चिकनपाड्यात रात्री १०:३० ला जागरण सुरू झालं. बाकीचा पाडा झोपला असला तरी सानद परिवारात मात्र गाणी आणि मंत्र म्हणणं सुरूच होतं.

प्लास्टिकच्या चवाळीवर काळू जंगली बसले होते. ते शेजारच्या पांगरी पाड्यावरून या कार्यक्रमासाठी आले होते. त्या विटा-मातीच्या घराच्या ओसरीवर पाहुणे म्हणून आलेले बरेच क. ठाकूर आदिवासी जमिनीवर किंवा प्लास्टिकच्या खुर्च्यांवर बसलेले होते. ते वणीदेवीच्या रात्रभर चालणाऱ्या जागरणाला आले होते.

खोलीच्या मध्यभागी, पन्नाशीच्या काळूने मांडलेलं पूजेचं साहित्य होतं; त्यात तांदळावर तांब्याचा  कलश, त्यावर ठेवलेला आणि लाल कपड्याने (स्थानिक भाषेत ‘ओरमाल’) झाकलेला नारळ आणि उदबत्त्या होत्या.

“भगताने दिलेल्या औषधांचा परिणाम म्हणून रुग्ण बरा होत आल्यावर आणि त्याला नजर लागू नये म्हणून हा विधी केला जातो,” काळूसोबत आलेले चिकनपाड्याचे पिढीजात भगत जैत्या दिघा म्हणाले.

Kalu Jangali (left, in a white vest)  had confirmed the diagnosis – Nirmala (centre) had jaundice. But, he said, 'She was also heavily under the spell of an external entity', which he was warding off along with fellow bhagat Jaitya Digha during the jagran ceremony in Chikanpada hamlet
PHOTO • Shraddha Ghatge
Kalu Jangali (left, in a white vest)  had confirmed the diagnosis – Nirmala (centre) had jaundice. But, he said, 'She was also heavily under the spell of an external entity', which he was warding off along with fellow bhagat Jaitya Digha during the jagran ceremony in Chikanpada hamlet
PHOTO • Shraddha Ghatge

काळू जंगलींनी (डावीकडे, सफेद बंदी घातलेले) निदान केलं – निर्मलाला (मध्यभागी) कावीळ झाली होती. त्याच्या मते, “शिवाय तिला ‘बाहेरची’ही जबरदस्त बाधा झालेली होती,’ आणि जैत्या दिघाच्या मदतीने ते, या जागरणाने ती बाधा दूर करत होते.

अशक्त झालेली निर्मला (१८) एक जुना मॅक्सी घालून आणि शाल पांघरून जमिनीवर बसली होती. काळूंच्या सर्व सूचना शांतपणे पाळत होती. ते सांगतील तेव्हा ती उभी राही. जैत्या स्टीलच्या थाळीतील तांदूळ निरखत होते, “निर्मलाला इतर काही वाईट शक्ती आणखी त्रास देईल का या प्रश्नाचं पूर्वजांकडून काय उत्तर मिळते हे समजून घेतोय.”

“तिला खूप ताप येत होता, भूक मेली होती, अंग खूप दुखत होतं,” निर्मलाचे वडील शत्रू सानद सांगत होते. त्यांचं एक एकराहून कमी असं भाताचं शेत आहे. “आम्ही तिला (सप्टेंबरच्या सुरवातीला) मोखाड्याच्या ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेलो होतो, त्यांनी काविळीच निदान केलं. पण त्यांनी दिलेल्या औषधांनी गुण नाही आला. तिची प्रकृती आणखी बिघडली. तिचं वजन कमी झालं, झोप नीट लागेना, आणि ती नेहमी थकलेली, घाबरलेली आणि अस्वस्थ राहू लागली. आम्हाला वाटलं, नक्कीच कुणीतरी तिच्यावर जादूटोणा केलेला असणार, तिला नजर लागली असणार. म्हणून मग आम्ही तिला काळूकडे नेली.”

त्यांनी सांगितलं की भगताने तिला अंगारा भरलेला एक ताईत दिला आणि काही औषधी वनस्पतींचं चूर्ण दिलं. तिने ते चूर्ण काही दिवस खाल्लं. “त्याचा गुण आला आणि म्हणून आम्ही हे जागरण ठेवलंय. आता त्या दुष्ट शक्तीचा कोणताच असर राहणार नाही.”

काळू जंगलींनी निदान केलं होतं – निर्मलाला कावीळ झाली होती. त्याच्या मते, “शिवाय तिला ‘बाहेरची’ही जबरदस्त बाधा झालेली होती.” सगळी ‘दुष्ट शक्ती’ बाहेर काढण्यासाठी काळूंनी ओरमालच्या भोवती हात नाचवले आणि डोक्यापासून पायापर्यंत आणि पुढे-मागे असा दोर फिरवला.

विधी तर आहेतच, पण भगत वनौषधीचा वापर अधिक करतात. ते म्हणतात, ‘आमच्या ताकदीच्या पलीकडलं काही असलं तर आम्ही त्यांना दवाखान्यात उपचार घ्यायला सांगतो’

व्हिडीओ पहा: चिकनपाड्यातील भगत, समजुती आणि चिंता

(मुंबईपासून सु. १८० कि.मी. अंतरावरच्या) पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील चास ग्रामपंचायतीतील या पाच पाड्यांवर भगताचे इलाज आणि सानद कुटुंबाचं भगताला आवतन या गोष्टी ही काही अनोखी घटना नाही.

“केवळ चासमध्येच नव्हे तर मोखाडा तालुक्यातील बहुतेक गावांत लोकांची अशी श्रद्धा आहे की कुणाच्या वाईट नजरेमुळे किंवा जादूटोण्यामुळे तुमची प्रगती खुंटते,” चासचे रहिवासी कमलाकर वारघडे म्हणतात. त्यांचा यावर विश्वास नाही पण स्थानिक लोकांच्या श्रद्धा-अंधश्रद्धांबद्दल ते संवेदनशील आहेत. सानद कुटुंबाप्रमाणेच तेही का ठाकूर आदिवासी आहेत. ते एका स्थानिक बँडमध्ये ऑर्गन, हार्मोनियम आणि कीबोर्ड वाजवतात. “ जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते, (किंवा एखादं प्रोजेक्ट किंवा काम बंद पडतं ) आणि डॉक्टरांना सुद्धा उपचार जमत नाहीत तेव्हा मग लोक भगताकडे जातात.”

मोखाड्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेवर लोकांचा विश्वास नाही हेही भगताकडे जाण्याचं एक कारण आहे. या पाच पाड्यांसाठी, सगळ्यात जवळचं सरकारी आरोग्य उपकेंद्र चासमध्ये आहे जे चिकनपाड्यापासून २ कि.मी. अंतरावर आहे.

“डॉक्टर दर मंगळवारी येतात, पण आमची त्यांची भेट होईलच याची काही खात्री देता येत नाही,” वारघडे सांगतात. “एक सिस्टर रोज येते पण ती फक्त सर्दी, खोकला, ताप यांची औषधं देते. इथे औषधांचा, इंजेक्शनांचा पुरेसा साठा नसतो; फक्त गोळ्या असतात. आशा (Accredited Social Health Activist) कार्यकर्ती  घरभेटी देतात पण जर रुग्ण गंभीर अवस्थेत आहे असं वाटलं तर त्या मोखाड्याला जायला सांगतात.”

Left: Nirmala's mother Indu, on the night of the the jagran, says she is relieved. Right: Kamlakar Warghade (here with his daughter Priyanka) of Chas village is sceptical but also sympathetic about the local belief systems
PHOTO • Shraddha Ghatge
Left: Nirmala's mother Indu, on the night of the the jagran, says she is relieved. Right: Kamlakar Warghade (here with his daughter Priyanka) of Chas village is sceptical but also sympathetic about the local belief systems
PHOTO • Shraddha Ghatge

डावीकडे: जागरणाच्या रात्री निर्मलाची आई इंदू सांगते की तिला आता निवांत वाटतंय. उजवीकडे: चास गावचे रहिवासी असणाऱ्या कमलाकर वारघडेंचा (आपली मुलगी प्रियांका हिच्या सोबत) यावर विश्वास नाही पण स्थानिक लोकांच्या श्रद्धांचा ते आदर ठेवतात

तिथे जायचं म्हणजे चासपासून जवळच्या बसस्टॉपपर्यंत ३ किलोमीटर अंतर चालत जायचं. इतर पाड्यांपासून तर तो आणखीच दूर आहे. किंवा मग भाड्यानी गाडी घ्यायची म्हणजे जाऊन-येऊन ५०० रुपयांचा खर्च. कधी कधी शेअर बोलेरोने, १०-२० रुपये सीट प्रमाणेही लोक चिकनपाड्याहून मोखाड्याचा प्रवास करतात.

“इथले बहुतेक रहिवासी छोटे शेतकरी किंवा दिवसाला २५० रुपये कमावणारे शेतमजूर आहेत. फक्त हॉस्पिटलपर्यंत पोचण्याचे ५०० रुपये, तिथला खर्च वेगळाच, हे त्यांना जडच जातं,” कमलाकर सांगतात.

आरोग्यसेवेतील या त्रुटी मग भगत मंडळी भरून काढतात, शिवाय हे लोक पिढ्यानपिढ्या त्यांना बरं करत आले आहेत. त्यामुळे ताप, पोटदुखीसारख्या छोट्या आजारांसाठी चासमधील आदिवासी - क ठाकूर, म ठाकूर, महादेव कोळी, वारली आणि कातकरी – भगतांकडेच जातात. वेळ पडली तर ‘वाईट नजरेपासून’ वाचवण्यासाठी सुद्धा ते त्यांच्याच कडे जातात.

Chas village (left): the Sanad family’s invitation to the bhagats is not unusual in the five padas (hamlets) of Chas gram panchayat. The local PHCs are barely equipped, and Mokhada Rural Hospital (right) is around 15 kilometres away
PHOTO • Shraddha Ghatge
Chas village (left): the Sanad family’s invitation to the bhagats is not unusual in the five padas (hamlets) of Chas gram panchayat. The local PHCs are barely equipped, and Mokhada Rural Hospital (right) is around 15 kilometres away
PHOTO • Shraddha Ghatge

चास गाव (डावीकडे): सानद कुटुंबाने भगताला दिलेलं आवतन ही चास ग्रामपंचायतीच्या आसपासच्या पाड्यांसाठी नवी नाही. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रं पुरेशी सेवा देण्यास सक्षम नाहीत आणि मोखाडा ग्रामीण रुग्णालय (उजवीकडे) सुमारे १५ किमी. दूर आहे

बहुतेक भगत गावातलेच आहेत (आणि सगळे पुरुषच आहेत) आणि इथल्या लोकांच्या परिचयाचे आहेत. निर्मलावर उपचार करणारे काळू जंगलीसुद्धा क ठाकूर आदिवासी आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते भगत म्हणून काम करत आहेत. “हे विधी आमच्या समुदायाच्या संस्कृतीचा भाग आहेत,” जागरणाच्या रात्री त्यांनी मला सांगितलं. “आम्ही जागरणानंतर सकाळी कोंबडा कापू आणि निर्मलाला पूर्ण बरी व्हावी म्हणून प्रार्थना करू. रुग्णाच्या आजूबाजूला वाईट शक्ती आहेत असं लक्षात येतं तेव्हाच आम्ही हा विधी करतो. वाईट शक्तींना दूर करणारे मंत्रही आम्हाला माहित आहेत.”

मात्र भगतांच्या इलाजाचा मुख्य भाग म्हणजे वनौषधी. “आम्ही औषधी – फुलं, पानं, गवत, झाडांच्या साली इ.- गोळा करण्यासाठी रानात जातो,” काळू सांगतात. “त्यापासून आम्ही काढे बनवतो तर कधी कधी साल जाळून त्याची राख रुग्णाला खाऊ घालतो. त्या माणसाच्या आसपास वाईट शक्तीचा वावर नसेल तर याचा उपयोग होतो. पण गोष्टी जर आमच्या ताकदीबाहेरच्या असतील तर आम्ही डॉक्टरकडे जायला सांगतो.”

जसं काळू वैद्यकीय सेवांचे महत्त्व मानतात तसंच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरसुद्धा या पारंपरिक भगतांच्या कामावर फुली मारताना दिसत नाहीत. चासपासून २० किमी वरील वाशाळा गावातील प्रा.आ. केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुष्पा गवारी म्हणतात, “आम्ही त्यांना सांगतो की आमच्या उपचारांवर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही भगताकडे जा. आदिवासींना भगतच्या उपचारांनी बरं नाही वाटलं तर ते परत आमच्याकडे येतात.” यामुळे स्थानिक लोकांच्या मनात डॉक्टरविषयी राग नाही. “वैद्यकीय सेवा आणि डॉक्टर यांच्याबद्दल लोकांच्या मनात विश्वास टिकून राहणं महत्त्वाचं आहे.”

“ते (डॉक्टर) बऱ्याचदा त्यांना निदान न होणाऱ्या केसेसमध्ये आमची मदत मागतात,” वाशाळा गावातील भगत काशिनाथ कदम (५८) म्हणतात. “उदा. काही महिन्यांपूर्वी, एक बाई अचानक, काही कारण नसताना बिथरल्यासारखी वागू लागली. तिला ‘बाधा’ झाली होती असं वाटत होतं. मी तिला जोरात थप्पड मारली आणि मंत्र म्हटले आणि तिला शांत केली. त्यानंतर डॉक्टरनी तिला औषधे देऊन गुंगीत ठेवले.”

Left: Bhagat Kalu Jangali at his home in Pangri village in Mokhada taluka. Right: Bhagat Subhash Katkari with several of his clients on a Sunday at his home in Deharje village of Vikramgad taluka in Palghar district
PHOTO • Shraddha Ghatge
Left: Bhagat Kalu Jangali at his home in Pangri village in Mokhada taluka. Right: Bhagat Subhash Katkari with several of his clients on a Sunday at his home in Deharje village of Vikramgad taluka in Palghar district
PHOTO • Shraddha Ghatge

डावीकडे: भगत काळू जंगली मोखाडा तालुक्यातील पांगरी गावातील आपल्या घरात. उजवीकडे: पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील देहार्जे गावातील भगत सुभाष कातकरी, आपल्या घरात. सोबत त्यांच्याकडे इलाज करायला आलेले लोक

इतर भगतांप्रमाणे, कदम आपल्या ‘रुग्णां’कडून फी घेत नाहीत. त्यांचं उत्पन्न आपल्या ३ एकर शेतातला भात आणि डाळीतून येतं. गावातले सर्व भगत सांगतात की त्यांच्याकडे येणारे लोक त्यांना जमेल तेवढी किंवा त्यांच्या इच्छेनुसार अगदी रु. २० पासून पैसे देतात. कुणी नारळ तर कुणी दारू. जर एखाद्या कुटुंबाला इलाज हवे असतील तर आपला रुग्ण बरा झाल्यावर त्यांना जागरण घालावं लागतं.

इतर भगतांप्रमाणेच काशिनाथही ते देत असलेल्या वनौषधींविषयी काहीही माहिती द्यायला नकार देतात. “कोणताच भगत तुम्हाला ते सांगणार नाही,” ते म्हणतात. “आम्ही आमचं ज्ञान कुणापाशी उघड केलं तर आमच्या औषधांची ताकद कमी होते. शिवाय प्रत्येक रुग्णासाठी औषधही वेगळं असतं. आम्ही वाळवलेल्या वनौषधींपासून काढे आणि अर्क तयार करतो जे मुतखडा, अपेंडिक्स, कावीळ, दातदुखी, डोकेदुखी, पोटदुखी, फ्लू, पुरुष आणि स्त्रियांतील मूल न होण्याची समस्या, गर्भपात आणि गर्भारपणातील इतर त्रास अशा आजारांवर आम्ही औषधं देतो. शिवाय वाईट नजर उतरवणं, करणी करणं, ताईत मंतरून देणं अशा गोष्टीही आम्ही करतो.”

पासोडीपाडा या ओसरविरा गावच्या एका पाड्याचे भगत केशव महाले थोडे अधिक खुलेपणाने बोलले. “तुळस, आलं, कोरफड, पुदिना अशा वनौषधी आम्ही कुठल्याही आजारात फार पूर्वीपासून वापरत आलोय. जेव्हा फक्त आम्हीच ‘डॉक्टर’ होतो. जंगलातले सगळेच आमच्याकडून औषध घेत असत,” ते सांगतात. “आता वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे लोकांना त्यांच्याकडे जावसं वाटतं. पण जेव्हा ती औषधं कामी येत नाहीत तेव्हा लोक आमच्याकडे येतात. मिळून काम करायला काय हरकत आहे?” केशव यांची दोन एक एकर भातशेती आहे.

Keshav and Savita Mahale (left) in Pasodipada hamlet: 'With advances in medicine, people prefer doctors. But they come to us when medicines fail them. There is no harm in co-existing'. Bhagat Kashinath Kadam (right) with his wife Jijabai in Washala village: 'The doctors often seek our help in cases which they can’t explain'
PHOTO • Shraddha Ghatge
Keshav and Savita Mahale (left) in Pasodipada hamlet: 'With advances in medicine, people prefer doctors. But they come to us when medicines fail them. There is no harm in co-existing'. Bhagat Kashinath Kadam (right) with his wife Jijabai in Washala village: 'The doctors often seek our help in cases which they can’t explain'
PHOTO • Shraddha Ghatge

केशव आणि सविता महाले(डावीकडे) पासोडीपाड्यात: ‘आता वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे लोकांना त्यांच्याकडे जावसं वाटतं. पण जेव्हा ती औषधं कामी येत नाहीत तेव्हा लोक आमच्याकडे येतात. मिळून काम करायला काय हरकत आहे?’ वाशाळा गावातील भगत काशिनाथ कदम (उजवीकडे) आणि पत्नी जिजाबाई: ‘बऱ्याचदा सहज निदान न होणाऱ्या केसेस मध्ये आमची मदत मागतात’

विक्रमगड तालुक्यातील देहर्जे गावच्या कातकरी पाड्यातील प्रसिद्ध भगत सुभाष कातकरी मूल न होणं किंवा गरोदरपणात गुंतागुंतीवरच्या खास औषधींबद्दल खुलासा करतात. “त्यासाठी विशेष आहार घ्यावा लागतो आणि काही काळजी घ्यावी लागते. एकदा आमच्या औषधांमुळे बाई गर्भार राहिली की तिने स्वयंपाकातील तेल बंद करायला हवं. तिने मीठ, हळद, कोंबडी, अंडी, मटन, लसून, मिरची हे सर्व बंद करायला हवं. घरचं सगळं काम, पाणी भरण्यासकट, तिनेच करायला हवं आणि आमच्या औषधांशिवाय इतर औषधं बंद करायला हवीत, हे शेवटच्या तिमाहीपर्यंत. वाईट नजरेपासून रक्षण म्हणून आम्ही त्या बाईला आणि नंतर तिच्या बाळाला ताईत देतो.”

मोखाडा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. दत्तात्रेय शिंदे म्हणतात, “दुर्दैवाने, यामुळे [आहारातील व इतर बंधनांमुळे] गरोदर आदिवासी बाया कुपोषित राहतात आणि मग त्यामुळे कमी वजनाची बाळं जन्मतात. मोखाड्यात अशा अनेक केसेस मी पाहिल्यात. अजूनही या अंधश्रद्धा आहेत आणि म्हणून लोकांचा भगतांवरील विश्वास दूर करणं कठीण आहे. (खरं म्हणजे ३७% जनता आदिवासी असलेला पालघर जिल्हा कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्युंसाठी चर्चेत असतो. पण तो वेगळा विषय आहे.)

तिकडे चिकनपाड्यात निर्मलाची आई इंदू, वय ४०, जागरणाच्या रात्री निवांत झाली आहे. “काळू आणि जयत्या, दोघांनी माझ्या मुलीवरचा जादूटोणा दूर केलाय आणि आता ती पूर्ण बरी होणार याची मला खात्री आहे,” ती म्हणते.

सार्वजनिक आरोग्यातील शोध पत्रकारिता या विभागातील २०१९ साली अमेरिकेच्या ठाकूर फौंडेशनने दिलेल्या अर्थसहाय्यातून या लेखाचे काम करण्यात आले आहे.

अनुवादः छाया देव

Shraddha Ghatge

Shraddha Ghatge is an independent journalist and researcher based in Mumbai.

Other stories by Shraddha Ghatge
Translator : Chhaya Deo

Chhaya Deo is a Nashik based activist of Shixan Bazaarikaran Virodhi Manch, a group working against commercialisation of education and for quality education which is a constitutional right of Indian citizens. she writes and also does translation work.

Other stories by Chhaya Deo