उंच, शिडशिडीत बांध्याची, करारी चेहऱ्याची ही मच्छीमार बाई सुंदरबनच्या जंगलातल्या कुलतली बेटावरच्या संथ वाहत्या पाण्यात बुडणाऱ्या सूर्याकडे टक लावून बसलीये. अनिमा मंडल संतप्त झालीये. सकाळपासून तिने अन्नाचा घासही घेतलेला नाहीये. 

कुलतली वन क्षेत्राच्या बीट अधिकाऱ्याने १४ फेब्रुवारी २०१५ रोजी दु. २ वाजता नदीच्या पलिकडे कुलतलीच्या एका कोपऱ्यात वन खात्याच्या आवारात बोलावलेल्या एका बैठकीसाठी ती इथे आलीये. तब्बल ५० बाया आणि काही पुरुष या महत्त्वाच्या बैठकीसाठी इथे दाखल झाले आहेत. त्यांच्या दोन मुख्य मागण्या आहेत – त्यांच्या डोंग्या त्यांना परत केल्या जाव्यात आणि बायांना पारंपरिक लघु मच्छीमार म्हणून गणण्यात यावं, त्यांचा उपजीविकेसाठी मासेमारी करण्याचा अधिकार मान्य केला जावा.

कुलतली महिला डोंगा मत्स्यजीबी समितीच्या छत्राखाली संघटित झालेल्या या बाया मध्य गुगुरिया गावाहून लांबचा प्रवास करून आल्या होत्या. ठरलेली तारीख चुकू नये म्हणून पायी, लाकडी फळकुटं लावलेल्या सायकलींवरून, नावेने त्यांनी हा प्रवास केला होता. 

PHOTO • Urvashi Sarkar

संध्याकाळचे ५ वाजून गेले आहेत. अनेकींचे पाय घरी जाणाऱ्या डोंगीच्या दिशेने पडत आहेतः काहींना माघारी असलेल्या लहानग्यांना खाऊपिऊ घालायचंय तर काहींना घरी नवरे मंडळींच्या संतापाची भीती आहे. अमीना आणि इतर काही जणी मात्र आपल्या गटाचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी म्हणून कुलतलीतच रहायचं ठरवतात. वनखात्याकडून त्यांना काही तरी उत्तर हवं आहे.

त्या आवारात पाय मोकळे करतात. हिरव्या गढूळ पाण्याच्या तळ्याच्या काठाने. तिथेच ताडाच्या खोडापासून तयार केलेल्या त्यांच्या जप्त केलेल्या डोंग्या रचून ठेवल्या आहेत. ते पाहून त्या अवाक् होतात. त्यांच्या डोंग्यांच्या ढलप्या निसटून पाण्यात पडायला लागल्यात. “आमच्या डोंग्या मोडून पाण्यात फेकून दिल्यात. लाखो रुपये अक्षरशः पाण्यात गेलेत,” दबक्या आवाजात गीता साहू ही मच्छीमार महिला म्हणते. तिच्या आवाजातला संताप लपत नाही. तिच्या सोबतच्या बाया ज्या अजूनही थांबलेल्या आहेत, त्यांचाही. 

एकमेव आधार

तिथे थांबलेल्या घोळक्याची चर्चा आता डोंगी तयार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाकडे वळते. ज्या ताडाच्या खोडांपासून कोरून या डोंग्या बनवतात, त्याची किंमत, खोड कोरण्यासाठी लागणारी मजुरी, कोळसा आणि डांबराचा लेप, त्याची देखभाल, सगळं मिळून किमान ५००० रुपये. दरवेळी जेव्हा नाव जप्त होते तेव्हा परत नव्याने त्यांना हा एवढा सगळा खर्च करावा लागतो. “एवढा पैसा जमा करायचा म्हणजे दोन-तीन महिने लागतात. वनखात्याची परवानगी असलेल्या लाकडी होड्या आम्हाला परवडणाऱ्या नाहीत,” मच्छीमार बायांपैकी एक, बीना बाग सांगते.

थोडं अंतर चालत गेल्यावर त्यांना झाडाआड जप्त केलेल्या दोन-तीन डोंग्या दिसतात. खेकडे आणि मासे धरण्याचा, उपजीविकेचा त्यांचा एकमेव स्रोत म्हणजे या डोंग्या. आता मात्र अनिमांना राम अनावर झालायः ­“आमच्या डोंग्या जप्त करून आमच्या पोटावर लाथ का मारताय? आम्हाला काय पगार मिळतो का? हे काही कलकत्ता नाहीये, जिथे महिना संपला की लोकांच्या खात्यात पैसा जमा होतो. मला कुणी स्वैपाकासाठी हातात भाजीची आयती पिशवी आणून देणार नाहीये. इथलं आयुष्य वेगळं आहे.” 

PHOTO • Urvashi Sarkar

इथल्या आयुष्याची झलक

खरंच, सुंदरबनमधलं जीवन खूपच वेगळं आहे. अनिमा आणि त्यांच्यासारख्या इतर मच्छीमार बायांचा दिवस पहाटे ३ वाजता सुरू होतो. घरकाम उरकून त्या त्यांच्या डोंग्या घेऊन नदीत शिरतात. मासे धरण्यासाठी त्या गळ्यापर्यंत येणाऱ्या थंडगार पाण्यात उतरतात. एकदा का मासे धरले की त्या घरी येऊन पोराबाळांना जेऊ घालतात. नंतर त्या खेकडे आणि मासळी केंद्रात पोचतात. इथे येऊन मासळी विकून थोडे तरी पैसे गाठीला बांधण्याची आशा घेऊन त्या येतात, खात्री अर्थातच नसते. ज्या दिवशी थोडा फार पैसा हाती येतो, तो लगेचच घरखर्चात किंवा मासे धरण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींवर खर्च होतो. आणि ज्या दिवशी काहीच हाती लागत नाही तेव्हासाठी बाजूला काढला जातो. इथली बरीच कुटुंबं भूमीहीन असून तीन-चार पिढ्यांपासून पोटापाण्यासाठी केवळ मच्छिमारीवर अवलंबून आहेत. त्यामुळेच त्यांच्या हातात काय पडतं यावर त्या काय बाजार करणार हे ठरतं.

इतर संधी नाहीत

लग्न झालं तेव्हा अनिमांचं वय १० किंवा १२ असेल. इतक्यातच त्यांच्या पतीचं अर्धांगवायूनं निधन झालंय. “इथे एकही धड दवाखाना नाहीये. गरोदर बायांनादेखील दोन तास प्रवास करून जयनगरला जावं लागतं, तिथे दवाखाने आहेत,” त्या वैतागून सांगतात. सुंदरबनमधली पुरुषांची संख्या घटत चाललीये, बऱ्या उपजीविकांच्या शोधात ते इथनं बाहेर पडतायत. बरेचसे शहरांमध्ये बांधकामावर कामं करतायत किंवा मग हातात पैसा यावा म्हणून वाघांच्या शिकारीत सामील होतात.

PHOTO • Urvashi Sarkar

सुंदरबनमधल्या प्रस्तावित पर्यटन उपक्रमांमध्येही आपला काहीच वाटा नाही याबद्दल या बायांच्या मनात कटुता आहेत. “पर्यटनाच्या उपक्रमांमध्ये ते आम्हाला का सामील करून घेत नाहीत? त्यातून आम्हाला जर बरी कामं मिळतील, बरे पैसे हातात पडतील. कुणालाच आमच्यासाठी बरं काहीच करायचं नाहीये बहुतेक. आता हेच बघा, मोठ्या बोटीसुद्धा आमच्यासारख्याच मासे आणि खेकडे पकडतात. पण वनखातं मात्र केवळ आमच्याच मागे लागलंय.”

मासेमारीचा परवाना

त्यांचं आयुष्य कमी खडतर म्हणून की काय वन खात्याकडून त्यांच्या डोंग्या जप्त केल्या जातात आणि त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर टाकली जाते. आणि कारण काय दिलं जातं तर त्यांच्या डोंग्यांना बोट परवाना प्रमाणपत्र नाही. वन खात्याकडून देण्यात येणारा परवाना त्यांच्याकडे नसल्याने त्यांना सुंदरबनमध्ये नाव चालवण्याची परवानगी नाही. कुलतली सुंदरबनच्या राखीव वनामध्ये मोडत असल्यामुळे या मच्छिमार महिलांना परवाना नसेल तर त्यांच्या स्वतःच्या भूमीतच मासे धरायला परवानगी नाही.

पण या परवाना पद्धतीतही त्रुटी आहेतच. हा परवाना अहस्तांतरणीय आहे, अनेक जण आता मासेमारी करत नाहीत मात्र त्यांच्याकडे हे परवाने आहेत, काळा बाजार तेजीत आहे आणि नव्याने परवाने देण्याचं काम थांबलेलं आहे. इंटरनॅशनल कलेक्टिव्ह इन सपोर्ट ऑफ फिशवर्कर्स या संघटनेने केलेल्या सुंदरबनच्या मच्छीमारांच्या अभ्यासात याची तपशीलवार माहिती दिलेली आहे. मच्छिमारांना अटकाव करण्यासाठी वनखातं त्यांची जाळी जप्त करण्यासारखे उपाय अवलंबतं. बायांनी अशीही तक्रार केली की नदीकिनारच्या रेतीत काचांचा चुरा मिसळण्याची देखील धमकी देण्यात आलेली आहे. त्या अनवाणी जात असल्याने त्यांना अटकाव करण्यासाठी हा मार्ग. 

PHOTO • Urvashi Sarkar

“जंगलावर अवलंबून असलेल्या मच्छिमार स्त्रियांना जंगलातल्या पाण्यात मासे धरण्याचे सामुदायिक हक्क नाकारणं हे वन हक्क कायद्याचं उल्लंघन आहे,” दक्षिणबंग मत्स्यजीबी फोरमचे अध्यक्ष प्रदीप चॅटर्जी सांगतात. वनांमध्ये राहणाऱ्यांच्या हक्कांचं रक्षण तसंच त्यांच्या अधिवासातील जैवविविधतेचा शाश्वत वापर आणि संवर्धन ही वन हक्क कायद्याची ध्येयं आहेत.

ते नमूद करतात की अनेकदा आवाहन करूनही पश्चिम बंगाल शासनाने नॉर्थ व साउथ २४ परगणा जिल्ह्यांमध्ये वन हक्क कायदा लागू केलेला नाही. “इथे कायदा लागू केलेला नसल्यामुळे जंगलांवर अलवंबून असणाऱ्या अनेकांना त्यांच्या उपजीविकेचा अधिकारच नाकारण्यात येतोय. उदा. मच्छीमार, मध गोळा करणारे, वाळलेली लाकडं गोळा करणारे, शंखशिंपले गोळा करणारे आणि इतरही अनेक. त्यामुळे वन खात्याशी सततच संघर्ष सुरू असतो.” वन हक्क कायद्याची अंमलबजावणी झाल्यास मच्छीमारांना परवान्याशिवाय खेकडे पकडता येऊ शकतील.

आशा आणि विजय

बीट अधिकारी येईपर्यंत संध्याकाळचे ६ वाजून गेले होते. त्यांनी महिला डोंगा समिती आणि दक्षिण मत्स्यजीबी फोरमच्या सदस्यांशी संवाद साधला. अधिकाऱ्याने सांगितलं की डोंग्या जप्त करण्यात आल्या कारण त्यांचा वापर शिकारीसाठी केला जात होता. डोंग्या वापरून शिकार करण्याच्या घटना अधून मधून घडत असतात पण म्हणून अख्ख्या मच्छीमार समुदायाला अशा प्रकारे शिक्षा करणं योग्य नाही असं या स्त्रियांचं म्हणणं होतं.

PHOTO • Urvashi Sarkar

जेव्हा शिकारीच्या घटना घडतील तेव्हा त्यांनी वन खात्यासाठी खबऱ्या म्हणून काम करण्याचं कबूल केलं मात्र मासेमारीसाठी डोंगी वापरण्याचा त्यांना अधिकार आहे यावर त्या ठाम होत्या.

वाघाच्या अधिवासात शिरल्यावर मच्छीमारांच्या मृत्यूच्या घटना घडतात आणि मग सरकारला भरपाई द्यावी लागतेय याबाबत त्या अधिकाऱ्याने कुरकूर केल्यावर मच्छीमारांनी त्याला जाणीव करून दिली की ते काही मजा म्हणून वाघाच्या अधिवासात शिरत नाहीत. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून त्यांना जावं लागतं.

चर्चा संपली. रात्र झालीये. तात्पुरता का असेना आपला विजय झाला म्हणून या बाया खूश आहेत. एका डोंगीत बसून त्या सुंदरबनच्या काळ्याशार पाण्यात निघून जातायत. अनिमा या संथ नितळ पाण्याकडे आणि घराच्या दिशेने डोळे लावून बसल्या आहेत.

लेखिका साउथ सॉलिडॅरिटी इनिशिएटिव्हसोबत संशोधक म्हणून काम करते तसंच एक पत्रकार आहे.

छायाचित्रं, साभारः दक्षिणबंग मत्स्यजीबी फोरम

अनुवादः मेधा काळे 

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

ऊर्वशी सरकार स्वतंत्र पत्रकार आणि पारीच्या २०१६ च्या फेलो आहेत. आपण लेखिकेशी येथे संपर्क साधू शकता: @storyandworse

Other stories by Urvashi Sarkar