Can a project’s success be judged on the basis of its never being completed? Yes, if it’s a living archive of the world’s most complex countryside. Rural India is in many ways the most diverse part of the planet. Its 833 million people include distinct societies speaking well over 700 languages, some of them thousands of years old. The People’s Linguistic Survey of India tells us the country as a whole speaks some 780 languages and uses 86 different scripts. But in terms of provision for schooling up to Class 7, just 4 per cent of those 780 are covered. Most Indian languages are mainly spoken by people in rural India.

भारतीय संविधानाच्या आठव्या सूचीमध्ये २२ भाषांची यादी दिली आहे ज्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी देशाच्या सरकारवर आहे. पण, इथे अशीही राज्यं आहेत ज्यांच्या राज्यभाषा या २२ भाषांमध्ये समाविष्ट नाहीत, उदा. मेघालयात बोलल्या जाणाऱ्या खासी आणि गारो. सहा भारतीय भाषा ५ कोटी किंवा त्याहून अधिक जण बोलतात. तर तीन भाषा ८ कोटी किंवा त्याहून अधिक जणांच्या तोंडी आहेत. आणि एक तर ५० कोटी लोकांची भाषा आहे.दुसरीकडे अशा काही अनोख्या आदिवासी भाषा आहेत ज्या अगदी ४००० किंवा त्याहूनही कमी लोक बोलतात. भारताच्या पूर्वेकडच्या एकट्या ओडिशामध्ये ४४ आदिवासी भाषा बोलल्या जातात. भाषा सर्वेक्षणाने अशी नोंद केली आहे की गेल्या ५० वर्षांत जवळ जवळ २२० भाषा अस्तंगत झाल्या आहेत. त्रिपुरामधली साइमार बोलणारे शेवटचे फक्त सात जण उरले आहेत.

हे असंच वैविध्य भारतातल्या व्यवसायांमध्ये, कामांमध्ये, कला आणि हस्तकलांमध्ये संस्कृती, साहित्य, आख्यायिका, दळणवळण आणि इतरही क्षेत्रात आहे. भारताची गावं अतिशय वेदनादायी संक्रमणाच्या अवस्थेतून ढकलली जात असताना ही सगळी वैशिष्ट्यंही नामशेष होतायत. आपल्याला अजूनच दरिद्री करतायत. उदा. भारतात विणकामाच्या जितक्या शैली आणि पद्धती आहेत तशा इतर कुठल्याही देशात सापडणार नाहीत. परंपरेने विणकाम करणारे हे समुदाय आता खरंच कोलमडून पडू लागलेत. यामुळे अख्खं जगच त्यांच्या कलेला मुकणार आहे. काही अगदी अनोखे व्यवसाय - जसं कथा, गोष्टी सांगणारे किंवा महाकाव्य गाणारे - तेही लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.

आणि असेही काही व्यवसाय आहेत जे फक्त काही देशातच अस्तित्वात आहेत. उदा. ताडी गोळा करणारे. हंगामात रोज ५० झाडं तीही तीन वेळा चढून ताडी गोळा करणारे. या रसापासून ते ताडगूळ बनवतात किंवा ताडी ही दारू. भर हंगामात एक ताडी काढणारा एका दिवसात न्यू यॉर्कच्या एम्पायर स्टेट इमारतीपेक्षा जास्त उंची सर करत असेल. पण किती तरी व्यवसाय कोलमडायला लागलेत. कुंभार, धातूकाम करणारे कारागीर आणि इतरही अत्यंत कुशल अशा लाखो कारागिरांच्या जीविका हिरावून घेतल्या जात आहेत.

ग्रामीण भारताचं अनोखेपण ज्या कशातून आलं आहे ते पुढच्या २०-३० वर्षांमध्ये कदाचित लुप्त झालेलं असेल.हे विलक्षण वैविध्य जतन करण्याची स्फूर्ती देणारं किंवा कमीत कमी आपलं शिक्षण करणारं असं काहीही लेखी, मौखिक किंवा इतर स्वरुपात पद्धतशीरपणे नोंदवून ठेवलेलं नाही. त्यामुळे गावाकडचं जग आणि तिथले आवाज आपण गमावून बसतोय. आपल्या येणाऱ्या पिढ्यांना यातलं फार कमी किंवा कदाचित काहीच माहित होणार नाही, कळणार नाही. आताची पिढीही हळूहळू या जगाशी असणारी आपली नाळ तोडून टाकायला लागलीये.

नष्ट व्हावं, संपावं असं बरंच काही ग्रामीण भारतात आहे. आणि यातलं बरंच त्रासदायक, शोषण करणारं, प्रतिगामी आणि क्रूर आहे. ते संपायलाच पाहिजे.अस्पृश्यता, सरंजामशाही, वेठबिगारी, टोकाेचे जातीभेद आणि लिंगभेद आणि शोषण, जमिनीची लूट आणि अजून बरंच काही. पण दुर्दैव हे की ज्या प्रकारचं परिवर्तन होतंय त्यातून या प्रतिगामी आणि क्रूर, रानटी प्रथांना बळ मिळतंय आणि जे सर्वोत्तम आणि विविधांगी आहे त्याला मात्र महत्त्व दिलं जात नाहीये.हे सगळंही इथे नोंदवलं जाणार आहे.

पारीचं योगदान नेमकं इथे आहे

पारी एकाच वेळी एक जिवंत अशी नोदवही आहे आणि सोबतच एक संग्रह आहे. यावरती ग्रामीण भारतासंबंधी असं लिखाण आणि इतर साहित्य तयार करण्यात येईल जे आताचं, वर्तमानातलं असेल तसंच सध्याच्या काळाला साजेसं असेल. हे करत असतानाच आम्हाला शक्य आहे तितक्या स्रोतांमधून आम्ही यापूर्वीही प्रकाशित झालेल्या कहाण्या, अहवाल, व्हिडिओ आणि ऑडिओ इथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पारीने स्वतः तयार केलेलं सर्व साहित्य क्रिएटिव्ह कॉमन्स खाली येतं आणि पारीची वेबसाइट वापरासाठी सर्वांना खुली आहे. आणि पारीवर कुणीही साहित्य पाठवू शकतं. आमच्यासाठी लिहा, चित्रण करा, मुद्रण करा, रेकॉर्ड करा - तुमच्या कोणत्याही साहित्याचं स्वागत आहे. मात्र या वेबसाइटची मानकं आणि आमचं ध्येय - रोजच्या माणसांची रोजची आयुष्यं - यामध्ये ते बसायला पाहिजे.

भारतातली ग्रंथालयं आणि संग्रहालयांचा वापर खासकरून गेल्या २० वर्षांत कमी झाला आहे. असं असलं तरी आश्वासक गोष्ट ही होती की संग्रहालयात तुम्हाला जे दिसायचं तेच इथल्या गल्ली बोळात, रस्त्यावरही मिळायचंः लघुचित्रांच्या विविध शैली किंवा मूर्तीकामाच्या परंपरा अगदी हुबेहुब. आता त्याही लुप्त होऊ लागल्या आहेत. ग्रंथालयं आणि संग्रहालयांना तरुणाई नेमाने नाही तर क्वचितच भेट देताना दिसते. पण अशी एक जागा आहे जिथे जगभरातल्या येणाऱ्या पिढ्या, त्यात भारतीय आहेतच जास्तच जास्त भेट देतील - इंटरनेट. भारतामध्ये इंटरनेट सेवा, त्यातही ब्रॉडबॅण्ड कमी आहे, पण त्यात वाढ होत आहे. त्यामुळे ही जागा एक सार्वजनिक संसाधन म्हणून तयार करण्यासाठी - एक जितं जागतं ज्ञानपत्र आणि लोकांची आयुष्यं नोंदवणारा संग्रह उभा करण्यासाठी उत्तम आहे. द पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया.अनेक विश्वं, एक वेबसाइट. अनेक आवाज, विभिन्न भाषा - आतापर्यंत कोणत्याही साइटवर एकत्र ऐकायला मिळाले असतील, त्याहून खचित जास्तच अशी आमची आशा आहे.

याचा अर्थ हा उपक्रम त्याचा आवाका आणि त्याचं परिमाण या दोन्ही बाबतीत अभूतपूर्व असेल, ज्यात अनेकानेक माध्यमं - दृकश्राव्य आणि लिखित - वापरली जातील. ज्यात गोष्टी, आपलं काम, कृती आणि अनेक इतिहास शक्यतो भारताच्या खेड्यापाड्यातले लोक स्वतः सांगतील. मळ्यांमध्ये चहाची पानं खुडत असणाऱ्या स्त्रिया.भर समुद्रात मासे धरणारे मच्छिमार. भातलावणी करता करता गाणी गाणाऱ्या शेतकरी-शेतमजूर स्त्रिया किंवा परंपरेने गोष्टी सांगणारे, कहाण्या सांगणारे कित्येक जण. कुठल्याही क्रेन किंवा फोर्कलिफ्टचा वापर न करताही शेकडो वर्षं वापरात असणाऱ्या तंत्रांनी प्रचंड अवजड जहाजं समुद्रात लीलया उतरवणारे खलाशी. थोडक्यात स्वतःबद्दल, आपल्या कष्टांबद्दल आणि आयुष्याबद्दल बोलणारी साधीसुधी, रोजची माणसं - आपण पाहण्यात कमी पडलो अशा जगाबद्दल आपल्याशी बोलतील.

पारीवर काय आहे?

पारीवर दृश्य, श्राव्य, फोटो आणि लिखित माध्यमं वापरली जातात, ती एकमेकात गुंफली जातात. आमच्याकडे काही साहित्य आधीपासून आहे आणि काही कहाण्या, लिखाण आम्ही तयार करत आहोत. हे सर्व एकत्र करणं आणि ते साइटवर टाकणं या दोन्ही वेळखाऊ गोष्टी आहेत. खास पारीसाठी तयार केलेले व्हिडिओ गरिबांची आणि भारतातल्या साध्यासुध्या माणसांची आयुष्यं आणि चरितार्थ/जीविका नोंदवून ठेवण्याचं काम करतात. उदा. एखादी शेतमजूर बाई तुम्हाला तिचं जगणं, तिचं काम, ती जे कष्टाचं काम करते त्यातलं तंत्र, तिचं कुटुंब, स्वयंपाकघर किंवा तिच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींशी तुमची ओळख करून देईल.अशा एखाद्या फिल्मच्या श्रेय नामावलीमध्ये पहिलं नाव हे निश्चितच त्या बाईचं असेल, तिच्यानंतर तिचं गाव, समुदाय. तिसऱ्या क्रमांकावर दिग्दर्शक असेल. तिची कथा ही तिची, तिच्या मालकीची आहे याचा पारी आदर करते. आणि आमचं कामच हे आहे की असे वेगवेगळे मार्ग शोधणं ज्यामुळे ज्यांच्याबद्दल ही साइट आहे - ग्रामीण भारतातले लोक - त्यांना या साइटच्या रचनेबद्दल आपलं म्हणणं मांडता यावं व तिचा वापर करता यावा. आम्ही तयार करत असलेल्या विविध बोधपटांसाठी वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये सबटायटल्स तयार करण्याचाही आमचा प्रयत्न असेल.

या साइटच्या ऑडिओझोन मध्ये येत्या काळात हजारो ध्वनीफिती - संभाषणं, गप्पा, गाणी, कविता - त्याही शक्यतोवर प्रत्येक भारतीय भाषेत असतील. आम्ही सुरुवात केली - जात्यावरच्या ओव्या - महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या बायांनी गायलेली लोकगीतं या प्रकल्पापासून. एक लाखाहून अधिक ओव्या येत्या काळात पारीवरती प्रसिद्ध होतील. हा काव्यं आणि गाण्याचा विलक्षण ठेवा इथे जतन करून ठेवला जाईल.

शिक्षण आणि शिकण्यावरही आमचा भर असेल. शैक्षणिक आणि संशोधन साहित्य, ज्यात पाठ्यपुस्तकांचाही समावेश आहे, पुढच्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन स्वरुपामध्ये उपलब्ध होऊ लागणार आहे. जगाच्या काही भागात ही प्रक्रिया सुरूदेखील झाली आहे. विद्यार्थी, शिक्षक, शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठं यांच्यासाठी माहितीपूर्ण आणि जिवंत संसाधनं तयार करण्याचा पारीचा मानस आहे. जर हे चोख केलं, तर त्यातून अशी ‘पाठ्यपुस्तकं’ किंवा शैक्षणिक साहित्य तयार होईल जी बदलता येती, त्यात भर घालता येईल, त्याच्या कक्षा रुंदावणं शक्य होईल. जसजसा ब्रॉडबॅण्ड सर्वदूर पोचेल, विद्यार्थ्यांच्या खिशावरही फारसा भार पडणार नाही कारण पारी जनतेसाठी-मोफत-वापर स्वरुपाची वेबसाइट आहे.

पारी संसाधने हा विभाग तयार करत आहे ज्यात ग्रामीण भारतासंबंधीचे सर्व शासकीय (आणि बिगर शासकीय पण मान्यताप्राप्त) अहवाल (संपूर्ण अहवाल, फक्त दुवे/लिंक नाही) उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. उदा. असंघटित क्षेत्रातील उद्योगासंबंधीच्या राष्ट्रीय आयोगाचा प्रत्येक अहवाल किंवा नियोजन आयोग (आता नीती आयोग) आणि मंत्रालयं संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतरही संस्थांचे अहवाल. संशोधकांना विभिन्न स्रोतांमधले महत्त्वाचे दस्तावेज किंवा अभ्यास पाहण्यासाठी वेगवेगळ्या साइट्स शोधव्या लागणार नाहीत.

विभाग

या संग्रहामधे तुम्हाला आज दिसणारे विभाग निश्चित किंवा अंतिम नाहीत. आम्ही एकेक करत यावर इतरही विभाग आणू जसं की पशुधन आणि वन्यजीवन.पारीवरच्या अनेकानेक विभागांमधले हे केवळ तीन विभाग पहाः

Things we do
आमचं काम

हा विभाग तुम्हाला भारताच्या खेड्या-पाड्यांतल्या श्रमाच्या जटिल विश्वात घेऊन जाईल. रानात राबणाऱ्या भूमीहीन मजुरांकडे, शेतकरी, लाकूडतोड्यांकडे, विटा बनवणाऱ्यांकडे आणि लोहारांकडे. काही दमड्यांसाठी २०० किलो कोळसा सायकलवर ४० किलोमीटरपर्यंत वाहून नेणाऱ्या पुरुषांपासून ते कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबण्याचा धोका पत्करून कचऱ्यातून कोळसा वेचणाऱ्या स्त्रियांकडे. आणि कामाच्या शोधात दर वर्षी हजारो किलोमीटर प्रवास करणाऱ्या, एका ठिकाणी, अगदी गावाकडच्या स्वतःच्या घरातही सहा महिन्यांहून अधिक काळ न राहू शकणाऱ्या स्थलांतरित कामगारांकडे.

त्यांच्या कहाण्या लिहीत असतानाच आम्ही त्यांच्या वापरातल्या अवजारं आणि उपकरणांचे फोटो, व्हिडिओ घेत आहोत. येत्या काही वर्षांत यातली बरीच वापरातून हद्दपार झाली असतील हे निश्चित.

Things we make
आमची निर्मिती

इथे, पारी कला, हस्तकला, कलाकार आणि कारागिरांच्या विश्वाची ओळख करून देते. या देशाच्या अगणित शैली, तंत्रं व परंपरा तसंच त्यांच्या निर्मितींची माहिती देते. या विभागात तुम्हाला भारताची रोजची, साधीसुधी संग्रहालयं दिसतील - लघुचित्र शैली, मूर्तीकामाच्या ग्रामीण परंपरा, विणकामाची अप्रतिम तंत्रं - यातली बरीच कौशल्यं आता वापरातून हद्दपार होऊ लागलीयेत आणि लवकरच ती पूर्णपणे नाहिशी होऊ शकतील.

Foot Soldiers Of Freedom
स्वातंत्र्याचं पायदळ

भारताच्या खेड्यापाड्यांमधले हयात असलेले हे अखेरचे स्वातंत्र्य सैनिक, बहुतेक जण आता नव्वदी पार केलेले.इंग्रज राजवटीपासून देशाला मुक्ती मिळावी आणि एक स्वतंत्र, लोकशाही भारत देशाच्या निर्माणाकरता अनेक वर्षं तुरुंगवास भोगलेले हे लोक. स्वातंत्र्याची कहाणी सांगण्यासाठी पुढच्या दशकात यांच्यापैकी कुणीही राहिलं नसेल.

लिहिते हात वाढावेत, पारीसाठी आपलं साहित्य देणाऱ्यांच्या संख्येत भर पडावी, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असलो तरी, आम्ही संपादकीय निवडीचा वापर करतो आणि गुणवत्तेबाबत आम्ही आग्रही असतो. विश्वसनीय काम असणाऱ्या अनुभवी लेखकांचा सहभाग अर्थातच या कामासाठी गरजेचा आहे.यातले बहुतेक पत्रकार आणि लेखक असले तरी तसा नियम नाही. कुणीही ज्याला या कामात रस आहे, सहभागी होऊ शकतं, आमच्यासाठी लिहा, चित्रण करा अगदी बरी क्वालिटी असणाऱ्या मोबइल फोनवरही चालेल - फक्त तुमचं साहित्य आमच्या या संग्रहाच्या उद्देशांशी जुळलं पाहिजे. तुम्ही व्यावसायिक पत्रकार असायला पाहिजे असं काहीही नाही.

एक लक्षात घ्या, पारीवरच्या कहाण्यांचा फार मोठा हिस्सा खुद्द गावाकडच्या माणसांनीच तयार केलेला, सांगितलेला आहे, त्यांची कहाणी सांगण्यासाठी मदत करणाऱ्या माध्यमांमधल्या माणसांची ही निर्मिती नाही. यातली गावाकडची काही मंडळी आपली कहाणी स्वतःच चित्रित करतील. आणि या गोष्टी नवनिर्मित करून, सगळ्यांना सांगितल्या जात राहतील. अट एकच - यामध्ये ‘गाव’ असायला पाहिजे.

पारीचा वापर सर्वांसाठी मोफत आहे. ही साइट काउंटरमीडिया ट्रस्टतर्फे चालवली जाते. एक अनौपचारिक मित्रपरिवार ट्रस्टच्या कामाला आर्थिक आणि इतर सहाय्य करतो - सेवाभावी काम, देणग्या आणि थेट वैयक्तिक योगदान. वार्ताहर, व्यावसायिक चित्रपटनिर्माते, चित्रपट संपादक छायाचित्रकार, बोधपट निर्माते आणि पत्रकार (दूरदर्शन, ऑनलाइन आणि प्रिंट) या सर्वांचा हा स्वयंस्फूर्तीने काम करणारा परिवार पारीचं प्रतिनिधीत्व करतो. आणि हा पारीचा सर्वात मोठा ठेवा आहे. अध्यापक, शिक्षक, संधोधक, तंत्रज्ञ आणि इतरही अनेक क्षेत्रातले व्यावसायिक या सर्वांचं कौशल्य ही वेबसाइट तयार करण्यासाठी आणि पारीची स्थापना करण्यासाठी कामी आलं आहे.

आमच्यासाठी सेवाभावीपणे केलेल्या कामापलिकडे जाऊन साहित्य तयार करण्यासाठी पारीला निधीची आवश्यकता असते. आणि आम्ही हा निधी लोकांकडूनच गोळा व्हावा यासाठी प्रयत्नशील असतो. वर्गणीसाठी आमचं आवाहन -‘तुमच्या देशाचं वार्तांकन करा’ असं असलं तरी ग्रामीण भारत पूर्णपणे कधीच एका ठिकाणी मांडता येणार नाही. या साइटवरचं साहित्य म्हणजे महाकाय अशा अनेक वास्तवांचे काही धागे किंवा अंश. ही अनेक विश्वं सर्वांसमोर आणणं हे जास्तीत जास्त व्यापक अशा लोकसहभागातूनच शक्य आहे.

P. Sainath
पारीचे संस्थापक संपादक

"वेडं असण्यात नक्कीच काही तरी आनंददायी आहे, आणि ते काय हे फक्त वेड्यांनाच ठाऊक असतं"

जॉन ड्रायडन, ‘द स्पॅनिश फ्रायर’ (१६८१)’

पारीला देणगी द्या

आर्थिक सहाय्य करा

तुम्ही तुमची देणगी विविध मार्गांनी पाठवू शकता. CounterMedia Trust ला दिलेल्या सर्व देणग्या आयकर कायद्याच्या कलम ८० जी नुसार करमुक्त आहेत.

पारीसाठी योगदान द्या

पारीवर कुणीही योगदान देऊ शकतं. आमच्यासाठी लिहा, चित्रण करा, रेकॉर्ड करा अनुवाद करा, संशोधन करा, एखादा व्हिडिओ संपादित करा - तुमच्या कोणत्याही साहित्याचं स्वागत आहे. मात्र या वेबसाइटची मानकं आणि आमचं ध्येय - रोजच्या लोकांची रोजची आयुष्यं - यामध्ये ते बसायला पाहिजे.

पारी आणि शिक्षण

पारीमध्ये आम्ही उद्याची पुस्तकं लिहीत आहोत. हे कसं? तर, दर आठवड्याला आमच्या साइटवर प्रकाशित होणारे लेख, कथा, फोटो, व्हिडिओ आणि ध्वनीफितींच्या माध्यमातून. कालांतराने यातलं बहुतेक साहित्य स्वतः शिक्षक आणि विद्यार्थीच तयार करतील.