कुमारतुलीमधील कृष्णा स्टुडिओचे तापस पाल म्हणतात “या वर्षी कोरोनामुळे मला अद्यापपर्यंत दुर्गा मूर्तींची ऑर्डर मिळालेली नाही. तरीही मी स्वतःहून काही मूर्ती बनवल्या आहेत. मला आशा आहे त्या विकल्या जातील.” उत्तर कोलकात्यातील कुंभार आणि मूर्तिकारांच्या या ऐतिहासिक गल्लीमध्ये त्यांचा स्टुडिओ आहे. ते पुढे म्हणतात, “तुम्ही मला ८ वर्षांपासून ओळखता. माझा स्टुडिओ जून महिन्यात विनामूर्तीचा तुम्ही कधी पाहिला आहे का?”

कुमारतुली मध्ये जवळपास ४५० स्टुडिओंची स्थानिक कारागीर संघटनेमध्ये नोंदणी झाली आहे. बांबू व पेंढ्याचा ढाचा तयार करून त्यावर चिकणमातीचा लेप लावून मूर्ती घडवली जाते. ऑक्टोबर महिन्यात सुरु होणाऱ्या दुर्गापूजेच्या काही आठवडे आधीच मूर्ती रंगवून, दागिन्यांनी सजवल्या जातात. दरवर्षी मूर्ती बनवण्याची तयारी मार्च - एप्रिल मध्येच सुरु होते. परंतु या वेळी कोविड १९ च्या महामारीने पूर्ण नियोजनच बिघडवून टाकलं आहे. (पहा - कुमारतुलीचा फेरफटका )

मागील २० वर्षापासून मूर्ती बनवणारे मृत्युंजय मित्रा म्हणतात, हे वर्ष आमच्यासाठी फार कठीण आहे. एप्रिल पासूनच व्यवसायात प्रचंड तोटा व्हायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला बनवलेल्या अन्नपूर्णा देवीसारख्या घरगुती देवतांच्या मूर्ती  बंगाली नवीन वर्षाला, पैला-बैसाखीला (यावर्षी १५ एप्रिल रोजी) विकायला पाहिजे होत्या परंतु त्या अजूनही विकल्या गेलेल्या नाहीत. “संपूर्ण गल्ली मध्ये जवळपास १०० मूर्ती असतील त्यापैकी फक्त ८ ते १० मूर्ती विकल्या आहेत. पूर्ण गुंतवणूक वाया गेलीये. मला अजून पर्यंत दुर्गामूर्तीसाठी ऑर्डर मिळालेली नाही.” मृत्युंजय मित्रा सांगतात.

१८ व्या शतकापासून कुमारतुलीमध्ये कुंभार हाताने दुर्गा देवीच्या मूर्ती बनवतायत. कोलकात्यातील त्यावेळच्या श्रीमंत जमीनदार आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या घरच्या वार्षिक दुर्गा पूजेच्या उत्सवासाठी मूर्ती खरेदी करायला सुरुवात केली. बहुतेक कारागीर हे मूळचे नाडिया जिल्ह्यातील कृष्णानगरचे आहेत. जशी हस्तकलेला शहरातून मागणी वाढली तसे हे स्थलांतरित कारागीर उत्तर कोलकत्यात हुबळी नदीच्या काठावर कुमारतुली मध्येच स्थायिक झाले.

मी १८ जूनला कुंभारवाड्यात पोहचलो तेव्हा कोलकाता महानगरपालिका २० मे च्या अम्फान चक्रीवादळाने पडलेली झाडं उचलत होती. ते सोडता एरवी कायम गजबजलेल्या या वस्तीमध्ये शांतता होती. बहुतेक स्टुडिओ तर बंदच होते. काहींनी स्टुडिओ उघडले होते पण मूर्तींची  कामं कुठेच सुरू दिसत नव्हती. देवतांच्या तुटलेल्या आणि अपूर्ण मूर्ती रस्त्यावरच पडून होत्या. सजावटीची दुकाने उघडलेली असली तरी ग्राहक मात्र कुठेच दिसत नव्हते. मागच्या काही वर्षांच्या तुलनेत यावेळी जून महिन्यातील चित्र काहीसं निराळंच होतं.

कुमारतुली मध्ये भेटलेल्या कारागिरांनी मला सांगितलं की २०१९ मध्ये त्यांच्या सगळ्यांचा मिळून ४० कोटी रुपयांचा धंदा  झाला होता. त्याचा मोठा हिस्सा हा दुर्गा मूर्तींच्या विक्रीतून आला होता. याच सोबत ते इतर देवतांच्या मूर्ती सुद्धा बनवतात आणि कधी कधी चित्रपटांसाठी मातीचे पुतळे बनवण्याची त्यांना मागणी येते. त्यांच्या पैकी काहीजण मातीची भांडी आणि इतर वस्तू बनवतात. त्यांना यावर्षी मूर्तींच्या विक्रीत वाढ होण्याची आशा होती पण त्या आधीच कोविड १९ मुळे सगळ्या गोष्टी ठप्प होऊन बसल्या.

PHOTO • Ritayan Mukherjee

दुर्गा देवी आणि इतर देवतांच्या अपूर्ण मूर्ती रोडवरच पडून आहेत . कुंभार म्हणतात यावर्षी नेहमी सारखा नफा मिळणार नाही

बिडीचा झुरका मारत मृत्युंजय मला सांगत होते या वर्षी २३ जूनला जगन्नाथ रथ यात्रेच्या उत्सवाला काही ऑर्डर मिळतील अशी त्यांना अपेक्षा आहे, हे दुर्गा मूर्ती बनवण्यासाठी शुभ मानलं जातं. “पण मला शंकाच आहे.” ते पुढे म्हणतात, “बँकासुद्धा आमच्या व्यवसायात नफा होऊ शकतो असा विचार करत नाहीत. कोणीही आम्हाला कमी कालावधीसाठी कर्ज देण्यास तयार नाहीये. आम्ही प्रत्येक वर्षी आमच्या खिशातले ७ लाख रुपये गुंतवतो [मार्च ते ऑक्टोबर] पुढील ८ महिने हा पैसा अडकून पडलेला असतो, काहीही उत्पन्न नसतं. आमच्याकडे ४ महिने कमाईसाठी आहेत, त्यानंतर संपूर्ण वर्ष त्यावर उदरनिर्वाह करावा लागतो. या वर्षी ते कसं शक्य होणार आहे?”

कुंभार वेगवेगळ्या आकाराच्या व किंमतीच्या दुर्गा मूर्ती बनवतात. साधारणतः ६ फुटाची घरगुती मूर्ती ३०,००० रुपयाला विकली जाते. संपूर्ण शहरात, मंडपांमध्ये स्थापना करण्यासाठी उत्सव समित्यांकडून उंच आणि सुशोभित मूर्तींना मागणी असते. जवळपास १० फूट उंच असलेल्या मूर्तींची  किंमत १ लाख ते २ लाख दरम्यान असते.

कार्तिक पाल एक अनुभवी, ज्येष्ठ मूर्तीकार आहेत. त्यांना रथ यात्रेसाठी काही ऑर्डर मिळाल्या आहेत. ते म्हणतात, “या ऑर्डर घरगुती पूजेसाठीच्या आहेत पण सार्वजनिक मंडपातल्या मोठ्या मागण्या बंद आहेत. मला आशा आहे आजपासून गोष्टी बदलायला लागतील. पण पूर्वीसारखी स्थिती नसणार हे नक्की.”

कार्तिक पाल म्हणतात ते खरंही असेल. निमाई चंद्र पॉल हे उत्सव समितीचे प्रमुख आहेत. त्यांचं मंडळ कुमारतुलीमध्ये प्रत्येक वर्षी मोठा मंडप टाकतं. त्यांना सुद्धा वाटतंय की या वर्षी मूर्तिकारांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागणार आहे. “आम्ही ३० ते ४० लाख रुपये खर्च करतो. आम्हाला मिळणारा निधी हा बहुतेक कार्पोरेट प्रायोजकांकडून येतो पण यावेळी कोणीही उत्सुक दिसत नाहीये. आम्ही काही कारागिरांना आगाऊ पैसे देऊन ऑर्डर्स दिल्या होत्या पण नंतर आम्हाला त्या रद्द कराव्या लागल्या.” पॉल यांच्या समितीने यावेळी बराच कमी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. ते पुढे म्हणतात, “मला खात्री आहे की मोठ्या प्रमाणात खर्च करणाऱ्या इतर समित्या सुद्धा असाच निर्णय घेतील.”

ऑर्डर्स न मिळाल्यामुळे कारागिरांपुढे इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. “रेल्वे बंद असल्यामुळे मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांना मदत करणारे रोजंदारीवरचे कामगार येऊ शकत नाहीत कारण ते खूप दूरच्या जिल्ह्यांमधून येतात. टाळेबंदी आणि अम्फान चक्रीवादळामुळे कच्च्या मालाच्या किमतींमध्ये जवळजवळ ३० ते ४० टक्के इतकी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे नुकसान भरून काढायला आम्हाला संधी कुठे आहे?” कार्तिक यांना पेच पडलाय. त्यांच्या पुढे बसलेले मिंटू पाल पूजा समित्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करतात कारण त्यांनी अम्फान चक्रीवादळानंतर आणि कोविड-१९ च्या टाळेबंदी मध्ये कुमारतुली मधील कारागिरांना राशन वाटप केलंय.

“देवतांच्या अंगावर तुम्हाला दिसणारे सुंदर दागिने नाडिया आणि हुगळी जिल्ह्यातील गावांमध्ये बनवले जातात. तेथील कारागीर सुद्धा बेरोजगार झाले आहेत. जवळपास ६० ते ७० कुटुंबं मूर्तींसाठी कृत्रिम केस तयार करतात त्यांनाही याची झळ पोहचली आहे. मूर्तींना लावला जाणारा लेप व त्यासाठीची माती मुख्यतः साऊथ २४ परगणा, नॉर्थ २४ परगणा आणि मालदा जिल्ह्यातून बोटींमधून आणली जाते. हे सगळं कुमारतुलीपर्यंत पोहचवणाऱ्या मजुरांकडे  आता कसलीही कमाई नाही.

PHOTO • Ritayan Mukherjee

मूर्तिकार बांबू आणि गवताच्या पेंढ्याने बनवलेल्या दुर्गा मूर्तीच्या साच्यावर चिकणमातीचा लेप लावत आहेत. मूर्ती बनवणे हे मेहनतीचे काम आहे, त्याला कौशल्य आणि वेळ लागतो. गेल्या वर्षी कुमारतुलीच्या कारागिरांचा ४० कोटींचा व्यवसाय झाला होता.

PHOTO • Ritayan Mukherjee

तयार झालेल्या मूर्ती प्लास्टिक गुंडाळून स्टुडिओमध्ये पावसाळ्यात जपून ठेवाव्या लागतात. शरद ऋतूतील दुर्गा उत्सवापर्यंत या मूर्ती सुरक्षित ठेवणं कुंभारांसाठी मोठं जिकिरीचं काम असतं.

PHOTO • Ritayan Mukherjee

मार्चच्या अखेरीस सुरु झालेल्या कोविड- १९ पासून कारागिरांकडे मूर्तींची मागणी नसल्याने कुंभाराच्या गोदामाबाहेर अर्धवट काम झालेल्या मूर्तींचा ढीग लागला आहे.

PHOTO • Ritayan Mukherjee

कुमारतुली मध्ये मिन्टू पाल यांच्या स्टुडिओमध्ये खास करून प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार होतात. त्यांना चित्रपट निर्मात्यांकडून ऑर्डर्स मिळतात पण लॉकडाऊन मध्ये चित्रपटाचे चित्रण बंद असल्याने त्याचा थेट परिणाम धंद्यावर झाला आहे.

PHOTO • Ritayan Mukherjee

बिहार छत्तीसगड आणि झारखंड मधील मजूर कुरमातुली मध्ये माती आणि मूर्तींची वाहतूक आणि गरज असेल तर अवजड, अंगमेहनतीची कामं करतात. लॉकडाऊन दरम्यान मजूर मूळ गावी गेले. आता ते परतणार नाहीत याची कुंभारांना चिंता आहे.

PHOTO • Ritayan Mukherjee

बंगालच्या ग्रामीण भागातले कारागीर त्यांनी बनवलेल्या वस्तू दुर्गापूजेच्या काळात शहरात विक्रीसाठी आणतात. जर उत्सव समित्यांनी साधेपणाने सोहळा साजरा करायचा निर्णय घेतला आणि मूर्तींची मागणी अशीच कमी राहिली तर या कारागिरांचा धंदाही बसणार असं दिसतंय.

PHOTO • Ritayan Mukherjee

इतरवेळी गजबजलेली कुमारतुलीतील गल्ली या वर्षी शांत आहे. अर्धवट काम झालेल्या मूर्ती आणि पुतळे विक्रीविना ढीग लावून ठेवलेत. काही विक्रेते, जसे की हा फुगे विकणारा, ग्राहक भेटण्याची आशा ठेवून गल्लीतून फिरत आहे.

PHOTO • Ritayan Mukherjee

कोविड- १९ चा परिणाम कुमारतुलीत सगळीकडे दिसत होता. एरवी विकलेल्या मूर्ती आणि तुटके फुटके पुतळे रस्त्यावर पडल्या आहेत हे दृश्य नजरेस पडणं दुर्मिळच.

PHOTO • Ritayan Mukherjee

एक कलाकार दुर्गा मूर्तीचे चलचित्र घेऊन जात आहे. मूर्तीच्या मागे साधा बारीक नक्षीकाम असलेला रंगीत पडदा लावलेला आहे, जो मूर्तीचं तेज मात्र कमी करत नाही. काळानुरूप नवीन संकल्पनांवर आधारित असलेल्या मंडपांच्या डिझाईनमुळे चलचित्राच्या मागणीवर परिणाम झाला आहे.

PHOTO • Ritayan Mukherjee

मोठे संगमरवरी पुतळे, देवता आणि सेलिब्रिटींच्या मूर्ती तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जी. पॉल अँड सन्स या कुमारुतुलीतील अग्रगण्य स्टुडिओचा व्यवसाय मंदावला आहे. या स्टुडिओत घडवलेल्या मूर्ती भारताच्या बऱ्याच भागात विकल्या जातात आणि इतर देशांतही निर्यात केल्या जातात. महामारीच्या काळात संपूर्ण देशभर वाहतुकीवर असलेल्या निर्बंधांमुळे या विक्रीवर परिणाम झाला आहे.

PHOTO • Ritayan Mukherjee

कुमारतुलीचे अरुंद रस्ते जूनमधील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान फुलून गेलेले असतात. पण या वर्षी मात्र रथयात्रेच्या दिवशी ते निर्मनुष्य होते.

अनुवादः अर्जुन माळगे

Ritayan Mukherjee

Ritayan Mukherjee is a Kolkata-based photographer and a PARI Senior Fellow. He is working on a long-term project that documents the lives of pastoral and nomadic communities in India.

Other stories by Ritayan Mukherjee
Translator : Arjun Malge