अनंतपूर जिल्ह्यातल्या नागरूरच्या शेतकऱ्यांना पूर्वीचे दिवस परत यावेत असं मनापासून वाटतंय, तेच दिवस जेव्हा जमिनीखाली मुबलक पाणी असायचं. २००७ च्या आधीच्या त्या काळाबद्दल बोलताना ते आजही वर्तमानकाळातच बोलतात, जणू काही त्या मानाने समृद्ध असणारे ते दिवस मागे टाकायला त्यांचं मन आजही तयार नाहीये.

साधारणपणे २००७ च्या सुमारात पावसाचं प्रमाण कमी कमी होऊ लागलं होतं. नागरूरच्या जवळची तळी शेवटचीच काय ती तुडुंब भरली. “एनटीआर (आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री) होते त्या काळात पाऊस नेमाने पडायचा. वाय एस राजशेखर रेड्डी आले (सत्तेमध्ये, मे २००४) तेव्हा आसपासची तळी (जोरदार वृष्टीमुळे) आठवडाभर ओसंडून वाहत होती. ते शेवटचंच,” ४२ वर्षाचे शेतकरी असणारे व्ही रामकृष्ण नायडू सांगतात.
PHOTO • Sahith M.

‘एनटीआर (आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री) होते त्या काळात पाऊस नेमाने पडायचा,’ गावात दुष्काळ ठाण मांडून बसण्याआधीच्या काळाविषयी सांगताना व्ही रामकृष्ण नायडू

तसं पाह्यला गेलं तर काही वर्षं कमी पाऊस पडला तरी त्यानंतर एखादं वर्ष दमदार पाऊस व्हायचा. त्यामुळे विहिरी भरायच्या, जमिनीत पाणी मुरायचं, भूजल वाढायचं. पण हळू हळू हे सगळंच बदललं. २०११ च्या आधी, काही वर्षांमध्ये नागरूरमध्ये (भूजल व जल लेखा परीक्षण विभाग, अनंतपूर यांच्या नोंदीप्रमाणे) एका वर्षात ७००-८०० मिमि पाऊस झाला होता. पण जून २०११ नंतर या गावातली सर्वोच्च नोंद आहे ६०७ मिमि (जून २०१५ - मे २०१६) आणि त्यानंतर मात्र इतर वर्षांसाठी केवळ ४०० ते ५३० मिमि.

खरं तर अनंतरपूर जिल्ह्यातल्या या ७५० च्या आसपास गावांमध्ये १९९० उजाडलं तेव्हाच पाण्याची कमतरता जाणवायला लागली होती. त्या दशकामध्येच अंदाजे २३०० लोकसंख्येच्या नागरूरमधल्या शेतकऱ्यांनी नाचणी आणि लिंबाचं पारंपरिक पीक सोडून भुईमूग आणि संत्र्यासारखी नगदी पिकं घ्यायला सुरुवात केली होती. “तेव्हा त्याचा जोर होता, त्यात जास्त पैसा होता, त्यामुळे लोक ही पिकं घेत होते,” शेतकरी असणारे सुनील बाबू सांगतात.

PHOTO • Sahith M.

के श्रीनिवासुलु आणि त्यांच्या कुटुंबाने बोअर पाडण्यावर १० लाखाहून जास्त पैसा खर्च केला आहे आणि ठिबकद्वारे जमीन भिजवण्यासाठी वरचे दोन लाख

जास्त पाणी लागणाऱ्या पिकांकडे कल, त्यात पाऊसमान कमी. त्यामुळे अर्थातच जास्तीत जास्त बोअरवेल आणि खोल खोल जाऊन पाणी उपसायचा आटापिटा. “चाळीस वर्षांपूर्वी [जमिनीला] अशी भोकं होती का? तेव्हा फक्त विहिरी असायच्या (स्वतः खणलेल्या). फक्त १० फूट खणलं तरी पाणी लागत होतं तेव्हा,” सत्तरीला पोचलेले, सुनील बाबूंचे शेतकरी वडील, के श्रीनिवासुलु त्या काळच्या आठवणी सांगतात.

पण भूजलाच्या पातळीत झपाट्याने घट व्हायला लागली – १९७२ मध्ये भूजल व जल लेखा परीक्षण विभाग या नोंदी ठेवू लागला तेव्हापासूनची सगळ्यात नीचांकी नोंद – आणि जमिनीत मुरणारं पाणी कमी होऊ लागल्यामुळे आता बोअर ६००-७०० फूट खोल जाऊ लागल्या आहेत. नागरूरच्या काही शेतकऱ्यांचं तर असं म्हणणं आहे की ते १००० फुटापर्यंत खाली गेलेत तरी पाणी लागलेलं नाही.

परिणामी, बोअरद्वारे जमिनी भिजवण्याचं प्रमाण वाढायला लागल्याने भूजलाचा साठा कमी होऊ लागलाय आणि साध्या खणलेल्या विहीरीही कोरड्या पडू लागल्या आहेत. एम एस स्वामिनाथन फौंडेशनने २००९ साली केलेल्या अभ्यासात म्हटलं आहे की, “अनंतपूर जिल्ह्याच्या ६३ मंडळांपैकी केवळ १२ मंडळं भूजल वापराच्या ‘सुरक्षित’ या श्रेणीत येतात...”

PHOTO • Sahith M.

नागरूरमध्ये किती खोलीवर भूजल उपलब्ध आहे ते दाखवणारा नकाशा – २००१-०२ मध्ये १० मीटर ते २०१७ मध्ये २५ मीटर. मधल्या काही वर्षांमध्ये ही पातळी अजून खालावली आहे मात्र सरासरीदेखील कमी होत चालली आहे. (भूजल व जल लेखा परीक्षण विभाग, अनंतपूर). उजवीकडेः के श्रीनिवासुलु त्यांच्या शेतातल्या पाणी न लागलेल्या बोअरचं तोंड दाखवताना

श्रीनिवासुलु यांनी त्यांच्या ९ एकर रानात आठ बोअर पाडल्या आहेत, प्रत्येक बोअरवर १ लाखाचा खर्च. त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी एका खाजगी सावकाराकडून ५ लाखाच्या घरात कर्जं घेतली आहेत. या सगळ्यातली फक्त एकच बोअर सध्या काम करत आहे. तीही त्यांच्या रानापासून २ किमी लांब आहे. तिकडनं रानापर्यंत पाणी आणण्यासाठी ठिबकच्या पाइपांवर त्यांनी २ लाख खर्च केले आहेत. “आमच्या तोंडचा घास असणारी ही पिकं जगवण्यासाठी हा सगळा आटापिटा,” श्रीनिवासुलु सांगतात.

श्रीनिवासुलुंसारखं हातघाईवर आलेल्या इतर शेतकऱ्यांनीही नशीब आजमावण्यासाठी बोअर पाडण्याचा सपाटा लावला आणि २०१३ पर्यंत या जिल्ह्यातला बोअरचा आकडा सुमारे २ लाखावर गेला – अनंत प्रस्थानम या आपल्या पुस्तकात डॉ. वाय व्ही मल्ला रेड्डी यांनी हा आकडा नोंदवला आहे. रेड्डी अनंतपूरमध्ये अक्सिआँ फ्रातेर्ना इकॉलॉजी सेंटरमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. “यातल्या ८०,००० बोअर २०१३ च्या उन्हाळ्यातच आटल्या आहेत हे आम्ही जाणतो,” ते लिहितात.

२०१७ मध्ये हा आकडा २.५ लाख इतका झाला आहे, रेड्डी यांनी आम्हाला सांगितलं. “इथल्या [भूजल विभाग] अधिकाऱ्यांनी मला सांगितलंय की यातल्या फक्त २०% बोअर काम करतायत बाकी ८०% बंद आहेत.”

PHOTO • Sahith M.

नागरूरमध्ये पाणी न लागलेली एक बोअरवेल आणि तिचं तोंड झाकण्यासाठी ठेवलेला दगड

त्या ८०% बंद बोअरवेलमध्ये रामकृष्ण नायडूंच्या रानातल्या दोन विहिरींचाही समावेश होतो. २००० नंतर त्यांनी त्यांच्या साडेपाच एकर रानात तीन बोअर पाडल्या, त्यातली आता फक्त एक चालू आहे. “मी २०१०-११ नंतर कर्ज काढायला सुरुवात केली. त्याआधी सगळीकडे भरपूर झाडोरा होता आणि पाणीदेखील बक्कळ होतं. कसलंही कर्ज नव्हतं तेव्हा,” नायडू सांगतात. आता त्यांच्यावर खाजगी सावकारांचं २.७० लाखाचं कर्ज आहे आणि ते शेतीतून येणाऱ्या उत्पन्नातून केवळ दर महिन्याचं व्याज चुकवू शकतायत. “माझा रातभर डोळा लागत नाही. मनात सतत सावकारांचाच विचार येत राहतो. आता उद्या पैसे मागायला कोण दारात उभा ठाकणार? सगळ्या गावासमोर कोण माझी लाज काढणार?”

कर्जाचा बोजा, एकाहून अधिक बोअरवेल तरीही पाण्याची आणि कर्जाची सततची चिंता या सगळ्यातूनही जर शेतकऱ्याच्या हाती चांगलं पीक आलंच तरीही अनंतपूरमध्ये त्याला त्यातून नफा मिळेल याची काही शाश्वती देता येत नाही. कारण शेतमालाचा बाजारभाव प्रचंड बेभरवशाचा आहे. बोअरच्या पाण्यावर एप्रिलमध्ये नायडूंनी सांबारमध्ये वापरल्या जाणाऱ्या काकडीचं चांगलं उत्पादन घेतलं. त्यातून बरा पैसा मिळेल अशी त्यांना आशा होती. “मी काकडी काढायच्या दहाच दिवस आधी भाव १४-१५ रु. किलोवरून १ रु. किलोवर आला,” ते सांगतात. “माझा बियाणाचा खर्चही त्यातून निघाला नसता. मी सगळी काकडी बकऱ्यांना चारली.”

PHOTO • Sahith M.

जी. श्रीरामलु त्यांच्या सहा एकर रानातल्या पाणी न लागलेल्या सहा बोअरपैकी एकीशेजारी उभे आहेत

“टोमॅटोलाही भाव नाही,” जी श्रीरामलु सांगतात. २०१६ च्या डिसेंबरमध्ये बोअरच्या पाण्यावर उत्तमरित्या टोमॅटो पिकवूनही त्यांना नुकसान सोसावं लागलं. त्यांच्या सहा एकराच्या रानात सहा कोरड्या बोअरवेल आहेत. त्यांच्या गावाबाहेर असलेल्या श्री साई टिफिन हॉटेलमध्ये बसून चहा पिता पिता ते त्यांच्या बोअरबद्दल आमच्याशी बोलतात. सकाळी ७.३० च्या सुमारास खरं तर एरवी इथे गजबज असते, बहुतेक करून शेतकऱ्यांची. शेती नीट पिकत नसल्याने रानात फार काही काम नसणारे किंवा रोजगार मिळवण्यासाठी मनरेगाच्या कामांवर किंवा बांधकामांवर जाणारे शेतकरी. २००३ मध्ये कुंभारकाम करणाऱ्या के नागराजू यांनी हे हॉटेल सुरू केलं. “सुरुवातीला दिवसाला २००-३०० रुपयांचा धंदा व्हायचा. आता दिवसाला जवळ जवळ १००० रुपयाची कमाई होते.”

इथे शेतकरी अनेक विषयांवर चर्चा करत असतात – केंद्रातलं राजकारण ते अगदी बोअरवेलच्या बाबतीतलं त्यांचं नशीब आणि त्यांची कर्ज, इ. “पूर्वी पार्ट्या फक्त गावच्या पुढाऱ्यांसाठी असायच्या. आता मात्र जे काही आहे ते फक्त गंगम्मा साठी (पाण्यासाठी),” हॉटेलमधला एक गिऱ्हाइक उपहासाने म्हणतो. याचा अर्थ असा, की पूर्वी गटा-तटाच्या भांडणांमध्ये अटक होऊ नये म्हणून गावकरी पुढाऱ्यांना पार्ट्या द्यायचे पण आता मात्र त्यांचा सगळा पैसा फक्त पाण्यावर खर्च होतोय.

PHOTO • Sahith M.

नागरूरच्या बाहेर असलेल्या श्री साई टिफिन हॉटेलमध्ये येणारे बहुतेक सगळे शेतकरी आहेत, नापिकीमुळे हाताला काम नसणारे किंवा रोजगारासाठी कामावर निघालेले.

दर वर्षी पाणी तळ गाठत चाललंय, आणि इथे शेती हा इतका नावडता धंदा झाला आहे की कित्येक जण सांगतात की नागरूरमध्ये कुणीही शेतकऱ्याच्या घरात मुलगी द्यायला राजी नसतं. “मला माझ्याच गावातल्या एका मुलीशी लग्न करायचं होतं,” नायडू सांगतात. “तिच्या पालकांनी सांगितलं की आम्ही तयार आहोत, पण तुला हैद्राबाद किंवा इतर कुठे तरी नोकरी मिळायला पाहिजे. त्यांच्या मुलीनी शेतकऱ्याशी लग्न करावं अशी काही त्यांची इच्छा नव्हती.”

नायडूंना वकिली करायची होती. “तसं आयुष्य फार छान झालं असतं. मला लोकांना न्याय मिळवून द्यायला मदत करता आली असती,” ते म्हणतात. पण घरच्या तंट्यांमुळे त्यांना पदवीचं शिक्षण अर्धवट सोडून शेतीत परतावं लागलं होतं. आज त्यांचं वय आहे ४२, अजूनही अविवाहित आणि मनात अनेक अपूर्ण स्वप्नं आणि आशा आकांक्षा.

अनुवादः मेधा काळे

Rahul M.

راہل ایم اننت پور، آندھرا پردیش میں مقیم ایک آزاد صحافی ہیں اور ۲۰۱۷ میں پاری کے فیلو رہ چکے ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Rahul M.
Sahith M.

ساہتھ ایم حیدرآباد سنٹرل یونیورسٹی سے پولیٹیکل سائنس میں ایم فل کر رہے ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Sahith M.
Translator : Medha Kale

میدھا کالے پونے میں رہتی ہیں اور عورتوں اور صحت کے شعبے میں کام کر چکی ہیں۔ وہ پیپلز آرکائیو آف رورل انڈیا (پاری) میں مراٹھی کی ٹرانس لیشنز ایڈیٹر ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز میدھا کالے