आकाशीचा चांद बाई माझ्या अंगणात गं... असा आर्त सुर कानी पडला. या सुरावटीत मला आव्हानात्मक आवेश आणि वेदनेचा आक्रोश यांचा मिलाप झाल्या सारखे वाटून गेले. ज्याच्यावर सारे जीव ओवाळून टाकतात, पण जो आपल्या पेक्षा अनेक योजने दूर आहे असा आकाशातील चंद्र माझ्या अंगणात रोज येतो. मी खरेच भाग्यवान आहे.

आम्ही जात्यावरील ओव्या संकलित करण्यासाठी ताडकळस येथे आलो होतो. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात हे गाव आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक आणि मराठीचे प्राध्यापक असलेल्या शाम पाठक यांचे हे गाव. आम्ही जात्यावरील ओव्या संकलित करतो आहे हे समजल्यावर त्यांनी आम्हाला आवर्जून स्वतःच्या गावी आणले.

गावातील एका वाड्यात आठ दहा महिला जमल्या होत्या. जात्यावर ओव्यांचे गायन चालले होते. एक जण सुरू करायची आणि बाकीच्या मागे म्हणायच्या. घोस किल्ल्याचा, इवाई केला बाई बीड जिल्ह्याचा ओव्यांच्या शब्दांप्रमाणे त्यांच्या चाली आणि गाणारे गळेही गोड होते. हे सर्व चालू असतानाच, आकाशीचा चांद बाई..... या गाण्याचा सूर दूरुन ऐकू आला. त्या आवाजाने माझ्यासह इतरांचेही लक्ष वेधलं. एक बाई म्हणाल्या, “गंगुबाईला बोलवा की, तिला चांगल्याच ओव्या येतात.” आम्ही म्हणालो, “ज्यांना ज्यांना ओव्या येतात, त्या सर्व महिलांना बोलवा. आम्ही त्यांच्या ओव्या लिहून घेणार आहोत. समाजाचा लोप पावत चाललेला हा ठेवा कुठेतरी नोंदविण्याची गरज आहे.” एक लहान मुलगी गंगुबाईला बोलवायला गेली.

विटलेल्या रंगाची साडी, डोक्यावरुन घेतलेला पदर एका हाताने गुंडाळून तो तोंडाजवळ घेतलेल्या साठीच्या घरातील एक बाई वाड्यात आल्या. केस पांढरे, तोंडावर सुरकुत्या, दातवणामुळे किंवा अन्य कारणाने त्यांचे दात काळे दिसत होते. त्यांच्याकडे पाहिल्यावर या बाईंनी खुप काही सहन केलेले आहे हे जाणवत होते. तरीही त्यांच्या चेह-यावर एक हास्य दिसत होते. बायांनी गंगुबाईला ओवी गाण्याचा आग्रह केला. त्यांनीही फारसे आढेवेढे न घेता, ओव्या सांगितल्या. राम, भाऊ, सीतेचा वनवास, आई, बाप अशा अनेक विषयावर त्यांनी ओव्या सांगितल्या.


ध्वनीफीत – ओवी गाताना गंगूबाई


ओवी सांगताना त्या सारख्या डोळे पुसायच्या. तोंडावरुन हात फिरवायच्या. ये, तुम्ही सांगाना गाणे, असेही इतरांना म्हणायच्या. पण गंगुबाईंनी जे अनुभवले होते, दुःख सहन केले होते, तेवढे इतर कोणीही नसावे. त्यांचे गाणे हृदयाला भिडणारे होते. त्यामुळेच त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा वाढली.

गावातील मंदिरात त्या रहात होत्या. मंदिरात देवाला ठेवलेला निवेद, लोकांनी केलेले अन्नदान यावरच गंगुबाईचा गुजारा चालू आहे. गंगुबाई शेतकरी कुटंबातल्या. लाडात वाढल्या. लहान वयात आई वडिलांनी बिजवराशी लग्न करुन दिले. सासर घरी रमल्या. तीन मुली झाल्या, पण एकच जगली. कुष्टरोग झाला आणि परिस्थिती बदलली. हातापायाची बोटं झडली, सौंदर्याची जागा कुरुपता घेवू लागली. नव-याने दूर लोटले.  नाइलाजाने गंगुबाईला माहेरी यावे लागले. तेव्हा त्या चाळिशीच्या होत्या. आइ-वडलांमागे काही काळ भावाने आधार दिला. पण भाऊ आपला, भावजयी परक्याची. ती किती दिवस सहन करणार. शेवटी भावाने बाहेरचा रस्ता दाखवला. सगळ्यांनीच नाकारल्यावर देवाने जवळ केले. आता देऊळच त्यांचे घर बनले होते.

गंगुबाई म्हणत होत्या, "आता मला माझ्या रामाचाच आधार आहे, माझे भांडण त्याच्याशीच आहे. मला तुम्ही घराबाहेर काढू शकाल, पण मंदिरा बाहेर नाही. माझ्या रामापासून मला कोणी दूर करु शकणार नाही."


Gangubai_village_voice_Marathi_soul_ Andreine_Bel


एकाकी पडलेल्या, नाकारलेल्या मनाने आधार घेतला नाम जपाचा. देवळात चालणारे भजन, किर्तन, पूजा, आरती, भाविक, रिकाम्या वेळात खेळणारी मुले यांच्याकडे बघत गंगुबाईचा दिवस पुढे सरकत होता. आपल्या अंतरंगातील वेदना तीच्या सुरावटीतून बाहेर पडू लागली. हरी भजन करताना, देवाला जाब विचारु लागली. संत तुकडोजी महाराज, सूरदास, जनाबाई यांच्या रचना गंगुबाईला मुखोदगत झाल्या.

तिचे गाणे लोकांचे लक्ष वेधू लागले. त्यामुळेच कोठेही लग्नाची हळद असली की गंगुबाईला गाणे म्हणायला बोलवा असे बाया म्हणायच्या. बाहेरच, थोडे दूर थांबून, तोंडाला पदर लावत गंगुबाई गाणे म्हणायची.

या गाण्यांसाठी का होईना लोकांना गंगुबाईची आठवण व्हायची. माझे अस्तित्व आता या गाण्यातच आहे याचे भान गंगुबाईला होते. जेव्हा आम्ही ओव्या गोळा करायला आलो. तेव्हा गंगुबाई जवळच्याच मंदिरात होती. वाड्यात चाललेल्या गाण्यांचा आवाज तीला ऐकू येत होता. मला अजून कोणी कसे बोलवायला येईना हे पाहून अस्वस्थ झालेली गंगुबाई, आकाशीचा चांद बाई माझ्या अंगणात गं... असे सांगून आम्हाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणिव करुन देत होती. त्यात ती यशस्वी झाली.

सामाजिक रचना, बाई म्हणून आधीच असलेले दुय्यम स्थान, त्यात कुष्टरोगामुळे मिळाणारी अप्रत्यक्ष अस्पृश्यतेची वागणूक, जवळच्यांनी नाकारल्यामुळे बसलेला धक्का, आणि बाई असूनही उघड्या मंदिरात राहण्याची नामुष्की गंगूबाईच्या आली. असे असतानाही गंगुबाईने कधी मला मदत करा अशी याचना कोणाकडे केलेली दिसली नाही. तसा अधिकार दाखवायला कोण होतं तिचं? सरकारी यंत्रणा, माणुसकी शिल्लक कुठे होती? तिच्या दुःखाचे गाऱ्हाणे तिने देवाकडे व्यक्त केले. गंगुबाई म्हणायच्या,  तुझे नाव मी रोज आवडीने घेते. त्यामुळे मला दुःख, वेदनेचा विसर पडतो.

गंगूबाईंनी आयुष्यबर दुःख आणि दारिद्र्य सोसलं. पण त्यांचा आत्मा समृद्ध-श्रीमंत होता. आणि त्यांच्याकडचं हे धन त्यांनी आपल्या ओव्यांमधून सगळ्यांना पुरेपूर वाटलं.

* * * * *

१९९६ ते २००० या काळात ताडकळसला तीन वेळा जाण्याचा योग मला आला. तीन्ही वेळा मी गंगुबाईंना आवर्जून भेटलो. त्यानंतर मात्र गंगुबाईची आणि माझी परत भेट झाली नाही. शाम पाठक सर वारल्यामुळे गंगुबाईचे काय चालले हे समजायला मार्ग नव्हता. मध्यंतरी त्यांचे भाऊ भेटले तेव्हा गंगुबाईंचे निधन झाल्याचे समजले. मन हळहळले.


जात्यावरची ओवी: जतन करूया एक राष्ट्रीय ठेवा

महाराष्ट्रातल्या खेडोपाडीच्या स्त्रियांनी गायलेल्या एक लाखाहून अधिक ओव्यांपैकी ही पहिली वहिली ओवी ऐका. हा अभूतपूर्व असा 'ग्राइंडमिल साँग्ज प्रोजक्ट - ओवी संग्रह' पारीवर नियमितपणे तुमच्या भेटीला येत राहणार आहे. संपूर्ण लेख वाचा

Jitendra Maid

جتیندر میڈ ایک آزاد صحافی ہیں جو زبانی روایتوں کا مطالعہ کرتے ہیں۔ وہ کئی سال پہلے پونہ کے سنٹر فار کوآپریٹو ریسرچ اِن سوشل سائنسز میں گائی پوئیٹیون اور ہیما رائیرکر کے ساتھ ریسرچ کوآرڈِنیٹر کے طور پر کام کر چکے ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Jitendra Maid