ऑगस्टमधली एक तापलेली दुपार; रस्ता सुनसान आहे. अलमोडा आणि पिठोरागड जिल्ह्यांमधील सीमारेषा दर्शवणाऱ्या शरयू नदीवरील पुलापलीकडे एखाद्या किलोमीटर अंतरावर पोस्टाची एक लाल चकचकीत  पेटी उन्हात झळकतेय.

पोस्टाची ती लाल चकचकीत  पेटी – त्या भागातली एकमेव – इतर ठिकाणी कुणाच्या ध्यानातही येणार नाही, पण इथे मात्र हे एक प्रगतीचं पाऊल आहे. २३ जून २०१६ ला इथे एक नवीन शाखा डाकघर, कुमाऊ मधल्या या भागातील पहिलंच. याचा सहा खेड्यांना उपयोग होतो - भानोली सेरा गुंठ, सेरा (ऊर्फ) बडोली, सरतोला, चौनापाटल, नैली आणि बडोली सेरा गुंठ. या गावातील बहुतेक रहिवासी शेतकरी आहेत.

पोस्ट नसल्याने इथल्या रहिवाश्यांना सहन कराव्या अडचणीविषयीची माझी (अर्पिता चक्रबोर्ती) ‘द लास्ट पोस्ट- अँड अ ब्रिज टू फार’ ही कथा ‘पारी’मध्ये छापून आल्यानंतर दोनच दिवसांनी हे घडलं. आता सेरा बडोलीला पिन कोडही मिळालाय – २६२५३२.

ही सहा गावं पिठोरागडच्या गंगोलीहाट गटातील आहेत पण त्यांचं पोस्ट मात्र पुलापलीकडे ५ किमीवर अलमोडा जिल्ह्याच्या भसियाच्छाना गटात आहे. मी जेव्हा पहिल्यांदा भानोली गुंठला गेले होते तेव्हा तिथले रहिवासी मदन सिंग सांगत होते, ‘‘अजून आम्हाला पिठोरागडचा हिस्सा मानलं जात नाही. म्हणजे आम्ही रहातो इथे पण आमचा पत्ता आहे अल्मोड्यात!”

‘पारी’मध्ये बातमी आल्यानंतर काही आठवड्यानंतर मी नवीन पोस्ट ऑफिस बघण्यासाठी पुन्हा गेले होते. या गावांतील लोकांना आजवर जवळच्या भसियाच्छाना डाकघरातून पत्र मिळायला १० दिवस लागत होते आणि पिठोरागडहून पत्र किंवा मनीऑर्डर मिळण्यासाठी महिनाभर थांबावं लागत होतं, कधी कधी त्यामुळे मुलाखतीची संधीही हुके एखाद्याची. महत्त्वाची डाक घेण्यासाठी कुणी कुणी ७० किमी दूर अलमोड्याला जात. आता त्यांची परिस्थिती कशी आहे हे पहायचं होतं मला.

या सहा गावांचे रहिवासी सांगत होते की त्यांनी मिठाई वाटून पोस्टाचं उद्घाटन साजरं केलं. सेरा बडोलीचे मोहन चंद्र जोशी हसत हसत म्हणाले, “इतर ठिकाणी लोक नवीन पोस्ट (पद) किंवा नेमणुका साजऱ्या करतात आम्ही इथे नवीन पोस्ट ऑफिस साजर करतोय! या पोस्टामुळे आमची आयुष्यंच बदलून जातील!”

एक टेबल आणि चार खुर्च्या मांडलेली एक छोटी खोली, तीत एक लोखंडी कपाट एवढंच आहे हे नवं पोस्ट. कैलाश चंद्र उपाध्याय हे इथले एकमेव कर्मचारी दुहेरी भूमिका – पोस्टमन आणि पोस्टमास्तर- निभावत आहेत. इथून १२ किमीवरच्या गनई डाकघरात त्यांची नेमणूक होती. इथे नवीन व्यक्तीची नेमणूक होईपर्यंत त्यांना या नव्या शाखेचा कार्यभार दिलेला आहे. “महिन्याभरात नवीन पोस्टमन आणि पोस्टमास्तर नेमले जातील.” उपाध्याय म्हणाले. ते रोज सकाळी १२ किमीवरच्या गनईहून डाक गोळा करतात आणि वाटेत सेरा बडोलीला पोचवतात.


02-Kailash-Chandra-in-his-post-office(Crop)-AC-A Post Office for Sera Badoli.jpg

कैलाश चंद्र उपाध्याय हे इथले एकमेव कर्मचारी दुहेरी भूमिका – पोस्टमन आणि पोस्टमास्तर- निभावत आहेत


रहिवाश्यांच्या म्हणण्यानुसार, झालेला सगळ्यात मोठा बदल म्हणजे आता आधार कार्डे योग्य पत्त्यानिशी  पोचवली जाऊ लागली आहेत. याआधी त्यांवर ‘भसियाच्छाना, जिल्हा अलमोडा’ हा पत्ता असे. ‘पण आम्ही तर पिठोरागड मध्ये राहतो, अल्मोड्यात नाही.” बडोली सेरा गुंठचे सुरेश चंद्र म्हणतात, “आम्ही जेव्हा ही चूक सुधारायला सांगितलं तेव्हां कार्डे गनईला जाऊ लागली. तिथून कुणी पोस्टमन येत नसे. त्यामुळे आम्हाला स्वत: जाऊन ती घ्यावी लागत. पण आता त्यांवर बरोबर पत्ता असतो आणि ती आमच्या घरी पोचवली जातात.”

नवीन डाकघरात बचत बँक व आवर्ती जमा खात्यांची सेवाही सुरु झाली आहे. आता सेरा बडोलीत २५ बचत आणि ५ आवर्ती जमा खाती उघडली आहेत. “इथे तिजोरी नाही, त्यामुळे खातेदारांनी जमा केलेली रोकड मी माझ्याजवळच ठेवतो,” कैलाश चंद्र सांगत होते.

पोस्टाने निवृत्तिवेतन सुद्धा मिळण्याची सोय लौकरच होणार आहे पण तोपर्यंत पार्वती देवी सारख्या ज्येष्ठ नागरिकांना गनईपर्यंत जावच लागणार. काही काळानंतरच हे पोस्ट संपूर्ण सेवा देऊ लागेल, असं दिसतंय.

अजूनही लोकांच्या मुलाखतींची पत्र उशीरा पोचतात. “आमच्या शेजाऱ्यांच्या मुलाची सरकारी शाळेतील नोकरीसाठी मुलाखत होती २९ जूनला आणि पत्र पोचलं ३ जुलैला,” बडोली सेरा गुंठचे पद्म दत्त नियुलींया सांगत होते, “अजूनही अनेकांना माहित नाही की आमचा पत्ता बदलला आहे. ते जुनाच पत्ता – भसियाच्छानाचा पिन कोड – लिहितात, मग या पत्रांना पोचायला महिना लागतो. लोकांना वाटतं की पोस्ट खातं या नवीन पोस्टाकडे पत्र पाठवतील पण तसं होत नाही. खात्याने आम्हाला पिन कोड मधील बदल सांगितलेला नाही, आम्हीच लोकांना तो कळवत आहोत.”

भसियाच्छानाचे पोस्टमन मेहेरबान सिंग मात्र कुरकुरत सांगतात, “या सहा गावांसाठीची दररोज निदान ५-६ पत्र येतात. तिथे नवीन डाकघर उघडलंय तरी लोक भसियाच्छानाच्या पत्त्यावर पत्र पाठवतात. पत्र ५ असोत की १५ मला गावोगाव चालत जाऊन ती पोचवावी लागतात. आम्ही या डोंगरावरची गाढवं आहोत.”

पण तरीही बरंच काही बदललंय. पिठोरागडहून सेरा बडोलीला २० ऐवजी फक्त ४ दिवसात पत्र पोचतं. ‘पारी’वरची २१ जूनला प्रसिद्ध झालेली बातमी वाचून बऱ्याच जणांनी उत्साहाने ट्वीट केलं. संचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी देखील या सहा गावांच्या संचार सेवांकडे लक्ष देण्याचं आश्वासन दिलं आहे. मोहनसारख्या नव्या पिढीच्या लोकांना आशा आहे की लवकरच हे पोस्ट गनई व इतर डाकघरांशी इंटरनेट द्वारा जोडलं जाईल.

Arpita Chakrabarty

Arpita Chakrabarty is a Kumaon-based freelance journalist and a 2017 PARI fellow.

Other stories by Arpita Chakrabarty
Translator : Chhaya Deo

Chhaya Deo is a Nashik based activist of Shixan Bazaarikaran Virodhi Manch, a group working against commercialisation of education and for quality education which is a constitutional right of Indian citizens. she writes and also does translation work.

Other stories by Chhaya Deo