केसांना चोपून तेल लावून घट्ट वेणी घातलेली. चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं. पायात हवाई चपला आणि टाचांच्या जरा वर नेसलेली खादीची साडी. दिवसभराच्या कामासाठी एकदम सज्ज असं त्यांचं रुप. पण आज त्या आम्हाला पिन्नाथ रांगांच्या पल्याड असलेल्या रुद्रधारी धबधब्यावर- जिथे कुमाऊं भागातील कोसी नदीचा उगम आहे - घेऊन जाणार आहेत.

आम्ही दरवर्षी मार्च-एप्रिल मध्ये कौसानीत भरणाऱ्या लोक उत्सवात भाग घेत आहोत. कौसानी हे उत्तराखंडच्या बागेश्वर आणि अल्मोरा जिल्ह्यांच्या वेशीलगत वसलेलं, जवळपास २,४०० लोकांची वस्ती असलेलं गाव. बसंती सामंत, किंवा बहुतेक लोक म्हणतात तसं बसंती बहन, वय ६०, या प्रसंगी वक्त्या आहेत. आमच्या गटाचं नेतृत्व करायला त्यांची अशीच निवड झाली नाहीये.

काही वर्षांपूर्वी, त्यांनी कोसी नदी वाचवण्यासाठी - एका गटात कौसानीच्या आजूबाजूच्या १५-२० स्त्रिया -  असे २०० गट तयार करून एक चळवळ उभारली होती. १९९२ मध्ये सेकंदाला ८०० लिटर या दराने वाहणारा नदीचा प्रवाह २००२ च्या सुमारास आटून ८० लिटर वर आला होता. आणि तेव्हापासून सामंत आणि कौसानीच्या स्त्रियांनी कोसीचं पाणी वाचवण्यासाठी अतोनात कष्ट घेतले.

२००२ मध्ये, सामंत यांनी स्त्रियांना जिवंत झाडं तोडणं बंद करायला आणि त्याऐवजी मोठ्या पानांची,  देशी बांज जमातीची झाडं लावायला प्रोत्साहित केलं. स्त्रियांनी पाणी जपून वापरायची आणि वणवे थांबवण्याची प्रतिज्ञा केली. सामंत यांनी पर्यावरणाचा सांभाळ करणारा एक भगिनीभाव या स्त्रियांमध्ये निर्माण केला आणि गेल्या अनेक वर्षांपासून, त्यांची एकजूट कायम राहिलीये, अगदी आपल्या घरातल्या लढ्यांसाठीही त्या एकमेकींकडून बळ घेत राहिल्या आहेत.

पण, हे सारं काही होण्यापूर्वी, सामंत यांना स्वतःची लढाई लढावी लागली होती.

“माझं जगणं डोंगरासारखंच होतं - कठीण आणि नुसत्या चढाचं,” त्या म्हणतात. वयाच्या १२ व्या  वर्षी इयत्ता ५वी पूर्ण झाल्यावरच बसंती यांचं लग्न लावून देण्यात आलं. नंतर त्या आपल्या सासरी, पिथोरागढ जिल्ह्यातील थारकोट गावी रहायला गेल्या. त्या १५ वर्षांच्या होत नाहीत तोच शालेय शिक्षक असणारे त्यांचे पती मरण पावले. “सासू म्हणायची मीच त्यांचा घास घेतला,” त्या सांगतात.

Kausani Mahila Sangathan raising awareness about Kosi in a government school
PHOTO • Basant Pandey

कौसानी महिला गटाच्या एका सभेत - कोसी नदीला असलेल्या धोक्यांबद्दल सांगताना एका सरकारी शाळेत

लगेच त्यांनी आपलं सामान बांधलं आणि त्या आपल्या घरी, पिथोरागढमधील डिगरा गावी परतल्या. तिथे आपल्या आई आणि काकींसोबत गवत कापणं आणि गाईचं शेण गोळा करायला मदत करू लागल्या. बिहार मधील पोलीस विभागात कामाला असणाऱ्या त्यांच्या वडलांनी त्यांचं नाव पुन्हा शाळेत घालण्याचे प्रयत्न केले. “त्यांना वाटायचं, मी प्राथमिक शाळेत जाऊन शिकवावं,” त्या म्हणतात. पण घरच्यांचा याला टोकाचा विरोध होता. “कधी एखादं पुस्तक घेऊन वाचावं, तरी आई टोमणा मारायची, ‘आता काय ऑफिसात काम करणारेस का?’ तिला तोंड देण्याची तेव्हा हिंमत नव्हती.”

काही वर्षांनी बसंती यांनी लक्ष्मी आश्रमाबद्दल ऐकलं - १९४६ मध्ये महात्मा गांधी यांच्या शिष्या कॅथरीन हेलमन यांनी सुरु केलेलं कौसानीतील तरुण महिलांसाठीचं एक प्रशिक्षण केंद्र,. बसंती यांनी प्रवेश  मिळवण्यासाठी आश्रमाला एक पत्र धाडलं. “राधा भट्ट, तत्कालीन अध्यक्षा, त्यांनी मला बोलावून घेतलं,” त्या सांगतात. १९८० साली त्यांच्या वडलांनी त्यांना आश्रमात वर्षभराच्या शिवणकामाच्या वर्गात पाठवलं.

बसंती यांनी आपल्या वडलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपला मुक्काम वाढवून घेतला आणि लक्ष्मी आश्रमाच्या बालवाडीत शिकवायला सुरुवात केली. त्यांनी शाळा परत सुरू करण्यासाठी अर्ज भरायला सुरुवात केली. “मी वयाच्या ३१व्या वर्षी [इयत्ता १०वी,  दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम] माध्यमिक शाळा उत्तीर्ण झाले. माझी आई गावभर मिठाई वाटत फिरली,” त्या सांगतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता ३० वर्षांपूर्वी घडलेली घटना जणू काल-परवाच घडल्यासारखी भासत होती.

कालांतराने, बसंती यांनी आश्रमात पूर्ण वेळ काम करायला सुरुवात केली, त्या आजही तिथेच राहतात. त्यांनी उत्तराखंड राज्यात बालवाडी आणि महिलांचे बचत गट स्थापन करण्यात - महिलांना शिवणकाम, हस्तकला आणि कमाईसाठी इतर कलाकुसरी शिकवण्यात – मोठी भूमिका बजावली. पण त्यांना कौसानीत परत जाण्याची इच्छा होती. “माझ्या मनात आलं मी या मोठ्या शहरात राहून काय करतेय [त्या डेहराडूनला मुक्कामी होत्या], कारण खरं तर मला गावातल्या बायांसोबत राहायला हवं,” त्या म्हणतात.

त्या २००२ साली कौसानीत परतल्या - जिथे परिस्थिती गंभीर होती. गावकरी झाडं तोडत होते, परिणामांची फारशी कल्पनाही नव्हती - प्रत्येक कुटुंबाला वाटायचं की त्यांनी जळणासाठी आणि शेतीसाठी थोडं फार लाकूड वापरलं तर फार काही फरक पडणार नाही - शिवाय कोसी कोरडी पडत चालली होती. २००३ मध्ये सामंत यांनी अमर उजाला मध्ये एक लेख वाचला ज्यात म्हटलं होतं की जंगलतोड आणि वणवे जर का आटोक्यात आणले नाहीत तर कोसी १० वर्षांत नष्ट होईल – मग मात्र त्या कामाला लागल्या.

पण त्यांना वाटलं त्याहून ही समस्या गंभीर होती.

Basanti Samant
PHOTO • Basant Pandey

‘माझं जगणं डोंगरासारखंच होतं - कठीण आणि नुसतं चढाचं’ - बसंती सामंत

लाकडं गोळा करायला गावातल्या स्त्रिया तांबडं फुटण्याधीच निघायच्या. चार घास मीठ-भाकरी आणि सोबतीला थोडा भात इतकंच खाऊन त्या शेतावर जायच्या. सामंत म्हणतात तसं बरेचदा, “आधी गोळा केलेली लाकडं तशीच पडून, त्यांना किडे लागलेले असायचे” पण स्त्रियांना त्याहून जास्त लाकूड गोळा करावं लागत असे. कारण त्या जर का घरी बसल्या असत्या, “तर त्यांना नवऱ्याची आणि सासरच्या मंडळींची बोलणी खावी लागायची.” अर्धवट जेवण आणि ताकदीचं काम म्हटलं म्हणजे मग कष्टानं कमावलेला सगळं पैसे त्यांना औषध-पाण्यावर खर्च करावा लागे. अशात  “मुलांच्या शिक्षणाकडे त्यांचं क्वचितच लक्ष असायचं.”

त्यामुळे सामंत यांच्यासाठी बचत गट तयार करण्याचं उद्दिष्ट पर्यावरण संवर्धनाच्याही पलीकडे होतं. पण स्त्रिया त्यांच्यापाशी काहीच बोलत नसत - कारण बहुतेकांच्या घरातील पुरुषांना त्यांनी असल्या ‘चळवळीत’ भाग घेतलेला आवडत नव्हता.

एके दिवशी, सामंत यांनी कौसानीतील एका बस स्थानकावर काही स्त्रियांचा घोळका पाहिला. त्या घाबरत घाबरत त्यांच्याजवळ गेल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते की कोसी नदीचं पाणी फक्त पिण्यासाठीच वापरता येईल, पण स्त्रियांना शेतीसाठीही पाणी लागणार होतं. शासनाने तोवर गावात कुठेही पाण्याचे बांध अथवा कालवे बांधले नव्हते. त्यामुळे कोसी नदी वाहती राहावी, हाच उपाय शिल्लक होता.

सामंत यांनी त्यांना वृत्तपत्रातील कात्रण दाखवलं आणि ब्रिटिशांनी लागवड केलेल्या चीडऐवजी मोठ्या पानांचे बांज वृक्ष लावणं आणि त्यांचा सांभाळ करणं का गरजेचं आहे, ते समजावून सांगितलं. त्यांनी स्त्रियांना १९७०च्या दशकात उत्तराखंडच्या गढवाल भागात झालेल्या चिपको आंदोलनाचं उदाहरण दिलं. पुढच्या दहा वर्षांत त्या आपल्या शेताला पाणी कसं पुरवतील, याचा विचार करायला त्यांना भाग पाडलं. कोरड्या, मृत कोसी नदीचं भयाण चित्र त्यांच्या डोळ्यापुढे उभं केलं.

Basanti Samant delivering keynote address at the opening of the Buransh Mahotsav 2018
PHOTO • Ashutosh Kalla

नुकत्याच झालेल्या एका लोक उत्सवात बीजभाषण देताना

हा संवाद लोकांच्या मनाला भिडला. २००३ च्या सुमारास, स्त्रियांनी एक समिती स्थापन केली, तिची अध्यक्षा नेमली, आणि गावात वृक्षतोडीचं प्रमाण कमी झालं. हळूहळू, कौसानीमधील पुरुषांनीदेखील या आंदोलनाला पाठींबा द्यायला सुरुवात केली. तरीसुद्धा स्त्रिया भल्या पहाटे घरून निघायच्या, मात्र या वेळी वाळलेलं सरपण गोळा करायला. गावकऱ्यांनी वन विभागासोबत करार केला की जंगलातील सरपणावर पहिला हक्क त्यांचा असेल, पण गावकरी अथवा वन अधिकारी यांपैकी कोणीही झाडं तोडणार नाहीत. हे एक उदाहरण लोकांपुढे आलं आणि आसपासच्या गावांत स्त्रियांच्या समिती स्थापन करण्यात आल्या.

ही लढाई जिंकली तरी वेगानं आव्हानं येतच राहिलीत. उदाहरणार्थ, शासनाचा आदेश असतानाही, २००५ च्या सुमारास एका स्थानिक उपाहारगृहाचा मालक कोसी नदीचं पाणी चोरून नेत असल्याचं उघडकीस आलं. स्त्रियांनी लगेच बसंती बहन यांना खबर कळवली. त्यांनी स्त्रियांना टँकर अडवून धरायला सांगितलं. तोवर, हे आंदोलन सशक्त आणि माहित झालं होतं, म्हणूनच जेव्हा स्त्रिया ठिय्या मांडून बसल्या, मालकाने माघार घेतली, आणि तो रु. १,००० दंड भरण्यास राजी झाला. ही रक्कम महिला बचत गटाच्या खात्यात जमा झाली.

पण यात केवळ गावकरी अथवा पर्यटनाचा दोष नव्हता. एक वन अधिकारी छुप्या रीतीने लाकूड विक्रीचा धंदा चालवत होता आणि आपले कामगार घेऊन बरेचदा झाडं तोडायला यायचा. एके दिवशी, सामंत बाकी स्त्रियांसोबत त्यांना सामोरं गेल्या. त्यांनी त्याला सुनावलं, “तुम्ही स्वतः एकही रोपटं लावलं नाहीत आणि इथे येऊन सर्रास आमची झाडं तोडून नेता?” सगळ्या स्त्रिया एकत्र होत्या. त्यांची संख्या बरीच मोठी होती. या प्रकरणाचा त्यांनी अनेक महिने पिच्छा पुरवला. त्यांनी लेखी स्वरूपात माफी लिहून मागतिली- त्याने नकार दिला. त्यांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवण्याची धमकी दिली. शेवटी नोकरी जाईल या भीतीने त्याने हा धंदा बंद केला.

तेव्हापासून, हे स्थानिक गट फक्त जंगलाचे पहारेकरीच नाहीत, तर दारूचं व्यसन आणि छळ याप्रकरणी मध्यस्थी करून किंवा स्त्रियांना परिस्थिती हाताळायचं मार्गदर्शन देऊन लोकांच्या घरातील समस्या सोडवणारे गट म्हणूनही काम करत आहेत. कौसानीतील एक बचत गटाच्या ३० वर्षांच्या ममता थापा, म्हणतात तसं “अडचणी येत राहतात, पण मला त्या मांडायला आणि त्यांवर शक्य ते उपाय शोधायला एक जागा मिळाली.”

२०१६ मध्ये, महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे सामंत यांना नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला - त्यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हातून तो अभिमानाने स्वीकारला. कोसी वाचवण्यासाठी त्यांचा लढा अजूनही सुरूच आहे आणि त्या आता कचऱ्याचं विभाजन करण्यावर काम करत आहेत. कौसानी आणि आसपासच्या भागातील उपाहारगृहांच्या मालकांशी त्यांच्या सुक्या कचऱ्यावर पुनःप्रक्रिया करण्याबद्दल त्या बोलत आहेत. पण त्यांचं सर्वांत मोठं योगदान म्हणजे, त्या म्हणतात, “स्त्रिया गप्प राहणार नाहीत, याची खात्री करणं. ना आसपासच्या समित्यांमध्ये, ना ग्राम पंचायतीत, ना त्यांच्या घरी.”

बुरांश महोत्सव आयोजित करणारे थ्रीश कपूर आणि प्रसन्न कपूर यांनी ही मुलाखत घडवून आणल्याबद्दल लेखिका त्यांच्या आभारी आहेत.

अनुवादः कौशल काळू

Apekshita Varshney

Apekshita Varshney is a freelance writer from Mumbai.

Other stories by Apekshita Varshney
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo