जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या कोळावडे गावच्या खडकवाडीच्या मैत्रिणी उन्हाळ्यातल्या उन्हाविषयीची सात गाणी सादर करतायत

एप्रलिच्या गरमीत आम्ही कोळावड्याच्या खडकवाडीला जाऊन पोचलो. याच वाडीवर सुमारे वीस वर्षांपूर्वी जात्यावरच्या ओव्या गोळा करणाऱ्या टीमने काही ओव्या गोळ्या केल्या होत्या. आता हा ओव्यांचा संग्रह पारीवर सादर केला जातो आहे आणि सध्या यावर काम करणारी टीम यातल्या काही गावांना भेट देऊन यातल्या कलावंत स्त्रियांना भेट देत आहे.

आम्ही मुळशी तालुक्यातल्या खडकवाडीला पोचलो तेव्हा आमच्यापाशी २१ जणींची यादी होती ज्यातल्या बहुतेक जणी शेतकरी मराठा कुटुंबातल्या होत्या. कोळावड्याची लोकसंख्या सुमारे १००० आहे आणि गावात १८८ कुटुंबं राहतात (जनगणना, २०११).

PHOTO • Samyukta Shastri

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या कोळवड्याच्या वेशीची कमान

आम्ही गावात प्रवेश करताच, ५८ वर्षांच्या लीलाबाई कांबळे आम्हाला थेट रामाच्या मंदिरातल्या सभागृहात घेऊन जातात. आयताकृती असणारं हे सभागृह चारी बाजूंनी खुलं आहे, वरती छताला पत्रा टाकलाय आणि सभागृहाच्या भिंतीला बसण्यासाठी कट्टा केलेला आहे.

लीलाबाई ओव्या गाणाऱ्या बायांना आवाज देतात आणि हळू हळू एकेक करत काही जणी सभागृहात यायला लागतात. आमच्या यादीतल्या काही जणी आता इथे नाहीत, काही मधल्या काळात हे जग सोडून गेल्यात आणि काहींचा कुणालाच काही पत्ता नाही.

सगळ्या जणी सांगतात की हरभऱ्याची डाळ दळायला, घावनं करण्यासाठी तांदूळ दळायला आणि हळदीच्या कार्यक्रमासाठी हळद दळण्यासाठी अजूनही जाती वापरतात.

आमच्या यादीतल्या एक लक्ष्मीबाई उभे आता ६५ वर्षांच्या आहेत. “माकडांच्या त्रासामुळे आम्हाला रानात भात सोडून दुसरं काही करता येत नाही,” त्या सांगतात आणि मग अभिमानाने हसून माहिती देतात, “मला चार लेकी, एक ल्योक, ११ नातवंडं आणि २ पतवंडं आहेत.”

मुक्ताबाई उभे, वय ६०, सातवीपर्यंत शिकल्या आहेत आणि त्यांनी वाचनाची गोडी आहे. त्या म्हणतात, “मी रणजीत देसाईंची श्रीमान योगी, पांडव प्रताप हरी आणि इतर धार्मिक ग्रंथ वाचले आहेत.”

खांद्यावर कुऱ्हाड घेऊन जाणारा एक बाप्या जोरात आवाज देतो, “काय चाललंय इथं?” आम्ही त्याला सांगतो की या बाया आता ओव्या गाऊन दाखवणार आहेत, मान हलवून संमती देत तो आपल्या वाटेने निघून जातो.

PHOTO • Samyukta Shastri

सहा जणी रांगेत बसतात. उन्हाळ्यावरच्या ओव्या गाण्यासाठी त्यांची तयारी सुरू होते, एकमेकीला शब्द आणि चाल विचारली जाते, एकदा गुणगुणून पाहिली जाते, त्यांच्या गावातल्या स्त्रियांच्या किती तरी पिढ्यांकडून शिकलेल्या चाली, शब्द आठवायचा प्रयत्न होत राहतो

मुक्ताबाई एका सुताराला उन्हाळ्याच्या उन्हाचा कसा त्रास होतो त्याची ओवी गाऊन सुरुवात करतात. सुतार त्यांच्या मित्राच्या घराची माडी बांधतोय असं त्या गातात. दुसऱ्या ओवीत त्यांना ऊन लागतंय आणि त्या त्यांच्या मुलाला, भिवाला डोईवर छत्री धरायला सांगतायत. मुलगा आईच्या शब्दाच्या बाहेर नाही आणि ती सांगते ते तो लगेच ऐकतो असं प्रतीत होतं.

उन्हाळ्यातलं ऊन बोलू लागलंय आणि झाड गार सावली देतंय. आणि गाणारी ताई म्हणते माझ्या माउलीचं बाळ (म्हणजे तिचा भाऊ) वाटेनं चाललाय. पुढच्या ओवीत म्हटलंय की उन्हाळ्याचं ऊन असं लागतंय की ती तिच्या भावाच्या सावलीला जाऊन थांबलीये.

पाचवी ओवी चैत्रातल्या (एप्रिल/मे) उन्हाच्या काहिलीविषयी आहेत. ओवी गाणारी ताई म्हणते तिचा मुलगा ऊन टाळण्यासाठी पोलिसाच्या घरी निवांत थांबलाय. यातून गावातल्या पोलिसाशी चांगले संबंध असणं फायद्याचं असतं असं म्हणायचं असेल कदाचित.

“सावली पाहुनी मी तर जाते धावुनी,” सहाव्या ओवीत ताई गाते. ती तिच्या भावाच्या सावलीला थांबते, जो “डौलदार  आंब्यासारखा आहे.” कठिण काळात स्त्रियांना भावाच्या आधाराची किती गरज असते आणि तोच एक आहे जो तिचं ऐकतो, तिचा शब्द पडू देत नाही असंच यातून सुचवायचं असावं.

PHOTO • Samyukta Shastri

कोळावड्याच्या खडकवाडीतल्या एका अंगणात आंब्याला हंगामातली पहिली फळं लागलीयेत

शेवटच्या ओवीत असं गायलंय की ऐन तारुण्यात असलेल्या तिच्या मुलाला ऊन लागतंय आणि त्यामुळे बाहेर जाताना तो सोबत छत्री घेऊन निघालाय.

व्हिडिओ पाहा : 'उन्हाळीच उन चैताची केली भारी, बाळा माझा उन टाळी चौकीवाल्याच्या रंगमहाली,' कोळावडे गावातल्या बाया गातात 

अशी उन्हाळ्याची ऊन ऊन लागतं सुताराला
सांगते रे बाळा तुला माडी बांधतो मैतराला 

उन्हाळीचं ऊन ऊन लागतं माझ्या जिवा
वाणीच्या माझ्या बाळा वर छतरी धर भिवा 

उन्हाळ्याचं ऊन ऊन झाडाशी बोलतं
माझ्या माऊलीचं बाळ सोनं वाटंनं चालतं 

उन्हाळीचं ऊन ऊन करील माझं काही
बंधू माझ्याच्या मी सावली उभी राही 

उन्हाळीचं ऊन चैताची केली भारी
बाळा माझा ऊन टाळी चौकीवाल्याच्या रंगमहाली 

सावली पाहुनी मी तर जाते धावूनी
वाणीचं माझं बंधू अंबा डौलाचा पाहुनी 

गावाला गेलं बाळ छत्री नेली संगतीला
बाळायाच्या माझ्या ऊन लागतं नवतीला

PHOTO • Samyukta Shastri

कलावंतः सीताबाई उभे, सिंधू उभे, मुक्ताबाई उभे, सुलोचना ढगे, लक्ष्मीबाई उभे, नंदा उभे

गावः कोळावडे

वाडीः खडकवाडी

तालुकाः मुळशी

जिल्हाः पुणे

जातः मराठा

दिनांकः या ओव्या आणि काही माहिती ६ जानेवारी १९९६ रोजी संकलित करण्यात आली. चित्रफीत आणि छायाचित्रं ३० एप्रिल २०१७ रोजी घेण्यात आली.

पोस्टरः सिंचिता माजी

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

PARI GSP Team

पारी ग्राइंडमिल साँग्ज प्रोजेक्ट टीम: आशा ओगले, जितेंद्र मैड, बर्नार्ड बेल, नमिता वाईकर

Other stories by PARI GSP Team