‘मी भाज्या विकतोय आता. पण त्यात फार फायदा नाही होत. आम्ही बहुतेक सगळे आता घरात बसून आहोत, रिकामे, काहीही न करता. इथे जवळ असलेला सिमेंटचा कारखाना सुरू आहे, पण आम्ही नाही जात तिथे कामाला,’ मोरी गावचे करीम जाट मला फोनवरून सांगत होते. कच्छ जिल्ह्याच्या लखपत तालुक्यातलं हे गाव. करीम जाट हा फकीरानी जाट समाजातले ‘मालधारी.’ कच्छी भाषेत ‘माल’ म्हणजे गुरं. गुरं राखून असणारे, म्हणून ते मालधारी. संपूर्ण कच्छमध्ये ही मालधारी मंडळी गाई, म्हशी, उंट, घोडे, शेळ्या आणि मेंढ्या बाळगून आहेत.

ज्या भाज्यांचा करीम जाटनी उल्लेख केला, त्या त्यांनी जवळच्या बाजारातून किंवा आसपासच्या गावातून विकत आणलेल्या. ते विकतायत भाज्या, पण त्यांची योग्य किंमत मिळत नाहीये, अशी त्यांची तक्रार आहे. या भागातला सिमेंटचा कारखाना त्यांच्या गावापासून काही किलोमीटरवर असलेल्या वसाहतीत आहे. पण लॉकडाऊनमुळे करीम आणि इतर फकीरानी जाट मंडळींना घरातून बाहेर पाऊल टाकणं खूप अवघड झालंय. शिवाय, या कारखान्यात आधीच भरपूर मजूर आहेत. बहुतेक सगळे पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांतून स्थलांतरित झालेले. घरी परतू शकले नाहीत, त्यामुळे इथेच राहिलेले. हे स्थलांतरित आणि इथली स्थानिक मंडळी यांच्यातले संबंध कधीचफार स्नेहाचे, प्रेमाचे नव्हते.

लॉकडाऊनमुळे भारत-पाकिस्तान सरहद्दीजवळ असलेल्या सावला पीर दर्ग्यात आणि तिथे होणाऱ्या उरुसाला जाता आलं नाही, याची खंत करीम जाट बोलून दाखवतात. ‘रमजान सुरू झालाय. ईदला आता महिनाही राहिला नाही...’ त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग... ‘या वर्षीची ईद खूपच वेगळी असणार आहे.’

कच्छमधला कोविड १९ चा पहिला रुग्ण होती लखपत तालुक्यातलीच एक महिला. ती परदेशी जाऊन आली होती. मार्चमध्ये भुजला तिची टेस्ट केली आणि ती करोना पॉझिटिव्ह आहे हे कळलं. लखपत हे उंट पाळणाऱ्यागुराख्यांचं माहेरघर आहे.

२४ मार्चला लॉकडाऊनची घोषणा झाली आणि त्यानंतर कच्छ जणू स्तब्ध झालं... सगळं जिथल्या तिथे! उंट पाळणारे गुराखी घरापासून खूप दूरवर वेगवेगळ्या ठिकाणी उंटांना चरायला घेऊन जातात. तसेच त्यावेळीही गेले होते. त्यांना घरी परतताच आलं नाही. ज्या गावांमध्ये ते कुटुंबासह राहातात, तो भाग भारत-पाकिस्तान हद्दीच्या अगदी जवळ, किंवा खरं तर सरहद्दीवरच असलेला. अतिसंवेदनशील भाग. सुरक्षेचे नियम अत्यंत कडक. अचानक झालेल्या लॉकडाऊनने ‘मालधारीं’ना गावात परतायला किंवा गावात असलेल्या त्यांच्या कुटुंबासाठी लागणाऱ्या अन्नधान्याची तजवीज करायला वेळच मिळाला नाही.

‘आता सध्या आमची गुरं ठीक आहेत,’ ते सांगतात. कारण आता ही सगळी मंडळी अडकली आहेत ती चराऊ कुरणांवर. पण हा लॉकडाऊन वाढला, तर गुरांना चारणं कठीण होईल. वाढत्या उन्हाळ्यातली वाढती उष्णता हाही एक प्रश्न आहेच.

नाखत्राणा तालुक्यातल्या काही जणांशी मी फोनवर बोललो. कुरणांवर असलेल्या त्यांच्यापैकी काही गुराख्यांना तिथल्या पोलिसांनी सांगितलं, अजिबात इकडेतिकडे फिरायचं नाही. त्यामुळे आता ही मंडळी धान्य, रेशन असं काही आणायला किंवा इतर काही कामासाठी आपल्या गावीही जाऊ शकत नाहीत. सगळंच कठीण झालंय.

PHOTO • Ritayan Mukherjee

कच्छमध्ये वेगवेगळे मालधारी समाज आहेत. राबरी, जाट, सामसा वगैरे. या साऱ्यांचं जगणं, त्यांची संस्कृती त्यांच्या गुरांभोवतीच फिरते. त्यांची लोकगीतंही त्यांच्या गुरं राखण्याच्या व्यवसायाबद्दल बोलतात. काही गुराखी समाजविशिष्ट मोसमात (मे-जूनपासून सप्टेंबरपर्यंत) स्थलांतर करतात, तर काही त्यांच्याच तालुक्यात वर्षभर स्थलांतर करत असतात. लॉकडाऊनमुळे त्यांच्या हंगामी स्थलांतराचं स्वरूपच बिघडून गेलंय .

गुलममद जाट आणि त्यांच्यासारख्याच इतर अनेक मालधारींना रेशन दुकानांवर धान्य मिळणंही कठीण झालंय. ‘आम्ही सगळे आमचं ओळखपत्र म्हणून रेशन कार्ड स्वत:सोबत ठेवतो,’ गुलममद सांगतात. ‘पण आमच्या वाटणीचं धान्य रेशन दुकानातून घेण्यासाठी त्याचा उपयोग झाला नाही. बऱ्याच कुटुंबांच्या बाबतीत हे झालं.’

‘हे असंच होणार,’ भुजच्या पशुपालन केंद्राच्या‘ब्रीडिंग प्रोग्राम’चे संचालक रमेश भट्टी सांगतात. ‘बरेच उंटवाले आपल्या गावापासून दहा-वीस किलोमीटरवर जंगलाच्या जवळ किंवा कुरणांवर जातात उंटांना चारायला. त्यांचा ना आपल्या गावांशी संपर्क असतो, ना सरकारी यंत्रणेशी. बरेच जण बाहेर असताना रेशन कार्ड गावात, घरात ठेवतात. सांडणीच्या दुधाला किंवा या मालधारींकडच्या इतर गोष्टींनाही आता गिऱ्हाईक मिळत नाहीये. त्यामुळे त्यांचं उत्पन्न जवळजवळ बंदच झालंय. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीही त्यांना घेता येत नाहीयेत. आपल्या घरी जायलाही त्यांना भीती वाटते. कारण काही गावं तर त्यांना यायला परवानगीच देत नाहीयेत.’

घरातली जी पुरुष माणसं गुरांना चरायला घेऊन गेली आहेत त्यांना दूध आणि रोटी तरी मिळतेय, पण इथे घरात असलेल्या बायका-मुलांनाही अन्नधान्य हवंच आहे की! ‘गेल्या काही दिवसांत थोडीथोडी वाहतूक सुरू झालीये अत्यावश्यक वस्तू आणि सेवांसाठी. पण त्याआधीच खूप नुकसान झालंय,’ भट्टी सांगतात.

अशा परिस्थितीत, भूक ही सगळ्यात मोठी आणि खरी समस्या आहे. सरकार जे काही देतंय, ते पुरेसं नाही. ‘आठ जणांच्या कुटुंबाला दहा किलो गहू मिळाला, तर त्यावर ते किती दिवस काढणार?’ ते विचारतात.

भुजची ‘सहजीवन’ ही संस्था पशुपालन केंद्र चालवते. मालधारींच्या हक्कांसाठी काम करते. या संस्थेने गरीब आणि वंचित कुटुंबांसाठी गेल्या दोन आठवड्यांत भुजमध्ये ७० रेशन किट्स तयार केले. गहू, मूगडाळ, सरकीचं तेल, साखर, कांदे, बटाटे, तांदूळ, मीठ, मसाले, धने पावडर, हळद, मोहरी... दोन आठवड्यांना पुरेल असं आणि एवढं सगळं. ‘त्यांचे आभारी आहोत आम्ही. सगळं अन्नधान्य दाराशी मिळालं आम्हाला,’ करीम जाट म्हणतात. ‘त्यामुळेच खरं तर आम्ही आज जिवंत आहोत. पण हा लॉकडाऊन वाढला, कडक झाला, तर आमच्यापुढे आणखी नवे प्रश्न उभे राहातील.’

लॉकडाऊनमध्ये हळूहळू ढील देण्यात येईल, शेती आणि तिच्याशी संबंधित कामं सुरू होतील, असं सरकारने जाहीर केलंय. ‘तसंच व्हायला हवं,’ करीम जाट म्हणतात. ‘नाहीतर लोक खाणार काय? सगळेच अस्वस्थ झालेत, चिंता वाटायला लागलीय आता लोकांना.’

लोकांना धान्य मिळायला लागलंय, तर आता काही जण भलत्याच गोष्टींच्या टंचाईने अस्वस्थ झालेत. जाट अयुब अमीन त्यातले एक. मी आणि माझे मित्र त्यांना प्रेमाने अयुब काका म्हणतो. फकीरानी जाट समाजातले ते एक बुजुर्ग व्यक्ती आहेत. ‘मला धान्य मिळालंय,’ ते म्हणतात, ‘ते पाठवणाऱ्या तुम्हा भल्या माणसांचे खूप आभार. पण या लॉकडाऊनमधली सगळ्यात दु:खद गोष्ट कोणती माहितीये का? बिड्या मिळत नाहीयेत हो ...’

PHOTO • Ritayan Mukherjee

फकीरानी जाट समाजातले बुजुर्ग जाट अयुब अमीन वर्षभर आपल्या खराई उंटांना भचाऊ तालुक्यातच चरायला नेतात. तेच त्यांच्या उत्पन्नाचं साधन. गेल्या काही वर्षांत मात्र चराऊ कुरणं कमी झाली आहेत. उंटांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे त्यांचं उत्पन्न कमी झालं आहे. कोविड १९ चा लॉकडाऊन उंटाचं दूधविकून मिळणारं त्यांचं उत्पन्न आणखी तीस टक्क्यांनी घटवेल, असा त्यांचा अंदाज आहे.

PHOTO • Ritayan Mukherjee

गेल्या काही वर्षांत कच्छच्या किनारपट्टी भागात सिमेंट उद्योगात मोठी वाढ झाली आहे. मोरी, तहेरा आणि सरहद्दीवरच्या इतर काही गावांतली फकीरानी जाट समाजाची तरुण मुलं रोजावर या सिमेंटच्या कारखान्यांत काम करायला जातात. पण लॉकडाऊनमध्ये आता हे कारखाने बंद आहेत.

PHOTO • Ritayan Mukherjee

घरातली पुरुषमाणसं गुरांना चरायला घेऊन जातात, त्यांना दूध-रोटी मिळते. पण गावात राहाणाऱ्या बायका-मुलांना रोटी, चावल, डाळ हे तर हवंच. अचानक झालेल्या लॉकडाऊनने सरहद्दीवरच्या या गावांच्या अडचणी वाढवल्याच, पण जे गुराखी आपली रेशन कार्ड गावातच ठेवून गुरांना चरायला घेऊन गेले होते, त्यांना रेशन दुकानांतून अन्नधान्य घेता आलं नाही.

PHOTO • Ritayan Mukherjee

करीम जाट लखपत तालुक्यातल्या मोरी गावात राहातात. पशुपालनातून मिळणाऱ्या आपल्या घटत्या उत्पन्नाला आधार म्हणून त्यांनी गेल्या वर्षी ऑटोरिक्षा घेतली. ‘पण आता लॉकडाऊनमुळे मी रिक्षा बाहेर काढूच शकत नाहीये. मग मी भाज्या विकतो,’ ते सांगतात.

PHOTO • Ritayan Mukherjee

बऱ्याच फकीरानी जाटांना बीडी किंवा सिगारेट ओढण्याची सवय असते. लॉकडाऊनमुळे सध्या मात्र तंबाखूच्या या गोष्टी मिळतच नाहीयेत. जाट अयूब अमीन तक्रार करतात, ‘खूपच निराशाजनक आहे हे...’

Left: Pastoralist families receiving ration bags from Bhikhabhai Vaghabhai Rabari, president of the Kachchh Unt Uchherak Maldhari Sangathan (Kachchh Maldhari Camel Herders Organisation). Right: Several Fakirani Jat families have received such ration kits from a Bhuj-based organisation working for the rights of the maldharis. The bags include essentials like wheat, lentils, cotton oil, turmeric, spices, salt and rice. The families say this has reduced the pressure on them greatly.
PHOTO • Sahjeevan
Left: Pastoralist families receiving ration bags from Bhikhabhai Vaghabhai Rabari, president of the Kachchh Unt Uchherak Maldhari Sangathan (Kachchh Maldhari Camel Herders Organisation). Right: Several Fakirani Jat families have received such ration kits from a Bhuj-based organisation working for the rights of the maldharis. The bags include essentials like wheat, lentils, cotton oil, turmeric, spices, salt and rice. The families say this has reduced the pressure on them greatly.
PHOTO • Sahjeevan

‘कच्छ उंट उच्छेरक मालधारी संघटन’ या संस्थेचे अध्यक्ष भिखाभाई वाघाभाई रबारी यांच्या हस्ते धान्याच्या पिशव्या स्वीकारताना उंट पाळणारी कुटुंबं

अनुवादः वैशाली रोडे

Ritayan Mukherjee

Ritayan Mukherjee is a Kolkata-based photographer and a PARI Senior Fellow. He is working on a long-term project that documents the lives of pastoral and nomadic communities in India.

Other stories by Ritayan Mukherjee
Translator : Vaishali Rode

Vaishali Rode is an independent journalist and a writer with prior experience in Marathi print media. She has penned the autobiography of a transgender, MI HIJDA MI LAXMI, which has been translated in many languages.

Other stories by Vaishali Rode