच्या बेल्मा गावी रहायच्या. त्या १६-१७ वर्षांच्या असताना त्यांचे वडील मोहन कालिंदी यांनी त्यांचं लग्न जवळच्याच डुमडुमी गावातल्या शंकर कालिंदींशी लावून दिलं. चारुबालांचं कुटुंब कालिंदी समुदायात येतं ज्यांची नोंद काही राज्यांमध्ये अनुसूचित जातींमध्ये केली गेली आहे.

शंकर विशीत होते आणि ते मिळेल ती कष्टाची कामं करायचे. मात्र त्यांचा स्वभाव हिंसक निघाला. त्यांची मारहाण इतकी प्रचंड वाढली की चारुबाला त्यांना सोडून आपल्या वडलांकडे परत आल्या. मात्र मोहन यांनी गरिबीमुळे त्यांना पोसणं शक्य नाही हे कारण देत त्यांना घरी घ्यायला नकार दिला. चारुबाला बेघर झाल्या, काही काळ अगदी रस्त्यावरही राहिल्या.

A Man helping dancer getting ready before her performance
PHOTO • Abhijit Chakraborty

एका खेळाआधी श्रावण चारुबालांना तयार व्हायला मदत करतायत

अशातच त्यांची गाठ श्रावण कालिंदींशी पडली (दोघांपैकी कुणालाच वर्ष स्मरत नाही). झुमुर कलावंत असलेल्या श्रावण यांनी त्यांना सहारा दिला. त्यांनी चारुबाला यांना नचनी व्हायचं प्रशिक्षण दिलं, त्यासाठी शेजारच्याच गावी राहणाऱ्या बिमला सरदार यांची मदत घेतली. कालांतराने आता ७५ वर्षांचे असणारे श्रावण चारुबालांचे ‘रसिक’ बनले म्हणजेच त्यांचे व्यवस्थापक, एजंट आणि त्यांच्या खेळांचे समन्वयक. ते बाउल, भादु, छाउ, करम कीर्तन, तुसु, कीर्तन असे कार्यक्रम सादर करणाऱ्या इतर गटांसोबतही काम करतात. ते अधून मधून शेतमजुरीही करतात.

एक रसिक म्हणजे काव्याचा आणि संगीताचा आस्वाद घेणारा व्यक्ती मानला जातो. बहुतेक वेळा नचनी आणि रसिक यांच्यामध्ये शरीरसंबंधही असतात. आणि ज्यात अनेकदा स्त्रीचं शोषणही होतं. इतर रसिकांप्रमाणे श्रावण यांचंही लग्न झालंय आणि त्यांचं मोठं कुटुंब आहे ज्यात त्यांच्या पत्नी सरला, मुली, सुना आणि नातवंडांचा समावेश आहे. चारुबाला आणि त्यांची एक मुलगी आहे, २४ वर्षांची कमला. तिचं लग्न झालंय आणि ती उत्तर प्रदेशात राहते.

एवढं मोठं कुटुंब पोसायचं असल्यामुळे चारुबालांनी या वयातही खेळ सादर करणं थांबवलेलं नाही. असं असूनही श्रावण यांच्या पत्नी सरला यांच्या लेखी त्यांना आजही मान नाही, त्यांनी आजही त्यांना स्वीकारलेलं नाही.

राज्य शासनाने आयोजित केलेल्या खेळाचे चारुबाला यांना रु. १,००० मिळतात. एक खेळ साधारण एक ते दीड तास चालतो. महिन्याला चारुबाला एक किंवा दोन खेळच सादर करू शकतात. त्यांना राज्याच्या सांस्कृतिक खात्याकडून लोक कलावंतांना मिळणारं महिना एक हजार रुपये मानधनही मिळतं.

झुमुरचा हंगाम असतो ऑक्टोबर ते मे. अनेक मंडळं आणि पूजा समित्यांकडून खाजगी खेळ ठेवले जातात. हे खेळ अगदी रात्रभर चालू शकतात ज्यात नचनीला किमान पाच तास नाचगाणं करावं लागतं. एका खेळासाठी पाच ते सात जणांच्या गटाला मिळून रु. ६,००० ते रु. ८,००० दिले जातात जे ते एकमेकांत वाटून घेतात. साथ देणारे कलाकार ढोल, मादोल (ढोलकी), ढामसा (नगाऱ्यासारखं वाद्य), खुळखुळा आणि सनई ही वाद्यं वाजवतात.

चारुबालांनी हे काम आपलं नशीब म्हणून स्वीकारलं आहे. “अजून काय करणार? आता भगवंतानंच माझ्या कपाळावर मी नचनी होणार असं लिहिलं असेल तर त्याच्यापुढे कुणाचं चालतं का? आणि हे काम सोडलं तर मी खाऊ काय?” त्यांच्या चेहऱ्यावर सखेद हास्य उमटतं.

A man helping performer to get ready for the performer
PHOTO • Abhijit Chakraborty

श्रावण, वय ७५ चारुबालाचे व्यवस्थापक, एजंट आणि त्यांच्या खेळांचे समनव्यक आहेत. ते एक रसिक आहेत आणि काव्य आणि संगीताचे चाहते मानले जातात. एक नचनी आणि रसिक यांच्यामध्ये बहुतेक वेळा शरीरसंबंध असतात.

Photo one - Charubala’s rasik Shravan Kalindi at their home.
Photo two - Shravan helps Charubala dress for her performance
photo three - Charubala chatting with dholak player 
photo four - A performer getting ready
PHOTO • Abhijit Chakraborty

वरच्या ओळीतः श्रावण कालिंदी आणि चारुबाला खेळ सुरू करण्याच्या तयारीत. खाली डावीकडेः चारुबाला त्यांच्या गटातले ढोलकपटू आणि शेजारी राहणारे साठीचे चेपू कालिंदी आणि त्यांची पत्नी पद्मा यांच्याशी सेनाबानाच्या घरी गप्पा मारतायत. झुमुरचा हंगाम नसतो तेव्हा चेपू शेतमजुरी आणि बांधकामावर काम करतात. खाली उजवीकडेः चेपू पुरुलिया गावात खेळ सुरू होण्याआधी आपला पोषाख परिधान करतायत. त्यांच्या ऐपतीप्रमाणे सजून तयार होतात. गावातल्या इतर गटांसाठीही ते साथ करतात.

A boy applies makeup to his face
PHOTO • Abhijit Chakraborty
A boy plays with the dholak drum
PHOTO • Abhijit Chakraborty

डावीकडेः चारुबालांचा १२ वर्षांचा नातू, माहेश्वर कालिंदी देखील मजा करत खेळासाठी तयार होतोय. झुमुरमध्ये मुलं काम करत नसली तरी. उजवीकडेः झुमुरमध्ये काम करणाऱ्यांच्या घरातली मुलं लहानपणापासूनच गाणं मात्र शिकतात. गटातल्या शांतीराम यांचा मुलगा मंगल खादू कालिंदींच्या घरी ढोलक वाजवतोय. खादू चारुबालाच्या गटात आहे आणि त्यांच्या शेजारी राहतो.

Charubala walks to the open space
PHOTO • Abhijit Chakraborty

सगळे तयार, आता खेळ सुरू करायची वेळ झालीः चारुबाला सेनबाना गावात खेळाच्या जागेच्या निघाल्या आहेत. या जागेला बैशाल, नचनीशाल किंवा आखाडा म्हणतात

A performer taking his entry into the performance arena
PHOTO • Abhijit Chakraborty

आणि आता आखाड्यात खेळासाठी श्रावण कालिंदी यांनी पण प्रवेश घेतला आहे

Charubala performing in the public
PHOTO • Abhijit Chakraborty

चारुबाला खेळ सुरू करण्याआधी परंपरेप्रमाणे देवांना आणि गुरुंना वंदन करतात. त्यांच्यासोबत आहेत (डावीकडून उजवीकडे) भजन कालिंदी, खादू कालिंदी (फक्त हात दिसतोय) आणि चरण महातो. भजन आणि चरण नेहमी गटाबरोबर नसतात. ते अधून मधून येतात.

Chepu and Amrito plying drums together
PHOTO • Abhijit Chakraborty

पुरुलियातले गावकरी चारुबाला कालिंदींचा नाच पाहतायत, चेपू कालिंदी ढोलक आणि अमृतो महातो धमशा वाजवतायत

Chepu and Amrito playing drum together
PHOTO • Abhijit Chakraborty

चेपू आणि अमृतो खेळात रंगून गेलेत. झुमुरच्या हंगामात प्रत्येक कलाकाराला खेळामागे रु. ३०० ते ४०० मिळतात तर चारुबाला आणि श्रावण एक ते दीड हजार कमाई करतात

An artist is playing drum
PHOTO • Abhijit Chakraborty

एकदम जोशात असलेले साठीच्या आसपास असणारे चेपू कालिंदी खेळात एकदमच बेभान झालेत

Charubala performing in public
PHOTO • Abhijit Chakraborty
A women in blue saree is performing
PHOTO • Abhijit Chakraborty

डावीकडेः चारुबाला कालिंदी नाचतायत, आजूबाजूच्या प्रेक्षकांनी त्यांच्या साडीला १० रुपयांच्या, कधी कधी १०० रुपयांच्या नोटा अडकवल्या आहेत. नचनीचा खेळ काही विशिष्ट विषयांवर असतो, प्रेम, भक्ती, विरह आणि वासना. नमनाने सुरुवात होऊन नंतर खेळात भक्तीरचना सादर होतात. हळू हळू जसा खेळ पुढे सरकतो तसं तालाचा वेग वाढतो आणि नाचही जास्त शृंगारिक व्हायला लागतो. उजवीकडेः अनेक झुमुर राधा आणि कृष्णाच्या प्रेमाभोवती गुंफलेले असतात. बहुतेक वेळा रसिक कृष्णाची भूमिका वठवतो तर नचनी राधा होते. इथे चेपू कृष्णाच्या भूमिकेत दिसतायत

A group of women are smiling
PHOTO • Abhijit Chakraborty

एका सामुदायिक बैठकीत नचनी आणि सोबत रसिक व इतर साथीदार त्यांच्या वेगवेगळ्या समस्या मांडण्यासाठी जमलेत. मनभूम लोक संस्कृती ओ नचनी उन्नयन समितीच्या मार्फत ते एकत्र आलेत. स्त्री व पुरुष ट्रान्सजेंडर व्यक्तींची संघटना असणाऱ्या कोलकात्याच्या दरबार महिला समन्वय कमिटीची एक शाखा म्हणून ही संघटना काम करते. समितीचे सचिव सांगतात की एकूण ५५ नचनी आणि रसिक आणि सुमारे ४,५०० साथीदार कलावंत त्यांचे सदस्य आहेत. संस्थेतर्फे सेनाबानामध्ये झुमर कलावंतांच्या मुलांसाठी शाळा चालवली जाते. चारुबाला या शाळेमध्ये सेवाभावी काम करतात, निधी गोळा करणं आणि मुलांसाठी मध्यान्ह भोजन बनवणं ही त्यांची कामं असतात

A women is dancing
PHOTO • Abhijit Chakraborty

चारुबाला कालिंदी नाचतायत, जवळच्याच गावात राहणाऱ्या आरती महातो आणि मोंजुरा हाजरा बघतायत. निखळ मैत्रीचे हे काही क्षण, प्रेक्षक आणि टाळ्या-शिट्ट्यांच्या पल्याड

या चित्रकथेची अन्य आवृत्ती २५ ऑक्टोबर २०१८ रोजी Sahapedia वर प्रसिद्ध झाली आहे.

अनुवादः मेधा काळे

Abhijit Chakraborty

Abhijit Chakraborty is a photojournalist based in Kolkata. He is associated with 'Sudhu Sundarban Charcha', a quarterly magazine in Bengali focused on the Sundarbans.

Other stories by Abhijit Chakraborty
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale