भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते लढले. आणि आता स्वातंत्र्य मिळून ७० वर्षं झाली तरी त्यांचा लढा चालूच आहे – आताचा लढा मात्र देशातल्या शेतकरी आणि शेतमजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी.

हौसाबाई पाटील , वय ९१. १९४३ साली महाराष्ट्रातील सातारा प्रांतात इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्याचं जाहीर करणाऱ्या प्रति सरकारच्या (सातारा प्रांतातील हंगामी भूमीगत सरकार) तुफान सेना या सशस्त्र सेनेच्या सदस्य. १९४३ ते १९४६ या काळात इंग्रजांच्या आगगाड्यांवर हल्ले करणाऱ्या आणि त्यांचा खजिना व पोस्ट खाती लुटणाऱ्या क्रांतीकारकांच्या गटात हौसाबाई होत्या.

आणि तुफान सेनेचे ‘सरसेनापती’ होते, रामचंद्र श्रीपती लाड, ज्यांना लाडाने सगळे कॅप्टन भाऊ म्हणतात. ७ जून १९४३ रोजी इंग्रज राजवटीतील अधिकाऱ्यांचे पगार घेऊन जाणाऱ्या पुणे-मिरज गाडीवर भाऊंनी अविस्मरणीय असा हल्ला चढवला होता.

सप्टेंबर २०१६ मध्ये वयाची ९४ वर्षं पूर्ण केलेल्या कॅप्टन भाऊंना आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला हे आवर्जून सांगितलं की ­“लुटलेला पैसा कुणा व्यक्तीच्या खिशात गेला नाही, तर प्रति सरकारकडे गेला. आम्ही तो पैसा गरीब आणि गरजूंना वाटला.”

दिल्लीमध्ये २९-३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या किसान मुक्ती मोर्चाची जय्यत तयारी सुरू असताना कॅप्टन भाऊ आणि हौसाबाईंनी शेतीवरच्या अरिष्टावर चर्चा करण्यासाठी संसदेचं २१ दिवसांचं अधिवेशन बोलावण्यात यावं या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा जाहीर केला.

या चित्रफितींमध्ये कॅप्टन भाऊ आपल्याला याद करून देतात की शेतकऱ्यावर जीव द्यायची वेळ यावी यासारखी शरमेची बाब नाही आणि हौसाबाई ठासून सांगतात की सरकारने शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव द्यावा आणि झोपलेल्या सरकारने आता तरी जागं होऊन गरिबाला न्याय देण्याचं काम करावं.

Bharat Patil

بھرت پاٹل پیپلز آرکائیو آف رورل انڈیا کے رضاکار ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز بھرت پاٹل
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے