प्रह्लाद ढोके आपल्या गाई वाचवू पाहताहेत पण त्यासाठी त्यांना आपली तीन एकरांवरची पेरूची बाग मरू देणं भाग आहे.

“ही एक तडजोड आहे,” ७-८ फूट उंच वाढलेल्या पेरूच्या झाडांच्या रांगांसमोर उभे ४४ वर्षांचे ढोके अश्रुभरल्या डोळ्यांनी म्हणतात, “माझ्याजवळ होतं-नव्हतं ते सारं – बचत, सोनं - सगळं मी खर्चलं...पण आता झाडं वाचवण्यासाठी पाणी विकत घेणं मला शक्य नाही. त्याऐवजी मी गाई वाचवायचं ठरवलं. निर्णय कठीण असला तरी.”

एकदा विकल्या की पुन्हा गाई विकत घेणं सोपं नसतं आणि प्रत्येक एप्रिलमध्ये, बीड जिल्ह्यातील त्यांच्या वडगाव-ढोक गावाच्या बाहेरच गुरांची छावणी असते. महाराष्ट्र सरकारच्या दुष्काळी कामाचा हा भाग आहे. प्रह्लादच्या १२ गाई (त्यात स्थानिक बाजारात प्रत्येकी एक लाखाला घेतलेल्या दोन गीर गाईही आहेत) छावणीत ठेवल्यात. पण झाडं सोडून देणं म्हणजे देखील भरून न येणारं नुकसानच आहे.

“माझा सगळ्यात मोठा भाऊ चार वर्षांपूर्वी लखनौला गेला होता; तिथून त्याने पेरूची रोपं आणली होती,” त्यांनी सांगितलं. ही बाग उभी करायला प्रह्लाद आणि त्याच्या कुटुंबियांना चार वर्षे लागली. पण लागोपाठचे दुष्काळ, २०१८ सालचा कोरडा पावसाळा यांमुळे शुष्क पडलेल्या मराठवाड्यातल्या वाढत्या पाणीटंचाईला तोंड देणं काही त्यांना जमलं नाही.

दर वर्षीच राज्यातील काही तालुक्यांत पाणी टंचाई आणि दुष्काळ असतो. पण २०१२-१३च्या शेती हंगामात (२०१२ पावसाळा कोरडा गेल्यामुळे २०१३ च्या उन्हाळ्यात पाण्याची प्रचंड टंचाई उद्भवली होती.) तीच परिस्थिती होती २०१४-१५ मध्ये आणि आता २०१८-१९ मध्येही. दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याची चणचण भासतेच पण २०१२ पासून मराठवाड्यात अवर्षणजन्य दुष्काळ (पावसाने दगा देणे), नापिकी (खरीप आणि रब्बी पिकं वाया) आणि पाण्याचं दुर्भिक्ष्य (भूजलातली घट) असे सर्व प्रकारचे दुष्काळच दुष्काळ सुरू आहेत!

वडगाव ढोक गेवराई तालुक्यात येतं. राज्य सरकारने ऑक्टोबर २०१८ मध्ये  दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या १५१ गावातील ते एक. जून ते सप्टेंबर २०१८ मध्ये तिथे ५०% हूनही कमी पावसाची नोंद झाली. अनेक वर्षांच्या सरासरी ६२८ मिमी पावसाऐवजी फक्त २८८ मिमी पाऊस झाला. पिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या सप्टेंबर महिन्यात सरासरी १७० मिमी ऐवजी फक्त १४.२ मिमी पाऊस झाला.

Prahlad Dhoke at his ten-acre farm; in one corner he has a cattle shed and a water tank for the cattle
PHOTO • Jaideep Hardikar
Prahlad with his ailing Gir cow at his cattle-shed in the cattle camp.
PHOTO • Jaideep Hardikar

प्रह्लाद ढोके यांच्या शेतावरील गुरांसाठीची पाण्याची टाकी कोरडी पडली आहे . त्यांनी आपली १२ गुरं गेवराई तालुक्यातील गुरांच्या छावणीत नेली आहेत

मराठवाड्याचे ८ जिल्हे धरून औरंगाबाद विभागात जून ते सप्टेंबर २०१८ मध्ये सरासरी ७२१ मिमी ऐवजी फक्त ४२८ मिमी पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात सरासरी १७७ मिमी ऐवजी जेमतेम २४ मिमी. (१४ %) पाऊस झाला.

२०१८ मधला अपुरा पाउस म्हणजे ऑक्टोबर-डिसेंबर मध्ये काढणीला येणाऱ्या खरिपाच्या पिकांचं नुकसान आणि या वर्षीच्या फेब्रुवारी-मार्च मध्ये येणारी रब्बीची पिकं नाहीतच. ढोके यांनी ठिबक सिंचन आणि आपल्या चार विहिरी खोल करण्यासाठी सुमारे ५ लाख रुपये खर्च केला (आपली बचत आणि जवळच्या शेतकी सहकारी सोसायटीचे आणि खाजगी बँकेचे अशी कर्जे घेऊन) पण काही उपयोग झाला नाही.

प्रह्लाद, त्यांचे दोन भाऊ आणि वडील यांची मिळून ४४ एकर जमीन आहे; त्यातील १० एकर त्यांच्या नावावर आहे. त्यातील एका एकरावर त्यांनी मोगरा लावला होता. "त्यातून आम्हाला चांगला नफा झाला होता पण तो सगळा पैसा शेतीवर खर्च झाला.” आणि आता हा मोगरा सुद्धा जळाला आहे.

मागच्या १५ वर्षात, या भागातली पाणी टंचाई जशी भीषण होत चालली आहे तसेच ढोके यांचे तिला तोंड देण्याचे प्रयत्नही. त्यांनी निरनिराळी पिकं घेऊन पाहिली, वेगळी तंत्रं वापरली, ऊस घेणं बंद केलं, सिंचन व्यवस्थेवर पैसा खर्च केला. पण भीषण होणारा पाणी प्रश्न परीक्षा बघत असल्याचं ते म्हणतात.

Dried up mogra plants on an acre of his farm
PHOTO • Jaideep Hardikar
The guava plants that have burnt in the absence of water on Prahlad’s three acre orchard that he raised four years ago
PHOTO • Jaideep Hardikar

ढोके यांची एका एकरावरील मोगऱ्याची शेती वाळून गेली आहे. तशीच चार वर्षांपूर्वी लावलेली पेरूची बागही

प्रह्लाद यांच्या चार विहिरी २०१८ च्या नोव्हेंबरमध्ये कोरड्या पडल्या. या वर्षी जानेवारी ते एप्रिल पर्यंत त्यांनी आठवड्यातून दोन वेळा पाणी विकत घेतलं. ५,००० ली.चा टँकर जो आधी ५०० रुपयांना मिळत असे त्याची किंमत ८०० इतकी वाढली. (आणि मेच्या शेवटपर्यंत ती १,००० रुपयांवर जायची शक्यता आहे).

या भागात, तुम्हाला वर्षभर पाण्याचे टँकर दिसतील. उन्हाळ्यात तर सर्रास. मराठवाडा दक्खनच्या कठीण काळ्या पाषाणावर आहे. अर्थात पावसाचे पाणी इथे फारसे झिरपत नाही त्यामुळे पाण्याचे साठे भरले जात नाहीत. शिवाय हा भाग ‘पर्जन्यछाये’च्या प्रदेशात येतो त्यामुळे पाऊस सरासरी ६०० मिमीहून अधिक पडत नाही.

गेवराई तालुक्यात मोठमोठ्या वैराण माळांवर अधून मधून उसाची शेतं दिसतात. (काही जणांच्या जिवंत विहिरींना अजूनही पाणी आहे, इतर जण मात्र पाणी विकत घेतात) गोदावरीच्या काठावरील शेतांत देखील द्राक्षे आणि इतर फळबागा दिसतात. पण नदीपासून दूर, दक्खनच्या पठारावर दूर दूर पर्यंत कुठे जिवंत हिरवाईचा नजरेस पडत नाही.

“साधारण ३ महिने मी पाणी विकत घेतलं,” प्रह्लाद सांगतात, “पण मग माझ्यापासचे पैसे संपले.” पेरूची झाडं वाचवण्यासाठी खाजगी सावकारांकडून चढ्या व्याजाने कर्ज घेणं त्यांनी टाळलं. ( पाणी विकत घेण्यासाठी बँकेचं कर्ज त्यांना मिळालं नसतं) “५,००० लि. पाण्याला ८०० रुपये! शक्य नाही हो. गावातल्या कुणाकडे तर इतकाला पैसा राहतो का,” ते म्हणतात. “शेवटी काय, आम्ही कर्जात बुडणार. माझ्या झाडांसारखं मीदेखील वाचत नाही.”

Prahlad Dhoke (right) and Walmik Bargaje (left) of the Vadgaon Dhok village in Georai tehsil of Beed district, at a cattle camp at their village
PHOTO • Jaideep Hardikar
A view of the cattle camp in Vadgaon Dhok village, one of the 925 such camps that have been opened up in Beed as a drought relief initiative funded by the Maharashtra government.
PHOTO • Jaideep Hardikar

समदु : खीः वाल्मिक बारगजे आणि प्रह्लाद ढोके गावाजवळच्या गुरांच्या छावणीत (उजवीकडे)

आपली पेरूची बाग वाचवण्याचे सारे प्रयत्न करून शेवटी एप्रिलमध्ये, ढोकेंनी हात टेकले. आता त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. पण जूनमध्ये पाउस येईपर्यंत उन्हाळ्याच्या झळा सहन न होऊन सगळी बाग जळून गेली असेल.

पूर्ण वाढ झालेल्या पेरूच्या १,१०० झाडांनी प्रह्लाद यांना येत्या हिवाळ्यात १० ते २० लाखांचं उत्पन्न मिळवून दिलं असतं – पेरूच्या झाडांना चौथ्या-पाचव्या वर्षी फळ धरतं. सगळा खर्च वजा जाता त्यांना भरपूर नफा झाला असता. काही झाडांवर छोटी फळं धरली होती पण गर्मीने ती कोळशासारखी काळीठिक्कर पडली. “पहा ही,” वाळलेल्या पानांतून चालताना एका फांदिवरची वाळलेली फळे दाखवत ते म्हणतात, “टिकावच धरू शकली नाहीत ती.”

ढोके यांच्या प्रमाणेच मराठवाड्यातील अनेकजण गंभीर होत चाललेल्या पाणीटंचाईला तोंड देत आहेत. “अख्ख्या बीडमध्ये, निदान आमच्या तालुक्यात तरी ना खरीप हाती आला ना रब्बी,” ५५ वर्षांचे वाल्मिक बारगजे सांगतात. ढोके त्यांना ‘समदु:खी’ म्हणतात. बरगज्यांची ५ एकर जमीन आहे आणि त्यांनी अर्ध्या एकरावर नारळाची झाडं लावली होती. सगळी झाडं वळून गेली. पाण्याच्या टंचाईमुळे त्यांनी ऊस घेणं आधीच बंद केलंय. २०१८ च्या जून-जुलै मध्ये त्यांनी सोयाबीन पेरला पण काहीच हाती लागलं नाही. आणि गुरांना कडबा व्हावा म्हणून रब्बीला घेतात ज्वारी-बाजरीचा पेराही झाला नाही.

औरंगाबाद विभागीय प्रशासनातर्फे, या वर्षी ३ जूनपर्यंत, बीड जिल्ह्यात ९३३ चारा छावण्यांना मान्यता मिळाली आहे. त्यातील ६०३ च चालू आहेत, त्यांत ४,०४,१९७ गुरे आहेत. औरंगाबाद विभागातील ८ जिल्ह्यांतील मान्यता असलेल्या १,१४० छावण्यांपैकी ७५० च चालू आहेत. परभणी, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांत एकही छावणी नाही, मान्यताही नाही आणि चालूही नाही.

महसूल खात्याच्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या गंभीर दुष्काळ असणाऱ्या दहा जिल्ह्यांतील १,५४० छावण्यांतून मिळून दहा लाखांहून अधिक गुरांना पाणी व चारा पुरवला जात आहे.

Prahlad with his youngest son Vijay, a seventh grader, at the cattle camp
PHOTO • Jaideep Hardikar

आपला लेक विजय सो बत प्रह्लाद . त्याची शाळेची फी थकल्याने शाळेने परीक्षेचा निकाल दिलेला नाही .

अनेक गोष्टींसाठी ढोके महाराष्ट्रातील भाजपा सरकारला दोष देतात. सगळ्यात अधिक यासाठी की, त्यांच्या मते, राज्य सरकार त्यांचे पाठीराखे आणि विरोधक यांच्यात भेदभाव करतंय. “भाजपच्या जवळच्या लोकांची कर्जं माफ झाली आणि नवीन कर्जंही मिळाली,” ते आरोप करतात, “मला मिळाली नाही कारण मी विरुद्ध पक्षाच्या बाजूचा आहे. दुष्काळासाठीच्या मदतीतही हीच वागणूक मिळतीये.”

प्रह्लाद यांची पत्नी पत्नी दीपिका रानात काम करते आणि गृहिणी आहे. त्यांना तीन मुलं आहेत – ज्ञानेश्वरीने १२ वी पूर्ण केली आहे, नारायण दहावीत आहे आणि धाकटा विजय सातवीत गेला आहे. “त्यांना शिकविणार बघा मी,” प्रह्लाद म्हणतात. पण विजयची फी भरणं (स्थानिक खाजगी शाळेची २०१८-१९ या वर्षाची रु. २०.०००) त्यांना न जमल्याने त्याचा वार्षिक निकाल शाळेने राखून ठेवलाय. “गेल्या आठवड्यात माझी एक गाय आजारी पडली आणि तिच्या उपचारावर माझा बराच खर्च झाला,” ते सांगतात.

कुटुंब आणि गुरं, दोहोंच्या खर्चाचा मेळ घालताना त्यांना जी तारेवरची कसरत करावी लागतेय त्यामुळे ढोके घायकुतीला आलेत. “फार कठीण काळ आहे हा,” ते म्हणतात, “ पण मला माहीत आहे हे दिवसही सरतील.”

तिथे अख्ख्या मराठवाड्यात तळी, साठवण तलाव, छोटी-मध्यम धरणं, विहिरी, विंधन विहिरी - सारे स्रोत कोरडे पडतायत. उन्हाचा कार वाढतोय तसं इथल्या हजारो माणसांना दररोज पाण्यासाठी वणवण करावी लागतीये. मराठवाड्यातील अनेक कुटुंबं औरंगाबाद, पुणे किंवा मुंबईला स्थलांतरित झाली किंवा होत आहेत. मच्छिमारांची वाताहत झालीये आणि पशुधन बाळगणाऱ्या पशुपालकांची गत वेगळी नाही.

गेल्या कित्येक दिवसांत मी झोपलेलो नाही असं प्रह्लाद सांगतात. घरापासून जेमतेम एक किलोमीटर अंतरावरच्या बागेतही त्यांनी फेरी मारलेली नाही; फक्त घर आणि हमरस्त्याच्या पलिकडची छावणी  एवढ्याच चकरा ते मारतात. “मी दिवसाचे १६ तास काम करतो,” आपल्या ओसाड रानातून फिरत असताना ते म्हणतात. पण पाणी आणि पैसा, दोन्ही संपल्यावर तुम्ही करणार तरी काय हा त्यांना पडणारा प्रश्न आहे.

अनुवादः छाया देव

Jaideep Hardikar

Jaideep Hardikar is a Nagpur-based journalist and writer, and a PARI core team member.

Other stories by Jaideep Hardikar
Translator : Chhaya Deo

Chhaya Deo is a Nashik based activist of Shixan Bazaarikaran Virodhi Manch, a group working against commercialisation of education and for quality education which is a constitutional right of Indian citizens. she writes and also does translation work.

Other stories by Chhaya Deo