आज मागे वळून पाहते तेव्‍हा उज्‍ज्‍वला पेठकरला स्‍वतःचंच आश्‍चर्य वाटतं. कसं काय आपण या बिकट परिस्‍थितीत तगू शकलो...

महाराष्ट्रातल्‍या विदर्भात एकामागोमाग एक शेतकरी आत्‍महत्‍या करत होते तेव्‍हाच उज्‍ज्‍वलाच्‍या नवर्‍याने, प्रभाकरने आत्‍महत्‍या केली. दशकभराहून अधिक काळ झाला त्‍याला. पण चाळिशी पार केलेली उज्‍ज्‍वला अजूनही आपल्‍या आयुष्याचं आणि कुटुंबाचं विखुरलेलं चित्र जुळवतेच आहे.

असं काय होतं ज्या आधारे ती तगून राहिली? “माझ्या मुलांमुळे,” ती क्षणभर थांबते, “कदाचित.”

प्रभाकर कीटकनाशक प्‍याला तेव्‍हा उज्‍ज्‍वलाने नुकतीच तिशी ओलांडली होती. धपकन सगळी जबाबदारी तिच्‍या अंगावर पडली... शेतीची कामं, कर्जाची परतफेड, दोन मुलांना वाढवणं... नवरा गेला म्हणून दुःख करायला तिला वेळच नव्‍हता. विश्रांती घ्यायला सवड नव्‍हती आणि ज्‍यावर टेकावं असा आधारही नव्‍हता.

गेली दहा वर्षं उज्‍ज्‍वला अशीच शांत आहे... शेतातला हरभरा काढत असताना हळूच डोळे टिपते, तेवढंच. वर्धा जिल्ह्यात, वर्धा शहरापासून २० किलोमीटर अंतरावर कुरझडी गावात तिची पाच एकर जमीन आहे. आम्ही गेलो तेव्‍हा तापलेला सूर्य वसंत ऋतूच्‍या आगमनाची द्वाही देत होता. उज्‍ज्‍वला मात्र उन्हाची पर्वा न करता चटचट काम करत होती. “मी काम केलं नाही, तर माझ्‍या मुलांच्या भविष्यात फक्त अंधार असेल. त्‍यांच्‍यासाठी मी कितीही वेळ रानात राबू शकते.”

स्‍वतःच्‍याच सावलीचा आधार घेत एकटीच काम करणारी उज्‍ज्‍वला हा पावलोपावली झगडणार्‍या विदर्भातल्‍या शेतकर्‍यांच्‍या विधवांचा एक निग्रही चेहरा आहे. चिकाटी न सोडणाऱ्या शेतकर्‍याचं ती प्रतीक आहे, आत्‍महत्‍या केलेल्‍या शेतकर्‍यांच्‍या विधवांची प्रतिमा आहे. कुटुंबाचं ओझं तिच्‍या खांद्यावर आहे, धड मरूही न देणार्‍या शेतीच्‍या समस्‍यांशी ती अथक झगडते आहे. ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी शाखे’च्‍या अहवालानुसार १९९५ ते २०१३ या काळात भारतात तीन लाख शेतकरी आणि मजुरांनी आत्‍महत्‍या केल्‍या आहेत. उज्‍ज्‍वलाच्‍या नवर्‍याने २००३ मध्ये आत्‍महत्‍या केली. विदर्भातला कापसाचा प्रश्‍न फार तीव्र झाला नव्‍हता, तेव्‍हाची ही गोष्ट.

PHOTO • Jaideep Hardikar
PHOTO • Jaideep Hardikar

‘माझ्‍या नवर्‍याच्‍या मृत्‍यूनंतर मी लोकांचा खरा चेहरा पाहिला’

“शेती बायांसाठी नाहीच,” उज्‍ज्‍वला सांगते. “मी बँकेत गेले तरी तिथले कर्मचारी माझं म्हणणं गंभीरपणे ऐकूनच घेत नाहीत. बाजारात गेले तर पुरुष अशा नजरेने माझ्‍याकडे बघतात, जणू काही मी त्यांच्या क्षेत्रात घुसखोरी केलीये... शेतमजूर, अगदी स्‍त्रियाही माझ्‍या रानात सहजासहजी कामाला येत नाहीत.”

शेती अधिकाधिक बायांच्या खांद्यावर येतीये या पार्श्वभूमीवर हे चित्र डोळ्यासमोर ठेवा - सर्व ऋतूंमध्ये अख्खा दिवस उज्‍ज्‍वला आपल्‍या शेतात काम करते आहे. कापूस, सोयाबीन, मका, हरभरा आणि गहू काढतीये. सगळ्या आव्‍हानांवर मात करत ती येत्‍या उन्‍हाळ्यात आपल्‍या ताटात अन्‍न वाढणार आहे. शेतातला गहू पिकला की तो काढून, पोत्यात बांधून बाजारात आणणार आहे.

“माझा नवरा जिवंत असता तर मी शेतात काम केलं असतं, पण मला शेतीचं अर्थकारण कळलं नसतं,” उज्‍ज्‍वला म्हणते. कपाळावर रुमाल बांधून ती शेतात फिरत असते, कापणीला आलेलं गव्‍हाचं उभं पीक निरखत असते.

शेतकर्‍याची बायको असणारी गृहिणी ते एक कुटुंबप्रमुख... उज्‍ज्‍वलाचा हा प्रवास सोपा नव्‍हता. “माझ्‍या नवर्‍याच्‍या मृत्‍यूनंतर मी लोकांचा खरा चेहरा पाहिला,” ती म्‍हणते. “कोणीही, अगदी तुमचे जवळचे नातलगही तुमच्‍या पाठीशी उभे राहात नाहीत. त्‍याच वेळी मला कळलं की या जगात माझ्‍यासाठी मीच आहे.”

“कोणी आपणहून मदत देऊ केली तर मी ती घेत नाही,” उज्‍ज्‍वला कडवटपणे म्‍हणते. “कारण मदतीच्‍या बुरख्याआड त्‍यांचा दुष्‍ट हेतू असतो. माझे प्रश्‍न मी सोडवते. शेतात काम करते आणि मला जे जे शक्‍य आहे ते ते माझ्‍या मुलांना देते, बस्‍स...” आपल्‍या मुलीचा, वृषालीचा उज्‍ज्‍वलाला अभिमान आहे. वडील गेले तेव्‍हा वृषाली जेमतेम दहा वर्षांची होती. आता ती विशीची तरुणी आहे, आत्‍मविश्‍वासाने काम करणारी. दहावी झाल्‍यानंतर नर्सिंगचं प्रशिक्षण घेण्‍यासाठी वृषाली नागपूरला गेली. आता ती तिथेच एका खाजगी रुग्‍णालयात काम करते आहे. उज्‍ज्‍वलाचा मुलगा प्रशील १७ वर्षांचा आहे. तो फार शिकला नाही, पण मजुरी करतो आणि आईला शेतीच्‍या कामात मदत करतो.

PHOTO • Jaideep Hardikar
PHOTO • Jaideep Hardikar

‘मला काहीच ठाऊक नव्‍हतं’ : आज ती उत्तम शेती करते आहे, आलटून पालटून पिकं घेते आहे, नव्‍यानव्‍या गोष्टी करून पाहाते आहे, शेतीचं अर्थकारण सांभाळते आहे आणि म्हणते आहे, ‘शेती करणं कठीण आहे’

उज्ज्वलाचे आईवडीलही शेतकरीच. त्यांना एकोणिसाव्‍या वर्षीच तिचं लग्‍न करून दिलं. स्‍वतःच्‍या हिंमतीवर ती शेतीतला श्रीगणेशा शिकली. पीक कसं निवडायचं, बियाण्‍याची खरेदी कशी करायची, बँकेचे व्‍यवहार कसे करायचे, प्रत्‍यक्ष शेती कशी करायची, माल कसा विकायचा, इत्यादी. “मला काहीच ठाऊक नव्‍हतं.” आज ती उत्तम शेती करते आहे, आलटून पालटून पिकं घेते आहे, नव्‍यानव्‍या गोष्टी करून पाहाते आहे, शेतीचं अर्थकारण सांभाळते आहे आणि म्हणते आहे, “शेती करणं कठीण आहे.”

वेगवेगळ्या पद्धतीने तिने शेती करून पाहिली, अनेक प्रयोग केले. पण नुकसान कमी करण्‍यासाठी आणि उत्‍पन्‍न वाढवण्‍यासाठी बहुपीक शेतीचा पर्याय तिला उत्तम वाटतो. “मी इथे शेतात ऊसही लावून पाहिला. तो होतो का, हे मला पाहायचं होतं फक्‍त. पण उतारा फारच कमी होता. पुन्‍हा कधी ऊस नाही लावला,” उज्‍ज्‍वला सांगते.

प्रभाकर गेल्‍यावर उज्‍ज्‍वलाच्‍या सासूसासर्‍यांनी तिच्याशी आणि तिच्या मुलांशी फार संबंधच ठेवले नाहीत. “शेतजमीन हीच माझी संपत्ती आहे,” ती सांगते. “त्‍यातही साडेचार एकर तर माझा नवरा असतानाच आम्ही कर्जापायी गमावली होती. ती मला परत मिळवता आली नाही, माझ्‍या आवाक्‍यातलं नाही ते.”

टळटळीत दुपार झालेली असते. हरभऱ्याचं कुटार रचून ठेवायचंय. “या वर्षी दुष्काळ होता, त्‍यामुळे पीक चांगलं झालेलं नाही,” मंद हसत ती म्हणते. “पुन्‍हा एकदा मी नुकसान आणि कर्जाच्‍या चक्रात अडकलेय.”

शेतीतलं नुकसान आणि कर्ज यांनीच तिच्‍या नवर्‍याचा घास घेतला. “माझ्‍या नवर्‍याने आत्‍महत्‍या केली तेव्‍हा आमच्‍यावर दोन लाखांचं कर्ज होतं,” उज्‍ज्‍वला सांगते. “मी हप्‍त्‍याहप्‍त्‍यात त्‍याची फेड करतेय. खाजगी सावकार आणि बँकांचे मिळून एक लाखाच्या वर फेडायेचत अजून. त्‍यांच्‍याकडून मी आता वेळ मागून घेतलाय.”

“मृत्‍यू हा काही संकटातून बाहेर पडण्‍याचा मार्ग नव्‍हे,” तिचं तत्त्वज्ञान ती सांगते. “माणसाचा जन्‍म एकदाच मिळतो. दुःख हा आयुष्याचाच एक भाग आहे. माझ्‍या नवर्‍याने आमचा विचार न करताच मृत्‍यूला कवटाळलं.”

Jaideep Hardikar

Jaideep Hardikar is a Nagpur-based journalist and writer, and a PARI core team member.

Other stories by Jaideep Hardikar
Translator : Vaishali Rode

Vaishali Rode is an independent journalist and a writer with prior experience in Marathi print media. She has penned the autobiography of a transgender, MI HIJDA MI LAXMI, which has been translated in many languages.

Other stories by Vaishali Rode