“चादोर बादनीच्या कठपुतळ्यांचं आमच्या पूर्वजांशी फार घनिष्ठ नातं आहे,” तोपोन मुर्मू सांगतो. “जेव्हा मी यांचे खेळ करतो ना...असं वाटतं ते सगळे माझ्या भोवती गोळा झालेत.”

२०२३ चा जानेवारी महिना. पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यात खोंजोनपूर गावातल्या शोर्पोकूरडांगा या पाड्यावर बांदना सणाचा सोहळा सुरू आहे. तोपोन तिशीचा आहे. संथाल आदिवासींच्या समृद्ध परंपरांचा, खास करून चादोर बादनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कठपुतळ्यांच्या खेळाबद्दल त्याला फार आतून प्रेम वाटतं.

पारीशी बोलत असताना, तोपोनच्या हातात एक घुमटाकार मांडव आहे. त्याला वर आणि खाली लाल चुटुक कापड गुंडाळलेलं आहे. आणि आतमध्ये अनेक छोट्या छोट्या लाकडी पुतळ्या आहेत. छोटी माणसंच. या पुतळ्यांचा खेळ करण्यासाठी वेगवेगळ्या बांबूच्या काड्या, खटके आणि एका रस्सीचा वापर केला जातो.

“माझ्या पायाकडे लक्ष द्या आणि मग मी या बाहुल्यांना कसा नाचवतो ते पाहतच रहाल,” असं म्हणत तोपोन संथाली भाषेतलं एक गाणं गुणगुणू लागतो. आणि त्याबरोबर चिखलाने माखलेले त्याचे पाय ताल धरू लागतात.

Left: Chadar Badni is a traditional puppetry performance of the Santhal Adivasi community.
PHOTO • Smita Khator
Right: Tapan Murmu skillfully moves the puppets with his feet
PHOTO • Smita Khator

डावीकडेः चादोर बादनी हा कठपुतळ्यांचा खेळ आहे, संथाल आदिवासींची ही परंपरागत कला आहे. उजवीकडेः तोपोन मुर्मू अगदी सफाईने आपले पायांच्या हालचाली करतो आणि बाहुल्या नाचू लागतात

Tapan Murmu, a Santhal Adivasi farmer from Sarpukurdanga hamlet, stands next to the red dome-shaped cage that has numerous small wooden puppets
PHOTO • Smita Khator

तोपोन मुर्मू शोर्पोकूरडांगा या पाड्यावर राहणारा संथाल आदिवासी शेतकरी आहे. त्याच्या शेजारी लाल रंगाच्या घुमटाकार मांडवामध्ये लाकडाच्या अनेक पुतळ्या आहेत

“चादोर बादनी हा सण साजरा करण्याचा एक नाच आहे. आमच्या सणांमध्ये, सोहळ्यांमध्ये कठपुतळ्यांचे खेळ असतात. बांदना म्हणजेच सुगीच्या सणात, लग्न आणि दुर्गापूजा काळात दासैं या संथाल आदिवासींच्या सणात हे खेळ केले जातात,” तोपोन सांगतो.

तो बाहुल्यांची ओळख करून देतो. “मध्यभागी दिसतोय तो मोडोल [गावाच्या म्होरक्या]. तो टाळ्या वाजवतो आणि बोनोम [लाकडापासून बनवलेलं एकतारी वाद्य] आणि बासरी वाजवतो. एका बाजूला स्त्रिया नाच करतात आणि दुसऱ्या बाजूला पुरुष धामशा आणि मादोल [आदिवासी तालवाद्यं] वाजवतायत.”

बांदना हा बिरभूमच्या संथाल आदिवासींचा सुगीचा सर्वात मोठा सण आहे. हाच सोहराई म्हणून देखील ओळखला जातो. हा सण साजरा करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे नाच सादर होतात, लोक सोहळा साजरा करतात.

चादोर बादनीमध्ये वापरल्या जाणाऱ्या बाहुल्या बांबूच्या किंवा लाकडी असतात आणि सुमारे नऊ इंच उंच  असतात. त्या सगळ्या एका छोट्याशा मंचावर ठेवलेल्या असतात आणि वरती एक छत असतं. वरती लाल रंगाची चादर असते. तिच्या आड बाहुल्यांची हालचाल करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मंचाखाली असलेल्या सगळ्या तारा, दोरे आणि तरफ झाकली जाते. कठपुतळ्यांचा सूत्रधार या दोऱ्या आणि काठ्यांची हालचाल करून तरफेच्या मदतीने बाहुल्यांचे खेळ करतो.

जुने जाणते संथाल सांगतात की या खेळाचं नाव बाहुल्या ठेवलेल्या या रचनेभोवती बांधलेल्या चादरीवरून, किंवा कापडावरून पडलं आहे.

तोपोनचा बाहुल्यांचा खेळ म्हणजे अस्सल संथाली नृत्याचा नमुना. त्याच दिवशी दुपारी या नाचाची प्रेरणा ठरणारं खरं खरं नृत्य देखील आम्ही पाहिलं

व्हिडिओ पहाः चादोर बादनी बाहुल्यांसोबत बांदना सणाचा सोहळा

तोपोन सांगतो की या खेळासोबत गायली जाणारी गाणी गावातल्या काही मोजक्या वयस्कांनाच येतात. बाया आपापल्या गावात सणाची गाणी गातात तर गडी चादोर बादनीचे खेळ घेऊन आसपासच्या गावांमध्ये जातात. “आम्ही सात-आठ जण धामसा आणि मोदोल घेऊन या भागातल्या आदिवासी पाड्यांवर फिरतो. या बाहुल्यांच्या खेळासाठी बरीच वाद्यं लागतात.”

जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या आधी दहा दिवस साजरा केला जाणाऱ्या या सणात गावात एकूण काय वातावरण असतं तेही तोपोनच्या बोलण्यातून आपल्याला जाणवत राहतं. संक्रांतीला या सोहळ्याची सांगता होते.

“सगळीकडे आनंदीआनंद असतो. घरी नवी भातं आलेली असतात – आणि म्हणूनच बांदना साजरा होतो. या सगळ्या सणात किती तरी वेगवेगळे विधी देखील केले जातात. सगळे नवे कोरे कपडे घालतात,” तो सांगतो.

पूर्वजांचं प्रतीक म्हणून पूजल्या जाणाऱ्या शिळा आणि झाडांना संथाल आदिवासी नैवेद्य दाखवतात. “खास पदार्थ केले जातात. आम्ही नव्या तांदळापासून हांडिया बनवतो, विधी म्हणून शिकारीला जातो. घरं साफ होतात, सजवली जातात. शेतीची अवजारं साफ करतो, दुरुस्त करून घेतो. आमच्या गायी-गुरांची पूजा केली जाते.”

या हंगामात सगळा आदिवासी समुदाय एकत्र येतो आणि चांगलं फळावं-फुलावं म्हणून वेगवेगळ्या पूजा केल्या जातात. “[आम्हाला] जगवणारं सगळं आमच्यासाठी पवित्र आहे आणि परब सुरू असताना त्या सगळ्याची पूजा केली जाते,” तोपोन सांगतो. संध्याकाळी सगळे जण गावात मध्यभागी असलेल्या माझीर ठाण [पूर्वजांचं ठाणं] इथे जमतात. “गडी, बाया, मुलं-मुली, लहान लेकरं आणि म्हातारी-कोतारी सगळेच यात भाग घेतात,” तो सांगतो.

Residents decorate their homes (left) during the Bandna festival in Sarpukurdanga.
PHOTO • Smita Khator
Members of the community dance and sing together (right)
PHOTO • Smita Khator

डावीकडेः बांदना सणाच्या काळात गावातले लोक घरं सजवतायत. उजवीकडेः शोर्पोकूरडांगा या तपनच्या गावी सण जोरात सुरू आहे. गावातले लोक एकत्र नाच-गाण्यांमध्ये रमलेले दिसतायत

Left: Earthen jars used to brew their traditional liquor, Hanriya.
PHOTO • Smita Khator
Right: Tapan in front of the sacred altar where all the deities are placed, found in the centre of the village
PHOTO • Smita Khator

डावीकडेः हांडिया तयार करण्यासाठी वापरले जाणारे मातीचे घडे. उजवीकडेः गावाच्या मध्यभागी असलेल्या पवित्र मानल्या जाणाऱ्या माझीर ठाण या जागेसमोर उभा असलेला तोपोन. इथेच सगळ्या देवतांची स्थापना केली जाते

तोपोन सादर करत असलेला बाहुल्यांचा खेळ म्हणजे संथाली नाचाचा अस्सल नमुना. पण हा फक्त पहिला खेळ आहे. दुपारी या नाचाची प्रेरणा असलेला खरा-खुरा नाच पाहण्यासाठी यायचं आवतन आम्हाला मिळतं.

रंगीत कपडे, डोक्यावरती नाजूक फुलं वगैरेंची नक्षी केलेल्या लाकडी बाहुल्यांची जागा आता खऱ्याखुऱ्या हाडामांसाच्या माणसांनी घेतलीये. पारंपरिक संथाली पोषाखातली ही माणसं तालावर सहज डुलतायत. पुरुषांच्या डोक्यावर पगड्या आहेत तर बायांनी अंबाड्यात फुलं माळली आहेत. धामसा आणि मोदोलच्या तालावर सगळेच थिरकतायत आणि डुलतायत. सगळी हवाच भारल्यासारखी वाटतीये.

पिढ्या न पिढ्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या या खेळातल्या बाहुल्यांबद्दल गावातली काही जुनी जाणती मंडळी सांगतात. तर असं म्हटलं जातं की एक नृत्यगुरू होते. गावाच्या आसपासच्या गावात जाऊन नाच सादर करण्यासाठी नाचणाऱ्या सगळ्यांना गोळा करायचं त्यांनी गावाच्या म्होरक्याला सांगितलं. संथाल पुरुषांनी आपल्या बाया आणि मुलींना पाठवायला नकार दिला पण आपण वाद्यं वाजवू असं सांगितलं. काहीच पर्याय दिसत नाही म्हटल्यावर त्या गुरूंनी स्त्रियांचे चेहरे लक्षात ठेऊन चादोर बादनीच्या लाकडी बाहुल्यांचे चेहरे हुबेहूब तसेच कोरले.

“आता कसं झालंय, माझ्या पिढीच्या लोकांना आमचं जगणं, राहणं कसं असतं ते काहीच माहिती नाही,” तोपोन सांगतो. “या बाहुल्या, त्यांचे खेळ, बीमोड झालेली भातं, कलाकुसर, गोष्टी, गाणी इतरही किती तरी गोष्टी त्यांना माहितीच नाहीत.”

सणाच्या त्या सगळ्या आनंदात मिठाचा खडा नको म्हणून हा विषय आवरता घेत तो म्हणतो, “या परंपरा जपणं हा मुद्दा आहे. माझ्या परीने होईल ते मी करतोय.”

Smita Khator

اسمِتا کھٹور، پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) کے لیے ’ٹرانسلیشنز ایڈیٹر‘ کے طور پر کام کرتی ہیں۔ وہ مترجم (بنگالی) بھی ہیں، اور زبان اور آرکائیو کی دنیا میں طویل عرصے سے سرگرم ہیں۔ وہ بنیادی طور پر مغربی بنگال کے مرشد آباد ضلع سے تعلق رکھتی ہیں اور فی الحال کولکاتا میں رہتی ہیں، اور خواتین اور محنت و مزدوری سے متعلق امور پر لکھتی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز اسمیتا کھٹور
Editor : Vishaka George

وشاکھا جارج، پاری کی سینئر ایڈیٹر ہیں۔ وہ معاش اور ماحولیات سے متعلق امور پر رپورٹنگ کرتی ہیں۔ وشاکھا، پاری کے سوشل میڈیا سے جڑے کاموں کی سربراہ ہیں اور پاری ایجوکیشن ٹیم کی بھی رکن ہیں، جو دیہی علاقوں کے مسائل کو کلاس روم اور نصاب کا حصہ بنانے کے لیے اسکولوں اور کالجوں کے ساتھ مل کر کام کرتی ہے۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز وشاکا جارج