ओखी वादळ येऊन गेलं त्याला आठवडे लोटले तरी जॉन पॉल II रस्त्यावरच्या आपल्या घराच्या व्हरांड्यात अलेल अजूनही उभा होता. दोन वर्षांचा हा चिमुरडा येणाऱ्या प्रत्येकाकडे बघून हसत होता मात्र नजर घराच्या दिशेने येणाऱ्या कच्च्या पाउलवाटेवर खिळलेली होती. आता येतील ते त्याचे वडील येसूदास असतील हेच त्याच्या मनात होतं.
या रस्त्यावरची काही घरं चांदणी आणि चमचमत्या दिव्यांनी सजली होती. मात्र अजीकुट्टनच्या (अलेलचं घरचं लाडाचं नाव) घरी मात्र अंधार होता. आत त्याची आई, ३३ वर्षाची अजिता रडत होती. कित्येक दिवस ती अंथरुणातून उठलीच नव्हती. थोड्या थोड्या वेळाने अजीकुट्टन जाऊन तिला एक मिठी मारायचा आणि परत व्हरांड्यात येऊन उभा रहायचा.
२०१७ चा नाताळ यायच्या आधी काही दिवसांची ही गोष्ट. अजिताने लहानग्या अलेलला सांगितलं होतं की त्याचे बाबा नाताळपर्यंत परत येतील, येताना त्याच्यासाठी नवे कपडे आणि केक घेऊन येतील. पण अलेलचे बाबा परतलेच नव्हते.
अडतीस वर्षाचा येसुदास शिमायोन. ३० नोव्हेंबरला जेव्हा ओखी चक्रीवादळ येऊन थडकलं तेव्हा समुद्रात बोट घेऊन गेलेल्या मच्छिमारांपैकी एक. तिरुवनंतपुरम जिल्ह्याच्या नेय्यतिंकर तालुक्यातल्या करोडे गावात येसुदासचं तीन खोल्यांचं घर आहे. २९ नोव्हेंबर रोजी आपल्या चार साथीदारांसोबत तो समुद्रावर गेला. साथीला एक त्यांचा शेजारी – अलेक्झांडर पोडीथंपी, वय २८. बाकी तिघं तमिळ नाडूचे. अलेक्झांडर आणि त्याची पत्नी २१ वर्षीय जास्मिन जॉन, या दोघांची १० महिन्याची तान्ही मुलगी आहे, अश्मी अलेक्स.
शक्यतो ६-७ दिवस मासे धरल्यानंतर मच्छिमार परत येत असत. मग त्या मासळीचा लिलाव करून ते परत समुद्रावर जात असत. हा त्यांचा नेम होता. पण त्यांची बोट, ‘स्टार’ अजूनही सापडलेली नाही आणि तिच्याबद्दल कसलीही माहिती हाती लागलेली नाही. पोळियुर वस्तीतले किमान १३ मच्छिमार बेपत्ता आहेत. पोळियुर ही ३२,००० लोकसंख्येच्या करोडे गावची एक वस्ती.
त्या संध्याकाळी केरळ आणि तमिळ नाडूतले १५०० हून जास्त मच्छिमार समुद्रावर गेलेले होते. त्यांच्या कुटुंबियांनी माध्यमांना सांगितलं की त्यांना कोणत्याही सरकारी यंत्रणेकडून येऊ घातलेल्या वादळाबद्दलची कसलीही आगाऊ सूचना मिळालेली नव्हती.
मेबल अडिमाचे पती शिलू, वय ४५ आणि मुलगा मनोज, वय १८ हे दोघंही बेपत्ता आहेत. तेदेखील त्यात दिवशी समुद्रावर निघाले होते. ते नेहमीप्रमाणे एकत्र त्यांच्या वल्लरपडदम्मा बोटीवर जायचे. तिच्यावर बिनतारी संदेश यंत्रणा बसवलेली होती. करोडे गावच्या परुथियुर वस्तीचे रहिवासी असणारे बोटीचे मालक केजिन बॉस्को यांना ३० नोव्हेंबर रोजी एकदा समुद्र खवळला असल्याचा संदेश मिळाला होता. त्यानंतर मात्र सिग्नल मिळेनासा झाला.
शोधपथकाला नंतर या बोटीवरच्या दोघांचे मृतदेह सापडले. ते शिलू आणि मनोजचे साथीदार होते. त्यांना इतरही मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले मात्र समुद्राच्या लाटा इतक्या उंच होत्या की ते मृतदेह आणणं अशक्य झालं होतं. “माझी बोट, जाळी आणि इतर सगळी यंत्र सामुग्री समुद्रात स्वाहा झालीये,” बॉस्को सांगतात. “सगळं मिळून २५ लाखाचं नुकसान झालं आहे. बचाव पथकाला बोट काही परत आणता आली नाही. पण सगळ्यात मोठं दुःख म्हणजे आम्ही आमचे जिवलग मित्र गमावलेत. त्यांच्या कुटुंबियांचं दुःख आणि नुकसान मोजता न येणारं आहे.”
मेबलची १५ वर्षांची मुलगी, प्रिन्सी, १० वीत शिकते. नवरा आणि मुलगा बेपत्ता असल्याचं दुःख तर आहेच पण भरीत भर म्हणून प्रिन्सीचं शिक्षण आणि घर बांधण्यासाठी काढलेल्या ४ लाखाच्या कर्जाचा आता तिला घोर लागलाय.
ओखी (बंगाली भाषेत, डोळा) हे अरबी समुद्रातलं एक जोरदार वादळ ३० नोव्हेंबर रोजी केरळ आणि तमिळ नाडूच्या किनाऱ्यावर पोचण्याच्या एक दिवस आधी २९ तारखेला श्रीलंकेला जाऊन थडकलं. तमिळ नाडूच्या कन्याकुमारी आणि केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यात वादळाचा जोर जास्त होता मात्र कोळम, अळप्पुळा आणि मल्लपुरम जिल्ह्यांनाही वादळाचा तडाखा बसला
“मला आता लाटांची भीती बसलीये. आता काही मी परत समुद्रात जात नाही. शक्यच नाही,” ६५ वर्षांचे क्लेमंट बांजिलास सांगतात. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडलाय. तिरुवनंतपुरम तालुक्याच्या मुट्टतरा गावच्या पोंथुरा वस्तीचे रहिवासी असणारे क्लेमंट १२ वर्षाचे असल्यापासून समुद्रात जातायत. २९ तारखेला ते इतर तिघांसोबत दर्यावर गेले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे रात्र तशी शांत होती. पण दुसऱ्या दिवशी पहाटे ५ च्या सुमारात ते जसे किनाऱ्याकडे परतू लागले तसं हवामान पार बदलून गेलं. जोरदार वारे वाहू लागले आणि अचानक त्यांची बोट उलटली. क्लेमंट (तिरुवनंतपुरमच्या प्रेस क्लबमध्ये त्यांनी आपले अनुभव सांगितले) सांगतात त्यांनी बोटीतून एक रस्सी खेचून घेतली, एक कॅन पोटाला बांधला आणि त्याच्या सहाय्याने ते पाण्यावर तरंगत राहिले. डोक्यावरून खाली आदळणाऱ्या उंचउंच लाटा आणि धुँवाधार पाऊस असतानाही त्यांनी समुद्रात तब्बल सहा तास काढले. त्यानंतर एक दुसरी बोट आली आणि त्यांचे प्राण वाचले.
पंतप्रधान आणि केरळ राज्याच्या मत्स्य व्यवसाय मंत्री जे मर्सीकुट्टी अम्मा या दोघांनी वादळाचा तडाखा बसलेल्या गावांतल्या लोकांना असं आश्वासन दिलं की ते बेपत्ता असणाऱ्या लोकांना नाताळपूर्वी परत आणतील. भारतीय नौदल, सागरी सुरक्षा दल आणि हवाई दलाने हाती घेतलेल्या बचाव कार्यामध्ये जवळ जवळ ८०० मच्छिमारांना वाचवण्यात यश आलं असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी २७ डिसेंबर रोजी संसदेला सांगितलं. यातले ४५३ तमिळ नाडूतले, ३६२ केरळमधले आणि ३० लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांवरचे आहेत.
मात्र सरकारी यंत्रणांनी नाताळच्या दोन दिवस आधी शोध मोहीम थांबवली. लोकांनी जोरदार निदर्शनं केल्यानंतर २५ डिसेंबरला परत शोध सुरू करण्यात आला आणि तो अजूनही चालूच आहे.
केरळ सरकारच्या म्हणण्यानुसार राज्यातले १४३ जण अजूनही बेपत्ता आहेत. मात्र केंद्र सरकारच्या माहितीनुसार हा आकडा २६१ इतका आहे. तिरुवनंतपुरमच्या लॅटिन आर्चडायसिसने २४३ जणांची नावं गोळा केली आहेत. तमिळ नाडूतले ४४० जण सापडलेले नाहीत.
ओखी वादळ येऊन गेल्यानंतर नॅशनल फिश वर्कर्स फोरम आणि केरला इंडिपेंडंट फिश वर्कर्स फेडरेशन यांनी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आपत्ती निवारण गटाला काही मागण्या सादर केल्या आहेत. यामध्ये पुढील मागण्यांचा समावेश आहेः शोकाकुल कुटुंबांना आर्थिक मदत आणि आधार, ज्यांची यंत्रसामुग्री हरवली आहे अशा मच्छिमारांना आर्थिक सहाय्य, खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या जहाजांसाठी परवानाप्राप्त सॅटेलाइट बिनतारी संच आणि सॅटेलाइट रेडिओ, खोल समुद्रात जाणाऱ्या सर्वच मच्छिमारांसाठी समुद्रामध्ये जीव वाचवण्यासाठीची कौशल्यं आणि दिशादर्शक यंत्रं उपलब्ध करून देणे, केरळ आणि तमिळ नाडूच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सागरी अॅम्ब्युलन्स सेवा आणि आपत्ती निवारण व पुनर्वसनासंबंधी निर्णयांमध्ये मच्छिमारांचा सहभाग.
२००४ च्या त्सुनामीनंतरच्या कटू अनुभवांची आठवण ठेऊन – तेव्हा आलेल्या निधीचा वापर पारदर्शीपणे किंवा कौशल्याने करण्यात आला नव्हता - अशीही मागणी करण्यात आली की ओखी वादळ मदत निधीसाठी आलेला निधी केवळ वादळाचा तडाखा बसलेल्या केरळ आणि तमिळ नाडूच्या गावांसाठीच वापरण्यात यावा.
दरम्यान अनेक राजकीय पक्षांचे लोक करोडेमध्ये येसुदास आणि इतरांना येऊन भेटून जात आहेत. अजीकुट्टनची बहीण अलिया, वय १२ आणि भाऊ अॅलन, वय ९ यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचं आणि इतरही मदत करण्याचं आश्वासन देऊन जात आहेत.
येसुदासच्या कुटुंबियांना अजूनही आशा आहे की तो आणि इतरही मच्छिमार कोणत्या तरी किनाऱ्यावर सुखरुप पोचले असतील. आणि तो लवकरच परतेल किंवा फोन तरी करेल. “तो अगदी १५ वर्षांचा असल्यापासून समुद्रात जातोय,” त्याची बहीण थडियस मेरी सांगते. “तो इतका उत्साही आणि सळसळता आहे, त्याला किती तरी भाषा बोलता येतात. तो येईल परत.”
पण जेव्हा २३ डिसेंबरला शासनाने शोधमोहीम थांबवत असल्याचं जाहीर केलं तेव्हा त्यांच्या समाजातल्या जाणत्यांनी अजिताला त्याचे अंतिम संस्कार पूर्ण करण्याचा सल्ला दिला. इच्छा नसूनही ती तयार झाली. त्या दिवशी स्थानिक सेंट मेरी मॅग्डलेन चर्चमध्ये त्याच्यावर आणि इतर बेपत्ता मच्छिमारांवर अंतिम संस्कार करण्यात आले.
तरीही त्याच्या घरच्यांनी आशा सोडलेली नाही. “आम्ही वाट पाहतोय,” थडियस मेरी म्हणते. “अजून काही दिवस तरी आम्ही त्याची वाट बघूच.”
या कहाणीची वेगळी आवृत्ती २४ डिसेंबर २०१७ रोजी माध्यममध्ये प्रसिद्ध झाली आहे .