“इथे कागदोपत्री नोंद असलेल्या विणकरांची कमतरता नाहीये पण माझ्या मृत्यूनंतर (व्यावहारिकदृष्ट्या) सर्व काही संपलेलं असेल,” रूपचंद देबनाथ त्यांच्या बांबूच्या झोपडीत हातमागावर विणकामातून विश्रांती घेत उसासा टाकून बोलत होते. ह्या झोपडीत बहुतांश जागा हातमागाने व्यापली होती आणि त्या व्यतिरिक्त तुटलेलं फर्निचर, धातूचे सुटे भाग, कचऱ्याचा ढीग आणि बांबूचे तुकडे पडलेले होते. एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी इथे जागाच नव्हती.

७३ वर्षीय रूपचंद हे त्रिपुरा राज्यातील भारत आणि बांगलादेशच्या सीमेवरील धर्मनगर शहराच्या बाहेरील गोबिंदापूर इथे राहतात. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावात एक अरुंद खडड्यांच्या रस्ता जातो, एकेकाळी इथे २०० विणकर कुटुंबे आणि ६०० हून अधिक कारागीर रहात होते. गोबिंदापूर हातमाग विणकर संघटनेचे कार्यालय अरुंद गल्ल्यांमधल्या काही घरांमध्ये उभे आहे, त्याच्या गंजून गेलेल्या भिंती हरवलेल्या वैभवाची आठवण करून देतात.

“इथे एकही घर असं नव्हतं की जिथे हातमाग नव्हता,” नाथ समाजाचे (राज्यातील इतर मागासवर्गीय म्हणून नोंदलेले) रूपचंद सांगत होते. सूर्य तळपत होता आणि पुढे जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरचा घाम पुसला. समाज आमचा आदर करायचा. “आता, कुणालाच आमची पर्वा नाही, मला सांगा ज्या व्यवसायात पैसा नाही अशा व्यवसायाचा आदर कोण करेल?” त्यांनी प्रश्न विचारला आणि ते गहिवरले.

या अनुभवी विणकराला त्याने हाताने विणलेल्या, फुलांचं विणकाम असलेल्या ‘नक्षी’ साड्या आठवतात. “१९८० च्या दशकात जेव्हा पूर्वाशाने (त्रिपुरा सरकारच्या हॅण्डक्राफ्ट एम्पोरिअम) धर्मनगरमध्ये एक आउटलेट उघडलं तेव्हा त्यांनी आम्हाला ‘नक्षी’ साड्या बंद करून साध्या साड्या बनवायला सांगितलं,” रूपचंद सांगतात. त्यांच्या कामातले बारकावे आणि एकूण गुणवत्ता फारच कमी होती आणि म्हणूनच त्या साड्या स्वस्तात मिळायच्या.

ते पुढे सांगतात, “नक्षी साड्या या प्रदेशात कमी होत गेल्या आणि आज इथे ना कुणी कारागीर उरलाय ना हातमागांना सुटे भाग पुरवले जाताय.” गेल्या चार वर्षांपासून विणकर संघटनेचे अध्यक्ष असलेले रवींद्र देबनाथ यांचे शब्द आजही कानात घुमतात. ते म्हणतात, “आम्ही तयार केलेल्या कपड्यांना बाजारपेठ नव्हती.” ही ६३ वर्षीय व्यक्ती सांगते की ती यापुढे विणकामाची गरज पूर्ण करू शकत नाही.

PHOTO • Rajdeep Bhowmik
PHOTO • Deep Roy

डावीकडेः रूपचंद देबनाथ (हातमागाच्या मागे उभे असलेले) हे त्रिपुरातील गोबिंदापूर गावातील शेवटचे हातमाग विणकर आहेत आणि ते आता फक्त गमछे बनवतात. त्यांच्यासोबत स्थानिक विणकर संघटनेचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र देबनाथ उभे आहेत. उजवीकडेः स्टार्चने प्रक्रिया केल्यानंतर सूत सूर्यप्रकाशात सुकवले जाते, कडक आणि सुरकुत्या पडलेले नाहीत ना याची खात्री केली जाते

२००५ पर्यंत, रूपचंद यांनी नक्षी साड्या विणणे पूर्णपणे बंद केलं आणि गमछा विणायला सुरुवात केली. “आम्ही कधीच गमछा विणत नव्हतो, आम्ही सर्वांनी फक्त साड्या विणल्या. पण आमच्याकडे पर्याय नव्हता,” गोबिंदापूरमधील हातमागात प्रवीण असलेली शेवटची व्यक्ती सांगत होती. “कालपासून मी फक्त दोन गमछे विणलेत. हे विकून मी जेमतेम २०० रुपये कमवणार आहे. ही माझी एकट्याची कमाई नाही. माझी पत्नी मला सूत कातायला मदत करते. त्यामुळे ती संपूर्ण कुटुंबाची कमाई आहे. या कमाईमध्ये आम्ही कसं जगावं?” रूपचंद सांगत होते.

सकाळी ९ च्या सुमारास रूपचंद न्याहारी करून विणकामाला बसतात आणि दुपारपर्यंत काम करतात. पुन्हा काम सुरू करण्यापूर्वी ते अंघोळ करण्यासाठी आणि दुपारच्या जेवणासाठी काम थांबवतात. आता ते सहसा संध्याकाळी काम करत नाहीत, कारण त्यामुळे त्यांचे सांधे दुखतात. पण तरुण वयात “मी रात्री उशिरापर्यंत काम केलंय,” ते सांगतात.

रूपचंद यांचा कामाचा बहुतेक वेळ हातमागावर गमछे विणण्यात जातो. स्वस्त आणि टिकाऊ असल्यामुळे इथल्या घरांमध्ये आणि बंगालमध्ये सर्वदूर गमछाचा वापर अजूनही कमी झालेला नाही. “मी विणलेले गमछे (बहुतेक) अशाच प्रकारे बनवले जातात.” रूपचंद पांढऱ्या आणि हिरव्या धाग्यात बनवलेल्या गमछाकडे लक्ष वेधतात, ज्यात लालभडक रंगाच्या सुताचा जाड काठ विणला जातो. “आम्ही हे सूत आधी स्वतः रंगवायचो. गेली १० वर्षं आम्ही विणकर संघटनेकडून रंगवलेले धागे खरेदी करतोय,” ते आम्हाला सांगतात आणि हेही की ते आपण स्वतः  विणलेला गमछा वापरतात.

हातमाग उद्योगाची परिस्थिती कधी बदलली याविषयी रूपचंद म्हणतात, “हे प्रामुख्याने यंत्रमाग सुरू झाल्यामुळे आणि सुताचा दर्जा खालावल्यामुळे झालंय. आमच्यासारखे विणकर यंत्रमागांशी स्पर्धा करू शकत नाहीत.”

PHOTO • Rajdeep Bhowmik
PHOTO • Rajdeep Bhowmik

डावीकडेः बांबूपासून बनवलेल्या स्पूल वळणाच्या चाकांचा वापर स्कीनिंगसाठी केला जातो, ही एकसमान जाडीची स्कीन तयार करण्यासाठी फिरत्या रीलवर धागा वळवण्याची प्रक्रिया असते. ही प्रक्रिया सहसा रूपचंदची पत्नी बसना देबनाथ करतात. उजवीकडेः विणकामासाठी वापरले जाणारे धाग्यांचे बंडल

PHOTO • Rajdeep Bhowmik
PHOTO • Rajdeep Bhowmik

डावीकडेः रूपचंद त्यांच्या वडिलांकडून कलाकूसर शिकले आणि १९७० पासून ते विणकाम करतायत. सुमारे २० वर्षांपूर्वी त्यांनी हे विशिष्ट हातमाग खरेदी केले होते. उजवीकडेः अनवाणी पायाने हाचमाग चालवताना रूपचंद गमछा विणत आहेत

यंत्रमाग महाग आहेत, त्यामुळे बहुतेक विणकरांना ते घेऊन काम करणे कठीण होतं. शिवाय, गोबिंदापूरसारख्या गावात, हातमागाचे सुटे भाग विकणारी दुकानं नाहीत आणि दुरुस्तीचं काम आव्हानात्मक आहे. अनेक विणकरांना ही मोठी समस्या येत होती. रूपचंद म्हणतात की यंत्रं चालवण्याचं त्यांचं वय नाही.

“मी आताच १२,००० रुपये देऊन २२ किलो सूत विकत घेतलंय. गेल्या वर्षी यालाच सुमारे ९००० खर्च आला होता. माझी तब्येत पाहता मला त्याचे १५० गमछे तयार करायला सुमारे तीन महिने लागतील आणि मी त्यांना (विणकर संघटनेला) ते विकले तर त्याचे मला फक्त १६,००० रुपये मिळतील,” रूपचंद हतबल होऊन सांगतात.

*****

रूपचंद यांचा जन्म १९५० च्या सुमारास बांगलादेशातील सिल्हेत येथे झाला आणि ते १९५६ मध्ये भारतात स्थलांतरित झाले. “माझे वडील इथे भारतात विणकाम करत राहिले. मी इयत्ता नववीपर्यंत शिकलो आणि मग शाळा सोडली,” ते सांगतात. रूपचंद यांनी तरूण असताना स्थानिक विद्युत मंडळात नोकरी केली, “काम खूप होतं आणि पगार मात्र खूप कमी म्हणून मी चार वर्षे काम करून नोकरी सोडली.”

त्यानंतर त्यांनी पिढीजात विणकर असलेल्या त्यांच्या वडिलांकडून विणकाम शिकायचं ठरवलं. हातमाग (उद्योग) त्यावेळी चांगले पैसे देत होता. “मी १५ रुपयांना साड्या विकल्या आहेत. मी या व्यवसायात नसतो तर मी माझा औषधोपचाराचा खर्च भागवू शकलो नसतो किंवा माझ्या तीन बहिणींची लग्न करू शकलो नसतो,” त्यांनी सांगितले.

PHOTO • Rajdeep Bhowmik
PHOTO • Deep Roy

डावीकडेः रूपचंदने विणकर म्हणून त्यांचा प्रवास नक्षी साड्यांपासून सुरू केला ज्यात फुलांच्या नक्षीचे काम होते. पण १९८० च्या दशकात, त्यांना राज्य एम्पोरियमने कोणतेही डिझाइन नसलेल्या सुती साड्या विणण्यास सांगितले. २००५ पर्यंत, रूपचंद पूर्णपणे गमछा विणकामाकडे वळले. उजवीकडेः बसना देबनाथ रूपचंद यांना घरातली सर्व कामं करण्यात मदत करतात

PHOTO • Rajdeep Bhowmik
PHOTO • Rajdeep Bhowmik

डावीकडेः हातमाग उद्योगात आता अनेक अडचणी असतील, पण रूपचंद यांना उद्योग सोडायचा नाही. “माझ्या कलेपुढे मी कसलाच लोभ ठेवला नाही,” असं ते म्हणतात. उजवीकडेः रूपचंद लड तयार करताना

त्यांची पत्नी बसना देबनाथ यांना आठवतं की, “लग्न झाल्यानंतर लगेचच त्यांनी विणकामात मदत करायला सुरुवात केली. आमच्याकडे त्यावेळी चार हातमाग असायचे आणि ते तेव्हा माझ्या सासऱ्यांकडून विणकामाचे धडे घेत होते,” दुसऱ्या खोलीत हातमाग चालवत असल्याच्या आवाजाकडे लक्ष वेधत त्या सांगतात.

बसनाचा दिवस रूपचंदपेक्षा जास्त व्यस्त असतो. त्या लवकर उठतात, घरातली कामं करतात, स्वयंपाक वगैरे उरकला की त्यानंतर सूत गुंडाळायला मदत करतात. त्यांना संध्याकाळी फक्त थोडी विश्रांती मिळते. “सूत गुंडाळणं आणि लडी बनवण्याची सर्व कामं ती करते,” रूपचंद अभिमानाने सांगतात.

रूपचंद आणि बसना यांना चार मुले आहेत. दोन मुलींचे लग्न झाली आहेत आणि त्यांची दोन मुलं (एक मेकॅनिक आणि दुसरा ज्वेलर) त्यांच्या घरापासून फार दूर राहतात. पारंपरिक कला आणि हस्तकलेशी लोकांची नाळ तुटतेय का असं विचारता त्यांनी विचार केला आणि म्हणाले, “मी सुद्धा अयशस्वी झालो. माझ्या मुलांनी या कामात यावं यासाठी मी त्यांना पुरेशी प्रेरणा देऊ शकलो नाही.”

*****

संपूर्ण भारतात ९३.३ टक्के हातमाग कामगारांचं कौटुंबिक उत्पन्न १०,००० रुपयांहून कमी आहे तर त्रिपुरातल्या ८६.४ टक्के हातमाग कामगारांचं घरगुती उत्पन्न रुपये ५,००० च्या खाली आहे. ( चौथी अखिल भारतीय हातमाग जनगणना, २०१९-२०२०)

रूपचंद यांचे शेजारी, अरूण भौमिक म्हणतात, “ही हस्तकला हळूहळू नष्ट होत आहे, आणि ती जतन करण्यासाठी आमचे प्रयत्न पुरेसे नाहीयेत. गावातील ज्येष्ठ नागरिक नानीगोपाल भौमिक हे देखील त्यांचे विचार व्यक्त करतात, लोकांना कमी काम करायचं असतं आणि जास्त पैसे कमवायचे असतात,” ते उसासा टाकत म्हणतात. “विणकर (नेहमी) झोपड्या आणि मातीच्या घरात राहतात, कुणाला असं जगायचं आहे?” रूपचंदही त्यांच्या मागोमाग विचारतात.

PHOTO • Deep Roy
PHOTO • Deep Roy

डावीकडे: रूपचंद आणि बसना देबनाथ त्यांच्या मातीच्या घरासमोर. उजवीकडे: पत्र्याचे छत असलेली बांबू आणि मातीपासून बनवलेली झोपडी रूपचंदच्या कामाची जागा आहे

उत्पन्न नाही या समस्येव्यतिरिक्त दीर्घकालीन आजारही विणकरांना त्रास देतात. रूपचंद म्हणतात, “मी आणि माझी पत्नी दरवर्षी दवाखान्यासाठी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च करतो.” या जोडप्याला श्वासोच्छवास आणि हृदयविकाराचा त्रास आहे, जो त्यांच्या व्यवसायामुळे सुरू झाला आहे.

ही हस्तकला जोपासण्यासाठी सरकारने काही प्रयत्न केले आहेत. पण रूपचंद आणि गावातील इतरांना वाटतं की त्यामुळे काही फरत पडत नाही. “मी दीनदयाल हातखर्गा प्रोत्साहन योजनेद्वारे (२००० मध्ये सुरू केलेला केंद्र सरकारचा उपक्रम) ३०० हून अधिक विणकरांना प्रशिक्षण दिलं आहे,” असं रूपचंद म्हणतात. ते पुढे म्हणतात, “प्रशिक्षणार्थी मिळणं कठीण आहे, बहुतेक लोक स्टायपेंडसाठी येतात. यातून कुशल विणकर निर्माण करणं शक्य नाही. हातमाग ठेवण्यातलं गैरव्यवस्थापन, वाळवीचा प्रादुर्भाव आणि उंदरांनी सूत नष्ट केल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.”

२०१२ ते २०२२ दरम्यान हातमाग निर्यात जवळपास ५० टक्क्यांनी कमी झाली आहे, जवळपास ३००० कोटींवरून १५०० पर्यंत कमी झाली आहे. हॅण्डलूम एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल आणि मंत्रालयाचा निधीदेखील कमी झाला आहे.

राज्यातील हातमागाचे भविष्य अंधकारात आहे आणि रूपचंद म्हणतात, “मला वाटतं की ही परिस्थिती सुधारण्यापलीकडे गेली आहे,” अन् ते क्षणभर थांबले आणि उपाय सांगू शकतो असं म्हणाले, “महिलांच्या अधिक सहभागामुळे ह्यात मदत होईल. मी सिधाई मोहनपूर (पश्चिम त्रिपुरामधील एका व्यावसायिक हातमाग उत्पादन केंद्र) मध्ये, जवळजवळ संपूर्णपणे स्त्रिया काम करत असल्याचे पाहिले आहे, हे केंद्रच स्त्रिया चालवतात.” परिस्थितीवर उपाय करण्याचा एक मार्ग म्हणजे सध्याच्या कारागीरांसाठी रोजची निश्चित मजुरी देणे हा आहे.

हे काम सोडण्याचा कधी विचार केला आहे का असे विचारल्यावर रूपचंद हसले आणि निश्चयाने म्हणाले, “कधीच नाही. लोभ किंवा हाव माझ्या कलेपुढे कधीही मोठी ठरू शकत नाही.” त्यांनी हातमागावर हात ठेवला आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले, “माझी कला मला सोडून जाऊ शकते, पण मी कधीच जाणार नाही.”

हे वार्तांकन मृणालिनी मुखर्जी फाउंडेशन (MMF) च्या फेलोशिपअंतर्गत करण्यात आले आहे.

Rajdeep Bhowmik

Rajdeep Bhowmik is a Ph.D student at IISER, Pune. He is a PARI-MMF fellow for 2023.

Other stories by Rajdeep Bhowmik
Deep Roy

Deep Roy is a Post Graduate Resident Doctor at VMCC and Safdarjung Hospital, New Delhi. He is a PARI-MMF fellow for 2023.

Other stories by Deep Roy
Photographs : Rajdeep Bhowmik

Rajdeep Bhowmik is a Ph.D student at IISER, Pune. He is a PARI-MMF fellow for 2023.

Other stories by Rajdeep Bhowmik
Editor : Sarbajaya Bhattacharya

Sarbajaya Bhattacharya is a Senior Assistant Editor at PARI. She is an experienced Bangla translator. Based in Kolkata, she is interested in the history of the city and travel literature.

Other stories by Sarbajaya Bhattacharya
Editor : Priti David

Priti David is the Executive Editor of PARI. She writes on forests, Adivasis and livelihoods. Priti also leads the Education section of PARI and works with schools and colleges to bring rural issues into the classroom and curriculum.

Other stories by Priti David
Translator : Ashwini Patil

Ashwini is a journalist based in Nashik with seven years of experience in Marathi print media. She has a keen interest in women and development, cultural studies, youth, finance and media.

Other stories by Ashwini Patil