सुनील गुप्ता काही घरून काम करू शकत नाहीत. आणि त्यांचं ‘ऑफिस’, अर्थात गेटवे ऑफ इंडिया, गेले १५ महिने, बराच काळ बंद आहे.

“आमच्यासाठी हे 'दफ्तर' आहे. आम्ही कुठे जाणार?” दक्षिण मुंबईतल्या या स्मारकाकडे बोट दाखवत ते विचारतात.

टाळेबंदी लागली त्या आधी आपला कॅमेरा घेऊन सकाळी ९ ते रात्री ९ सुनील या लोकप्रिय पर्यटनस्थळी थांबलेले असायचे. गेटवेकडे जाणारे विविध चेकपॉइंट पार करून जाणाऱ्या पर्यटकांना गाठून ते आणि त्यांच्यासारखे इतर छायाचित्रकार आपल्याकडचे क्लिक आणि प्रिंट असे ‘इन्स्टंट’ फोटोंचे अल्बम त्यांच्या पुढ्यात धरायचे आणि ‘एक मिनिट में फुल फॅमिली फोटो’ किंवा ‘एक फोटो प्लीज. फक्त ३० रुपये’ अशी गळ घालायचे.

कोविड-१९ च्या केसेस वाढायला लागल्या आणि एप्रिलच्या मध्यावर मुंबईमध्ये परत एकदा निर्बंध लागू झाले. परत एकदा काम बंद झालं. “आज सकाळी मी इथे आलो तर माझं स्वागत या ‘नो एन्ट्री’ ने केलं,” एप्रिल महिन्यात ३९ वर्षीय सुनील मला म्हणाले होते. “आधीच कमाईचे वांदे झाले होते आता तर निगेटिव्हच झालंय म्हणा ना. आणखी तोटा सहन करायचं त्राण काही माझ्यात राहिलेलं नाही.”

Sunil Gupta: 'We were already struggling and now we are going into negative [income]. I don’t have the capacity to bear any further losses'
PHOTO • Aakanksha
Sunil Gupta: 'We were already struggling and now we are going into negative [income]. I don’t have the capacity to bear any further losses'
PHOTO • Aakanksha

सुनील गुप्ताः ‘आधीच कमाईचे वांदे झाले होते आता तर निगेटिव्हच झालंय म्हणा ना. आणखी तोटा सहन करण्याचं त्राण काही माझ्यात राहिलेलं नाही’

ऑफिसला जाताना, म्हणजेच गेटवेवर सुनीलसारखे सगळेच फोटोग्राफर (सगळे पुरुष) एकदम ‘फॉर्मल’ कपडे घालून जायचे – कडक इस्त्रीचा पांढरा शर्ट, काळी पँट, काळे बूट. प्रत्येकाच्या गळ्यात कॅमेऱ्याचा बंद आणि पाठपिशवी. काही जण शर्टाला रंगीबेरंगी चष्मे अडकवून असायचे. कुणाला जर एकदम स्टाइलमध्ये फोटो काढून घ्यायचा असेल तर त्याची सोय. त्यांच्याकडच्या अल्बममध्ये ही वास्तू पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे हसरे फोटो असायचे.

“सध्या अशी गत आहे की लोक कमी आणि आम्हीच जास्त,” सुनील सांगतात. मार्च २०२० मध्ये पहिल्यांदा टाळेबंदी लागली त्या आधी सुनील आणि इथल्या इतरांच्या अंदाजानुसार किमान ३०० फोटोग्राफर गेटवेवर काम करत होते. तेव्हापासून ही संख्या घटत घटत आज १०० जण उरलेत. अनेक जण दुसऱ्या कामाच्या शोधात आहेत तर अनेक आपापल्या गावी परतायच्या बेतात.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुनील यांनी परत काम सुरू केलं होतं. “आम्ही दिवस रात्र उभे असतो, धो धो पाऊस कोसळत असला तरीही. एक तरी गिऱ्हाईक मिळेल याची वाट पाहत. दिवाळीत [नोव्हेंबर] तर मुलांसाठी मिठाई विकत घेण्याइतके सुद्धा पैसे माझ्यापाशी नव्हते,” ते सांगतात. आणि मग ‘लक’ मुळे त्याच दिवशी त्यांची १३० रुपये कमाई झाली. त्या काळात अधून मधून कुणी काही पैशाची मदत केली, काही संस्थांनी फोटोग्राफर्सना रेशन वाटलं.

२००८ साली सुनील यांनी काम करायला सुरुवात केली. तेव्हापासून तसंही त्यांचं उत्पन्न घटतच चाललं होतं. रोजचे ४०० ते १००० रुपये असणारी कमाई (किंवा मोठ्या सणांच्या काळात, १० लोकांच्या फोटोंचे १५०० रुपये देखील त्यांनी कमवलेत) आता २०० ते ६०० रुपयांवर आली आहे. कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनचा सुळसुळाट झाला तेव्हापासून ही उतरती कळा सुरूच आहे.

गेल्या वर्षी टाळेबंदी लागल्यापासून तर ते दिवसाला कसेबसे ६० ते १०० रुपये कमवू शकतायत.

It's become harder and harder to convince potential customers, though some agree to be clicked and want to pose – and the photographer earns Rs. 30 per print
PHOTO • Aakanksha
It's become harder and harder to convince potential customers, though some agree to be clicked and want to pose – and the photographer earns Rs. 30 per print
PHOTO • Aakanksha

आजकाल लोकांना पटवणं जास्तच अवघड होत चाललंय, काही जण तयार होतात आणि खास पोझ पण देतात – अशा प्रत्येक फोटोचे फोटोग्राफरला ३० रुपये मिळतात

“बोहनीच होत नाही हेच सध्या रोजचं नशीब आहे. गेली काही वर्षं आमचा धंदा तसाही बसलाच होता. पण सध्या ही अशी वेळ सारखीच येतीये. तेव्हा तसं तर होत नव्हतं,” सुनील सांगतात. ते दक्षिण मुंबईच्या कफ परेड भागातल्या एका वस्तीत राहतात. घरी पत्नी सिंधु आणि तिघं मुलं आहेत. सिंधु गृहिणी आहेत आणि क्वचित कधी शिलाईकाम शिकवतात.

सुनील १९९१ साली उत्तर प्रदेशातल्या फरसारा खुर्द गावाहून आपल्या मामांबरोबर मुंबईला आले. ते कांदू या इतर मागासवर्गीय प्रवर्गातले आहेत. त्यांचे वडील मऊ जिल्ह्यातल्या आपल्या गावी हळद, गरम मसाला आणि इतर मसाले विकायचे. “माझ्या मामांचा आणि माझा गेटवेला भेळपुरीचा ठेला होता किंवा आम्ही काही ना काही विकायचो – पॉपकॉर्न, आइस्क्रीम, लिंबू पाणी, वगैरे. तिथे काही फोटोग्राफर फोटो काढत असायचे ते आम्ही पहायचो. मला पण यामध्येच काही तरी करावं असं वाटायला लागलं,” सुनील सांगतात.

कालांतराने त्यांच्याजवळ थोडे पैसे साठले होते, काही मित्रांकडून आणि नातेवाइकांकडून उसने घेतले आणि २००८ साली जवळच्याच बोरा बाझार मार्केटमधून त्यांनी एक साधा सेकंड हँड एसएलआर कॅमेरा आणि प्रिंटर विकत घेतला. (२०१९ संपता संपता त्यांनी जरा महागाचा निकॉन डी २७०० हा कॅमेरा घेतला, तोही असेच पैसे उसने घेऊन. ते पैसे ते अजूनही फेडतायत).

त्यांनी त्यांचा पहिला कॅमेरा विकत घेतला तेव्हा लगेच प्रिंटरवर फोटो छापून देता येत असल्याने धंदा चांगला चालेल अशी त्यांची अटकळ होती. पण मग स्मार्टफोन इतके सहज मिळायला लागले की फोटोंची मागणी फारच आटली. गेल्या दहा वर्षांत, ते सांगतात, एकही नवा फोटोग्राफर या धंद्यात आलेला नाही. फोटोग्राफर्सची त्यांची ही शेवटची फळी असेल कदाचित.

'Now no one looks at us, it’s as if we don’t exist', says Gangaram Choudhary. Left: Sheltering from the harsh sun, along with a fellow photographer, under a monument plaque during a long work day some months ago – while visitors at the Gateway click photos on their smartphones
PHOTO • Aakanksha
'Now no one looks at us, it’s as if we don’t exist', says Gangaram Choudhary. Left: Sheltering from the harsh sun, along with a fellow photographer, under a monument plaque during a long work day some months ago – while visitors at the Gateway click photos on their smartphones
PHOTO • Aakanksha

‘आजकाल तर कुणी आमच्याकडे पाहत पण नाही, जणू काही आम्ही तिथे नाहीच,’ गंगाराम चौधरी म्हणतात. डावीकडेः काही महिन्यांपूर्वी उन्हापासून आडोसा म्हणून या वास्तूचा परिचय करून देणाऱ्या फळ्याखाली बसलेले हे दोघं फोटोग्राफर – पलिकडे आपापल्या स्मार्टफोनवर फोटो काढण्यात दंग असलेले पर्यटक

सुनील यांनी हे काम सुरू केलं त्या आधी गेटवेवरचे फोटोग्राफर पोलरॉइड कॅमेरे वापरायचे. पण ते सांगतात की हे फोटो प्रिंट करणं महाग पडायचं आणि त्याची देखभालही. त्यानंतर त्यांनी पॉइंट अँड शूट कॅमेरे वापरायला सुरुवात केली. फोटोची प्रिंट काढून ते पोस्टाने गिऱ्हाइकांना पाठवून द्यायचे.

आजकाल, स्मार्टफोनशी स्पर्धा असल्याने पोर्टेबेल प्रिंटरसोबत काही फोटोग्राफर एक यूएसबी डिव्हाइसही सोबत ठेवतात. म्हणजे फोटो काढला की लगेच गिऱ्हाइकांच्या स्मार्टफोनवर कॉपी करता येतो. त्याचे १५ रुपये वेगळे घेतात. काही जणांना सॉफ्ट कॉपी आणि छापलेली (प्रत्येकी रु. ३०) दोन्ही हव्या असतात.

गेटवेवर अनेक वर्षांपूर्वी ज्यांनी पोलरॉइड कॅमेरा वापरलाय अशांपैकी एक आहेत गंगाराम चौधरी. “असा एक काळ होता, जेव्हा लोक आपणहून आमच्याकडे यायचे आणि फोटो काढायला सांगायचे,” ते तेव्हाच्या आठवणी सांगतात. “आजकाल कुणी आमच्याकडे बघतही नाही, जणू काही आम्ही तिथे नाहीच.”

गेटवेवर काम सुरु केलं तेव्हा गंगाराम अगदी कुमारवयात होते. केवट समाजाचे (इतर मागासवर्गीय) गंगाराम बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातल्या डुमरी या आपल्या गावाहून मुंबईला आले. आधी ते कोलकात्याला गेले. त्यांचे वडील तिथे रिक्षा ओढायचं काम करायचे. गंगाराम यांना तिथे एका आचाऱ्याच्या हाताखाली काम मिळालं. महिन्याला ५० रुपये पगार होता. एका वर्षाच्या आतच त्यांच्या मालकाने त्यांना मुंबईतल्या आपल्या नातेवाइकाकडे काम करण्यासाठी पाठवून दिलं.

Tools of the trade: The photographers lug around 6-7 kilos – camera, printer, albums, packets of paper; some hang colourful sunglasses on their shirts to attract tourists who like to get their photos clicked wearing stylish shades
PHOTO • Aakanksha
Tools of the trade: The photographers lug around 6-7 kilos – camera, printer, albums, packets of paper; some hang colourful sunglasses on their shirts to attract tourists who like to get their photos clicked wearing stylish shades
PHOTO • Aakanksha

कामाच्या वस्तूः फोटोग्राफर किमान ६-७ किलोचं ओझं पाठीवर वाहतात – कॅमेरा, प्रिंटर, अल्बम, फोटोचे कागद, काही जण तर त्यांच्या शर्टला रंगीबेरंगी चष्मे देखील अडकवतात. एकदम स्टाइलमध्ये ज्यांना फोटो काढायचे असतात त्यांना आकर्षित करण्याची त्यांची क्लृप्ती

काही काळाने गंगाराम यांना त्यांचे एक लांबचे नातेवाईक भेटले जे गेटवेवर फोटोग्राफर म्हणून काम करत होते. “मी विचार केला, करून बघायला काय हरकत आहे?” ते सांगतात. तेव्हा (१९८० च्या दशकात) गेटवेपाशी फक्त १०-१५ फोटोग्राफर असायचे. त्यातले काही अनुभवी लोक नव्याने धंद्यात आलेल्या लोकांना त्यांच्याकडचे जादा पोलरॉइड किंवा पॉइंट अँड शूट कॅमेरे कमिशन घेऊन वापरायला द्यायचे. सुरुवातीला गंगाराम यांच्याकडे फोटो अल्बम दाखवून गिऱ्हाईक आणण्याचं काम असायचं. हळू हळू त्यांच्या हातात कॅमेरा यायला लागला. गिऱ्हाइकांकडून एका फोटोचे २० रुपये मिळायचे, त्यातले २-३ रुपये त्यांना दिले जायचे. रात्र कुलाब्याच्या पदपथांवर जायची आणि दिवस फोटो काढून घेण्यास इच्छुक लोकांच्या शोधात.

“त्या वयात चार पैसे हातात यावेत एवढ्यासाठी भटकायला पण भारी वाटायचं,” गंगाराम हसत हसत सांगतात. “सुरुवातीला मी काढलेले फोटो इतके चांगले यायचे नाहीत. पण काम करत करतच तुम्ही शिकत जाता.”

फोटोचं प्रत्येक रीळ अगदी मौल्यवान असायचं – ३६ फोटोंचं रीळ ३५-४० रुपयांना मिळायचं. “आम्हाला काही एकामागून एक फोटो काढायची चैन करता यायची नाही. प्रत्येक फोटो लक्ष देऊन आणि विचार करून काढावा लागायचा. आजच्यासारखं नाही, वाटेल तितके [डिजिटल] फोटो काढा,” गंगाराम म्हणतात. त्यांना आठवतं, की कॅमेऱ्याला फ्लॅशलाइट नसायचा त्यामुळे सूर्यास्त झाला की त्यांना काम थांबवावं लागायचं.

१९८० च्या दशकात फोटो प्रिंट करायला एक दिवस लागायचा. फोर्ट परिसरात असलेल्या दुकानांमध्ये आणि छोट्या फोटो स्टुडिओंमध्ये एक रीळ डेव्हलप करण्याचे १५ रुपये आणि एक ४ बाय ५ इंची रंगीत फोटो छापायला १.५० रुपये खर्च यायचा.

To try and compete with smartphones, some photographers carry a USB devise to transfer the photos from their camera to the customer’s phone
PHOTO • Aakanksha
To try and compete with smartphones, some photographers carry a USB devise to transfer the photos from their camera to the customer’s phone
PHOTO • Aakanksha

स्मार्टफोनशी स्पर्धा असल्याने काही फोटोग्राफर कॅमेऱ्यातून गिऱ्हाइकाच्या स्मार्टफोनवर फोटो कॉपी करून देण्यासाठी यूसबी डिव्हाइस देखील सोबत ठेवतात

“पण आता या धंद्यात टिकून रहायचं असेल तर हे सगळं वागवणं आलं,” गंगाराम म्हणतात. फोटोग्राफर किमान ६-७ किलोचं ओझं पाठीवर वाहतात – कॅमेरा, प्रिंटर, अल्बम, फोटोचे कागद (५० कागदाच्या पुड्याची किंमत रु. ११०, शाईच्या कार्ट्रिजचा खर्च वेगळा). “आम्ही दिवसभर इथे लोकांना फोटो काढून घ्या म्हणून पटवत उभे असतो. माझी पाठ भरून येते,” गंगाराम सांगतात. ते नरिमन पॉइंट वस्तीत राहतात. गृहिणी असणारी पत्नी कुसुम आणि तीन मुलं असं त्यांचं कुटुंब आहे.

त्यांनी गेटवेवर काम सुरू केलं तेव्हा सुरुवातीच्या काळात तर मुंबई दर्शन करायला आलेली काही कुटुंबं इथल्या फोटोग्राफरना मुंबईतल्या इतर स्थळांवर सोबत घेऊन जायची. हे फोटो गिऱ्हाइकांना पोस्टाने किंवा कुरियरने पाठवले जायचे. जर फोटो अंधुक किंवा धूसर आले तर हे फोटोग्राफर पाकिटात पैसे आणि दिलगिरी व्यक्त करणारी चिठ्ठीही पाठवून द्यायचे.

“सगळं विश्वासावर चालायचं. भल्याचा जमाना होता. कुठून कुठून लोक यायचे, त्यांना फोटोचं फार मोल होतं. त्यांच्यासाठी ती आठवण असायची, घरी परत गेल्यावर आपल्या घरच्यांना दाखवायची असायची. त्यांचा आमच्यावर आणि आमच्या फोटोग्राफीवर विश्वास होता. आमची खासियत म्हणजे आम्ही अशा काही कोनातून फोटो काढायचो की वाटावं तुम्ही गेटवेला [शिखराला] स्पर्श करताय,” गंगाराम सांगतात.

पण त्यांचं काम अगदी जोरात असतानाही अडचणी असायच्याच, ते सांगतात. कधी कधी कुणी तक्रार केली तर त्यांना कुलाबा पोलिस स्टेशनला बोलावलं जायचं. किंवा कधी कधी फोटो मिळाले नाहीत म्हणून संतापलेले गिऱ्हाईक गेटवेवर यायचे. “हळूहळू आम्ही आसपासच्या पोस्ट ऑफिसातले शिक्के असलेलं एक रजिस्टर सोबत ठेवायला लागलो, पुरावा म्हणून,” गंगाराम सांगतात.

आणि कधी कधी लोकांकडे फोटो प्रिंट करून घेण्यासाठी पैसे नसायचे. तेव्हा मात्र पोस्टाने पैसे यायची वाट बघण्याची जोखीम देखील हे लोक घ्यायचे.

'Our speciality was clicking photos in such a way that in the image it looks like you are touching [the top of] Gateway or the Taj Hotel'
PHOTO • Aakanksha
'Our speciality was clicking photos in such a way that in the image it looks like you are touching [the top of] Gateway or the Taj Hotel'
PHOTO • Sunil Gupta

‘आमची खासियत म्हणजे आम्ही अशा एका कोनातून फोटो काढायचो की वाटावं तुम्ही गेटवेला किंवा ताज हॉटेलला [वरून] स्पर्श करताय’

गंगाराम सांगतात की ताज हॉटेलवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर काही दिवस काम बंद होतं, पण हळू हळू मागणी वाढायला लागली. “लोक यायचे आणि त्यांना ताज हॉटेलच्या [गेटवे ऑफ इंडियाच्या समोर] आणि ओबेरॉय हॉटेलच्या शेजारी फोटो काढायचे असायचे. या दोन्ही वास्तूंची आपापली गोष्ट होती ना,” ते म्हणतात.

बैजनाथ चौधरी देखील गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या कथांच्या चौकटीत लोकांना टिपण्याचं काम गेटवेपासून एक किलोमीटरवरच्या नरिमन पॉइंटच्या ओबेरॉय (ट्रायडंट) हॉटेलबाहेरच्या पदपथावर करतायत. आता ५७ वर्षांचे असलेले चौधरी गेल्या चाळीस वर्षांपासून फोटोग्राफी करतायत. त्यांच्या इतर अनेक सहकाऱ्यांनी मात्र दुसऱ्या वाटा चोखाळल्या आहेत.

वयाच्या १५ व्या वर्षी ते बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातल्या डुमरी गावातून आपल्या मामाबरोबर मुंबईला आले. कुलाब्याच्या पदपथावर ते दुर्बिणी विकायचे. शेतमजुरी करणारे त्यांचे आईवडील गावीच राहिले.

बैजनाथ गंगारामच्या लांबच्या नात्यातले आहेत. ते देखील सुरुवातीला पोलरॉइड कॅमेरा वापरायचे. त्यानंतर त्यांची मजल पॉइंट अँड शूट कॅमेऱ्यांपर्यंत पोचली. ते आणि त्यांच्यासारखेच इतर काही फोटोग्राफर रात्री जवळपासच्या पदपथांवर निजायचे, तेव्हा आपापले कॅमेरे ताज हॉटेलजवळच्या एका दुकानदाराकडे सुरक्षित ठेवायचे.

Baijnath Choudhary, who works at Narmian Point and Marine Drive, says: 'Today I see anyone and everyone doing photography. But I have sharpened my skills over years standing here every single day clicking photos'
PHOTO • Aakanksha
Baijnath Choudhary, who works at Narmian Point and Marine Drive, says: 'Today I see anyone and everyone doing photography. But I have sharpened my skills over years standing here every single day clicking photos'
PHOTO • Aakanksha

नरिमन पॉइंट आणि मरीन ड्राइव्हवर काम करणारे बैजनाथ चौधरी म्हणतातः ‘आजकाल तर जो दिसतोय तो फोटो काढतोय. पण दररोज इथे उभं राहून एकेक फोटो काढत मी माझं कौशल्य आत्मसात केलं आहे’

अगदी सुरुवातीच्या काळात दिवसाला ६-८ गिऱ्हाईक झाले तरी १००-२०० रुपये कमाई व्हायची. हळू हळू ती ३००-९०० रुपये इतकी वाढली. आणि मग स्मार्टफोनचं आगमन झालं आणि हीच कमाई दिवसाला १००-३०० रुपये इतकी खालावली. आणि आता तर टाळेबंदी लागल्यापासून दिवसाला कसे बसे ३० ते १०० रुपये मिळतायत, ते म्हणतात. कधी कधी तर काहीच नाही.

साधारणपणे २००९ पर्यंत ते उत्तर मुंबईच्या सांताक्रूझ भागातल्या पबमध्ये देखील फोटो काढायचं काम करायचे. तिथे त्यांना एका फोटोचे ५० रुपये मिळायचे. सकाळी ९ ते रात्री १० मी इथे [नरिमन पॉइंटवर] धावपळ करायचो. आणि जेवण झाल्यावर क्लबमध्ये जायचो, बैजनाथ सांगतात. त्यांचा थोरला मुलगा, विजय, वय ३१ हा देखील गेटवेवर फोटोग्राफर म्हणून काम करतो.

बैजनाथ आणि इतर फोटोग्राफर सांगतात की त्यांना काम करण्यासाठी कुठला परवाना लागत नाही, पण २०१४-१५ पासून त्यांना मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून ओखळपत्रं देण्यात आली आहेत. त्यासोबत कपड्यांसंबंधी काही नियम तसंच वर्तणुकीसाठीही काही नियम आणि अपेक्षाही आहेत. उदा. वास्तूपाशी कुठलं बेवारस सामान सापडलं तर किंवा स्त्रियांची कुणी छेड काढत असेल तर मध्ये पडणे, त्याची खबर देणे, इत्यादी (या बाबींची खातरजमा होऊ शकलेली नाही).

त्या आधी कधी कधी मनपाचे अधिकारी किंवा पोलिस त्यांना दंड ठोठावून काम बंद करायला लावायचे. त्यांच्या सगळ्यांच्या अडचणी संघटितपणे सोडवण्यासाठी १९९० च्या सुरुवातीला फोटोग्राफर्सनी एक कल्याणकारी मंडळ स्थापन केल्याचं बैजनाथ आणि गंगाराम सांगतात. “आमच्या कामाला ओळख मिळावी अशी आमची इच्छा होती, आम्ही आमच्या हक्कांसाठी लढत होतो,” बैजनाथ म्हणतात. २००१ साली किमान ६०-७० जणांनी आझाद मैदानात निदर्शनं केली होती. अवाजवी निर्बंध न घालता जास्त वेळ काम करायला परवानगी मिळावी अशीही त्यांची मागणी होती. २००० साली त्यांच्यापैकी काही जणांनी गेटवे ऑफ इंडिया फोटोग्राफर युनियन स्थापन केली आणि ते आपल्या मागण्या घेऊन स्थानिक आमदाराला देखील भेटले होते. यातून थोडा दिलासा मिळाला आणि बृमनपा किंवा स्थानिक पोलिसांच्या त्रासाशिवाय काम करण्यासाठी जागा देखील.

A few photographers have started working again from mid-June – they are still not allowed inside the monument complex, and stand outside soliciting customers
PHOTO • Aakanksha
A few photographers have started working again from mid-June – they are still not allowed inside the monument complex, and stand outside soliciting customers
PHOTO • Aakanksha

काही फोटोग्राफर जूनच्या मध्यावर परत काम सुरू करतायत – त्यांना या वास्तूच्या आवारात जाण्याची परवानगी मिळालेली नाही आणि त्यामुळे बाहेरच गिऱ्हाइक गाठायचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत

बैजनाथ यांना सुरुवातीचा काळ आजही आठवतो. त्या काळी फोटोग्राफीला मान होता. “आजकाल जो उठतो तो फोटोग्राफी करतोय,” ते म्हणतात. “पण गेली किती तरी वर्षं रोज एकेक फोटो काढत मी माझं कौशल्य आत्मसात केलंय. आमचं एका क्लिकमध्ये काम होतं. पण तुम्ही तरुण मुलं एक चांगला फोटो येण्यासाठी चिक्कार फोटो काढता आणि मग ते आणखी सुंदर करता [एडिट करून],” एक घोळका चाललेला पाहून ते फूटपाथवरून उठतात. ते त्यांना गळ घालून पाहतात, पण त्यांना फारसा काही रस दिसत नाही. त्यांच्यातला एक जण खिशातून फोन काढतो आणि सेल्फी काढायला सुरुवात करतो.

तर, तिथे गेटवे ऑफ इंडियाजवळ सुनील आणि इतर काही फोटोग्राफर जूनच्या मध्यापासून परत एकदा ‘कामाला’ जाऊ लागले आहेत. त्यांना अजूनही स्मारकाच्या आवारात जाण्याची परवानगी नाही त्यामुळे ते बाहेर, ताज हॉटेलच्या आसपास थांबून गिऱ्हाईक मिळतंय का त्याची वाट पाहत उभे आहेत. “पावसाळ्यात तुम्ही येऊन तर पहा,” सुनील म्हणतात. “आम्हाला आमचा कॅमेरा, प्रिंटर, पेपर, सगळं कोरडं कसं राहील याची काळजी असते. या सामानात भर म्हणजे एक छत्री पण असते. आणि या सगळ्याचा तोल साधत एक चांगला फोटो काढायचा असतो.”

पण हा तोल सांभाळण्यापेक्षा आपल्या कमाईची कसरत त्यांच्यासाठी जास्तच अवघड होत चाललीये. स्मार्टफोन-सेल्फीची लाट आणि टाळेबंदी यामुळे ‘एक मिनिट में फुल फॅमिली फोटो’ची साद घालणाऱ्या फोटोग्राफर्सचा आवाज आता कुणाच्या कानावर जाईना झालाय.

सुनील यांच्या पाठपिशवीत तिन्ही मुलांची शाळेची फी भरल्याच्या पावत्या आहेत (तिन्ही मुलं कुलाब्याच्या खाजगी शाळेत शिकतात). “मी शाळेला विनवणी करतोय की मला [फी भरायला] थोडा वेळ वाढवून द्या म्हणून,” ते सांगतात. सुनील यांनी गेल्या वर्षी स्वतःसाठी एक साधा छोटा फोन विकत घेतला जेणेकरून त्यांची मुलं त्यांच्या स्मार्टफोनवर अभ्यास करू शकतील. “आमचं तर जगून झालंय, पण त्यांना माझ्यासारखे उन्हाचे चटके सोसावे लागू नयेत हीच इच्छा आहे. त्यांनी थंडगार एसी ऑफिसमध्ये काम करावं,” ते म्हणतात. “दररोज कुणासाठी तरी एखादी स्मृती टिपावी आणि त्यातून माझ्या पिलांसाठी चांगलं आयुष्य साकारावं इतकीच आशा आहे.”

Aakanksha

Aakanksha is a reporter and photographer with the People’s Archive of Rural India. A Content Editor with the Education Team, she trains students in rural areas to document things around them.

Other stories by Aakanksha
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale