महाराष्ट्रातल्या खेडोपाडीच्या स्त्रियांनी गायलेल्या एक लाखाहून अधिक ओव्यांपैकी ही पहिली वहिली ओवी ऐका. हा अभूतपूर्व असा 'ग्राइंडमिल साँग्ज प्रोजक्ट - ओवी संग्रह' पारीवर नियमितपणे तुमच्या भेटीला येत राहणार आहे. आतापर्यंत तब्बल ३०,००० ओव्यांचं डिजिटल रेकॉर्डिंग झालं आहे व  ४०,००० ओव्यांचा इंग्रजी अनुवाद पूर्ण झाला आहे. काव्य आणि संगीताचा हा समृद्ध वारसा जतन करण्याच्या या प्रकल्पात १००० गावांमधल्या ३३०२ स्त्री कलावंतांनी सहभाग घेतला आहे

द ग्राइंडमिल साँग्ज प्रोजेक्ट – ओवी संग्रह! ओव्यांच्या या दुनियेत तुमचं मनापासून स्वागत! महाराष्ट्रातल्या घराघरात जात्यावर किंवा घरची इतर कामं करताना बाया ओव्या गातात, त्या एक लाखाहून अधिक जात्यावरच्या ओव्यांचा हा संग्रह.

गेली अनेक दशकं कित्येक मानववंश शास्त्रज्ञांनी आणि सांस्कृतिक संदर्भात संगीताचा अभ्यास करणाऱ्या विविध तज्ज्ञांनी पद्धतशीर आणि बारकाईने केलेल्या संशोधनातून हा संग्रह तयार झाला आहे. स्त्रियांच्या जात्यावरच्या ओव्यांचं जतन व्हावं, अनुवाद व्हावेत, एक दस्तावेज तयार व्हावा आणि या प्रचंड मोठ्या ठेव्याचं पुनरुज्जीवन करावं ही या संग्रहामागची प्रेरणा. गेल्या दशकामध्ये जाती गेली आणि चक्की आली. त्यामुळे ओव्यांची ही परंपरा हळू हळू नाहीशी होऊ लागली आहे.

या ओव्यांचा आवाका फार मोठा आहे. खेड्यातलं, गावातलं जीवन, लिंगभाव, जात आणि वर्गाचं वास्तव, धर्म, स्त्रीचं तिच्या मुला-बाळांबरोबर, नवरा, भावंडं आणि एकूणच समाजाबरोबर असणारं नातं इतकंच नाही तर त्या त्या काळातले सामाजिक, राजकीय प्रश्न अशा कितीतरी गोष्टींबद्दल या ओव्या आपल्याला एक वेगळं भान देतात.

ओवी गाताना गंगूबाई

महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांमधल्या बायांची ही समृद्ध कला आणि त्यांची जगण्याची काटक वृत्ती यांचं प्रतीक असणाऱ्या या ओव्या पीपल्स अर्काइव ऑफ रुरल इंडिया (पारी) आपल्या वेबसाइटद्वारे सगळ्या जगासमोर आणत आहे. आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जागतिक महिला दिन, ८ मार्च २०१७च्या सन्मानार्थ आम्ही हा संग्रह प्रकाशित करत आहोत.

ओव्यांच्या संग्रहाची मूळ संकल्पना स्व. हेमा राइरकर आणि गी पॉइटवँ यांची. हे दोघंही सामजिक कार्यकर्ते, नावाजलेले तज्ज्ञ आणि सेंटर फॉर को-ऑपरेटिव रिसर्च इन सोशल सायन्सेस, पुणे या संस्थेचे संस्थापक. वीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी दोघांनी मिळून महाराष्ट्रातली तब्बल १,१०,००० लोकगीतं कागदावर उतरवली.

१९९० च्या शेवटी शेवटी बर्नार्ड बेल या उपक्रमात सहभागी झाले. फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रीसर्च इथे अभियंता असणारे आणि नंतर संख्याशास्त्र आणि गणितीय पद्धती वापरून संगीताचा अभ्यास करणारे बेल या उपक्रमामध्ये सामील झाले आणि त्यांनी ही लोकगीतं, त्यांची संबंधित टिपणं आणि तब्बल १२० तासांचं ध्वनीमुद्रण असा एक मोठा दस्तावेज उभा केला. हा सगळा संग्रह गुरगाव, हरयाणा इथल्या अर्काइव्ज अँड रीसर्च सेंटर फॉर एथ्नोम्युझिकॉलॉजी इथे जतन करण्यात आला आणि नंतर तो फ्रान्समधल्या एक्झ ऑन प्रोवॉन्समधल्या स्पीच अँड लँग्वेज डेटा रिपॉझिटरी इथे डॉ. बेल यांच्या देखरेखीखाली हलवण्यात आला. पुढे ओपन अर्कायवल इनफर्मेशन सिस्टिम्ससाठी हा ओव्यांचा संग्रह एक उत्तम नमुना ठरला. इतकंच नाही तर डिजिटल ह्युमॅनिटीज म्हणजेच साहित्य, इतिहासासारख्या शाखा आणि डिजिटल माध्यमं यांचा संयोग करणाऱ्या विद्याशाखेच्या वाढीसाठी या संग्रहाने वाट आखून दिली.

१९९३ ते १९९८ दरम्यान ओवी संग्रह प्रकल्पाला युनेस्को, नेदरलंडचे विकास सहकार्य खाते आणि स्वित्झर्लंडच्या चार्ल्स लिओपोल्ड मेयर फौडेशन फॉर प्रोग्रेस ऑफ ह्यूमनकाइंड या संस्थांचे अर्थसहाय्य मिळाले.

प्रा. बेल सांगतात, “ओव्यांच्या संग्रहाचं दस्तावेजीकरण, संपादन आणि अनुवाद पूर्ण करणं आणि ते मुक्त प्रवेश (ओपन अॅक्सेस) मंचावर प्रकाशित करणं ही माझी हेमा राइरकर आणि गी पॉइटवँ यांच्याशी असणारी वैयक्तिक बांधिलकी होती. २०१५ च्या जानेवारीमध्ये पुण्यात ओव्यांसंबंधी काम करणाऱ्या काही अनुभवी व्यक्तींना मी काही उपकरणं देणगी म्हणून दिली. आणि त्यानंतर हा उपक्रम नव्याने सुरू झाला. हा सगळा संग्रह प्रकाशित करण्यासाठी आम्ही एक कच्चा आराखडा तयार केला. यासाठी सगळ्या संग्रहाची नव्याने जुळणी आणि वेगवेगळ्या देवनागरी संकेतनांतून (encoding) लिखितांचं अनु संकेतन (transcoding) करणं यासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक होती.”

पारीने यात भाग घेतला आणि काही जुन्या आणि नव्या सहकाऱ्यांच्या मदतीने हा प्रकल्प परत एकदा सुरू झाला. गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या माजी दस्तावेज अधिकारी आशा ओगले यांनी  रजनी खळदकर व जितेंद्र मैड या त्यांच्या सहकाऱ्यांसोबत अनुवाद न केलेल्या ७०,००० ओव्या हाती घेतल्या. या सर्वांचं मराठी भाषेचं आणि गावाकडच्या जगण्याचं सखोल ज्ञान यामुळे या अनुवादांना एक अनोखा आणि अनमोल संदर्भ मिळाला.

२०१६ मध्ये अशोका विद्यापीठाबरोबर भागीदारी सुरू झाली. तिथले राज्यशास्त्राचे प्राध्यापक जिल वेर्नियर्स यांनी यात पुढाकार घेतला. २०१६-१७ चे यंग इंडिया फेलो – मेहेरीश देवकी, स्नेहा माधुरी आणि पूर्णप्रज्ञा कुलकर्णी सध्या अनुवादांचं परीक्षण आणि संग्रहासाठी मदत करत आहेत. पारीच्या व्यवस्थापकीय संपादक नमिता वाईकर ओवी प्रकल्पाच्या पारीसाठीच्या प्रमुख आहेत तर अमेरिकन इंडिया फौंडेशन क्लिंटन फेलो, ऑलिव्हिया वॉरिंग संग्रहाच्या अभिरक्षणासाठी (curation) सहयोग देत आहेत.

या प्रकल्पामध्ये ज्यांचं फार मोलाचं योगदान आहे अशा काहींचा उल्लेख करावाच लागेल. भीमसेन नाणेकर (मुलाखती), दत्ता शिंदे (संशोधन सहभाग), मालविका ताळुदकर (छायाचित्रणकार), लता भोरे (डेटा एंट्री) आणि गजराबाई दरेकर (अनुलेखन).

ओव्या सादर करणाऱ्या प्रमुख कलावंत आणि प्रकल्पातल्या एक सहभागी गंगूबाई अंबोरेंच्या निवडक चित्रफिती आणि छायाचित्रं अँड्रियेन बेल यांची आहेत.

पारीतर्फे आपल्या सर्वांना हे हार्दिक निमंत्रण. हा संग्रह पहा, त्याचा अभ्यास करा, त्याचा आनंद घ्या. पुढले काही महिने, खरं तर काही वर्षं आम्ही हा संग्रह टप्प्या-टप्प्याने प्रकाशित करणार आहोत. पारीचे आम्ही सर्व ओवी संग्रहामध्ये सामील असलेल्या सर्वांचे मनापासून आभारी आहोत. या टप्प्यावर महाराष्ट्राच्या खेडोपाडीच्या अगणित अनाम बायांच्या आयुष्यांची आणि त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेणं भाग आहे. खेद इतकाच की त्यांची नोंद घेण्यासाठी ना कुठला दस्तावेज आहे ना कोणची गीतं...


ध्वनीफीत – ओवी गाताना गंगूबाई

कलावंत : गंगुबाई अंबोरे

जात : मराठा

गाव : ताडकळस

तालुका : पूर्णा

जिल्हा : परभणी

लिंग : स्त्री

वयः ५६

शिक्षणः नाही

मुलं : १ मुलगी

व्यवसायः ऊस, कापूस, भुईमूग, ज्वारी निघणारी घरची १४ एकर शेती. मात्र घरातून हाकलून दिल्यामुळे गावच्या देवळात राहत असत.

ध्वनीमुद्रण : ७ एप्रिल १९९६ व ५ फेब्रुवारी १९९७ रोजी मुलाखत व ओव्या संकलित केल्या.

आरण्या गं वनामधी, कोण रडतं आईका, कोण रडतं आइका। बोरी बाभळी बाइका, बोरी बाभळी बायका।

कोण रडतं आईका, सीतेला गं समजावया। बोरी बाभळी बाइका बोरी बाभळी बाइका।

टिपण:

रामाच्या सांगण्यावरुन लक्ष्मणाने सीतेला अरण्यामध्ये आणून सोडले. नवऱ्याने आपल्याला कोणतीही कल्पना न देता असं अचानक वनात सोडून दिल्याचं लक्षात आल्यावर सीतेच्या दुःखाला पारावार उरला नाही. तिचं दुःख, वेदना समजून घेणारे आप्त, मैत्रीण असं कोणीही जवळ नव्हतं. वनातील झाडं, पशु-पक्षी आणि प्राणी यांना तिचा आक्रोश कसा समजणार? अशा प्रसंगात अरण्य-वनामध्ये तिचं सांत्वन कोण करणार?  म्हणून ती म्हणते, 'आरण्या वनामध्ये कोण रडतं आईका'...तिचा आवाज ऐकणारं माणूस म्हणून कोणीच नसतं. तिचा आवाज कोणी तरी ऐकावा ही अपेक्षा या ओवीतून ती व्यक्त करते. ज्याच्यावर विश्वास ठेवला त्या नवऱ्यानेच सोडून दिलेली ती एकटी पडते. अशा वेळी तिचं सांत्वन करायला, समजवायला बोरी, बाभळी या बायका येतात. बोरी बाभळीचे काटे, भेगाळलेलं खोड आणि शुष्कता या ओवीत जणू बाईच्या जगण्याचीच परिस्थिती मांडतात. स्त्रियांप्रमाणेच बोरी, बाभळीच्या झाडांचंही सामाजिक मूल्य कमीच लेखलं गेलं आहे. शेवटी या बोरी, बाभळीच तिचं सांत्वन करायला पुढे येतात. तिला समजावतात की बाई आम्हीही तुझ्यासारख्याच आहोत, एकट्या, सोडून दिलेल्या, दुर्लक्षित. गंगूबाई अंबोरे ही ओवी गाताना जणू सीतेमध्ये स्वतःला पाहतात.


हे पण बघा:  गंगा मनाची निर्मळ…    - जितेंद्र मैड

परभणी जिल्ह्यातल्या ताडकळस गावच्या गंगूबाई अंबोरे दुःखाने काठोकाठ भरलेल्या ओव्या गायच्या. वर्षांचा एकटेपणा भिनलेला त्यांचा आवाज... ऐकणारा भारावून जात असे संपूर्ण लेख वाचा

अनुवाद: मेधा काळे

Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale