दगड फोड, हाडं मोड, ओठावर गाणी गोड

' पारी' स्वयंसेवक संकेत जैन याला भारतभरात ३०० गावांत जायचंय आणि इतर गोष्टी टिपत असतानाच ही मालिका तयार करायची आहे: गावातील एखाद्या दृश्याचं किंवा प्रसंगाचं छायाचित्र आणि त्याच छायाचित्राचं एक रेखाचित्र. हे ' पारी' वरील मालिकेतलं सातवं पान. चित्रावरची पट्टी सरकवून तुम्ही पूर्ण छायाचित्र किंवा रेखाचित्र पाहू शकता.

“हाडं मोडायची भीती तर आम्हाला रोजच्या कामात आहेच,” हातोडा उचलत भीमाबाई पवार म्हणते. भीमाबाई, जिचे सुरकुतलेले, रापलेले हात तुम्हाला छायाचित्रात दिसतायत ती एक भूमीहीन दलित कामगार आहे. कर्नाटकच्या बिजापूर जिल्ह्यातल्या सिंदगी (ग्रामीण) हून स्थलांतर करून आलेली.

भीमाबाईने कदाचित तिशी पार केली असेल. वयाच्या १५ व्या वर्षापासून ती कामासाठी स्थलांतर करतीये. “दर वर्षी आम्ही सहा महिने [नोव्हेंबर-एप्रिल] कामासाठी गाव सोडतो. महाराष्ट्रातल्या गावोगावी जाऊन दगड फोडायची कामं करतो,” ती सांगते. उरलेले सहा महिने ती सिंदगी तालुक्यातच दुसऱ्याच्या रानात मिळाली तर मजुरी करते.

एक ब्रास (स्थापत्य अभियांत्रिकीच्या भाषेत १०० घनफूट) दगड फोडायचे तिला ३०० रुपये मिळतात. “२००० सालाच्या सुमारास याच कामाचे मला ३० रुपये मिळत होते. एक ब्रास दगड फोडायला आम्हाला दोन दिवस लागतात – हाताची हाडं मोडली नाहीत तर,” ती म्हणते.

हाडं खिळखिळी करणारं काम आणि राहण्याची धड सोय नसल्यामुळे स्थलांतरित कामगारांच्या हालात भर पडते. ती आणि तिचा नवरा पिवळ्या प्लास्टिकच्या तंबूवजा झोपडीत राहतात. जिथे काम असेल तिथे हे बिऱ्हाड सोबत नेतात.

भीमाबाईचे आई-वडील शेतमजुरी करायचे. हा फोटो कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातल्या कांबळवाडी गावात घेतलाय. सिंदगी (ग्रामीण)च्या १० जणी तिथे काम करत होत्या. या बायांनी सांगितलं की त्यांनी कोल्हापूर, सातारा आणि पुण्याच्या गावांमध्ये कामं केली आहेत. त्यांचे नवरेही दगडाचंच काम करतात. पुरुष लोक डोंगरातून मोठाले पत्थर काढून ट्रॅक्टरवर लागून कामावर आणतात. त्यानंतर बाया पत्थराचे छोटे दगड फोडतात. या बायांच्या अंदाजाप्रमाणे त्यांच्या टोळीतल्या १०-१२ गड्यांना मिळून “एका ट्रॅक्टरमागे १५० रुपये मिळतात. आणि ते किमान १० ट्रॅक्टर भरतील एवढे दगड एका दिवसात फोडत असतील.”

या कामगारांबरोबर त्यांची लहान लेकरंही असतात. काही तर अगदी तान्ही, साडीच्या झोळ्यांमध्ये निजलेली. बहुतेक मुलं माध्यमिक शाळेत पोचण्याआधीच शाळा सोडतात.

जखमा नित्याच्याच. पण, भीमाबाई सांगते, “आता लागलं म्हणून काम थोडी थांबवता येतंय. जास्तच झालं तर आम्हाला आमच्या गावी परतावं लागतं.” कधी कधी दगड फोडताना त्याच्या चिपा किंवा ठिकऱ्या उडून बाकीच्यांना इजा होतात. “छोट्या मोठ्या जखमा होतच राहतात,” गंगूबाई सांगते. असाच दगडाचा कण जाऊन तिच्या डाव्या डोळ्याला इजा झाली होती.

उन्हाचा कार आहे. दुपारचे ४ वाजलेत. दगड फोडायचं काम अचानक थांबतं. या बायाचं पाच मिनिटं विश्रांती घ्यायचं ठरतं. त्या पाणी पितात आणि मारवाडी भाषेतलं निसर्गाला वाहिलेलं एक गाणं गायला लागतात. “आमचे पूर्वज राजस्थानातून इथे आले,” त्या सांगतात. “आम्हाला मारवाडी, कन्नड आणि मराठी पण बोलता येतं.”

अनुवादः मेधा काळे

Sanket Jain

Sanket Jain is a journalist based in Kolhapur, Maharashtra. He is a 2022 PARI Senior Fellow and a 2019 PARI Fellow.

Other stories by Sanket Jain
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale