मला आजही तो दिवस आठवतो. आईच्या कुशीत पांघरुणात निजल्या निजल्या मी आईकडून गोष्ट ऐकत होतो – “आणि मग आयुष्याचा अर्थ शोधण्यासाठी सिद्धार्थ आपलं घर सोडून बाहेर पडला,” ती सांगत होती. रात्रभर पाऊस सुरू होता आणि आमच्या खोलीत धरणीच्या कुशीत शिरल्यासारखा मृद्गंध पसरला होता, मेणबत्तीची काजळी छतापर्यंत पोचत होती.
“आणि सिद्धार्थाला भूक लागली तर?” मी विचारलं. खरंच किती खुळा होतो ना मी? सिद्धार्थ तर देव होते.
आणि मग १८ वर्षांनंतर मी परत त्याच खोलीत आलो. पाऊस सुरू होता – खिडक्यांच्या तावदानावरून पागोळ्या गळत होत्या. माझ्या शेजारी पांघरुणात निजल्या निजल्या माझी आई बातम्या ऐकत होती. “२१ दिवसांची टाळेबंदी जाहीर झाली तेव्हापासून भारतातल्या मोठ्या शहरांमधून किमान ५ लाख स्थलांतरित कामगार चालत आपल्या गावी पोचले आहेत.”
प्रश्न आजही तोच आहेः त्यांना भूक लागली तर?
रक्ताच्या पाउलखुणा
लहानशा झरोक्यातन मी पाहिलं,
लोक चाललेत, जणू मुंग्यांची रांग.
मुलं खेळत नव्हती,
बाळं रडत नव्हती,
सुनसान रस्त्यांवर शांततेचं राज्य.
का भुकेचं?
लहानशा झरोक्यातून मी पाहिलं
गडी डोक्यावर बोजा घेऊन चाललेले
आणि काळजात भय –
भुकेचं भय.
मैलोनमैल ते चालत राहिले,
रक्ताळलेली पावलं,
त्यांच्या असण्याच्या खुणा
मागे ठेवत चाललेली.
धरणी आरक्त झाली, आणि तसंच आभाळ.
लहानशा झरोक्यातून मी पाहिलं,
सुरकुतून गेलेल्या आपल्या स्तनांतून
बाळाला पान्हवणारी एक आई.
आणि वाट संपली.
काही जण घरी पोचले,
काही मध्येच निवर्तले,
काहींच्या अंगावर मारला गेला औषधाचा फवारा
आणि काहींना कोंबलं गुरासारखं ट्रकांमध्ये.
आभाळ काळंभोर झालं आणि नंतर आली निळाई,
पण जमीन मात्र आरक्तच.
कारण होत्या,
तिच्या उरावर रक्ताळलेल्या पाउलखुणा, अजूनही.
कवितेचा स्वरः सुधन्वा देशपांडे जन नाट्य मंचातील अभिनेते व दिग्दर्शक आणि लेफ्टवर्ड बुक्सचे संपादक आहेत.
अनुवादः मेधा काळे