जर त्याच्या पत्नीला, आरयीला घरी यायला पाच मिनिटंही उशीर झाला असता तर सेत्तने या जगात राहिला नसता. तिने दारात पाऊल टाकलं तेव्हा त्याने गळ्याभोवती फास आवळलाच होता.

“जवळजवळ सगळं संपलंच होतं,” असं म्हणणाऱ्या के. लेकन – टोपणनाव सेत्तू – या साध्या शेतकऱ्याला आपलं हे धाडस वाया गेल्याचं आता समाधान वाटत होतं. आरयीने आरडाओरड करून शेजारच्यांना बोलावलं आणि त्यांनी सेत्तूला खाली उतरवलं. आलेलं संकट टळलं होतं.

६ नोव्हेंबर, २०१६ चा तो दिवस. पन्नाशीत असलेला सेत्तू आपल्या दीड एकर रानात धानाचं पीक कसं घ्यावं या विचाराने त्रस्त होता. तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील तयनुर गावातील त्याचं पडक शेत पाहून तो उद्ध्वस्त झाला होता. त्याने दुबार पेरणी करूनसुद्धा धानाचं पीक आलंच नाही.

“बायका-मुलं इतर शेतात कामाला गेले असताना मी घरी परतलो. घेतलेलं कर्ज कसं फेडणार, घरदार कसं चालवणार याचा विचार करत होतो.”  जिल्हा सहकारी बँक आणि सावकाराचं असं मिळून एकूण १,५०,००० देणं आहे, असं सेत्तू सांगत होता. “या चिंतेनेच मी आत्महत्या करण्याचं ठरवलं.”

त्यानंतर काही महिन्यांतच २०१७ च्या एप्रिल-मे दरम्यान कावेरी खोऱ्यातल्या – एकेकाळी सुपीक असलेल्या – प्रदेशातील शेतकऱ्यांनी नवी दिल्लीत कर्जमाफीकरिता तोंडात उंदीर धरून, मानवी कवट्या मांडून, जमिनीवर लोळण घेत जोरदार आंदोलन केलं. त्यांच्या प्रदेशातील कित्येक शेतकऱ्यांनी कर्जाच्या बोजाने कंटाळून जीव दिलाय तर अनेकांना हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गमवावे लागले आहेत.

जानेवारी २०१७ मध्ये ‘पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज’च्या वतीने अनेक शेतकरी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, डॉक्टर आणि इतर सदस्यांनी या प्रदेशातील ५० अकस्मात मृत्यूंचा अभ्यास करायचं ठरवलं. स्थानिक शेतकऱ्यांच्या मते अशा मृत्यूंची संख्या २०० च्या वर गेली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने ५ जानेवारी, २०१७ रोजी राज्य सरकारला दिलेल्या माहितीनुसार कमीतकमी १०६ शेतकऱ्यांनी २०१६ च्या डिसेंबर महिन्यातच आत्महत्या केली आहे.

ही तमिळनाडूवर घोंघावणाऱ्या गंभीर संकटाची नांदी आहे. समृद्ध अशा कावेरी खोऱ्यातील गावोगावीचे शेतकरी मात्र हे मानवनिर्मित संकट असल्याचं सांगतात. त्यांच्या मते कुठल्याही दुष्काळापेक्षा ही परिस्थिती वेगळी आहे.


From Left: Tayanoor farmers Inbaraj, Subramaniam Kumar, Settu, Arokya Samy, and B Muthuraja, all small farmers who were reeling under drought.

तयनुर गावातील शेतकरी तेथील दुष्काळाबद्दल सांगताना . डावीकडून : इन्बराज , सुब्रमण्य कुमार , सेत्तू , आरोग्य सामी आणि बी . मुथुराज

शेतमालक असणारे सेत्तूचे मित्र सुब्रमण्य कुमार सांगतात, “यापूर्वी असा दुष्काळ आम्ही पाहिला नाही.” आमच्या या प्रवासात सगळ्या शेतकऱ्यांकडून  आम्ही हेच ऐकत आलोय.

तमिळनाडूच्या पठारी प्रदेशात सुमारे १ ते १.५ किमी रुंद पात्र पसरलेली विशाल कावेरी नदी आणि तिच्या सहा-सात उपनद्या ६ महिन्यांपासून कोरड्या पडल्या आहेत. बोअरवेलकरिता कितीही खोलवर खोदत गेलं तरी भूजलाची पातळी त्याहीपेक्षा खाली गेलेली आढळते. काम टिकणं तर सोडाच, मिळणं देखील कठीण, अशा परिस्थितीत शहराकडे स्थलांतरात अचानक वाढ झाली आहे. किंवा हजारोंच्या संख्येने लोक हाती कुऱ्हाड घेऊन ‘१०० दिवसांत काम’ या आश्वासनाने ग्रामीण रोजगार हमी योजनेत काम करताहेत.

आम्ही श्रीरंगम् तालुक्यात तिरुचिरापल्ली शहरापासून २५ किमी दूर असलेल्या तयनुर गावाला भेट दिली तेंव्हा सेत्तू सुब्रमण्य आणि इतर मित्रांसोबत चिंतातुर होऊन बसलेला होता. मागील एक दोन वर्षांत पाऊस न पडल्याने दुष्काळ आला होता. सर्वांच्या मते यंदाचा दुष्काळ हा त्याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचा आहे.

“परिस्थिती आणखी वाईट होत चालली आहे,” दोन एकरात धानाचं पीक घेणारे इन्बराज सांगतात. “आमच्या नदीला पाणी नाही, भूजलाची पातळी कमी होत चालली आहे आणि त्यातच पावसानेही निराशा केली आहे.”   कावेरी नदीच्या अनेक उपनद्यांपैकी एक असलेल्या कट्टलाई नदीच्या काठी हे गाव वसलं आहे.


Inbaraj, a fellow-villager, narrates the same story; that of a ravaged farm economy in the Delta drought.

दोन एकर शेतात धानाचं पीक घेणारे इन्बराज . कधी काळी सुपीक असलेल्या पण सध्या दुष्काळाने कोरड्या पडलेल्या भागातील मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेचं वर्णन करताना .

इन्बराज आणि त्यांची तीन भावंडं आपल्या शेतात बोअरवेल घेण्याचा विचार करताहेत. याचा एकूण खर्च १,००,००० रुपये – चार भावंडांत विभागून २५,००० प्रत्येकी एवढा येईल. “भूजलाची पातळी ५०० फूट खोल असल्यानं खर्च कदाचित वाढू शकतो.”  पूर्वी पातळी १०० ते १५० फूट एवढी होती पण दोन दशकांत ही पातळी तीनदा खालवून एवढ्यावर आली आहे.

आम्हा शेतकऱ्यांना, आमच्या गुराढोरांना पाण्याची गरज आहे, पण आमच्या नद्यांमधलं सर्व पाणी शोषून जवळच्या त्रिची आणि इतर शहरांना पुरविलं जातं. “शहरात एका नव्या माणसाची भर पडते ना पडते तोच रिअल इस्टेटच्या त्या फोफावत्या जंगलाची तहान वाढायला लागते.”

पत्नी आरयीने वाचविल्यानंतरही सेत्तूची परिस्थिती काही बदललेली नाही. उलट पूर्वीपेक्षा त्याची आणि त्याच्यासारख्या छोट्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणखीच बिकट होत चाललीय.

सेत्तू जगला म्हणून तो त्यातल्या त्यात नशीबवान, काहींच्या नशिबी तर तेही नव्हतं.

२०१६ मध्ये पाऊस न झाल्याने कावेरी नदी कोरडी पडली. त्यातच कर्नाटक राज्यातही दुष्काळाचं चक्र सुरू असल्याने तेथील शासनाने धरणाचं पाणी अडवून ठेवलं. बी उगवलंच नाही. ऊस, धान आणि बाजरीचं उत्पादन ढासळलं. पाणी नाही तर काम नाही, काम नाही तर पैसा नाही. कर्जाचा वाढता बोजा कमी करण्यासाठी जमीनजुमला विकायला काढावा लागला.

निराश झाल्यावर घरदार चालविण्याची प्रचंड चिंता वाटू लागते व त्यातूनच पुढे हृदयविकराचा झटका येऊ शकतो.


Grand Anicut: The 2000-year-old dam that the Cholas built had run completely dry in the winter as rains failed and Cauvery river too had fallen silent. The Anicut is a structure built of stone and still robust. It's the lifeline of the Delta.

२००० वर्षांपूर्वी चोलांनी बांधलेलं हे धरण आजही या भागाची जीवनवाहिनी मानलं जातं . हिवाळ्यात हे धरण पूर्ण कोरडं पडलेलं आहे आणि कावेरी नदीचं खळाळणंदेखील शांत झालं आहे .

गळफास लावून आत्महत्येच्या विचारात असलेला सेत्तू आता स्वतःच्या मूर्खपणावर खजील होतोय. तो नसता तर आज त्याचा निराधार परिवार कर्जाच्या डोंगराखाली दबून गेला असता. पण आज तो व त्याच्यासारखेच अनेक शेतकरी हलाखीचं जगत आहेत, तरी मनातली आशा जिवंत आहे.

सुब्रमण्यम सांगतात की, बोअरवेलच्या पाण्याने काही शेतकऱ्यांनी आपली शेती वाचविली आहे. पण सेत्तूकडे बोअरवेल नव्हती. “त्या दिवशी मला माझ्याच शेतीकडे बघवत नव्हतं,” सेत्तू सांगतो. तो नोव्हेंबरचा महिना होता आणि सेत्तूची जमीन दीनवाणी भासत होती. “पाऊसच झाला नाही, तेंव्हा मी पेरलेलं बी उगवलंच नाही.”

मानसिक धक्का, भीती आणि निराशा – अशी एकंदर संमिश्र भावना झाली आहे. “खूप कर्ज फेडायचं आहे. पण एवढ्यात मी कुणालाही काहीच परत करू शकणार नाही.”

आम्ही त्याला भेटलो त्या दिवशी सेत्तूची पत्नी आणि मोठा मुलगा कामानिमित्त शहराकडे गेले होते. त्याची मुलगी दोन वर्षांपूर्वी लग्न होऊन सासरी गेली. धाकटा मुलगा शाळेत जातो. आता सेत्तूजवळ उदरनिर्वाहासाठी काही उरलं असेल तर ती म्हणजे  दिवसाला ३ लिटर दूध देणारी जर्सी गाय – तीदेखील चाऱ्याअभावी भुकेजून गेलेली.

“माझ्याजवळ उरलेलं ह एकमेव धन,”  सेत्तू म्हणतो. “आता हिची देखभालही किती काळ करता येईल ते बघायचं.”

छायाचित्रे : जयदीप हर्डीकर

Jaideep Hardikar

Jaideep Hardikar is a Nagpur-based journalist and writer, and a PARI core team member.

Other stories by Jaideep Hardikar
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo