बाळंतपणानंतर दीपा दवाखान्यातून घरी आली तेव्हा आपल्या गर्भाशयात तांबी बसवलीये याची तिला सुतराम कल्पना नव्हती.

तिचं दुसरं बाळ जन्माला आलं होतं, दुसरा मुलगा. तिला नसबंदी करून घ्यायची होती. पण सिझेरियन झालं होतं त्यामुळे, दीपा सांगते, “डॉक्टरांनी सांगितलं की सिझेरियन आणि नसबंदी एकाच वेळी करता येत नाहीत.”

त्यामुळे डॉक्टरांनी दीपाला तांबी बसवून घेण्याचा सल्ला दिला. दीपा आणि तिचा नवरा नवीन (दोघांची नावं बदलली आहेत) यांना वाटलं होतं की डॉक्टर फक्त  सल्ला देतायत.

२०१८ च्या मे महिन्यात बाळंतपणानंतर चार दिवसांनी २१ वर्षीय दीपाला दिल्लीच्या शासकीय दीनदयाळ उपाध्याय हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं. “आम्हाला कल्पनाच नव्हती की डॉक्टरांनी तांबी बसवून टाकली होती,” नवीन सांगतो.

साधारण एक आठवडाभरानंतर त्यांच्या भागातल्या आशा कार्यकर्तीने हॉस्पिटलने घरी जाताना दिलेले कागद वाचले तेव्हा कुठे त्यांना काय झालंय ते लक्षात आलं. दीपा आणि नवीन दोघांनीही त्या आधी ते काही वाचलेले नव्हते.

तांबी हे गर्भाशयात बसवण्याचं गर्भनिरोधक साधन आहे. यामुळे गर्भ गर्भाशयाच्या भिंतीवर रुजत नाही. “काही वेळा तांबीची सवय होण्यासाठी तीन महिने लागू शकतात आणि काही जणींना त्याचा त्रासही होऊ शकतो. म्हणून आम्ही दवाखान्यात नियमित [सहा महिन्यांपर्यंत] येऊन तपासणी करून जायला सांगतो,” ३६ वर्षीय सुशीला देवी सांगतात. त्या २०१३ सालापासून दीपाच्या परिसरात आशा कार्यकर्ती म्हणून काम करत आहेत.

पण पहिल्या तीन महिन्यांमध्ये दीपाला कसलाच त्रास झाला नाही. तिच्या थोरल्या मुलाचं काही तरी आजारपण सुरू असल्याने ती तपासणीसाठी दवाखान्यात देखील गेली नाही. तिने तांबी वापरावी असं ठरवलं.

Deepa at her house in West Delhi: preoccupied with her son’s illness, she simply decided to continue using the T
PHOTO • Sanskriti Talwar

पश्चिम दिल्लीतील आपल्या घरी दीपाः आपल्या थोरल्या मुलाच्या आजारपणामुळे दीपाला वेळ नव्हता आणि तिने तांबी वापरावी असं ठरवलं

त्यानंतर बरोबर दोन वर्षांनी, २०२० च्या मे महिन्यात दीपाला पाळी आली आणि त्यानंतर खरी समस्या सुरू झाली – तिला प्रचंड वेदना व्हायला लागल्या.

काही दिवस उलटले तरी दुखायचं थांबलंच नाही तेव्हा ती पायीच दिल्लीच्या बक्करवाला भागातल्या आम आदमी मोहल्ला क्लिनिकमध्ये गेली. तिच्या घरापासून हा दवाखाना दोन किलोमीटरवर आहे. “त्रास कमी व्हावा म्हणून डॉक्टरांनी काही तरी औषधं दिली,” दीपा सांगते. पुढचा महिनाभर तिने तिथे उपचार घेतले. “माझा त्रास काही कमी होईना तेव्हा बक्करवालामधल्या दुसऱ्या मोहल्ला क्लिनिकमधल्ये स्त्री डॉक्टरला भेटायला सांगितलं,” ती सांगते.

दीपा ज्या दवाखान्यात गेली तिथे डॉ. अशोक हंस प्रमुख वैद्यकीय अधिकारी होते. ते दिवसाला जवळ जवळ २०० रुग्ण तपासतात आणि त्यांना दीपाबद्दल फारसं काही लक्षात नाही. “अशी काही केस आमच्याकडे आली तर आम्ही उपचार करतो,” ते सांगतात. “जर पाळीचं काही असेल [अनियमितता, वगैरे] तर आम्ही ते नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतो. नाही तर आम्ही सोनोग्राफी करायला सांगतो आणि दुसऱ्या सरकारी दवाखान्यात पाठवतो.” या दवाखान्यातही दीपाला सोनोग्राफी करायला सांगण्यात आलं होतं.

“ती इथे आली होती तेव्हा तिने आम्हाला फक्त पाळीची तक्रार सांगितली होती. ती पहिल्यांदा इथे आली तेव्हा तिने जो त्रास होतोय असं सांगितलं त्या आधारावर आम्ही तिला लोह आणि कॅल्शियम घ्यायला सांगितलं,” बक्करवालाच्या छोट्या मोहल्ला क्लिनिकमधल्या डॉ. अमृता नादर सांगतात. “तांबीचं ती काहीच म्हटली नाही. नाही तर आम्ही सोनोग्राफी करून ती कुठे आहे ते जरा पाहिलं असतं. तिने पूर्वी केलेला एक सोनोग्राफीचा रिपोर्ट दाखवला, त्यात सगळं काही नीट दिसत होतं.” दीपाचं मात्र म्हणणं आहे की तिने डॉक्टरांना तांबीबद्दल सांगितलं होतं.

२०२० च्या मे महिन्यात प्रचंड वेदना सुरू झाल्या त्यानंतर तिचा त्रास वाढतच गेला. “तेव्हा पाळी आली आणि पाच दिवस राहिली. एरवी देखील तितकीच यायची,” ती सांगते. “पण नंतरच्या महिन्यांमध्ये मात्र, विचित्रच रक्तस्राव व्हायला लागला. जूनमध्ये दहा दिवस पाळी सुरू होती. पुढच्या महिन्यात १५ दिवस. आणि १२ ऑगस्टला पाळी आली तेव्हा तर महिनाभर अंगावरून जात होतं.”

दिल्लीच्या पश्चिमेकडच्या नंगलोई-नजफगढ़ रोडवरच्या आपल्या घरी लाकडी दिवाणावर दीपा बसली होती. त्यांच्या सिमेंटचं बांधकाम केलेल्या दोन खोल्या आहेत. “त्या काळात काही हालचाल करण्याचंही त्राण माझ्यात नव्हतं. पाऊल टाकायचं म्हटलं तरी त्रास व्हायचा. गरगरायचं. मी नुसती पडून रहायचे. काही कामसुद्धा व्हायचं नाही. कधी कधी पोटात प्रचंड कळा यायच्या. अंगावरून इतकं जायचं की दिवसातून चार वेळा कपडे बदलायला लागायचे. कधी कधी चादरसुद्धा खराब व्हायची.”

Deepa and Naveen with her prescription receipts and reports: 'In five months I have visited over seven hospitals and dispensaries'
PHOTO • Sanskriti Talwar

दीपा आणि नवीन औषधांच्या चिठ्ठ्या आणि रिपोर्ट दाखवतायतः ‘पाच महिन्यांच्या काळात मी सात हॉस्पिटल आणि दवाखान्यांना जाऊन आले असेन’

२०२० साली जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दीपा दोन वेळा बक्करवालाच्या छोट्या दवाखान्यात जाऊन आली. दोन्ही वेळी डॉक्टरांनी तिला काही तरी गोळ्या औषधं दिली. “आम्ही शक्यतो काय करतो तर औषधं दिल्यावर एक महिना पाळीत काही बिघाड नाही ना यावर लक्ष ठेवायला सांगतो. आमच्या दवाखान्यांमध्ये आम्ही फक्त साधे उपचार करू शकतो. पुढच्या तपासणीसाठी मी तिला सरकारी रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागात जायला सांगितलं,” डॉ. अमृता मला सांगतात.

ऑगस्टच्या मध्यावर कधी तरी दीपा बसने जवळच्याच गुरू गोबिंद सिंग हॉस्पिटलला गेली. (हे हॉस्पिटल तिच्या घरापासून १२ किमी अंतरावर आहे.) तिथल्या डॉक्टरने निदान केलं - ‘मेनोरेजिया’ म्हणजेच मासिक पाळीत जास्त किंवा जास्त काळ रक्तस्राव होणे.

“मी दोनदा हॉस्पिटलला गेले,” दीपा सांगते. “दर वेळी ते दोन आठवड्यांची औषधं द्यायचे. पण दुखत होत ते काही थांबलंच नाही.”

दीपा आता २४ वर्षांची आहे. तिने दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. ती अगदी तीन महिन्यांची असताना तिचे आई-वडील कामाच्या शोधात बिहारच्या मुझफ्फरपूरमधून देशाच्या राजधानीत, दिल्लीत आले. तिचे वडील एका छापखान्यात काम करायचे आणि आता स्टेशनरीचं एक लहानसं दुकान चालवतात. तिचा नवरा, नवीन, वय २९ राजस्थानच्या दौसा जिल्ह्याचा रहिवासी असून त्याचं शिक्षण दुसरीपर्यंत झालं आहे. २०२० साली मार्च महिन्यात टाळेबंदी लागली आणि शाळा बंद झाल्या. तोपर्यंत नवीन दिल्लीत शाळेच्या बसवर मदतनीस म्हणून काम करायचा.

या दोघांचं लग्न २०१५ साली ऑक्टोबर महिन्यात झालं आणि त्यानंतर लगेचच दीपाला दिवस गेले. पहिला मुलगा झाला. घरची परिस्थिती बिकट होती त्यामुळे दीपाला वाटत होतं की एकाच मुलावर थांबावं. पण तिचा मुलगा दोन महिन्यांचा असल्यापासून सारखा आजारीच असतो.

“त्याला 'डबल न्यूमोनिया' आहे. त्याच्या उपचारासाठी डॉक्टर म्हणतील तितके पैसे आम्ही खर्च केलेत,” ती सांगते. “एकदा एका हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी तर चक्क सांगितलं की त्याची तब्येत पाहता तो जगेल वाचेल असं काही वाटत नाही. त्यानंतर मग घरच्यांनी आणखी एक मूल होऊ द्या म्हणून गळ घातली.”

The couple's room in their joint family home: 'I felt too weak to move during those days. It was a struggle to even walk. I was dizzy, I’d just keep lying down'
PHOTO • Sanskriti Talwar
The couple's room in their joint family home: 'I felt too weak to move during those days. It was a struggle to even walk. I was dizzy, I’d just keep lying down'
PHOTO • Sanskriti Talwar

दीपा आणि नवीन एकत्र कुटुंबात राहतात. घरातली त्यांची खोली. ‘त्या दिवसात मला खूपच अशक्त वाटायचं. पाऊल टाकायचं तरी त्रास व्हायचा. गरगरायंच. मी नुसती पडून रहायचे’

लग्नाच्या आधी दीपा एका खाजगी प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नोकरी करायची. तिला महिन्याला ५,००० रुपये पगार मिळत होता. लग्नानंतरही नोकरी सुरू ठेवायची तिची इच्छा होती. मात्र मुलाच्या आजारपणामुळे तिला ती सोडावी लागली.

तिचा थोरला मुलगा आता पाच वर्षांचा आहे. दिल्लीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दर तीन महिन्यांनी दीपा बसने त्याला तिथे तपासायला घेऊन जाते. कधी कधी तिचा भाऊ मोटरसायकलवर त्या दोघांनी तिथे घेऊन जातो.

३ सप्टेंबर २०२० रोजी असंच एकदा ती मुलाला लोहिया हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती. तेव्हा तिने तिथल्या स्त्रीरोग विभागात जाऊन तपासून घ्यायचं ठरवलं. इतक्या सगळ्या दवाखान्यांमध्ये जाऊनही जो त्रास काही थांबला नव्हता त्याच्यावर उपाय शोधण्याचा आणखी एकदा प्रयत्न करून पहावा असा तिने विचार केला.

“तिथे हॉस्पिटलमध्ये [कशामुळे वेदना होतायत त्याचं] कारण शोधायला सोनोग्राफी केली गेली, पण काहीही हाती लागलं नाही,” दीपा सांगते. “डॉक्टरांनी तांबी शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना दोरा हाताला लागला नाही. मग त्या डॉक्टरनी सुद्धा मला काही औषधं दिली आणि २-३ महिन्यांनी परत यायला सांगितलं.”

इतका रक्तस्राव कशामुळे होतोय हे काही अजूनही कळत नव्हतं. मग ४ सप्टेंबर रोजी दीपा घराजवळच्या एका खाजगी डॉक्टरकडे गेली. “इतका सगळा रक्तस्राव होत असताना तुम्ही तो सहन तरी कसा केला असं डॉक्टरनी विचारलं. तिनी पण तांबी कुठे आहे ते शोधायचा प्रयत्न केला. पण तिलाही ती सापडली नाही,” दीपा सांगते. तपासायचे २५० रुपये झाले. त्याच दिवशी घरच्या कुणाच्या तरी सल्ल्यावरून दीपाने एका खाजगी लॅबमध्ये जाऊन कटिर पोकळीचा एक्स रे काढला. त्याचे ३०० रुपये झाले.

रिपोर्टमध्ये लिहिलं होतं – ‘तांबी कटिर पोकळीच्या वरच्या भागात अडकली आहे.’

Deepa showing a pelvic region X-ray report to ASHA worker Sushila Devi, which, after months, finally located the copper-T
PHOTO • Sanskriti Talwar
Deepa showing a pelvic region X-ray report to ASHA worker Sushila Devi, which, after months, finally located the copper-T
PHOTO • Sanskriti Talwar

दीपा आशा कार्यकर्ती सुशीला देवींना आपला एक्स रे रिपोर्ट दाखवतीये. अनेक महिन्यांनतर अखेर तांबी कुठे आहे ते या रिपोर्टमध्ये समजलं

“प्रसूतीनंतर लगेच किंवा सिझेरियन झाल्यानंतर लगेच तांबी बसवली तर ती सरकण्याची किंवा वाकडी होण्याची शक्यता असते,” दिल्ली स्थित स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना गुप्ता सांगतात. “कारण या दोन्ही स्थितीत गर्भाशय ताणलेलं असतं, आतली जागा मोठी झालेली असते आणि ते मूळ आकाराएवढं व्हायला काही काळ जातो. आणि हे सगळं होत असताना आत बसवलेली तांबी तिरकी होऊ शकते. तसंच एखाद्या बाईला पाळीच्या काळात पोटात वांब येत असतील तरीसुद्धा तांबी तिरपी होऊ शकते किंवा सरकू शकते.”

आशा कार्यकर्ती सुशीला देवींच्या मते या तक्रारी नेहमीच ऐकायला मिळतात. “तांबीबद्दल किती तरी बाया तक्रार करतात,” त्या म्हणतात. “अनेकदा त्या म्हणतात की तांबी आता पोटापर्यंत पोचलीये आणि त्यांना ती काढून टाकायचीये.”

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी – ४ (२०१५-१६) नुसार केवळ १.५ टक्के स्त्रियांनी तांबी वापरण्यास पसंती दिल्याचं दिसतं. तर भारतात १५-४९ वयोगटातल्या ३६ टक्के स्त्रिया नसबंदी करून घेण्यास प्राधान्य देतात.

“मी इतर बायांकडून ऐकलं होतं की तांबी सगळ्यांना चालत नाही आणि त्यातून काही समस्या निर्माण होऊ शकतात,” दीपा सांगते. “मलासुद्धा पहिली दोन वर्षं काहीच त्रास झाला नव्हता.”

कित्येक महिने प्रचंड रक्तस्राव आणि वेदना सहन केल्यानंतर अखेर सप्टेंबर महिन्यात दीपाने दिल्लीच्या वायव्येकडच्या पीतमपुऱ्यातल्या भगवान महावीर या सरकारी रुग्णालयात जाण्याचं ठरवलं. रुग्णालयात सुरक्षा विभागात काम करणाऱ्या एकाने तिला तिथल्या डॉक्टरला भेटण्याचा सल्ला दिला. अर्थात कोविड-१९ ची तपासणी केल्यानंतरच. त्यामुळे ७ सप्टेंबर २०२० रोजी घराजवळच्या दवाखान्यात तिने कोविडची तपासणी केली.

त्यात तिला कोविडचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आणि पुढचे दोन आठवडे तिला विलगीकरणात रहावं लागलं. कोविडचा संसर्ग नसल्याचा अहवाल आल्याशिवाय तिला तांबी काढून टाकण्यासाठी कोणत्याही दवाखान्यात जाता आलं नाही.

'We hear many women complaining about copper-T', says ASHA worker Sushila Devi; here she is checking Deepa's oxygen reading weeks after she tested positive for Covid-19 while still enduring the discomfort of the copper-T
PHOTO • Sanskriti Talwar

‘किती तरी स्त्रिया तांबीबद्दल तक्रारी घेऊन येत असतात’, आशा कार्यकर्ती सुशीला देवी सांगतात. कोविडचा संसर्ग झाल्यानंतर त्या दीपाच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासतायत. दीपाचा पाळीचा त्रास तसाच सुरू आहे

मार्च २०२० मध्ये देशभरात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आणि शाळा बंद झाल्या. दीपाचा नवरा आतापर्यंत शाळेच्या बसचा वाहक म्हणून काम करत होता. महिना ७,००० पगाराची त्याची नोकरी गेली आणि पुढचे पाच महिने त्याला काम नव्हतं. त्यानंतर त्याने अधून मधून जवळच्या एका आचाऱ्याच्या हाताखाली काम केलं. त्याचे दिवसाला ५०० रुपये मिळायचे. (अगदी गेल्याच महिन्यात, ऑगस्ट २०२१ मध्ये त्याला बक्करवाला परिसरातल्या एका मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यात महिना ५,००० रुपये पगारावर काम मिळालं आहे.)

२५ सप्टेंबर रोजी कोविड-१९ चाचणीमध्ये दीपाला संसर्ग नसल्याचं निदान झालं, त्यानंतर तिला परत दीनदयाल उपाध्याय हॉस्पिटलमध्ये परत जायला सांगितलं. याच हॉस्पिटलमध्ये २०१८ साली मे महिन्यात दीपाच्या बाळंतपणानंतर तांबी बसवण्यात आली होती.

२०२० च्या ऑक्टोबरचा पहिला आठवडा स्त्रीरोग विभागाच्या बाह्योपचार विभागाच्या चकरा मारण्यात गेला. “मी डॉक्टरांना तांबी काढून टाकायला सांगितलं आणि नसबंदी करण्याची विनंती केली. पण तिथल्या डॉक्टरनी मला सांगितलं की कोविड-१९ मुळे सध्या हॉस्पिटलमध्ये नसबंदीच्या शस्त्रक्रिया होत नाहीयेत म्हणून,” दीपा सांगते.

एकदा का या सेवा-सुविधा सुरू झाल्या की तिची नसबंदी होईल आणि त्यानंतर तिला तांबी काढून घेता येईल असं तिला सांगण्यात आलं.

डॉक्टरांनी आणखी काही औषध गोळ्या लिहून दिल्या. “डॉक्टर म्हणाले की काही त्रास झाला तर आम्ही काळजी घेऊ. पण या औषधांनी बरं वाटायला पाहिजे,” गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या मध्यावर दीपाने मला सांगितलं होतं.

(दीपाच्या तब्येतीसंबंधी मी नोव्हेंबर २०२० मध्ये दीनदयाल उपाध्याय हॉस्पिटलच्या स्त्री रोग विभागाच्या ओपीडीमध्ये गेले आणि विभागप्रमुखांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी डॉक्टर कामावर आले नव्हते. तिथे असलेल्या दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की आधी मला हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालकांची परवानगी घ्यावी लागेल. मी संचालकांशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही.)

PHOTO • Priyanka Borar

‘तिनी [तांबी काढून टाकण्यासाठी] काही अवजार वापरलं का ते माहित नाही... पण दाई मला म्हणाली की आणखी दोन एक महिने जर तांबी काढून टाकली नसती तर माझ्या जिवाला धोका निर्माण झाला असता’

“महासाथीच्या काळात संपूर्ण लक्ष कोविडच्या व्यवस्थापनाकडे वळवावं लागल्यामुळे सगळ्या सरकारी रुग्णालयांना मोठा फटका बसला, या शहरालाही त्याच्या झळा लागल्याच. नसबंदीसारख्या कायमस्वरुपी गर्भनिरोधनाच्या पद्धती खूपच मागे पडल्या. पण तात्पुरत्या पद्धती मात्र जास्त प्रमाणात उपलब्ध होत होत्या. शक्य त्या प्रकारे आम्ही या सुविधा मिळत राहील यासाठी प्रयत्न करत राहिलो,” दिल्ली कुटुंब कल्याण संचलनालयातील एक वरिष्ठ अधिकारी सांगतात.

“गेल्या वर्षी बरेच महिने कुटुंब नियोजनाच्या सगळ्या सेवा थांबलेल्या होत्या. या काळात किती तरी रुग्णांना आम्हाला परत पाठवावं लागलं होतं,” फौंडेशन फॉर रिप्रडक्टिव्ह हेल्थ सर्विसेस इन इंडिया या संस्थेच्या चिकित्सा सेवा संचालक, डॉ. रश्मी आर्डे सांगतात. “आता, तसंही परिस्थिती जरा सुधारली आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी आता सरकारी मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. मात्र महासाथीच्या पूर्वी सेवांचा जो स्तर होता, तितपर्यंत काही आपण अजून पोचू शकलेलो नाही. आणि याचा स्त्रियांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होणार आहे.”

आता आपल्या समस्या दूर करण्यासाठी पुढे नक्की काय करायचं याबद्दल काहीच समजत नसल्याने अखेर १० ऑक्टोबर रोजी दीपा आपल्या परिसरातल्या एका सुइणीकडे गेली. तांबी काढून टाकण्यासाठी तिने तिला ३०० रुपये दिले.

“तिने [तांबी काढून टाकण्यासाठी] काही अवजार वापरलं का माहित नाही. वापरलंही असेल. मी जमिनीवर आडवी पडले होते. तिची मुलगी वैद्यकीय शिक्षण घेतीये. तिने तिची मदत घेतली. त्यांना दोघींना ४५ मिनिटं लागली,” ती सांगते. “ती मला म्हणाली, जर अजून एक दोन महिने ही तांबी काढून टाकली नसती तर माझ्या जिवाला धोका निर्माण झाला असता.”

तांबी काढून टाकल्यापासून दीपाची अनियमित पाळी आणि दुखणं थांबलं आहे.

वेगवेगळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठ्या आणि अनेक हॉस्पिटलमधले रिपोर्ट आपल्या दिवाणावर मांडत दीपा सप्टेंबर २०२० मध्ये मला म्हणाली होतीः “या पाच महिन्यांमध्ये मी सात हॉस्पिटल आणि दवाखान्यांच्या चकरा मारल्या आहेत.” तेही अशा काळात जेव्हा तिला आणि नवीनला काम मिळत नव्हतं आणि होता तो पैसाही अगदी मोजकाच म्हणावा इतका.

दीपाला आणखी मुलं नको आहेत आणि येत्या काळात नसबंदी करून घेण्याचा तिचा विचार आहे. तिला लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायचीये. “मी अर्जसुद्धा आणलाय,” ती म्हणते. आपल्या कुटुंबाला आधार देण्याचा, पुढे जाण्याचा तिचा निर्धार आहे. या महासाथीने आणि तांबीने त्यात अडथळा आला होता इतकंच.

पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा

Sanskriti Talwar

سنسکرتی تلوار، نئی دہلی میں مقیم ایک آزاد صحافی ہیں اور سال ۲۰۲۳ کی پاری ایم ایم ایف فیلو ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Sanskriti Talwar
Illustration : Priyanka Borar

پرینکا بورار نئے میڈیا کی ایک آرٹسٹ ہیں جو معنی اور اظہار کی نئی شکلوں کو تلاش کرنے کے لیے تکنیک کا تجربہ کر رہی ہیں۔ وہ سیکھنے اور کھیلنے کے لیے تجربات کو ڈیزائن کرتی ہیں، باہم مربوط میڈیا کے ساتھ ہاتھ آزماتی ہیں، اور روایتی قلم اور کاغذ کے ساتھ بھی آسانی محسوس کرتی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Priyanka Borar
Editor and Series Editor : Sharmila Joshi

شرمیلا جوشی پیپلز آرکائیو آف رورل انڈیا کی سابق ایڈیٹوریل چیف ہیں، ساتھ ہی وہ ایک قلم کار، محقق اور عارضی ٹیچر بھی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز شرمیلا جوشی
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے