शिकण्याची नवी व्याख्या

  1. भविष्यासाठी पाठ्यपुस्तकं तयार करताना

    पारीमध्ये आम्ही उद्याची पुस्तकं लिहीत आहोत. हे कसं? तर, दर आठवड्याला आमच्या साइटवर प्रकाशित होणारे लेख, कथा, फोटो, व्हिडिओ आणि ध्वनीफितींच्या माध्यमातून. कालांतराने यातलं बहुतेक साहित्य स्वतः शिक्षक आणि विद्यार्थीच तयार करतील.

    विद्यार्थी, शिक्षक, शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठांसाठी ग्रामीण भारताबद्दल जिवंत आणि माहिती देणाऱ्या कहाण्या तयार कराव्या असा पारीचा मानस आहे. एवढ्याच नाही तर या संस्थांच्या भिंतींपलिकडच्या विद्यार्थ्यांसाठीही. आमची खात्री आहे की शिकवण्याचं आणि शिकण्याचं साहित्य, ज्यात पाठ्यपुस्तकांचाही समावेश आहे, पुढच्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन स्वरुपामध्ये उपलब्ध होऊ लागणार आहे. जगाच्या काही भागात ही प्रक्रिया सुरूदेखील झाली आहे. जर हे चोखपणे केलं, तर त्यातून अशी ‘पाठ्यपुस्तकं’ किंवा शैक्षणिक साहित्य तयार होईल ज्यात भर घालता येईल, जी बदलता येतील आणि त्याच्या कक्षा रुंदावणं शक्य होईल. जसजसा ब्रॉडबॅण्ड सर्वदूर पोचेल, विद्यार्थ्यांच्या खिशावरही फारसा भार पडणार नाही कारण पारी जनतेसाठी-मोफत-वापर स्वरुपाची वेबसाइट आहे.

  2. विद्यार्थ्यांनीच अभ्यासक्रम तयार करावा यासाठी सहाय्य

    या प्रक्रियेसाठी आम्ही याआधीच एक मोलाची गोष्ट केली आहेः विद्यार्थी त्यांची स्वतःची पाठ्यपुस्तकं तयार करण्यासाठी आता पारीवर सहभागी होऊ शकतात. एखादी शिक्षिका किंवा संस्था एखाद्या अभ्यासक्रमासाठी किंवा त्यातल्या काही भागासाठी शैक्षणिक साहित्य तयार करू इच्छित असेल, तर आम्ही हा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी त्यांच्याबरोबर काम करू. समजा ग्रामीण भागातील श्रम किंवा स्थलांतरित कामगार किंवा शेती किंवा कारागीर अशांबाबतचा अभ्यासक्रम असेल तर - आम्ही क्षेत्रभेटींमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयांसंबधी जिवंत असं ज्ञानभांडार तयार करायला मदत करू.

    म्हणजेच, विद्यार्थ्यांचे व्हिडिओ, रेकॉर्डिंग, फोटो आणि लेख त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात गुण किंवा श्रेणी तर मिळवून देतीलच पण त्याचसोबत हे साहित्य एका मुक्त आणि लवचिक अशा पाठ्यपुस्तकाचा भाग बनेल. उदा. एखादा असा व्हिडिओज्यात शेतमजूर स्वतः त्यांच्या आयुष्याबद्दल स्वतः सांगतायत, ज्यात ते स्वतः प्रेक्षकांशी स्वतः संवाद सांधतायत, स्वतःच्या आयुष्याबद्दल, कामाबद्दल आणि त्यांच्या जगाबद्दल बोलतायत, समजावून सांगतायत - शिकण्यासाठीचं असं काही संसाधन निश्चितच जास्त रंजक असेल. आणि अशी संसाधनं सामान्य जनतेप्रमाणेच विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांचं लक्ष वेधून घेतील, काही वर्षांआधीच तयार झालेल्या छापील पुस्तकांपेक्षा तर नक्कीच जास्त. पारी ज्या प्रकारे विचार आणि काम करते, त्यानुसार लेख, संशोधनपर लिखाण, दृक श्राव्य आणि फोटो या सगळ्यांची ताकद एकत्र करून ही संसाधनं सादर केली जातील.

  3. शिकण्याचा एक जबरदस्त स्रोत खुला करताना

    आम्ही तयार केलेल्या किंवा आमच्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडिओंसाठी पारीच्या विशिष्ट मार्गदर्शक सूचना आहेत, ज्यानुसार कथा सांगणाऱ्या व्यक्तींचा प्रथम लेखकत्वाचा हक्क मान्य करण्यात आला आहे. यातही, ज्यांचा अभ्यास करत आहोत अशा व्यक्तींशी विद्यार्थ्यांचा झालेला संवाद, आणि गावपातळीवरील खरंखुरं साहित्य तयार करण्यासाठी त्यांनी समुदायांसोबत एकत्रितरित्या केलेले प्रयत्न, हेही शिकण्याचे अतिशय प्रभावी, जबरदस्त स्रोत आहेत. आणि हे पारीवर सध्या सुरूही झालंय.

    अजून एक गोष्ट आहेः दर वर्षी विद्यार्थी भारताबद्दल बरंच मोलाचं काम करत असतात. संशोधनपर लिखाण, लेख, व्हिडिओ, बोधपट, वार्तापत्रं, फोटो आणि बरंच काही. यातलं काही साहित्य उत्कृष्ट असतं मात्र ते विभागांच्या ग्रंथालयांमध्ये, उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यात कपाटांमध्ये किंवा वाट न चोखाळलेल्या सायबर दुनियेतल्या अंधाऱ्या गुहांमध्ये हरवून जातं. पण आमच्याशी जोडून घेणाऱ्या संस्थांसाठी पारी असा मंच उपलब्ध करेल ज्यावर असं सर्वोत्तम साहित्य जतन केलं जाईल, आवर्जून सादर केलं जाईल आणि जगभरात कुठूनही आणि कुणालाही हे सहजपणे पाहता येईल. आपलं काम अख्ख्या जगात कुणीही पाहू शकेल हे माहित झालं तर आपल्या कामाची प्रत, गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, ते निराळंच.

  4. संशोधकांसाठी ग्रंथालय - एकाच छताखाली

    याशिवाय, विद्यापीठं, महाविद्यालयं आणि शाळांमधले अनेक विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमाशिवाय पारीसाठी लेख, दृक श्राव्य साधनं तयार करत आहेत. काही अगदी तरूण विद्यार्थ्यांनी आमच्यासाठी वर्तमानपत्रं तयार केली आहेत.

    आमच्या संसाधने विभागात ग्रामीण भारतासंबंधीचे सर्व शासकीय (आणि बिगर शासकीय पण मान्यताप्राप्त) अहवाल (संपूर्ण अहवाल, फक्त दुवे/लिंक नाही) उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. उदा. असंघटित क्षेत्रातील उद्योगासंबंधीच्या राष्ट्रीय आयोगाचा प्रत्येक अहवाल किंवा नियोजन आयोग (आता नीती आयोग) व खाती, संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतरही संस्थांचे अहवाल. संशोधकांना विभिन्न स्रोतांमधले महत्त्वाचे दस्तावेज किंवा अभ्यासांसाठी वेगवेगळ्या साइट्स शोधव्या लागणार नाहीत.

    विद्यार्थी, शिक्षक आणि शिकत असणाऱ्या कुणासाठीही पारी एका छताखालचं ग्रथांलय आहे